समाजमाध्यमांत जे काही वाचू/पाहू त्याने स्वत:ची डोकी आणि भावना उद्दीपित होऊ न देणे हाच त्यातल्या त्यात या संकटास भिडण्याचा समजूतदार मार्ग आहे..

एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या खोटय़ा ध्वनिचित्रफितीची दखल घेऊन माहिती तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले, हे योग्यच! एका ब्रिटिश अभिनेत्रीच्या देहावर भारतीय अभिनेत्रीचा चेहरा बेमालूमपणे बसवल्याचे यातून पुढे आले. हे एकमेव उदाहरण नाही. व्यावसायिकांसाठीच्या एका अ‍ॅपवर ब्लूमबर्गच्या एका पत्रकाराचे प्रोफाइल बनवले गेले, जो प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हता. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडीज असे भारदस्त नाव असलेल्या संस्थेत उच्चपदी असलेल्या एका महिलेचेही असेच प्रोफाइल केले गेले. प्रत्यक्षात अशी कोणीही महिला त्या संस्थेत नव्हती. गेल्या मार्च महिन्यात एका जर्मन कंपनीच्या ब्रिटिश उपकंपनीच्या प्रमुखास जर्मनीतून मूळ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दूरध्वनीवरून फोन आला आणि एका खात्यात बलदंड रक्कम भरण्यास सांगितले गेले. त्यानुसार ती रक्कम भरलीही गेली. नंतर उघडकीस आले की ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संबंधित कंपनीच्या प्रमुखाचा हुबेहूब आवाज काढून सदर आदेश दिला गेला. या तंत्रज्ञानाचा फटका अशांनाच बसला असे नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा एका ध्वनिचित्रफितीत डोनाल्ड ट्रम्प यांची असभ्य शब्दांत निर्भर्त्सना करताना आढळले. भारतीय अभिनेत्रीच्या ध्वनिचित्रफितीप्रमाणे ओबामा यांची ही चित्रफीतही काही क्षणांत प्रचंड व्हायरल झाली. पण ती पूर्णपणे बनावट होती आणि डीपफेक तंत्राने ती बनवली गेली होती. सध्या डोकेदुखी बनलेल्या ‘फेसबुक’ या आंतरराष्ट्रीय चावडीचा जनक मार्क झकरबर्ग यांसही या तंत्राचा झटका बसला. याचा अर्थ जे झाले, होत आहे आणि होणार आहे ते वैश्विक आहे. पण त्याची डोकेदुखी मात्र स्थानिक असल्याने या सगळय़ाचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. पण त्याआधी हे होते कसे हे समजून घ्यावे लागेल. याचे कारण असे की हे थांबवता येणारे नाही.

Revenue Minister Chandrashekhar Bawankule warned revenue officials
खबरदार! कामात कुचराई तर कारवाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Punha Kartvya Aahe
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत होणार नवीन एन्ट्री; ‘या’ जेष्ठ अभिनेत्री दिसणार गुरूमाँच्या भूमिकेत
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Transgender actress Shubhi Sharma
तृतीयपंथी अभिनेत्रीचा झाला अपघात; दुचाकी चालकाने दिली धडक, पोलिसांनी केली मदत
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
drugs inspector nidhi pandey viral video taking bribe
Video: महिला अधिकाऱ्याची पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाचखोरी; कॅमेऱ्यात सगळा प्रकार कैद; पदावरून गच्छंती!

हेही वाचा >>> अग्रलेख : जात आडवी येणार..

