चित्रपटाचा ७० एमएमचा पडदा आणि चित्रवाणीचा २१ इंची पडदा ही जातिव्यवस्था यशस्वीपणे मोडीत काढणारा ‘कौन बनेगा करोडपती?’ पाव शतकभर सुरू आहे…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वाय टू के’ची भीती अगदीच खोटी ठरली, बिल क्लिंटन भारतात आले, पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी ‘आयसी १८४’च्या अपहरणासाठी पाकिस्तानला बोल लावले, अझीम प्रेमजी सर्वात श्रीमंत आशियाई बनले, ओरिसात नवीन पटनाईक यांचे पहिलेवहिले सरकार अस्तित्वात आले, आयोम शर्मिला यांचे उपोषण सुरू झाले, यश चोप्रा यांचा ‘मोहब्बते’, राजेश रोशन यांचा ‘कहो ना प्यार है’ तुफान चालले तर ‘कही प्यार ना हो जाये’, ‘हे राम’, ‘फिझा’ आपटले असे बरेच काही घडलेल्या वर्षातच ‘देवियो और सज्जनो…’ या शब्दांनी रात्री नऊ वाजता दूरचित्रवाहिनीच्या पडद्यासमोर तमाम भारतीय टीव्ही प्रेक्षकांवर जे गारूड केले, ते आज २५ वर्षांनंतरही अगदी जसेच्या तसे आहे. एकेकाळी अँग्री यंग मॅनच्या रूपात ज्याला याच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते, त्या त्यांच्या आवडत्या नायकाचे नव्या सहस्राकाच्या नवलाईतले हे नवे रुपडे होते. मुळात त्याने त्याचा तो अंगार, चमकधमक, वलय, त्याच्याबद्दलच्या कथा-दंतकथा हे सगळे सगळे बाजूला ठेवून छोट्या पडद्यावर सामान्य लोकांना थेट त्यांच्या घरात भेटायला येणे हे खरोखरच अविश्वसनीय होते. सरकारी दूरदर्शनच्या पडद्याला भारतीयांना सरावून दहा- १५ वर्षे होईपर्यंत रंगीत टीव्ही आला आणि अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर खासगी वाहिन्यांचे आक्रमण होऊन मनोरंजनाचे नवे विश्व त्यांच्यासमोर अवतरले. पण त्यातील सासबहूचे कौटुंबिक नाट्य किती दिवस बघणार? त्यालाही कंटाळलेल्या प्रेक्षकांना काहीतरी नवे, ताजेतवाने हवे होते. दूरचित्रवाणीवरील नातेसंबंधांच्या भावनिक खेळापेक्षाही वेगळ्या, बुद्धीला चालना देणाऱ्या, खिळवून ठेवणाऱ्या, त्यांच्या स्वत:च्या जगण्याचे प्रतिबिंब असलेल्या कशाच्या तरी ते प्रतीक्षेत होते. आणि मग आला ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो. ‘हू वॉन्ट टू बी बिलिनेयर’ या १९९८ मध्ये इंग्लंडमध्ये सादर झालेल्या, नंतर ताबडतोब अमेरिकेत उचलल्या गेलेल्या आणि वेगाने लोकप्रिय झालेल्या रिअॅलिटी शोची ही भारतीय आवृत्ती होती. आणि तिचे सूत्रसंचालन करणार होते, भारतातले त्या काळातले सुपरस्टार अमिताभ बच्चन. सामान्य प्रेक्षकाला तोपर्यंत टीव्हीचे पुरते वेड लागलेलेच होते, पण कलाकारांमध्ये मात्र ७० एमएमचा पडदा आणि २१ इंची पडदा ही जातिव्यवस्था अस्तित्वात होती. सिनेसृष्टीतल्या कलाकारांच्या दृष्टीने टीव्ही, त्यावरील मालिका, डेली सोप या सगळ्या तुच्छ गोष्टी होत्या. मनोरंजनाच्या दोन्ही क्षेत्रांमध्ये एक अदृश्य भिंत होती आणि कोणीही ही ओलांडू धजत नसे.

अशा सगळ्या वातावरणात ‘कौन बनेगा करोडपती’ घेऊन अमिताभ बच्चन आले आणि छोट्या पडद्याच्या दुनियेची सगळी गणितेच बदलली. प्रेक्षकांना हवे ते सगळे काही त्या कार्यक्रमात होते. त्यात ज्ञान होते, मनोरंजन होते. आईवडीलच घरातल्या लहानग्यांना कान धरून एखादा कार्यक्रम बघायला बसवत आहेत, ही किमया फक्त याच कार्यक्रमाची. त्याआधीही क्विझ शो झाले होते, पण केबीसी बघणे हा कौटुंबिक सोहळा होता. सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी तो निखळ आनंदाचा झरा होता. अमिताभ बच्चन यांच्यासमोरच्या हॉटसीटवर कुणीही बसू शकत होते. हा कार्यक्रम बघणारा प्रत्येकजण तिथे पोहोचणाऱ्यांमध्ये आपल्या मुलामुलींना, आईवडिलांना, आत्यामावशांना, काकामामांना बघत होता. आपणही तिथे कधीतरी पोहोचू अशी महत्त्वाकांक्षा बाळगत होता. तिथे पोहोचूनही नुसते मिरवायचे नव्हतेच, तर बुद्धी पणाला लावायची होती. त्यामुळे हॉटसीटवर बसलेल्याचा ताण, त्याचा आनंद, त्याचे यशअपयश कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचे होते. मुळात आपल्या बुद्धीच्या जोरावर कोट्यधीश व्हायचे स्वप्न बघणे ही काही आलतूफालतू महत्त्वाकांक्षा नव्हती. आणि ही महत्त्वाकांक्षा त्यांना कुठे घेऊन जात होती तर थेट त्यांच्या काळातल्या महानायकापर्यंत.

गेल्या २५ वर्षांमध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाला ज्या पातळीवर नेऊन ठेवले आहे, ते केवळ कल्पनेच्या पलीकडचेच म्हणावे लागेल. या कार्यक्रमाची व्यावसायिकता, त्याचे सादरीकरण या सगळ्याबद्दल आजवर खूप सांगितले गेले आहे. पण कार्यक्रमातील आशय, एकसाचीपणा येऊ न देता वेळोवेळी कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल करणे, लाइफलाइनचे स्वरूप बदलणे, गावखेड्यातील स्पर्धकाच्या घरापर्यंत प्रेक्षकांना घेऊन जाणे, काही चुका झाल्या तर त्या मान्य करून वेळोवेळी दुरुस्त्या करणे, कार्यक्रमाचे ग्लॅमर टिकवून ठेवणे या सगळ्यातून केबीसीने उत्कंठा टिकवून ठेवलीच, पण अमिताभ बच्चन यांचे शानदार सूत्रसंचालन ही त्यावरची कडी आहे. अत्यंत अभिजात हिंदी, त्यांचा तो भारदस्त, धीरगंभीर आवाज, आपल्यामुळे प्रचंड भारावून गेलेल्या स्पर्धकाला विश्वासात घेण्याची हातोटी, सामान्य स्पर्धकांशी, त्यांच्या आशा-आकांक्षांशी जोडून घेण्याची असोशी, हजरजबाबीपणा, सुपरस्टार या प्रतिमेच्या बाहेर पडून वागण्याबोलण्यातली नम्रता, या सगळ्यातून येणारा त्यांचा करिष्मा… या सगळ्यातून येणारा त्यांचा वावर व्यावसायिकदृष्ट्या जितका सफाईदार असतो तितकाच मानवीही असतो. म्हणूनच त्यांच्यासमोर हॉटसीटवर बसलेला स्पर्धक त्यांना आपली स्वप्ने, आपली सुखदु:खे सांगतो. त्यांच्यासमोर हसतो, रडतो, गातो, नाचतो, सल्ला घेतो-देतो. या खेळात जिंकेन किंवा हरेन, पण त्यापेक्षा तुम्हाला भेटायला मिळालं यातच भरून पावलो ही स्पर्धकाची प्रतिकिया ही त्याच आत्मीयतेने येते. लहानथोर, स्त्रीपुरुष, सामान्य माणूस, सेलिब्रिटी या सगळ्यांसाठीच ती हॉटसीट ही त्यांची हक्काची जागा असते, त्यांना प्रेमाने प्रश्न विचारणारा, काळजीने चार गोष्टी सांगणारा, ते काही रक्कम जिंकल्यावर त्यांच्या आनंदात सहभागी होणारा अमिताभ बच्चन हा त्यांचा माणूस असतो आणि ‘कौन बनेगा करोडपती’ हा त्यांचा शो असतो.

गेल्या २५ वर्षांत या कार्यक्रमाचे १५ सीझन झाले आहेत आणि आता १६ वा सीझन सुरू झाला आहे. त्याचे नाक कापण्यासाठी ‘कौन बनेगा करोडपती’पेक्षाही जास्त रक्कम देण्याचा दावा करत ‘सवाल दस करोड का’ असा एक शो अनुपम खेर यांना घेऊन आणला गेला. अभिनेता गोविंदाला घेऊनही ‘जीतो छप्पर फाडके’ या शोचा प्रयत्न झाला. एवढेच कशाला, ‘कौन बनेगा करोडपती’च्या तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन अभिनेता शाहरुख खानने केले होते. पण त्याचाही तेवढा प्रभाव पडला नाही. आणि त्यानंतर ते पुन्हा अमिताभ बच्चन यांच्याकडे आले आणि २५ वर्षांच्या प्रवासात त्यांनी या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. अन्य भाषांत- यात मराठीही आली- अशा शोची नक्कल करण्याचा प्रयत्न झाला. पण तो फसला.

ते सर्व फसण्याचे आणि ‘कौन बनेगा…’ यशस्वी होण्याचे एकमेव कारण म्हणजे अर्थातच अमिताभ बच्चन यांचे नसणे आणि असणे. वास्तविक या शोने अमिताभ बच्चन यांचाही कलाकार म्हणून पुनर्जन्म झाला. व्यावसायिकदृष्ट्या रसातळाला गेलेल्या अमिताभ यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून या शोला हात घातला आणि शोचे सोने करता करता स्वत:भोवतीही सुवर्णमखर निर्माण केले. आजही ‘देवियो और सज्जनो’ हे शब्द ऐकू आले की सगळे ‘मान्यवर’ सरसावून बसतात. ‘कम्पुटरजी’ ही तर जणू केबीसीमधली एक व्यक्तिरेखाच. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराला ‘लॉक किया जाय’ हे तिचेच काम. त्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आले की पुन्हा तोच धीरगंभीर आवाज सांगतो, ‘बिलकुल सही जबाब…’ पुन्हा पुढचा प्रश्न येण्याआधी ऐकायला येतं, ‘चलिये हम और आप खेलते है, कौन बनेगा करोडपती…’. या शोने ‘कौन बनेगा करोडपती’चे उत्तर दीडएक डझन वेळा दिलेही. पण २५ वर्षांनंतरही ‘‘कौन बनेगा… अगला अमिताभ’’ या प्रश्नाच्या उत्तराचा शोध संपलेला नाही.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on amitabh bachchan 25 years of kaun banega crorepati css