रणवीरने स्वत:च्याच देहाचे प्रदर्शन केले म्हणून आपणास लाज वाटत असेल तर इतक्या वेळा आपली व्यवस्था उघडी पडते याची लाज आपणास कधी वाटणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या चित्रविचित्र पेहरावासाठी कायम टीकेचा वा टिंगलीचा विषय होतो अशा रणवीर सिंगाने एकदम दुसरेच टोक गाठले आणि दिगंबरावस्थेत छायाचित्रांकन केले. हे काहीसे असे होते. तोंड म्हणजे पिठाची चक्की आहे असे समजून सतत तीत काही ना काही सारायची सवय झालेल्यास काही काळाने अनशनाची उबळ येते, शाब्दिक अतिसार झालेल्यास विपश्यनेची गरज वाटते, माणसांचे घोंघावणे अति झाले की काहींस काही काळापुरती का असेना वानप्रस्थाश्रमाची ओढ लागते, तद्वत अति कपडय़ांत वावरावे लागलेल्यास सर्व काही ‘सोडून’ द्यावे असे वाटू शकते. हे असे वाटणारे आणि रणवीर सिंग यांच्यातील फरक इतकाच की असे वाटून घेणारे अन्य प्रत्यक्ष रणातून पळ काढतात आणि रणवीर सिंगसारखा मात्र खरेच सर्व काही सोडून ‘दाखवू’ शकतो. हिंदू संस्कृतीत सर्वसंगपरित्याग फार मोलाचा. रणवीरने जे केले ते या संस्कृतिमूल्यापासून फार दूर नाही. त्याने ‘सर्वअंगपरित्याग’ केला. यात ‘सं’चा ‘अं’ झाला हे खरे. त्यामुळे काही आकाश कोसळले असे नाही. पण तसे ते कोसळते असे काहींस वाटले. त्यांनी अब्रह्मण्यम असे ओरडत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि रणवीराविरोधात तक्रार दाखल केली. कशाबद्दल? तर त्याने कपडे काढून दिगंबरावस्थेचे दर्शन जगास घडवले म्हणून.  वास्तविक त्याने स्वत:चेच कपडे फेडले. अन्य कोणाच्या वस्त्रास त्याने हात घातला असे नाही.

सर्वसाधारणपणे कोणी कोणाचे अनिच्छेने वस्त्रहरण केले तरच तो तक्रारीचा विषय असतो. येथे तसे झालेले नाही. त्याने हे स्वत:च स्वत:च्या इच्छेने केलेले असल्याने त्याची स्वत:विरोधात काही तक्रार आहे असेही नाही. या रणवीराचे देवाब्राह्मणाच्या साक्षीने दोनाचे चार झालेले आहेत. तेव्हा त्याची धर्मपत्नी, जी की दीपिका पदुकोण, हिच्याच नजरेस जे पडायला हवे ते सवासो क्रोर देशवासीयांसमोर आले हा आपला हक्कभंग अशी तिची तक्रार आहे असे म्हणावे तर तेही नाही. या रणवीराचे गणगोत माहीत नाहीत. पण दीपिकाच्या पालकांनी, जे की सालस असे प्रकाश पदुकोण, आपल्या जामाताने नको त्याचे प्रदर्शन केले असा तक्रारीचा सूर लावल्याचेही समोर आलेले नाही. तेव्हा मुद्दा असा की या रणवीरास आपले शारीरपौरुष कॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटात जनसामान्यांच्या प्रदर्शनार्थ मांडावे असे वाटले तर, ज्याचे छायाचित्र काढले गेले त्याची आणि ज्यास असे दिगंबरावस्थीय छायाचित्र काढावे लागले त्याची तक्रार नसेल तर अन्य कोणाच्या पोटात दुखून पोलिसांत तक्रार गुदरली जाण्याचे कारणच काय?

या त्याच्या कृत्यामुळे कोणाचा कोणाकडून विनयभंग होतो की ज्याची पोलिसांनीही दखल घ्यावी? की ज्या पोलिसांचे प्रमुख दिवाभीतासारखे कित्येक महिने लपून होते ते अधिक लाजिरवाणे नव्हे काय?  तशी वेळ आलेले पोलीसवीर अधिक नग्न की रणवीर? दुसरे एक पोलीसप्रमुख राष्ट्रीय समभाग बाजारातील घोटाळय़ात नुकतेच तुरुंगवासी झाले. मुंबई पोलीस ही एके काळी स्कॉटलंड यार्डच्या खालोखाल नाव आणि मान राखून असलेली यंत्रणा. त्या यंत्रणेतील एक वरिष्ठ तेलगी स्टँप पेपर घोटाळय़ात सापडतो, दुसऱ्यावर आणखी कसल्या घोटाळय़ाचा आरोप होतो, तिसऱ्या कोणावर केंद्र सरकारी यंत्रणा कारवाई करते इत्यादी सारे व्यवस्थेस नग्न करणारेच नव्हे काय? हे ज्या शहरात घडते ती मुंबई देशातील सर्वात प्रगत राज्याची राजधानी. सर्वाधिक कर महसूल देणारे शहर. त्या शहरांतील रस्ते कोणास नग्न करतात? काऊ-चिऊच्या गोष्टीतील कावळय़ाच्या घराप्रमाणे एक सर आली की या शहरातील रस्ते वाहून जातात, यातून कोणाची नग्नता दिसते? तारुण्य ही भविष्याची स्वप्ने पाहण्याचे, त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कष्ट करण्याचे वय. पण या वयातले चार-पाच जीव या शहरांतील रस्त्यावरच्या खड्डय़ांमुळे प्राण गमावतात तेव्हा खरे तर कोणाचे वस्त्रहरण होते? या वस्त्रहरणाची लाज कोणास वाटते? आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक डॉक्टर पावसाने साचलेल्या पाण्यात गटाराचे झाकण उघडले गेल्याने अख्खाच्या अख्खा वाहून जातो. किंवा एखादी भाजीखरेदीसाठी निघालेली गृहिणी नगरपालिकेच्या उद्यानातील धोकादायक झाड पडून मारली जाते. किंवा स्वत:च्या घरात असलेल्यावर आकाशातून थेट विमानच कोसळते, तेव्हा यातून कोणाची नग्नावस्था दिसते? मुंबईत हे असे तर अन्यत्र काय असेल या विचारानेच भयचकित होऊन उघडे-बोडके झाल्यागत वाटते. अलीकडेपर्यंत या देशाने बोगस वाहन परवान्यावर रिक्षा-टॅक्सी हाकणारे गोड मानून घेतले आहेत. पण वैमानिकांच्याही बोगस परवान्याचे वृत्त वाचून  आपली उरलीसुरली अब्रूही जाते असे कोणास वाटते काय? अनेक शहरांस कवेत घेणाऱ्या डोंगरांची हिरवी वस्त्रे हळूहळू फेडली जाऊन हे डोंगर उघडे-बोडके झाले. निसर्गाचे पौरुषदर्शक हे डोंगरकडे असे नग्नासन्न पाहून आपल्या भावना दुखावत नाहीत काय? ज्यास पंचमहाभूते मानून नमस्कार केला जातो त्या सर्वाची कमालीची हेळसांड ज्या समाजात होते त्या समाजातील पर्यावरणीय नग्नतेचे काय? अन्य कोणत्याही शारीर धर्माइतकीच नैसर्गिक असलेली आणि मानवी जैवसातत्यासाठी अपरिहार्य असलेली मासिक पाळी आहे म्हणून वृक्ष लागवडीस मनाई करण्याइतकी अचाट निर्बुद्धता दाखवणारा समाज काय दर्शवत असतो? ज्या देशात नागरिकाचे सरासरी उत्पन्न बऱ्या – श्रीमंत नव्हे, बऱ्या – देशांतील नागरिकांपेक्षाही कमी आहे त्या देशात मोजके धनाढय़ श्रीमंत देशांतील लक्ष्मीपु्त्रांपेक्षाही अधिक धनवान कसे होतात? ते तसे होत असतील तर येथील नियामकांची वस्त्रप्रावरणे जरा जास्तच झिरझिरीत आहेत आणि त्यातून व्यवस्थेच्या अंगप्रत्यांगाचे जरा जास्तच प्रदर्शन होते असे वाटून त्यातून दिसणारा व्यवस्थेचा उघडा देह जरा झाकायला हवा, असे कधी संस्कारप्रेमींस वाटते काय?

तर अशा देशात रणवीरचे जरा चुकलेच म्हणायचे. वास्तविक देह प्रदर्शनच करायचे तर कोणा तरी मुहूर्तावर संपूर्ण दिगंबरावस्थेत नदीत डुंबणाऱ्या धर्मतपस्वींत त्याने स्वत:चा समावेश करून घ्यायला हवा होता. ते त्यास सुचले असते तर नग्नही होता आले असते आणि ‘तशी’ छायाचित्रेही प्रसृत करून घेता आली असती. इतकेच काय तसे झाले असते तर अनेकांनी त्याची चरणधूळ ललाटी लावून आशीर्वादही मागितले असते. आणि मुख्य म्हणजे ते त्यास देताही आले असते. ती संधी चुकलीच म्हणायची. त्यामुळे त्याच्या या न्यू यॉर्कस्थित मासिकासाठी केलेल्या नग्नावस्थीय छायाचित्रांमुळे भावना दुखावल्याची तक्रार भारतात करण्याची संधी अनेकांना मिळाली. तसे पाहू गेल्यास ‘आधार’ कार्डाच्या सक्तीप्रमाणे ही छायाचित्रे पाहण्याची सक्ती सरकारने (अद्याप) केलेली नाही. त्यामुळे ही छायाचित्रे न बघण्याचा पर्याय सर्वास उपलब्ध आहे. तो निवडल्यास भावनाही दुखवून घेण्याचा प्रश्न नाही. पण भारतीयांस तसे चालत नाही. दूरचित्रवाणीवरच्या बुद्धिमत्तेच्या प्राथमिक पातळीस स्पर्श करणाऱ्या मालिकादी कार्यक्रम पाहायचेच. पण वर ‘‘शी शी काय चालले आहे हे दूरचित्रवाणीवर’’ असे म्हणून नाकेही मुरडायची ही आपली सांस्कृतिक सवय. वास्तविक रणवीरच्या छायाचित्रांप्रमाणे हे कथित वाईट कार्यक्रमही न पाहण्याची सोय आहेच. पण नाही. ते पाहायचे आणि वर भावना दुखावल्याची तक्रारही करायची! तेव्हा हे, वर उल्लेखलेले आणि असे न उल्लेखलेले असंख्य नमुने पाहिले की प्रश्न पडतो: खरे नग्न कोण? रणवीरने त्याचा स्वत:चाच देह प्रदर्शित केला म्हणून आपणास अशी लाज वाटत असेल तर इतक्या साऱ्यातून इतक्या वेळा आपली व्यवस्था उघडी पडते म्हणून आपणास कधी लाज वाटणार?

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on controversy over ranveer singh nude photoshoot zws
Show comments