अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपले मित्रबित्र असले तरी चिपतंत्रज्ञान भारतास सहज मिळणार नाही, असाच अमेरिकेचा प्रयत्न आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता-आर्टिफिशियल इंटलिजन्स (एआय)- या विषयाच्या चर्चेस आता चांगलीच गती आलेली दिसते. विज्ञान, तंत्रज्ञानविषयक चर्चांचा परीघ आणि खोली वाढत असेल तर त्याचे केव्हाही स्वागत. कोणत्या मुहूर्तावरील स्नान आत्मिक उन्नती अधिक करेल इत्यादी चर्चेपेक्षा विज्ञान, तंत्रज्ञानाची चर्चा जैविक (बायोलॉजिकल) आणि मर्त्य मानवांसाठी अधिक उपयोगी. त्यामुळे ती आपल्याकडे सुरू झाली ही बाब महत्त्वाची. ती वाढण्यास भले निमित्त सॅम आल्टमन याचा भारत दौरा हे असेल. पण त्यामुळे चर्चा सुरू होण्याचे महत्त्व कमी होत नाही. सॅम हे मायक्रोसॉफ्ट-पुरस्कृत ‘ओपन एआय’चे कर्तेधर्ते. त्यांचे ‘चॅटजीपीटी’ हे एआयस्त्र आज आपल्याकडेही अनेकांच्या संगणक, मोबाइलवर सुखाने स्थानापन्न झाल्याचे दिसते. या एआय विश्वास गेल्या आठवड्यात चीनने हादरा दिला. चीनने स्वत:चे ‘डीपसीक’ हे स्वतंत्र एआयस्त्र बाजारात आणले. त्यामुळे जगापेक्षाही अधिक धक्का आपणास बसला. कारण भारतातही हे ‘डीपसीक’ वापरले जाण्याची शक्यता. त्यामुळे आपण ही बाब गांभीर्याने घेतली आणि एआयसाठी कसे काय काय करता येईल याची वाच्यता केली गेली. तंत्रज्ञान असो वा संरक्षण. चीन हा देश कार्यक्रमपत्रिका ठरवतो आणि त्याबरहुकूम जगास आणि त्यातही आपणास वागावे लागते. हे उलट होताना दिसत नाही. म्हणजे आपण कशात पुढाकार घेतलेला आहे आणि चीनला त्याची दखल घ्यावी लागत आहे, असे होत नाही. सर्व प्रक्रिया उलट. एआयबाबतही तसेच होताना दिसते. आता आपण एआयसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करत असून अर्थसंकल्पातही ५०० कोटी रुपये या क्षेत्राच्या विकासासाठी यंदा खर्च होतील. तेवढे तर तेवढे! सुरुवात होणे महत्त्वाचे. ती झाली. सॅम आल्टमन यांच्या भारत दौऱ्याने तीस गती आली. आता आपल्या यासंदर्भातील प्रयत्नांविषयी.

त्यावर भाष्य करण्याआधी सॅम आल्टमन भारतात का आले, ही बाब लक्षात घ्यायला हवी. ‘‘भारत ही आमच्यासाठी अमेरिकेनंतरची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे’’, अशा स्पष्ट शब्दांत आल्टमन यांनी आपला इरादा स्पष्ट केला. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रयत्न नाही. त्यानंतर आपले उच्च तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव आदींनी आल्टमन यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचे सार असे : अमेरिका वा चीन यांनी एआय विकसनासाठी जितका खर्च केला आहे त्याच्या काही अंशात भारत स्वत:चे एआय प्रारूप विकसित करू शकतो. म्हणजे भारताचे प्रारूप त्यांच्यापेक्षा स्वस्त असेल; असा त्याचा अर्थ. हे आपले वैशिष्ट्य. त्याचे कौतुक करावे किंवा काय हाही प्रश्न. पहिल्यांदा काही विकसित करणे, त्याची सर्वोत्कृष्टता इत्यादीपेक्षा इतरांपेक्षा स्वस्त हा आपला हुकमी एक्का राहिलेला आहे. मग ते उपग्रह प्रक्षेपण असो की अन्य तंत्रविस्तार. एआयबाबतही प्रतितास एक डॉलरपेक्षाही कमी खर्चात संगणन (कम्प्युटिंग) करून देणारे प्रारूप आपण विकसित करून देणार आहोत. त्यासाठी विविध विज्ञान संस्था, विद्यापीठे वा तंत्रसमूहांस आवश्यक ते भागभांडवल सरकारतर्फे पुरवले जाईल. त्यासाठी सरकारी पातळीवर प्रस्ताव मागवले जाणार असून या क्षेत्रात भरीव काही करू शकतील असे किमान सहा नवे नवउद्यामी (स्टार्टअप्स) सरकारच्या डोळ्यासमोर आहेत. त्यांच्याकडून पुढील दहा महिन्यांत एआयचे खास भारतीय बनावटीचे प्रारूप सादर होईल. साधारण पाच-सहा दशकांपूर्वी अमेरिकेने आपणास महासंगणक देण्यास नकार दिला तेव्हा भारतीय तंत्रज्ञांनी स्वतंत्र शक्कल लढवून ती क्षमता साध्य केली. ‘समांतर संगणन’ (पॅरलल कम्प्युटिंग) ही ती युक्ती. म्हणजे एक महाप्रचंड क्षमतेचा संगणक जे करू शकेल ते आपण लहान क्षमतेचे संगणक समांतर पद्धतीने एकत्र कामास लावून साध्य केले. या लहान संगणकांची ‘बुद्धिमत्ता’ एकाच वेळी समांतर पद्धतीने कामाला जुंपली आणि त्याद्वारे महासंगणनाचे लक्ष्य साध्य केले. तसेच काही आपण एआयसंदर्भात करू पाहतो आहोत.

