हुकूमशहा भित्रा वाटावा इतका सावध असतो, यास पुतिन अपवाद नसल्यानेच त्यांच्या टीकाकारांखेरीज काही समर्थकांनाही मरण आले..
रशियातील बदनाम खासगी ‘वॅग्नेर आर्मी’चा प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांच्या मरणावर शिक्कामोर्तब होणे, ही केवळ औपचारिकता होती. ती पार पडली आणि प्रिगोझिन यांचे खरोखरच निधन झाल्याचे जाहीर झाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांस आव्हान देणारा आणखी एक त्यांचा मित्रोत्तर शत्रू निजधामास पोहोचला. दोन दिवसांपूर्वी प्रिगोझिन हे आपल्या साथीदारांसह रशियाकडे येत असताना त्यांच्या विमानाचा हवेत स्फोट झाला आणि ते कोसळले. त्यामुळे प्रिगोझिन यांच्या विमानास अपघात झाला असे भासवण्याचे प्रयत्न झाले तरी हा अपघात नाही; घातपात आहे हे त्या क्षणापासून स्वच्छ दिसत होते. हे सत्य नंतर उघड झाले. या विमानात बॉम्बस्फोट घडवला गेला. त्यामुळे ते पडले आणि त्यातील सर्वच्या सर्व दहा जण मारले गेले. त्यांत प्रिगोझिन यांचा समावेश होता. तथापि त्यांच्या मरणाची बातमी निश्चित होत नव्हती. वास्तविक या दहा जणांत प्रिगोझिन नसते तर विमान पाडले गेलेच नसते. तेव्हा त्यांच्या मरणाची शाश्वती नसती, तर हे झालेच नसते. इतके हे सारे सोपे आणि सरळ आहे. प्रिगोझिन यांच्या विमानास झालेल्या या घातपातामागे पुतिन यांचा हात आहे, असा आरोप अमेरिकेने केला आणि पुतिन यांनी तितक्याच तत्परतेने तो नाकारला. पण पुतिन यांच्या या नकारास काडीचाही अर्थ नाही. याचे कारण त्यांचा रक्तपिपासू इतिहास.
हेही वाचा >>> अग्रलेख :..बजाव पुंगी!
त्याचे वैशिष्टय़ असे की पुतिन आपल्या विरोधकांस तर संपवतात. पण त्याचबरोबर तितक्याच उत्साहाने ते आपणास मदत करणाऱ्यांसही संपवतात. किंबहुना आपल्या मदतकर्त्यांना संपवण्यात त्यांना अधिक रस असतो. उदाहरणार्थ बोरिस बेरेझोव्हस्की यांचे मरण. हे बोरिसबाबा खरे तर पुतिन यांचे मोठे आधार. येल्तसिन यांच्याकडून पुतिन यांच्याकडे सत्तांतर होत असताना मधल्या अशांततेच्या सांदीत या बोरिसबाबांनी पुतिन यांस खूप मदत केली. रशियन खासगी वृत्तवाहिन्यांशी संबंधित माध्यमसम्राट बोरिसबाबांनी आपली सर्व ताकद पुतिन यांच्या प्रतिमासंवर्धनार्थ खर्च केली. पुतिन अध्यक्ष झाल्यावर याची दामदुप्पट वसुली बोरिसबाबांनी केली खरी. पण पुतिन यांनी त्यांच्या नाडय़ा आवळण्यास सुरुवात केली. अखेर बोरिस यांच्यावर देश सोडून जाण्याची वेळ आली. ते लंडनमध्ये स्थिरावले. पण तरी ते पुतिन यांच्यापासून काही वाचू शकले नाहीत. दहा वर्षांपूर्वी लंडनमधील आपल्या घरातील बंद न्हाणीघरात हा अब्जाधीश मृतावस्थेत आढळला. तेथपासून ते बोरिस नेमेस्तोव हे रशियाचे उपपंतप्रधान, नतालिया इस्तेमिरोव्हा आणि अॅना पोलित्कोवस्काया या महिला पत्रकार, केजीबीचे अलेक्झांडर लिटविनेंको या साऱ्या विरोधक वा टीकाकारांपासून ते अगदी अलीकडे युक्रेन युद्धास विरोध करणारे पावेल अंताव या उद्योगपतीपर्यंत पुतिन बळींची संख्या मोजणेदेखील अनेकांनी थांबवले असेल. एकचालकानुवर्ती राजवटींचा मुकुटमणी ठरलेले पुतिन आज अनेकांचे आदर्श आहेत. टर्कीचे एर्दोगान सत्ताकारणाचे हे पुतिन प्रारूप त्यांच्या देशात राबवू पाहतात, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांस या प्रारूपाचे अप्रूप असून ते अमेरिकेत राबवण्यात आले तर किती बरे; असे वाटते. आपली इच्छा उघडपणे बोलून दाखवण्याइतका प्रामाणिकपणा ट्रम्प यांच्या ठायी आहे. तथापि असे जाहीरपणे न बोलता पुतिन प्रारूपाचे अनुकरण करू पाहणारे जगाच्या पाठीवर अन्य अनेक देशांत असू शकतात. प्रिगोझिन यांच्या हत्येमागे युक्रेन आणि त्याचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा हात असल्याची शक्यताही काही अभ्यासक वर्तवतात. असे करण्याइतपत क्षमता झेलेन्स्की यांनी कमावलेली आहे किंवा काय, हा तसा प्रश्नच. त्याचे उत्तर सर्वानुमते नाही असेच असण्याची शक्यता अधिक. तेव्हा प्रिगोझिन यांच्या आकस्मिक मृत्यूचे कर्ते आणि करविते हे रशियन अध्यक्ष पुतिन हेच असावेत यावर अनेकांचे एकमत दिसते.
