रिकामा, निर्मनुष्य ध्वनिमुद्रण स्टुडिओ तेथील वापर होत नसलेल्या उपकरणांसह दिसतो आहे. कॅमेरा त्या निश्चेष्ट उपकरणांवरून फिरतो आहे. या दृश्यांना पार्श्वसंगीत म्हणून अशा रिकाम्या स्टुडिओत ऐकू येऊ शकणारे अगदी दूरस्थ ‘आवाज’ दृश्य पाहणाऱ्या-ऐकणाऱ्याला ऐकू येत आहेत. हळूहळू पडद्यावर इंग्रजी अक्षरे उमटतात, ‘एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) कंपन्यांची खुलेआम संगीतचोरी ब्रिटिश सरकारने कायदेशीर करू नये’ – अशा अर्थाची. ‘इज धिस व्हॉट वुई वॉण्ट’ नावाचा, नवाकोरा संगीत अल्बम २५ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला, त्याचे हे वर्णन. तब्बल चार मिनिटे हे पाहिले-ऐकल्यानंतर हतबुद्ध व्हायला होते. पण त्याचबरोबर नीरवाचा ध्वनी किती परिणामकारक असतो, याची मनात जाणीव रुजू लागते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ‘एआय’चा व्यापार-वापर करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना आपले हात-पाय सहज पसरू दिल्याचे काय दुष्परिणाम होतील हे दाखवून, आपल्याला हे हवे आहे का, असा प्रश्न विचारणारा हा अल्बम आहे. त्या शांततेत निषेधाचा ठाम सूर आहे आणि जे दाखवले जात आहे, ते भविष्य असेल, तर मानवाची सर्जनशीलता आता अशी गंजत जाणार का, असा रोकडा सवालही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटिश सरकारने कॉपीराइट कायद्यात अलीकडेच काही बदल प्रस्तावित करून त्यावर सल्लामसलत सुरू केली आहे. त्यामध्ये ब्रिटिश संगीतकारांची भूमिका ठाम विरोधाची आहे. ‘बीटल्स’ या प्रसिद्ध संगीत चमूतील प्रसिद्ध पॉल मॅकार्टनी, दिग्गज एल्टन जॉन ते केट बुश, अॅनी लेनक्स अशा हजारभर जणांनी निषेधही सर्जनशील पद्धतीनेच करायचा ठरवून ‘इज धिस व्हॉट वुई वॉण्ट’ हा विषण्णतादर्शक सवाल केला आहे. हा प्रश्न केवळ संगीतापुरता मर्यादित नाही, तर सर्वच कलांना असलेल्या ‘एआय’च्या धोक्याबाबतचा आहे. त्यामुळे लेखक, चित्रकार, दृश्य कलाकार अशा सगळ्यांनीच या लढ्याला पाठिंबा दिला आहे. निषेधाचे हे वारे ब्रिटनमध्ये वाहत असले, तरी या प्रश्नाचे वादळ केवळ ब्रिटनपुरते मर्यादित राहणार नसून साऱ्या जगावर घोंघावते आहे. म्हणूनच यावर भाष्य प्रस्तुत.

त्याआधी ब्रिटनमध्ये प्रस्तावित असलेल्या कॉपीराइट कायद्यातील बदलांविषयी. या प्रस्तावित बदलांमुळे एआय कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी कॉपीराइट असलेल्या कलाकृती विनापरवाना वापरण्याची मुभा मिळणार आहे. एआय कंपन्या या विदेचा वापर करून त्यांच्या प्रारूपांना प्रशिक्षित करतील आणि त्यातून तयार झालेली उत्पादने वापरून कुणीही स्वत:ची स्वतंत्र कलाकृती सहज तयार करू शकेल. हे होते कसे, तर एआयवर आधारित चॅटबॉट, प्रतिमा निर्माणक किंवा संगीत निर्माणकाला इंटरनेटवर उपलब्ध असलेला प्रचंड विदा उपलब्ध करून देऊन त्यातून पद्धती विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशी प्रशिक्षित उपकरणे त्यांना मिळालेल्या आज्ञावलीनुसार शाब्दिक मजकूर, प्रतिमा किंवा संगीताची ‘नवनिर्मिती’ करू शकतात. संगीताबाबत थोडक्यात सांगायचे, तर एआय कंपन्या असे एखादे एआय आधारित उत्पादन तयार करू शकतील, जे संगीतकार नसलेल्या एखाद्याला त्याची स्वत:ची चाल तयार करण्यास मदत करील. ज्याला चाल करून हवी आहे, त्याने नुसती आज्ञावली द्यायची खोटी, चाल तयार!