उदाहरणार्थ चीनचा ‘डीपसीक’ हा २००० जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स) क्षमतेवर काम करतो. जीपीयू म्हणजे अत्यंत गुंतागुंतीचे संगणन करण्याची क्षमता असणाऱ्या अत्युच्च दर्जाच्या चिप्स. कमीतकमी जागेत जास्तीत जास्त अशा चिप्स बसवण्याची क्षमता असणारे सेमीकंडक्टर्स विकसित करणे हे हार्डवेअरचे आव्हान. आपण सद्या:स्थितीत बनवलेल्या लहानात लहान चिपचा आकार २० नॅनोमीटर (एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा १०० कोटी इतका सूक्ष्म अंश) इतका आहे. मात्र जगात प्रगत देशांनी बनवलेल्या चिप्स फक्त पाच नॅनोमीटर इतक्या सूक्ष्मातिसूक्ष्म आहेत. अशा कमालीच्या उच्च दर्जाच्या हार्डवेअरला तितक्याच उच्च दर्जाच्या संगणनाची- सॉफ्टवेअरची- जोड एआयसाठी आवश्यक. यावर सध्या हुकमत आहे ती अमेरिका आणि चीन या दोन देशांची. म्हणूनच चीनचा ‘डीपसीक’ विकसित झाला. तो हजार जीपीयूचा होता तर चॅटजीपीटीच्या पहिल्या आवृत्तीचा एआय तब्बल २५ हजार जीपीयूवर आधारित आहे. या पार्श्वभूमीवर आपण गाठलेली क्षमता १५ हजार जीपीयूंची आहे. सद्या:स्थितीत चिपनिर्मिती क्षेत्रात जागतिक बाजारात आपला वाटा एक टक्का इतकाही नाही. यात आघाडीवर आहेत ते तैवान, दक्षिण कोरियादी देश. ‘एनविडिया’सारखी या क्षेत्रातली कंपनी ही अर्थाकाराने इतकी दिव्य आहे की आपण तिची तुलनाही करू शकत नाही. या कंपनीस मायक्रोसॉफ्ट, अॅपल अशा कंपन्यांची साथ असल्याने अमेरिकी कंपन्यांनी यात घेतलेली गती कल्पनातीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपले मित्रबित्र असले आणि त्यांची सत्ता यावी यासाठी आपल्याकडे अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले, ‘अगली बार…’ असा प्रचार केला हे खरे असले तरी हे चिपतंत्रज्ञान भारतास सहज मिळणार नाही, असाच अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे ज्यांनी ‘देसी’ महासंगणक विकसित केला त्या ‘सेंटर फॉर अॅडव्हान्स कम्प्युटिंग’ (सी-डॅक) या संस्थेकडे हे काम सोपवण्यात आलेले आहे. हे सर्व छानच.

तथापि खरे आव्हान आहे ते उच्च गुणवत्तेचे अभियंते तयार करणे हे. चीनचे ‘डीपसीक’ हे संपूर्णपणे देशांतर्गत बनावटीचे आहे आणि त्यासाठीच्या चिप्सही त्यांच्याच आहेत. म्हणजे हार्डवेअरही त्यांचे आणि सॉफ्टवेअरही चिनी. हे सत्य लक्षात घेतल्यास मानवी गुणवत्ता आणि तांत्रिक क्षमतानिर्मिती यांचे महत्त्व लक्षात येईल. मानवी तांत्रिकतेबाबत आपले आशाकेंद्र म्हणजे पं. नेहरू-कालीन आयआयटीज आणि एखादे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स वा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. तेही त्याच काळातील. पुढे सगळा आनंदच. हे झाले उच्च शिक्षणाबाबत. ते ज्यावर आधारित असते त्या प्राथमिक शिक्षणाची लक्तरे दिवसागणिक निघत असतात. शिक्षणाची तरतूद दुप्पट केली जाईल असे २०१४ पासून सांगितले जात असले तरी त्यात तसूभरही फरक पडलेला नाही. पं. नेहरूंच्या नावे बोटे मोडत असताना गेल्या दहा वर्षांत याबाबत काय झाले हा प्रश्न. एआयनिमित्ताने तो अधिकाधिक गंभीर होत जाणार यात शंका नाही. प्रत्येक भारतीय बालक जन्मत:च एआयशी परिचित असते अशी कोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांच्याशी एआयवरील चर्चेत केली. माता-संबंधित आई, आय हे शब्द आणि एआय असा हा कोटी-बंध. अनेकांस तो चतुर वाटला असेलही. तिचा आधार घेत एआयच्या आव्हानाबाबत ग्रेस यांच्या कवितेचा आधार घेत इशारा देणे इष्ट. नपेक्षा भविष्यात ‘घनव्याकुळ मीही रडलो’ असे म्हणण्याची वेळ येण्याचा धोका संभवतो.

Story img Loader