अलीकडे समाजमाध्यमांच्या उदयानंतर अनेकांकडून हौसेने स्वत:हून वा दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून स्वत:च्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांत ‘सोडल्या’ जातात. यामुळे जिचे भावविश्व घरातल्या चार-पाच जणांव्यतिरिक्त फार नाही अशा व्यक्तीपासून ते सार्वजनिक जीवनातील व्यक्तिमत्त्वापर्यंत सगळय़ांचेच आयुष्य रस्त्यावर आले. म्हणजे घरातल्या घरात अंडय़ाचे ऑम्लेट बनवण्याचे वा चॉकलेट वा तत्सम काही निरुपद्रवी आणि निरुपयोगी उद्योगांचे अकारण व्हिडीओ करून ते प्रदर्शित करणाऱ्यापासून ते एखाद्या अभ्यासकाच्या/कलाकाराच्या/ खेळाडूच्या वा अन्य व्यावसायिकाच्या नैपुण्यापर्यंत हल्ली या समाजमाध्यमांमुळे सर्व काही चव्हाटय़ावर मांडता येते. डीपफेक तंत्राची ही सुरुवात. उच्च दर्जा/ गती/ क्षमतेचा संगणक आणि ते हाताळण्याची बौद्धिक कुवत असलेले तंत्रज्ञ कोणाचेही हे असले समाजमाध्यमी तुकडे, आवाज इत्यादी गोळा करून अन्य कोणत्याही व्यक्तीवर त्यांचे सहज आरोपण करू शकतात. इतकेच काय तर एखाद्याची भाषणे समाजमाध्यमांत असतील तर त्या व्यक्तीच्या आवाजात तिने न उच्चारलेले शब्दही तोंडी पेरता येतात आणि त्यातून तयार होणारी ध्वनिचित्रफीत हुबेहूब त्या व्यक्तीची असल्यासारखीच वाटते. याचा सगळय़ात मोठा फटका बसला तो महिलांस. डीपफेकचा मुक्त वापर प्रसिद्ध, सौंदर्यवती महिलांना व्हर्च्युअली अनावृत करण्यात अधिक केला गेला आणि यापुढेही तो तसा केला जाईल ही शक्यता आहे. दाक्षिणात्य अभिनेत्रीस अलीकडे जे सहन करावे लागले, तो याच मानसिकतेचा परिपाक. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात असे १५ हजार डीपफेक व्हिडीओ समाजमाध्यमांत सोडले गेल्याचे या क्षेत्रात कार्य करणाऱ्या एका अमेरिकी कंपनीस आढळले. त्यातील ९६ टक्के हे असे महिलांस अनावृत करून त्यांस वाटेल ते करताना दाखवणारे होते. हे भयंकर आहे असे म्हणणेदेखील कमी वाटावे इतके हे धोकादायक आहे.

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘बिबी’ बायडेनना बुडवणार!

विशेषत: आपल्यासारख्या देशांत. जेथे कशानेही माथी भडकवली जातात, भावना इतक्या कृश की ज्या कशानेही दुखवल्या जातात आणि हातांच्या रिकामेपणाशी स्पर्धा करणारी डोकी पैशाला पासरीने उपलब्ध असतात तेथे या तंत्राच्या संभाव्यतांचा धोका अधिक आहे. तो जितका सामाजिक आहे, तितकाच तो वैयक्तिकही आहे. एखादा संगणक-कुशल तरुण आपणास नकार देणाऱ्या तरुणीचा असा काही व्हिडीओ सहजपणे समाजमाध्यमांत प्रसृत करून त्या अभागी तरुणीचे जिणे हराम करू शकेल. म्हणजे अ‍ॅसिड फेकून चेहरे करपवून टाकणारे विपुल असताना त्याच्या जोडीला ही चेहरा ‘काळा’ करण्याची आधुनिक सोय! नुकताच असा प्रकार जिच्याबाबत घडला ती अभिनेत्री सेलेब्रिटी असल्याने सरकारने झाल्या प्रकाराची दखल घेतली आणि कारवाईचे आदेश दिले. पण एखाद्या सामान्य महिला/तरुणीबाबत असे काही झाल्यास तिच्या आयुष्याचे काय होईल या प्रश्नानेही अंगावर काटा यावा. या अभिनेत्रीबाबत झाल्या प्रकाराची दखल घेऊन सरकारने सदर ध्वनिचित्रफिती काढून घेण्याचा आदेश भले दिलाही. पण काय उपयोग त्याचा? असल्या गोष्टी इतक्या वाऱ्याच्या वेगाने पसरतात की त्यांना एक तर आवर घालणे अशक्य आणि नंतर नुकसानभरपाई तर अशक्याहून अशक्य. अब्रूचे/विश्वसनीयतेचे जे काही नुकसान अशा प्रकारात होते ते नंतर या ध्वनिचित्रफिती काढून घेतल्याने काही अंशानेही भरून येत नाही. जागतिक भांडवल बाजारात कंपन्यांचे समभाग या असल्या उद्योगांमुळे गडगडल्याची उदाहरणे आहेत. जे पाहिले/ऐकले आणि अगदी अनुभवलेही, ते खोटे होते ही उपरती नंतर होऊन काहीही उपयोग नाही, हे जागतिक स्तरावरही दिसले.

