येथे सनदशीर मार्गाने काहीच होऊ शकत नाही, ही तिसऱ्या जगातील भावना आपल्याकडेही दाटताना दिसते, म्हणून बदलापुरात झाली तशी अतर्क्य मागणी होते…
समाजाची म्हणून एक सामुदायिक संवेदना असते ती आपण घालवून बसलो, त्यास बराच काळ लोटला. बदलापुरात जे झाले ते या समाजशून्यतेचे निदर्शक. गावातील एका संस्कारी शाळेतील संस्कारी कर्मचारी तीन-चार वर्षांच्या, लैंगिकता म्हणजे काय हेदेखील न कळणाऱ्या वयातील मुलींचे लैंगिक शोषण करतो, त्यांच्यावर अत्याचार करतो, तरीही शाळेच्या व्यवस्थापनास याचा गंध नसतो आणि लागतो तेव्हा ‘शाळेची बदनामी नको’ म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो आणि तोही अशा संस्कार-संस्कृतीप्रेमी उपनगरात! हे काय दर्शवते? आपले बरेचसे संस्कारी हे ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ छापाचे असतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही, हे सत्य असले तरी सदरहू शाळेच्या सुविद्या, सुशिक्षित नेतृत्वास जे काही झाले ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहे, सबब त्यावर कारवाई व्हायला हवी, असे वाटू नये? आपल्या शाळेतील मुलींच्या इभ्रतीपेक्षा शाळेच्या कथित प्रतिमेची चिंता त्यांना अधिक वाटावी? स्थानिक पोलीस वगैरे यंत्रणांविषयी तर न बोललेले बरे. इंग्रजीत ‘व्हिच वे द ब्रेड इज बटर्ड…’ असे म्हटले जाते. त्या उक्तीनुसार जिकडे सरशी तिकडे पोलीस असे म्हणता येईल. त्यामुळे त्यांनीही या प्रकरणी चौकशीचा फार काही उत्साह आणि कार्यतत्परता दाखवली नाही. त्यांच्या निष्क्रियतेचा संबंध शाळा संचालकांच्या राजकीय लागेबांध्यांशी असणार याचा अंदाज बांधण्यास राजकीय पांडित्याची गरज नाही. तेव्हा इतक्या गंभीर प्रकारांनंतरही इतक्या निष्क्रियतेविरोधात समाज इतक्या तीव्रपणे व्यक्त झाला असेल तर त्यामागील कारणे समजून घेता येतील. तरीही अतर्क्य, असमर्थनीय होती या आंदोलकांची एक मागणी.
‘‘आत्ताच्या आत्ता, आमच्यासमोर आरोपीस फाशी द्या’’, हा आंदोलकांचा आग्रह. त्या वातावरणातील उन्मादाने कोणाही शहाण्याची झोप उडेल. बदलापुरातील शाळेत लहान लहान मुलींस जे काही सहन करावे लागले त्याची निंदा, ते करणाऱ्याची निर्भर्त्सना, कृत्याविषयी घृणा व्यक्त करावी तितकी कमीच हे सत्य असले तरी म्हणून ‘‘सर्वांसमक्ष, आत्ताच्या आत्ता फाशी’’ ही मागणी? ही तालिबानी वृत्ती/कृती आहे याचा गंधही या आंदोलकांस नसेल. पण ही सामुदायिक असंवेदनशीलता ‘पुढे काय वाढून ठेवलेले आहे’ याची जाणीव करून देते, हे नि:संशय. अलीकडच्या काळात हे असे जमाव जमवायचे आणि अशा काही ‘‘आत्ताच्या आत्ता’’ अमलात आणा अशा मागण्या करायच्या हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू लागले आहे. ‘‘आरक्षणाचा अध्यादेश काढा… आत्ताच्या आत्ता’’, ‘‘अमुकतमुकला बडतर्फ करा… आत्ताच्या आत्ता’’ असा सुरू झालेला आपला समाजांदोलनाचा प्रवास ‘‘फाशी द्या… आत्ताच्या आत्ता’’, या मागणीपर्यंत येऊन थांबलेला आहे. श्रीलंका, बांगलादेश येथील आंदोलनाची सतत समोर येणारी वृत्तचित्रे आणि अखेर आंदोलक जमावानेच ‘व्यवस्था’ ताब्यात घेत विजयोत्सव साजरा करणे हे अनेकांनी पाहिलेले असल्याने आपणही ‘असे’ काही करायला हवे अशी शौर्योत्सुक (?) भावना समाजातील अस्वस्थ घटकांत असणार हे उघड आहे. कोलकात्यात जे सुरू आहे तेही डोळ्यासमोर आहे. अशा ज्वालाग्राही वातावरणात बदलापुरातील घटनेची ठिणगी पडली आणि स्फोट झाला. हा ‘ठिणग्यांचे व्यवस्थापन’ करण्याची जबाबदारी असणाऱ्या व्यवस्थेसाठी धडा आहे. या अशा स्फोटकावस्थेपर्यंत आपण का आलो? येथे सनदशीर मार्गाने काहीच होऊ शकत नाही, ही तिसऱ्या जगातील भावना आपल्याकडेही पुन्हा का दाटताना दिसते? नुसते आंदोलन नाही, तर हिंसक आंदोलन केल्याखेरीज समाजपुरुषाच्या ढिम्म शांततेस जराही तडा जात नाही, असे आपल्यातील अनेकांस का वाटू लागले?