हेही वाचा >>> अग्रलेख : आनंद ते प्रज्ञानंद..
त्याबाबत दुसरे कारण म्हणजे अलीकडे जून महिन्यात त्यांनी आणि त्यांच्या वॅग्नेर ग्रुपने पुतिन यांच्याविरोधात केलेले सशस्त्र बंड. ते ज्या पद्धतीने अचानक सुरू झाले त्याच पद्धतीने त्याच सायंकाळी मागे घेतले गेले. या माघारीनंतर प्रिगोझिन यांस रशियात आसरा न देण्याचा निर्णय झाला आणि ते शेजारील बेलारूसमध्ये मुक्काम करतील, असे निश्चित झाले. त्याप्रमाणे प्रिगोझिन यांनी तिकडे जाणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. त्यानंतरही प्रिगोझिन वारंवार रशियात दिसले. त्याआधी पुतिन यांनी या बंडासाठी प्रिगोझिन यांस कडक शासन केले जाईल, अशी भाषा केली होती. तीही लगेच बदलली आणि या गृहस्थांस बेलारूसला पाठवण्यावर एकमत झाले. हे सगळेच अचंबित करणारे होते. आहेही. आपल्याविरोधात इतके मोठे बंड करणाऱ्या, खासगी लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या आणि त्याहूनही मुख्य म्हणजे युक्रेनमध्ये रशिया आणि पुतिन यांच्या वतीने लढणाऱ्या इतक्या मोठय़ा गावगुंडास पुतिन यांनी ‘असेच’ कसे सोडले, याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
हेही वाचा >>> अग्रलेख: शैक्षणिक कल्पनाविस्तार!
त्याचे उत्तर या विमान ‘घातपाता’त दडले असावे, असे मानण्यास जागा आहे. हे प्रिगोझिन पुतिन यांचे एके काळचे अत्यंत जवळचे सहकारी. त्यांचे जणू उजवे हातच! पुतिन यांचा खानसामा, असे त्यांचे वर्णन केले जात असे. एकलकोंडय़ा, एकचालकानुवर्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्या, त्याप्रमाणे कार्यशैली असणाऱ्या व्यक्तींस आपल्याशी कोणी इतकी सलगी दाखवलेली आवडत नाही. त्यामुळे आपल्या अंतर्गत कक्षापर्यंत गेलेले प्रिगोझिन पुतिन यांना खुपत नसतील, असे मानता येणार नाही. त्यात रशियाच्या अधिकृत लष्करातील काही सर्वोच्च अधिकारी प्रिगोझिन यांस सामील झाले होते. हा सरळ सरळ राजद्रोह. पुतिन यांनी अलदगपणे सत्तावर्तुळात प्रवेश करून नंतर ज्याप्रमाणे आपली पकड बसवली तसेच काहीसे त्यांच्याविरोधात त्यांचेच काही सहकारी करू पाहतात किंवा काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. ती अनाठायी म्हणता येणार नाही. तेव्हा अशा सर्व कारणांमुळे पुतिन यांस प्रिगोझिन नकोसे झाले असणे शक्य आहे आणि पुतिन यांचा लौकिक पाहता त्यांचा हात या विमान घातपातामागे असणेही सहज शक्य आहे. रशियात पुतिन विरोधकांच्या मरणाच्या फक्त बातम्या येतात. त्या आकस्मिक हत्यांमागील कारणे आणि त्यास जबाबदार कोण, हे कधीही समोर येत नाही. त्याच न्यायाने प्रिगोझिन यांच्या मरणाबाबतही काही अधिक बातमी, तपशील, त्यास कोण जबाबदार इत्यादी पुढे येईल, अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. पण आता प्रश्न आहे तो प्रिगोझिन यांनी उभारलेल्या खासगी लष्कराचा. हे लष्कर सीरिया, आफ्रिका आदी ठिकाणी आताच गोंधळ घालत आहे. त्यांस मोकळे सोडता येणार नाही. परंतु प्रिगोझिन यांच्या या व्यवस्थेतील उत्तराधिकारीही त्यांच्यासमवेत मारला गेल्याने या सैनिकांस आता तसा कोणी नेता नाही. त्यामुळे ही खासगी सेना पूर्णपणे गुंडाळून तरी टाकली जाईल अथवा काही प्रमाणात रशियाच्या लष्करात विलीन करून घेतली जाईल. ते असे मोकळे आणि मोकाट सोडले जाणार नाहीत, हे मात्र नक्की. यातून नवा एखादा प्रिगोझिन तयार होणार नाही, याची खबरदारी पुतिन नक्कीच घेतील. हुकूमशहा भित्रा वाटावा इतका अतिरेकी सावध असतो. पुतिन यास अपवाद नाहीत. आणि कोणत्याही अन्य हुकूमशहाप्रमाणे त्यांस ‘अवध्य मी, अनंत मी’ असे वाटत असले, तरी वास्तव तसे असणार नाही.