दिल्लीतील तख्तास आव्हान ठरणाऱ्या महाराष्ट्री नेतृत्वाचा बंदोबस्त करण्यासाठी येथील नेत्यांच्या आप्तेष्टांनाच हत्यार म्हणून वापरण्याचा प्रयोग मोगलाईपासून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकीयांविरोधात किती रक्त आटवावे लागले ते नव्याने सांगण्याची गरज नाही. पुढे इंग्रजांनी हाच ‘फोडा व झोडा’ मार्ग अधिक रुंद केला. आज मोगलाई नाही आणि इंग्रजही येथून गाशा गुंडाळून मायदेशी गेले. पण तरीही या दोघांनी यशस्वी करून दाखवलेली युक्तीच महाराष्ट्राच्या बीमोडासाठी दिल्लीश्वरांच्या कामी अजूनही येताना दिसते. ताज्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे त्याचे उदाहरण. या वेळी महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या. त्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या साधर्म्याचा मुद्दा ‘उजव्यांचे समाजवादी रक्षाबंधन’ या संपादकीयात (२५ नोव्हेंबर) चर्चिला गेला. आज या निवडणुकीतील फरकाच्या मुद्द्याविषयी. झारखंडमधे ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ या अगदी स्थानिक पक्षाने भाजपच्या बलदंड आव्हानास झुगारून सत्ता आपल्या हाती राखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि हे कमी म्हणून की काय आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी धार्मिक मुद्द्यावर झारखंड पेटवण्याचा प्रयत्न केला. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांनी त्यावर सहज पाणी ओतले. तुरुंगवास, केंद्रीय चौकशी यंत्रणा, भाजपची अमाप ताकद या सर्वांवर सोरेन यांनी मात केली. एक लहानसा प्रादेशिक पक्ष बलाढ्य भाजपची अतिबलाढ्य साधनसंपत्ती आणि त्या साधनसंपत्तीचा निर्घृण उपयोग करणारे नेते या सर्वांस पुरून उरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा