उजव्या ल पेन यांस दूर ठेवायचे की एकमेकांत भांडून त्यांच्यासाठी वातावरण अनुकूल करायचे इतकाच पर्याय फ्रेंच राजकारण्यांसमोर आहे.

ब्रिटनपाठोपाठ शेजारील फ्रान्समधील निवडणूक निकालावर भाष्य करताना काही मुद्दे अत्यंत लक्षणीय ठरतात. कायदेमंडळाची ही निवडणूक अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांनी ओढवून घेतली होती. युरोपियन युनियनच्या निवडणुकीत फ्रान्समध्ये माक्राँ यांच्या पक्षापेक्षा मारीन ल पेन यांच्या नेतृत्वाखालील उजव्यांचा विजय प्राधान्याने झाला. त्यामुळे स्वत:चे बहुमत तपासण्यासाठी हा अकाली निवडणुकांचा घाट माक्राँ यांनी घातला. वास्तविक खुद्द माक्राँ यांच्या अध्यक्षीय निवडणुकीस आणखी तीन वर्षे आहेत. तसेच ‘नॅशनल असेम्ब्ली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, आपल्या ‘लोकसभा’सदृश फ्रेंच प्रतिनिधिगृहाची मुदतही संपत आली होती असे नाही. तरीही माक्राँ यांनी ही निवडणूक जाहीर केली. हे साहस होते. ते दु:साहस ठरता ठरता वाचले. म्हणजे युरोपीय संघाच्या निवडणुकीप्रमाणे माक्राँ यांच्या विरोधी उजव्या गटांस बहुमत मिळाले नाही. वास्तविक फ्रेंच राज्यपद्धतीप्रमाणे या निवडणुकीत त्या पक्षीयांचा विजय झाला असता तरी माक्राँ यांस पदत्याग करावा लागला असता असे नाही. तरीही देशातील राजकीय विचारधारेची दिशा तपासणे हे माक्राँ यांच्या निवडणूक निर्णयाचे कारण होते. मतदारांनी माक्राँ यांस निराश केले नाही. या निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत मारीन ल पेन यांच्या उजव्या आघाडीस मतदारांनी बहुमतापासून बऱ्याच अंतरावर रोखले. फ्रेंच मतदारांनी या निवडणुकीत दाखवलेले शहाणपण खरोखर कौतुकास्पद. आणि म्हणून दखलपात्र.

हेही वाचा >>> अग्रलेख: मजुरोदय!

फ्रेंच मतदारांस पुढे काय वाढून ठेवलेले आहे याची जाणीव आठवडाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीत झाली. तेथे सार्वत्रिक निवडणुका दोन टप्प्यांत होतात. पहिल्या फेरीत कितीही उमेदवार उभे राहू शकतात आणि त्यात सर्वाधिक मते मिळवणारे दोन उमेदवार दुसऱ्या फेरीत जातात. तेथे अधिक मते मिळवणारा विजयी होतो. या अशा निवडणुकांनंतर किमान वर्षभर निवडणुका न घेणे हा नियम आहे. त्यानुसार या वेळी पहिल्या फेरीत कडव्या उजव्या ल पेन यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांस भरघोस मते मिळाली. दुसऱ्या फेरीतही हे प्रमाण असेच राहिले असते तर त्यांची उजवी आघाडी नॅशनल असेम्ब्लीत बहुमताने सत्ता स्थापन करू शकली असती. ल पेन यांचा परिचय फ्रान्सच्या डोनाल्ड ट्रम्प असा करून दिल्यास त्यांच्या राजकारणाची दिशा लक्षात येईल. ज्या मूल्यांसाठी फ्रान्स ओळखला जातो त्या सर्व मुद्द्यांस या बाईंचा विरोध. तेव्हा दुसऱ्याही फेरीत या अशाच विजयी झाल्या तर समाजघड्याळाचे काटे उलटे फिरतील याची जाणीव झाल्याने फ्रान्सच्या राजकीय वर्तुळात एकदम खळबळ माजली आणि फ्रान्सचे राजकारण हडबडून गेले. त्यातूनच काहीही करून हे उजवे वळण टाळायला हवे या निर्धाराने अन्य राजकीय पक्षांनी परस्पर सहकार्याचे धोरण अवलंबिले. अनेकांनी निवडणुकीतून माघार घेत डावीकडील सहिष्णू, समाजवादी पक्षीयांस पाठिंबा देण्याचा सपाटा लावला. त्यामुळे दुसऱ्या फेरीत बऱ्याच ठिकाणी ल पेन यांच्या कर्मठ आघाडीविरोधात डावे, समाजवादी, पर्यावरणवादी इत्यादींनी एकास एक उमेदवार दिले. ल पेन यांचे राजकारण कमालीचे विद्वेषाचे आहे आणि मुसलमान, फ्रान्स-युरोपीय संघ संबंध, स्थलांतरित अशा प्रत्येक मुद्द्यावर त्यांची मते केवळ धर्मांध म्हणावीत अशी आहेत. ही त्यांना तीर्थरूप जीन ल पेन यांच्याकडून मिळालेली वडिलोपार्जित देणगी. या अशा धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणास हल्ली फ्रान्समध्ये ‘लपेनायझेशन’ म्हणतात. ते टळले. हा त्यांचा चौथा पराभव.