या प्रश्नांच्या उत्तरांसाठी अण्णा हजारे आणि तत्समांच्या ‘रामलीला’ मैदानावरील लीलांपर्यंत मागे जावे लागेल. त्या वेळी राजकीय बदलाच्या तात्कालिक हेतूने समाजातील अर्थकारणी अस्वस्थतेस भ्रष्टाचाराची फोडणी देण्याचा निर्लज्ज खेळ खेळला गेला. खरे उद्दिष्ट होते सत्ताबदल हे! त्यासाठी अण्णांचे बुजगावणे पुढे करून नैतिकतेचे फुगे फुगवले गेले. सत्ताबदलानंतर ही नैतिकतेची हवा सुटली आणि हवा गेलेल्या फुग्याप्रमाणे अण्णाही निपचित झाले. हे इतकेच झाले असते तर ठीक. पण दरम्यानच्या काळात खोट्या सामाजिक आंदोलनांचा मोठेपणा उगाचच पसरला. अण्णांच्या आंदोलनामागील खोटेपणा ठाऊक असल्यामुळे नंतर आलेल्या सरकारने तशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनांस एक पैचीही भीक घातली नाही. मग ते नागरिकत्व आंदोलन असो वा शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन असो वा महिला पैलवानांचे कुस्ती संघटनेच्या विकृत प्रमुखाविरोधातील आंदोलन असो. सरकारने त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. इतकेच काय कोलकाता लैंगिक अत्याचाराविरोधात रास्त आवाज उठवणाऱ्या नवनैतिकतावाद्यांच्या संवेदनशीलतेवर हाथरस घटनेने एक ओरखडाही उमटला नाही. वरील तीन आंदोलने ही आंदोलनांच्या नियमानेच झाली होती. घटनेने नागरिकांस दिलेल्या मूलभूत अधिकारांच्याच आधारे अत्यंत सांविधानिक पद्धतीने आंदोलक आपापल्या मागण्या पुढे करत होते. या मागण्या किती रास्त किती गैर हा मुद्दा वेगळा. पण त्यांचा त्या मागण्या आंदोलनाद्वारे रेटण्याचा हक्क नाकारता कसा येईल? त्या आंदोलनांवर सरकारची प्रतिक्रिया काय होती?
‘आंदोलनजीवी’,‘देशद्रोही’, ‘खलिस्तानी’, ‘टुकडे टुकडे गँग’ आदी शेलक्या विशेषणांनी या आंदोलकांची संभावना केली गेली आणि नवनैतिक मध्यमवर्ग यास धडाडी म्हणत आपल्या नेत्याकडे कौतुकभरल्या डोळ्यांनी बिनडोकपणे पाहत राहिला. ज्या वेळी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते तेव्हा त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा विचारही या नवनैतिकवाद्यांच्या मनात आला नाही. संघटनेच्या लिंगपिसाट पदाधिकाऱ्याविरोधात महिला पैलवान सर्वस्व पणास लावून रस्त्यावर आल्या त्या वेळीही या संवेदना जाग्या झाल्या नाहीत. आताही महिला पत्रकारास ‘‘तुझ्यावर तर नाही ना झाला बलात्कार’’ असे निलाजऱ्या उद्दामपणे विचारणारा राजकीय नेताही या संवेदनांस स्पर्श करू शकत नाही. एका पक्षाचा आमदार भर पोलीस ठाण्यात गोळीबार करतो आणि दुसऱ्या पक्षाचा एक नेता बलात्कारासारख्या अत्यंत अधम, हीन, स्त्रियांचे मन करपून टाकणाऱ्या गुन्ह्याविषयी असे विधान करतो. या दोन्हींनंतर संबंधित पक्षनेतृत्वाची प्रतिक्रिया एकच. पाठीशी घालणे. अशा घटनांचा परिणाम काय?
‘‘आत्ताच्या आत्ता’’ ही मागणी. नैतिक मार्गाने, नैतिक पद्धतीने आपल्या हाती काहीही लागू शकत नाही असे या देशात एका मोठ्या वर्गास वाटू लागले असून जे काही करावयाचे ते आत्ताच्या आत्ता, येथल्या येथे असे वर्तन ही त्याची परिणती. शिवाय अशी मागणी करणाऱ्यांच्या आकाराचा फायदा घेण्यासाठी समुदायामागे फरपटत जाणारे नेतृत्वही वाढू लागलेले आहे. समाजास आकार देण्याऐवजी त्यांच्याप्रमाणे स्वत:चा आकार/उकार बदलण्यात हे नेतृत्व धन्यता मानते. आपण यांच्यामागे फरपटत जायचे नाही; उलट यांनी आपल्यामागे यायला हवे, असे काही या नवनेतृत्वास वाटतही नाही. या अनागोंदीचा परिणाम असा की जेव्हा बदलापुरात झाला तसा उद्रेक होतो तेव्हा बोलायचे कोणाशी? समुदाय हा विचारशून्य असतो आणि अधिकाधिक भडकाऊ भूमिका घेण्यात त्यास स्वारस्य असते. ‘‘कसे वाकवले सरकारला’’ इतकाच काय तो आनंद! तेच समाधान! पण या अशा भडक आंदोलनाने ना यांच्या हाती काही लागते ना समाजाचे काही भले होते. तरीही या मार्गाने जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढती आहे.
हे असेच राहिले तर ज्वालामुखीचा विस्फोट फार दूर नाही. त्या ज्वालामुखीच्या तोंडाशी आपण आहोत. पुढील अनर्थ टाळायचा असेल तर समाजातील शहाण्यांनी, सत्ताधीशांनी वातावरणातील या बदलाची दखल आता तरी घ्यायला हवी.