आपल्या जवळच्या एखाद्या उदाहरणातून याची फोड करून सांगायचे, तर एखाद्याला समजा वाटले, की आपल्याला अशी एखादी चाल करायची आहे, ज्या चालीत थोडे शंकर-जयकिशन, थोडे आर. डी. बर्मन आणि थोडे ए. आर. रेहमानही हवेत, तर तशी आज्ञावली देऊन तो एआय आधारित उत्पादनाकडून ती चाल तयार करून घेऊ शकतो. आता यासाठी या एआय उत्पादनाला काय लागेल, तर या तिन्ही संगीतकारांच्या सर्व मूळ कामांचा विदा. तो असल्याशिवाय एआय उत्पादन हे काम करू शकणार नाही, कारण या संगीतकारांच्या चालीतल्या पद्धतीतील बारकावे त्याला माहीत नसतील. आता हा विदा, म्हणजेच या संगीतकारांचे हे मूळ काम एआय आधारित उत्पादनासाठी वापरायचे, तर त्याची रीतसर परवानगी हवी, कारण ते कॉपीराइट कायद्याने सुरक्षित आहे – अर्थात, आपल्याकडे होत असलेली सर्रास कॉपीराइट उल्लंघने पाहता, ही कामे खरोखरच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा, पण तांत्रिकदृष्ट्या ती सुरक्षित आहेत, असे गृहीत धरू. ब्रिटिश कायद्यातील प्रस्तावित बदल हेच सुरक्षा कवच काढून टाकेल आणि एआय कंपन्यांना संगीतकारांचे काम विनापरवाना उचलण्याची मुभा देईल. ब्रिटिश संगीतकारांचा विरोध आहे तो याला. अर्थात, एआय कंपनीने इंटरनेट जाळ्यातून कुणा संगीतकाराच्या एखाद्या कामाचा विदा म्हणून वापर करण्याचे ठरवले, तर ते काम घेऊ नका, असे सांगण्याची मुभा हा कायदा देतो. पण संगीतकारांचे म्हणणे आहे की, एआय कंपन्या इंटरनेट जाळ्यातून खोऱ्याने विदा उचलू लागल्यावर कुठे आणि किती ठिकाणी लक्ष ठेवून नकाराचा अधिकार वापरायचा? मूळ कलाकृती ज्यांनी निर्मिली किंवा जे नवीन कलाकार नवीन काही निर्माण करू इच्छितात, त्यांच्यावर हा अन्यायच, असे या ब्रिटिश संगीतकारांचे म्हणणे. यावर ‘एआय क्षेत्रात आपला देश मागे नको’ असे ठरवलेल्या सरकारचे म्हणणे असे की, एआय आणि संगीत क्षेत्रातील मंडळींनी एकत्रित काम करावे. मात्र हे वाटते तितके सहज-सोपे नाही. एआय कंपन्यांनी विविध प्रकारचे कलात्मक काम विनापरवाना वापरल्यावरून अमेरिकेत सध्या अनेक खटले सुरू आहेत आणि या एआय कंपन्यांवर कॉपीराइट उल्लंघनाचे कोट्यवधी डॉलरचे दावेही ठोकण्यात आले आहेत. मध्यंतरी हॉलीवूडमधील लेखकांनी याच कारणावरून संप पुकारला होता. चित्रपट, मालिकांच्या संहिता ‘एआय’च्या साह्याने तयार करण्याला किंवा त्याचा आधार घेण्याला त्यांचा विरोध होता.

हे झाले ब्रिटन, अमेरिकेतले, पण भारतातही हेच व्हायला सुरुवात झाली आहे. कुठलेसे ‘मैनू विदा करो’ हे गाणे मोहम्मद रफीपासून जगजीत सिंग, ए. आर. रहमान आदी कसे सादर करतील याचे व्हिडीओ गेल्या वर्षी आले, त्यातून एआयने हिंदी चित्रपटगीतांचा किती ‘विदा’- डेटा- फस्त केला याची कल्पना येते. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आपले गृहपाठ सर्रास चॅटबॉटच्या साह्याने करू लागले आहेत. कल्पनेचा एखादा बिंदू सांगा, पुढील कथानक किंवा त्याचे विविध पर्याय आम्ही एआय आधारित उत्पादनांकडून करून घेतो, असे चित्रपट-मालिकांचे निर्माते लेखकांना म्हणू लागले आहेत. हे सगळे होत आहे, म्हणूनच ‘एआय’चा नैतिक वापर, त्यासाठी बंधने, निकष, कायदे याबद्दल जागतिक पातळीवर विविध परिषदांमधून चर्चा झडते आहे.

पण मुद्दा एआय हवे की नको हा उरलेलाच नाही. तो फक्त, एआय किती आणि कुठे हवे इतकाच आहे. काही आशयनिर्मिती कंपन्या, वृत्त संकेतस्थळे आदींनी एआय कंपन्यांशी केलेले करार याच सहअस्तित्वाच्या दिशेकडे जाणारे पाऊल. भान ठेवायला हवे, ते एकाच गोष्टीचे, ते म्हणजे जी कामे करणे मानवाला नकोसे वाटते, ज्यात पुनरावृत्ती आहे किंवा जी मानवाने करणेच मुळात अपेक्षित नाही, त्यासाठी एआय आहे. ही कामे सोडून एआय मानवाच्या सर्जनशीलतेची जागा घेऊ पाहील, तर त्याला विरोध होत राहील, राहायला हवा. ब्रिटनमध्ये आत्ता झालेला विरोध ‘नीरव’ असला, तरी त्याबद्दल ‘बोलले’ जायला हवे, कारण आताशा एरवी कर्कशतेत जगणाऱ्या माणसाला तो ‘शांतता… एआय चालू आहे,’ असे सांगतो आहे. हे नीट ‘ऐकले’ नाही, तर एआय आधारित उपकरणाला आज्ञावली देऊन सर्जनशीलता ‘मुकी’ करण्याचे प्रसंग येथून पुढे घडतच राहतील…