गतवैभवाची भाषा जनसामान्यांस नेहमीच आकृष्ट करते. तथापि तसे करताना किती ताळतंत्र सोडायचा आणि शहाणपणापासून किती फारकत घ्यायची?
राजकीय हिशेबासाठी शहाणपणा सोडून एक पाऊल मागे घेण्याचा लोकानुनय केला की नंतर अधिकाधिक मागेच जावे लागते. अमेरिकेचे माजी आणि भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांस आता याची जाणीव होत असणार. अमेरिकेस (पुन्हा एकदा) महान करण्याच्या वायद्यावर ट्रम्प गेल्या महिन्यातील निवडणुकीत विजयी झाले. ‘‘देशास महान करीन’’, ‘‘गतवैभव मिळवून देईन’’, ‘‘पुन्हा एकदा सोन्याची कौले चढवीन’’ वगैरे अजागळ घोषणांस लोक भुलतात. मग तो देश कोणताही असो. कारण भविष्य अज्ञात असते आणि वर्तमानाच्या अस्थिरतेत कथित उज्ज्वल भूतकाळाची पोपटपंची आशेचा किरण ठरते. बरे, हजारो वर्षांपूर्वीचा हा कथित उज्ज्वल भूतकाळ कोणी पाहिलेला आहे म्हणावे तर तसेही नसते आणि म्हणून विचारमंद जनसामान्य तो दंतकथा असूनही त्यावर विश्वास ठेवतात. राजकीय द्वंद्व म्हणजे या दंतकथांचा बाजार. या बाजारात शुष्क वास्तवावर शहाणे भाष्य करणाऱ्यांपेक्षा स्वप्नांचे खोटे इमले बांधणाऱ्याच्या उत्पादनांस नेहमीच अधिक मागणी असते. अमेरिकी निवडणुकीत त्याचा पुन्हा प्रत्यय आला. या निवडणुकीत ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’, म्हणजे ‘मागा’, हा जणू परवलीचा शब्द असल्यासारखे वातावरण होते. ‘मागा’च्या टोप्या काय, टीशर्ट काय, पोस्टर्स काय सगळा नुसता हुच्चपणा! यातील एकालाही अमेरिकेस पुन्हा महान करावयाचे आहे म्हणजे नक्की काय हे विचारले असते तर सांगता आले नसते. या प्रश्नाचे उत्तर खुद्द ट्रम्प यांनाही देता येणार नाही. पण तरीही हे सर्व ‘मागा’चे तुणतुणे वाजवत राहिले. आता ते अंगाशी येताना दिसते.
हेही वाचा : अग्रलेख : बडे बेआबरू होकर…
हे होणारच होते. याचे कारण ‘मागा’ म्हणजे केवळ परदेशीयांना, स्थलांतरितांना हाकला यापेक्षा अधिक काही या मंडळींच्या डोक्यात नाही. आपल्या ‘स्वप्नभूमीत’ गौरेतर स्थलांतरित नको, असा या ‘मागा’चा खरा अर्थ. तथापि या अर्धवटरावांस वास्तवाचे भान नाही. अमेरिका जी काही महान झाली/ होती वा आहे ती या स्थलांतरितांमुळे. या देशाचे नेतृत्व करणाऱ्यांत महान होण्याची क्षमता होती म्हणून जगभरातील स्थलांतरित त्याकडे आकृष्ट झाले आणि असे सर्व जगातील गुणवान आकर्षित झाले म्हणून तो देश इतका सशक्त झाला. हे स्थलांतर एके काळी अमेरिकेइतक्याच सशक्त असलेल्या सोविएत रशियात का नाही झाले? कारण तिथल्या देशनेतृत्वाची तितकी क्षमता नव्हती आणि नाही. त्यामुळे रशियात स्थलांतरितांविरोधात कोणी मोहीम हाती घेण्याची शक्यता नाही. हा फरक लक्षात घेताना या उभय देशांच्या नेतृत्वांतील साम्यस्थळही विचारात घ्यावे लागेल. हे साम्य आहे या दोन्ही देशप्रमुखांच्या भाषेत. ट्रम्प यांच्याप्रमाणेच पुतिन हेही रशियास पुन्हा गतवैभवी स्थानावर घेऊन जाऊ इच्छितात. तेव्हा मुद्दा हा की सच्ची लोकशाहीवादी अमेरिका असो वा अन्य कोणी वा रशिया. गतवैभवाची भाषा जनसामान्यांस नेहमीच आकृष्ट करते. तथापि तसे करत असताना किती ताळतंत्र सोडायचा आणि शहाणपणापासून किती फारकत घ्यायची याचे भान असावे लागते. ते नसले की काय होते याचे अमेरिकेत सध्या सुरू आहे ते उदाहरण.
झाले असे की कोणा लॉरा लूमर या अलीकडे भलतेच फॅड असलेल्या ‘इन्फ्लुएन्सर’ महिलेने ट्रम्प यांनी श्रीराम कृष्णन यांच्या सल्लागारपदी केलेल्या नेमणुकीवर समाजमाध्यमांत हिणकस म्हणावी अशी टीका केली. हे श्रीराम अर्थातच भारतीय वंशाचे आहेत आणि ट्रम्प यांनी ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (कृत्रिम प्रज्ञा) विभाग हाताळण्यासाठी त्यांना सल्लागार घोषित केले आहे. त्यावर या लूमरबाई संतापल्या. ट्रम्प यांची ही कृती ‘मागा’ आश्वासनास तडा देणारी आहे असे त्यांचे म्हणणे. म्हणजे ट्रम्प यांनी सर्व महत्त्वाच्या पदांवर फक्त स्थानिक अमेरिकी व्यक्तींच्याच नेमणुका कराव्यात, स्थलांतरित अजिबात नकोत असा त्यांचा आग्रह. ट्रम्प हे उजवे तर लूमरबाई अतिउजव्या. ट्रम्प यांनी प्रचारात स्थलांतरितांविरोधात चालवलेला मुद्दा अमलात आणावा यासाठी त्या आग्रही आहेत. त्यांचा हा समाजमाध्यमी आग्रह ‘मागा’ समर्थकांत वाऱ्यासारखा पसरला आणि समस्त ट्रम्प समर्थकांस तो पटलादेखील. त्यामुळे ट्रम्प यांची चांगलीच पंचाईत झाली. कारण निवडणुकीत एखादा विषय तापवणे ही एक बाब आणि तो तापवलेला विषय तडीस नेता येणे ही वेगळी बाब. ट्रम्प यांना हा फरक लक्षात आला असणार. कारण त्यांनी अधिकृत स्थलांतरितांचे स्वागत करणाऱ्या ‘एच १बी’ व्हिसाची तारीफ केली. पण या ‘मागा’ समर्थकांस हे मंजूर नाही. आपल्या गेल्या अध्यक्षीय कारकीर्दीत आणि अलीकडे प्रचारात ट्रम्प यांनी स्थलांतरितांविरोधात कडक भूमिका घेतली होती आणि हे परदेशी घुसखोर स्थानिक अमेरिकनांची कुत्री-मांजरे खातात असा हास्यास्पद आरोप केला होता. गेल्या खेपेस ट्रम्प यांनी ‘एच १बी’ व्हिसासही विरोध केला होता. वास्तविक ट्रम्प यांचे लक्ष्य होते ते बेकायदा मार्गाने येणारे स्थलांतरित. ‘एच १बी’ व्हिसा घेऊन अमेरिकेत जाणारे हे कायदेशीर मार्गाने गेलेले असतात.
हेही वाचा : अग्रलेख : महाराष्ट्राचे उत्तरायण
पण हा फरक समजावून घेण्यास लूमरबाई तयार नाहीत आणि ‘मागा’ समर्थकांसही तो अजिबात मंजूर नाही. स्थलांतरित म्हणजे स्थलांतरित. कायदेशीर-बेकायदा असा फरक नाही; सगळ्यांना हाकला असा त्यांचा आग्रह. अमेरिकी उच्चतंत्र कंपन्या, बँका, वित्तसंस्था यांना हे झेपणारे नाही. कारण या सगळ्यात कळीच्या पदांवर अनेक परदेशी आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व ट्रम्प यांचे सूर-साथी एलॉन मस्क यांनी आधी केले. मस्क हे ‘एक्स’ (आधीची ट्विटर) या कंपनीचे प्रमुख. त्यांच्या कंपनीत अनेक परदेशी नागरिक आहेत आणि खुद्द मस्क हेदेखील स्थलांतरितच आहेत. त्यांनी ‘एच १ बी’चे समर्थन केले. झाले, ‘मागा’ समर्थक त्यांच्याही मागे लागले. परिस्थिती अशी झाली की अखेर ट्रम्प यांस मस्क यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरावे लागले. त्यामुळे समाजमाध्यमी ‘मागा’पंथी अधिकच चिडले. त्यांचा तो अवतार पाहून मस्क यांनाही आपल्या भूमिकेत बदल करावा लागला. ‘एच १बी’चा पुनर्विचार व्हायला हवा; त्यात अनेक दोष आहेत, असे आता हे मस्क महाशय म्हणतात. परिणामी या मुद्द्यावर ट्रम्प एकटे पडले.
हा जगाचा इतिहास आहे. भावना उद्दीपित करून निवडणुका जिंकल्या, सत्ता मिळवली की या भावनांस आळा घालावा लागतो. परंतु एव्हाना हे भावनोद्दीपित चेकाळलेले असतात. आपल्या भावनांस ज्यांनी हात घातला त्यांचे शांत होणे त्या सर्वांस मंजूर नसते. ते मग आपल्याच नेत्यांच्या कह्यात राहत नाहीत. मग मुद्दा मशिदींखालील शिवलिंगांचा असो वा स्थलांतरितांस हाकलण्याचा. दोन्ही भिन्न भौगोलिक मुद्द्यांवरील प्रतिक्रियेत साम्य असते. तेव्हा अमेरिकेतील या ‘संगीत ‘मागा’पमान’ नाट्याची मौज भारतीयांनी मन:पूर्वक घ्यायला हवी. कारण या ‘एच १बी’ व्हिसाचा सर्वाधिक फायदा भारतीय उठवतात. म्हणजे दर दहा ‘एच १बी’ धारकांतील तब्बल सात व्हिसाधारी ‘भरतभू’त जन्मलेले असतात. या नाट्याची मौज घेतल्यानंतर आणि ‘व्हिसा’ मिळाल्यानंतर भावनिक मुद्द्यांवर- मग तो मायदेशातील मंदिर-मशिदीचाही का असेना- अक्कल गहाण टाकायची नसते, याचेही भान राखता आले तर बरे! तसेही अमेरिकावासी भारतीयांचा आविर्भाव आपले भारतावर भारतीयांपेक्षा अधिक प्रेम आहे, असा असतो! त्यांच्यासाठी हा सं. ‘मागा’पमानाचा प्रयोग अधिक रंगतदार असेल.