हेही वाचा >>> अग्रलेख : भूक निर्देशांक सत्य?

भारतात त्याचा ‘आविष्कार’ अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यात आगामी वर्ष सार्वत्रिक निवडणुकांचे आणि समाजमाध्यमांचा वापर अस्त्र म्हणून करण्यात ‘काहीं’नी नैपुण्य मिळवलेले! अशा वेळी आपणास नको असलेल्या वा आपल्या मार्गात काटा असलेल्या कोणाही नेत्याची कसलीही ध्वनिचित्रफीत बनवून समाजमाध्यमांत सोडली की झाले! बरे हे सर्व जगाच्या पाठीवरून कोठूनही करण्याची सोय! आपल्याकडेच काही नेत्यांची ट्विटर खाती बनावट असल्याचे म्हटले गेले. त्याचे पुढे काही झाले नाही आणि याबाबत दूरसंचारमंत्री राजीव चंद्रशेखर काही करण्याचीही शक्यता नाही. अशा परिस्थितीत एखादी ध्वनिचित्रफीत/वक्तव्य ठरवून व्हायरल करण्याची सोय सहज उपलब्ध आहे आणि अलीकडे सर्वच राजकीय पक्ष कमीअधिक प्रमाणात या तंत्रात वाकबगार झाले/होत असल्याने हा समाजमाध्यमी कोलाहल आता अधिकच वाढेल यात शंका नाही. संबंधित अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेचा विषय झाल्याने अनेक स्वयंभू माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञ हे ‘‘डीपफेक’ व्हिडीओ कसे ओळखाल?’, अशा पद्धतीचे शहाजोग सल्ले देताना आढळतात. हे; साप विषारी की बिनविषारी कसे ओळखावे याचे प्रवचन साप चावल्याने गर्भगळीत व्यक्तीस देण्यासारखेच! अशा व्यक्तीस तातडीची गरज असते ती विषावर उतारा देण्याची.

तो सर्पदंशाने बाधित व्यक्तीस एक वेळ मिळेल. पण समाजमाध्यमे आणि डीपफेक बाधितांस ती सोय नाही. त्यांस इलाज नाही. यावर तांत्रिक उतारादेखील नाही. समाजमाध्यमांत जे वाचू/पाहू त्याने स्वत:ची डोकी आणि भावना उद्दीपित होऊ न देणे हाच त्यातल्या त्यात या संकटास भिडण्याचा समजूतदार मार्ग. तथापि तो सामाजिक शहाणपणाच्या अंगणातून जात असल्याने आणि हे अंगण कमालीचे आकसल्याने हा मार्ग कोठपर्यंत जाईल, हा प्रश्न. अनेक असत्ये किंवा ‘फेक’सत्याने ग्रासलेल्या समाजासमोर आता हे ‘डीपफेक’चे आव्हान आहे. ते पेलण्याची मानसिक तयारी सुजाणांनी तरी करायला हवी.

Story img Loader