गुणवंत क्रीडापटूंच्या प्रगतीत तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांतील सरकारांचाही सहभाग असतो, तसे महाराष्ट्रात मात्र होत नाही..

दोम्माराजू गुकेशने अवघ्या १७व्या वर्षी बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये आव्हानवीर बनण्याचा मान पटकावला. गुकेश चेन्नईचा. त्यामुळे त्यानिमित्ताने विश्वनाथन आनंदच्या ‘चेन्नई वंशावळी’चा गौरव होणे स्वाभाविकच. ज्या बहुचर्चित कँडिडेट्स स्पर्धेमध्ये गुकेशने हे देदीप्यमान यश संपादले, त्याच स्पर्धेत आपला विदित गुजराथीही खेळला. कँडिडेट्स स्पर्धेत खेळलेला पहिला महाराष्ट्रीय बुद्धिबळपटू. त्याने काही संस्मरणीय विजय मिळवले, तरी सातत्य राखता आले नाही. विदित सहावा आला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तीन महिने आधी विदितला आर्थिक मदतीची चिंता होती. त्याने त्या वेळी मुंबईतील पत्रकार परिषदेत राज्य सरकारला मदतीचे आवाहन केले होते. स्पर्धा कॅनडात, तेथे राहण्याचा खर्च, प्रशिक्षण आणि प्रशिक्षक शुल्क, व्यायामतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांचा प्रवास खर्च व शुल्क वगैरे हिशोब एक कोटी रुपयांपल्याड जात होता. त्या पत्रकार परिषदेत विदितने एका बाबीकडे लक्ष वेधले. गुकेश, प्रज्ञानंद, वैशाली या चेन्नईच्या बुद्धिबळपटूंच्या खर्चाचा सर्व भार तमिळनाडू सरकारने आधीच उचलला होता. विदितला मदत मिळाली का, किती मिळाली वगैरे तपशील उपलब्ध नाही. समजा ती मिळाली असेल, तरी इतक्या मोठ्या स्पर्धेच्या तोंडावर ‘आपल्या’ खेळाडूला मदतीसाठी आवाहन (की याचना?) करावे लागणे म्हणजे विलक्षणच. ही परिस्थिती उद्भवते याची कारणे दोन – पहिले म्हणजे शुद्ध अज्ञान आणि दुसरे म्हणजे इच्छाशक्तीचा अभाव.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास
Dommaraju Gukesh Ding Liren World Chess Championship Match Entertainment news
दक्षिणी दिग्विजयाचा अर्थ…
loksatta lokrang Andhra Pradesh and Telangana have a rich tradition of chess
आदर्श घ्यावा असा…

विदितचे उदाहरण म्हटले तर तात्कालिक, म्हटले तर सार्वकालिक. जे झाले त्यानिमित्त नवीन सहस्राकातील पहिल्या पाव शतकाच्या आसपास कालखंडामध्ये विविध क्षेत्रांतील राज्याच्या वाटचालीचा आढावा समयोचित ठरतो. हल्ली असल्या अवलोकनात्मक चिकित्सेमध्ये उत्साहवर्धक फार काही हाती लागत नाही. ‘चळवळींचे उगमस्थान महाराष्ट्र’, ‘उद्याोगपती, उद्याोजकांची पहिली पसंती महाराष्ट्र’ वगैरे दाव्यांची पडताळणी नवीन युगाच्या संदर्भात करण्याची वेळ आली आहे. उद्याोगभूमीत उद्यामी किती येतात, चळवळींच्या उगमभूमीचे सध्या राजकीय ‘वजन’ किती वगैरे प्रश्न गैरसोयीचे ठरू लागतात. क्रीडा क्षेत्रात तर यापेक्षाही मोठी अधोगती सुरू आहे. चळवळी आणि उद्याोग क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रातही महाराष्ट्राचे अस्तित्व खणखणीत होते. पण नवीन सहस्राकात जेथे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये इतर राज्यांमधील क्रीडापटू वैयक्तिक पदके जिंकू लागले आहेत, तेथे महाराष्ट्राच्या एकाही क्रीडापटूला २५ वर्षांमध्ये तशी कामगिरी करता आलेली नाही. ज्या वेळी वैयक्तिक पदकाची कल्पनाही कोणी करत नव्हते, त्या काळात म्हणजे १९५२ मध्ये मराठमोळ्या खाशाबा जाधवांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. त्याआधीच्या लंडन ऑलिम्पिकमध्येही ते पदकासमीप पोहोचले होते. त्यांच्या दुर्दैवाने हे नाव आता स्मरणरंजनापुरतेच उरले.