तत्पूर्वी ल पेन आणि उजवे बाजी मारणार असे अनेकांचे भाकीत होते. निवडणूकपूर्व चाचण्यांतूनही तसेच कल समोर येत होते. त्यामुळे हुरूप येऊन ल पेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या भाषेची धार आणखी वाढवली आणि सत्ता जणू मिळालीच अशा थाटात धोरणात्मक भाष्य करणे सुरू केले. याचा उलट परिणाम झाला. त्यांच्या एकांगी, एककल्ली आणि एकमार्गी राजकारणाविरोधात जनमत अधिकच संघटित होऊ लागले. जर्मनीत ‘युरो कप’ स्पर्धेत फ्रान्सचे नेतृत्व करणाऱ्या केलीन एम्बापेसारख्या विख्यात खेळाडूनेही राजकारणातील या उजव्या, धर्मवाद्यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली आणि देशाच्या सहिष्णू लोकशाहीस ही मंडळी नख लावू शकतात, असा जाहीर इशारा दिला. याबाबत फ्रेंचांचे कौतुक करावे तेवढे थोडे. एरवी अन्यत्र समाजातील मान्यवर वाढत्या हुकूमशाहीबद्दल भाष्य करणे सोडा, या प्रवृत्तींच्या पायावर लोटांगण घालण्यात धन्यता मानत असताना फ्रान्समध्ये साध्या साध्या माणसांनी, विविध क्षेत्रांतील धुरीणांनी राजकारणाच्या ध्रुवीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली. या सगळ्याचा निश्चित परिणाम झाला.

हेही वाचा >>> अग्रलेख: उन्माद आणि उसासा

आणि जो पक्ष ५७७ सदस्यांच्या नॅशनल असेम्ब्लीत बहुमत मिळवेल असे वाटत होते तो ल पेन-चलित उजव्या पक्षीयांचा गट थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यांच्या उजव्या आघाडीस जेमतेम १४३ जागा मिळाल्या. तर त्याच वेळी डावे आणि माक्राँ यांच्या नेतृत्वाखालील मध्यममार्गीयांचे अनुक्रमे १८२ आणि १६८ उमेदवार निवडून आले. त्यामुळे ल पेन यांच्या उजव्या आघाडीस सर्वात मोठा पक्ष ठरण्याचाही मान मिळाला नाही. म्हणजे सत्तास्थापनेची संधी मिळण्याचा प्रश्नच नाही. अर्थात फ्रान्समधील रिवाजानुसार पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याचा अधिकार सर्वस्वी अध्यक्षांचा. तेव्हा या बाईंना तशीही सत्तेची संधी नाही. गेल्या निवडणुकीतही ल पेन यांस रोखण्यासाठी डावे आणि समाजवादी एकत्र आले.

वर्तमानात या निकालाचा परिणाम म्हणून फ्रान्समध्ये आघाडी सरकार अटळ असेल. पलीकडील जर्मनीप्रमाणे फ्रान्सला आघाडीच्या सत्ताकारणाची सवय नाही. एक तर त्या देशाची अध्यक्षीय लोकशाही अन्यांपेक्षा वेगळी आहे आणि तेथील राजकीय पक्षही ‘मोडेन पण वाकणार नाही’ या वृत्तीचे आहेत. या वेळी उजव्यांसमोर लोटांगण घालावे लागून स्वत:स मोडावे लागेल हे ध्यानात आल्यावर त्यांनी आघाडी केली. पण निवडणुका आघाडीने लढणे आणि सत्ता आघाडीत राबवणे यात जमीन- अस्मानाचे अंतर असते. एकमेकांमध्ये वाटून घेण्यासारखे काही नसते तेव्हा वाटण्यांवर एकमत घडवणे नेहमीच सोपे. पण बरेच काही वाटून घ्यायची संधी आल्यावर वाटण्यांत काहीच देऊ नये असे संबंधितांस वाटू लागते. फ्रान्समधील राजकीय परिस्थिती या सत्याची जाणीव करून देते. ‘‘संपूर्णपणे आमचाच कार्यक्रम राबविला जाणार असेल तर आम्ही सत्तेत आघाडी करू’’, असे तेथील डाव्या पक्षांनी आताच जाहीर केले आहे. तेव्हा समाजवादी आणि डाव्यांची मोट सत्तेसाठी बांधणे किती अवघड आहे हे लक्षात येईल. तथापि सद्या:स्थितीत त्या देशातील राजकीय पक्षांस आघाडीखेरीज पर्याय नाही. कायद्यानुसार आणखी एक वर्ष तेथे निवडणुका घेता येणार नाहीत. तेव्हा एकमेकांचा हात धरून सत्तेत कसे राहायचे हे तेथील राजकीय पक्षांस शिकावे लागेल. एकमेकांच्या अहंगंडास गाडून ल पेन यांस दूर ठेवायचे की एकमेकांत भांडून त्यांच्यासाठी वातावरण अनुकूल करायचे इतकाच पर्याय फ्रेंच राजकारण्यांसमोर आहे. यात निवड करणे अजिबात अवघड नाही.

फ्रेंच टोस्ट, फ्रेंच फ्राइज, कॉफी शौकिनांचा फ्रेंच प्रेस या जनप्रिय शब्दसमूहाप्रमाणे महिलांत ‘फ्रेंच ट्विस्ट’ही लोकप्रिय आहे. भारतीय महिलांच्या केशरचनेत जसा वाटोळा ‘अंबाडा’ त्याप्रमाणे फ्रेंच महिलांची वेणी घालून वा मोकळ्या केसांची उभट बांधणी म्हणजे ‘फ्रेंच ट्विस्ट’. त्या देशाच्या राजकारणातील हा ‘फ्रेंच ट्विस्ट’ही पेचदार तितकाच आकर्षक म्हणावा लागेल.