पदुकोण-गोपीचंदच्याही आधी महाराष्ट्रात नंदू नाटेकर होते. ठाणे, पुणे, मुंबई येथे बॅडमिंटनची संस्कृती होती. भारताच्या पहिल्या चार बुद्धिबळ ग्रँडमास्टरांपैकी दोघे (प्रवीण ठिपसे, अभिजीत कुंटे) मराठी होते. आज आपल्याकडे ८४ ग्रँडमास्टर आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रातील ग्रँडमास्टरांची संख्या १२ आहे. तमिळनाडूत ही संख्या ३० आहे. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर तमीळच. पण ग्रँडमास्टर होण्यापूर्वी किंवा त्यानंतर बराच काळ त्याने भारताबाहेर व्यतीत केला. नवीन सहस्राकात आनंदपासून प्रेरणा घेऊन ज्याप्रमाणे तमिळनाडूतील मुले आणि त्यांचे पालक बुद्धिबळाकडे वळले, तसेच तेथील राज्य सरकारांनीही कमीअधिक प्रमाणात मदत करण्यास सुरुवात केली. जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांनी आनंद-कार्लसन जगज्जेतेपदाची लढत चेन्नईत यशस्वीरीत्या भरवून दाखवली. याच चेन्नईत ऐन वेळी बुद्धिबळ ऑलिम्पियाड भरवले गेले. गुकेशला कँडिडेट्स स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी आवश्यक मानांकन गुण कमी पडत होते, तेव्हा तमिळनाडू सरकारने जराही वेळ न दवडता एक ग्रँडमास्टर स्पर्धा भरवली. त्याचा फायदा झाल्यामुळेच गुकेश कँडिडेट्स स्पर्धेत खेळू शकला. ऑलिम्पियाड किंवा गुकेशसाठीच्या स्पर्धेचे आयोजन करणारे तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन होते. जयललिता अण्णा द्रमुकच्या, स्टॅलिन द्रमुकचे. तरी स्पर्धांचे आयोजन दोघांनीही वेगवेगळ्या वेळी तत्परतेने केले. कारण ‘आपल्या’ खेळाडूंचे महत्त्व तेथे पक्षातीत मानले जाते. महाराष्ट्रात विविध राजकीय आघाड्या-बिघाड्यांतून फुरसत काढून अशा प्रकारे तत्परता आणि कल्पकता दाखवली जाण्याची शक्यता किती? २००८ पासून हरयाणातून ऑलिम्पिक पदकविजेते निपजू लागले, त्या वेळी त्यांना कोटी-कोटी रुपयांची पारितोषिके देण्याची दिलदारी त्या सरकारने प्रथम दाखवली. आमच्याकडे याविषयी निर्णयच हल्ली हल्ली घेतले जाऊ लागले. बॅडमिंटनमध्ये पडुकोण-गोपीचंद यांच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात बॅडमिंटन अकादम्या सुरू करण्याची स्पर्धा लागली. सायना नेहवाल, पी. सिंधू आणि अनेक प्रथितयश पुरुष बॅडमिंटनपटूंनी तेथे लाभ घेतला. त्याही वेळी तेथील राज्य सरकारांनी पुढाकार घेतला. आपल्याकडील बॅडमिंटन प्रतिभेची दखल घेऊन तसा प्रयत्नदेखील इथल्या सरकारांनी केल्याचे ऐकिवात नाही. २००४ मध्ये राज्यवर्धन राठोडने नेमबाजीमध्ये ऑलिम्पिकपदक जिंकले. त्याच्या आधीपासून अंजली वेदपाठक नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत आहेत. पुढे तेजस्विनी सावंत, सुमा शिरूर, राही सरनौबत यांनी तो वारसा पुढे नेला. यातून बोध घेत राज्यात नेमबाजीविषयी अद्यायावत सुविधा केंद्रे उभारण्याचा प्रयत्न झालेला दिसत नाही.

हे झाले खेळ आणि खेळाडूंविषयी. आपल्या शेजारी राज्यात म्हणजे गुजरातमध्ये क्रीडा संस्कृती जवळजवळ नगण्य. तरी त्या राज्याने २०३६ मधील ऑलिम्पिक भरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्या शहराविषयी ‘आपले’पणा वाटणारे नेते सध्या देशात सर्वोच्च पदावर आहेत हे मान्य. पण त्यांच्या पुढ्यात किमान युक्तिवाद करण्यासाठी तरी, आपल्याकडे नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा शहरांमध्ये क्रीडा संकुले, क्रीडा नगरी उभारण्याचे प्रयत्न का झाले नाहीत? पुण्यात बाणेर येथील क्रीडा नगरीविषयी चांगले किती ऐकायला-वाचायला मिळते? ही शहरे क्रीडानगरी म्हणून विकसित झाली असती, तर किमान आमच्याकडे प्रस्थापित क्रीडानगरी आहे असे आपल्याला सांगता तरी आले असते. ओडिशासारखे मागास राज्य आज देशातच नव्हे, तर जगात हॉकीचे प्रमुख स्पर्धा केंद्र बनले आहे. त्या खेळात पैसा ओतण्याचे धोरण तेथील मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दाखवले. त्यामुळेच आज पंजाबसारख्या पारंपरिक हॉकी केंद्रापेक्षाही सरस सुविधा ओडिशातील मैदानांमध्ये दिसून येतात.

आधुनिक खेळामध्ये महत्त्वाची असते, पोषक परिसंस्था वा ‘इकोसिस्टीम’. जाज्वल्य इतिहास आणि मातीतली गुणवत्ता फार पुढे नेत नाही. गुणवत्ता घडवावी लागते, इतिहास ‘जागवावा’ लागतो. चांगल्या खेळाडूंची फळी उभारण्यासाठी दृष्टी आणि महत्त्वाकांक्षा लागते. महाराष्ट्रात क्रीडापटू यादृच्छिक पद्धतीने तयार होतात. पंजाब, हरयाणा, दिल्लीमध्ये कुस्तीत ऑलिम्पिक पदकविजेते घडवण्याची मोहीम आकार घेत आहे. कुस्तीचे पारंपरिक केंद्र असलेल्या महाराष्ट्राची मजल मात्र महाराष्ट्र केसरी, हिंद केसरीपलीकडे जात नाही! कारण अल्पसंतुष्टपणा आणि दृष्टी व महत्त्वाकांक्षेचा अभाव ही खास महाराष्ट्रीय ठरू लागलेली वैगुण्ये येथील क्रीडा क्षेत्रातही झिरपू लागली आहेत. क्रिकेटने या राज्यातील मनोविश्वाचा मोठा भाग व्यापला हे मान्य केले, तरी ते खूळ पूर्वीपासून देशभर पसरले आहे. आता ती सबब म्हणूनही चालवून घेण्यासारखी नाही. क्रीडा क्षेत्रात आपली रखडगती ही इतर क्षेत्रांप्रमाणेच बौद्धिक मांद्या आणि विचारजडत्वातून होत आहे. पुढील आठवड्यात १ मे महाराष्ट्र दिन. तो साजरा करताना हे राज्य किती दीन झाले आहे, याचे भान आपले कर्ते-करवते यांना असेल का? नसण्याची शक्यताच अधिक. तूर्त आपण गुकेशचा विजय साजरा करू या!

Story img Loader