ट्रम्प यांचे सत्तारोहण पाहताना आपण अमेरिका या एकमेव महासत्तेच्या प्रमुखाचे सत्तारोहण पाहत आहोत की टिंबक्टु देशाच्या प्रमुखाचे असा प्रश्न अनेकांस पडला असणार.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तारोहणाचे थेट प्रक्षेपण पाहताना नक्की कोणकोणत्या भावना दाटून आल्या याचे वर्णन करता येणे अशक्य. अमेरिकी जनतेविषयी कमालीची कणव, निखळ विनोदाचा जागतिक नमुना पाहत असल्याचा निर्भेळ आनंद, पोट धरधरून हसणे, काही विधानांमुळे पुन:प्रत्ययाचा आनंद इत्यादी इत्यादी विविध भावतरंग हा सोहळा पाहत असताना सातत्याने उमटले. त्यांची ‘‘अमेरिकेचा ऱ्हास आजपासून थांबणार’’, ‘‘अमेरिकी जनता आजपासून खरी स्वतंत्र होणार’’, ‘‘अमेरिकेच्या सुवर्णयुगास आजपासून सुरुवात’’ आदी विधाने बहुसंख्यांस प्रतिध्वनीसम भासली असणार तर त्या विधानांमुळे काही अल्पसंख्यांच्या कपाळावरील आठ्यांची संख्या वाढली असणार. जे कोणी बहुसंख्य वा अल्पसंख्य या दोहोंत नसतील, त्यांच्या मनात हे सारे याआधी कोठे बरे ऐकले असा प्रश्न निर्माण झाला असणार आणि आपण अमेरिका या एकमेव महासत्ता प्रमुखाचे सत्तारोहण पाहत आहोत की टिंबक्टु देशाच्या प्रमुखाचे असाही प्रश्न त्यांस पडला असणार. एकाच वेळी विनोद आणि करुणा, उपहास आणि उद्वेग अशा परस्परविरोधी भावना जागृत करण्याची या सोहळ्याची- आणि या समारंभाचे नायक ट्रम्प यांची- क्षमता वादातीत म्हणायला हवी. त्यांचा दुसऱ्या खेपेचा चार वर्षांचा सत्ताकाळ या सोहळ्याने सुरू झाला. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या या गुणांचा प्रत्यय आपणास येणार असल्याने त्याविषयी अधिक काही भाष्य न करता त्यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर जे काही निर्णय घेतले त्यांची दखल घेतलेली बरी.

हेही वाचा : अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!

मेक्सिकोच्या आखाताचे ‘अमेरिकेचे आखात’ असे नामकरण, पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेणे, पर्यावरणाशी संबंधित पॅरिस करारातून अमेरिकेने बाहेर पडणे, अमेरिकी तेल कंपन्यांना हवे तितके तेल उपसू देण्याची मुभा असणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वाचा त्याग करणे, मेक्सिको-अमेरिका सीमेवर आणीबाणी जाहीर करून तेथील व्यवस्था संरक्षण दलाच्या हाती देणे अशा एकापेक्षा एक निर्णयांचा ट्रम्प यांचा धडाका यानिमित्ताने जगाने अनुभवला. अलीकडे ‘ढ’ व्यक्तींच्या वाटेल त्या कृत्यांस धडाडी म्हणण्याची प्रथा पडली असून ती चांगल्या प्रकारे रुजलेली दिसते. ट्रम्प यांचा पहिल्याच दिवसातील हा निर्णयधडाका धडाडी या गुणाविषयी खचितच प्रश्न निर्माण करतो. हे इतकेच नाही. यापुढे अमेरिकेत ‘पुरुष’ आणि ‘स्त्री’ हा पारंपरिक भेदच फक्त अधिकृत मानला जाईल. म्हणजे पारलिंगी (एलजीबीटीक्यू) व्यक्तींस त्या देशात यापुढे काहीही स्थान राहणार नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जिवाने पुरुष तरी असायला हवे अथवा स्त्री. हे दोन्हीही नसलेले वा दोन्हीही असलेल्यांस अन्यत्र ‘चले जाव’ असा ट्रम्प यांचा आदेश असेल. गेल्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला. तो निकाल जितका राजकीय होता त्यापेक्षा ट्रम्प यांच्यासाठी पुरुषार्थास हात घालणारा होता. त्यानंतर ट्रम्प यांचे समर्थक ‘कॅपिटॉल हिल’वर चालून आले आणि त्यांना ट्रम्प यांची फूस होती. अशा दीड हजार दंगेखोरांस त्या वेळी सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर खटले भरले. त्या सर्वांस ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी माफी दिली. म्हणजे सरकारविरोधातील बंडदेखील आता अमेरिकेत शिक्षापात्र नाही. यातील काही निर्णयांची घोषणा तातडीने झाली असली तरी त्यांचे परिणाम दूरगामी असतील.

उदाहरणार्थ वसुंधरा रक्षणाच्या पॅरिस करारातून तसेच जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेने बाहेर पडणे. पर्यावरणाच्या मुद्द्यावर आधीच विकसित आणि विकसनशील देशांत मोठी दरी आहे. पर्यावरण रक्षणार्थ विकसनशील देशांनी उपाय योजायचे पण त्याबदल्यात विकसित देशांनी त्या खर्चाचा भार उचलण्यास नकार द्यायचा असा हा वाद. पर्यावरणाचा इतका ऱ्हास झालेला आहे तो विकसित देशांच्या आतापर्यंतच्या धोरणांमुळे. पण पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उपायांमुळे पोटास चिमटा बसणार तो विकसनशील देशांच्या असा हा व्यापार. आता तर या सगळ्याच जबाबदारीतून अमेरिका स्वत:स मुक्त करणार. म्हणजे पॅरिस करार जवळपास बोंबलला असे म्हणायचे. त्यात हा गृहस्थ अमेरिकी तेल कंपन्यांस हव्या तितक्या तेल विहिरी खणा असे म्हणतो. इतकेच नाही तर आतापर्यंत सर्व प्रकारच्या पर्यावरणीय धोक्यांपासून दूर ठेवल्या गेलेल्या अलास्का प्रांतातही तेल उत्खननादी व्यवहार सुरू करणार असे म्हणतो, म्हणजे सगळाच आनंद. तीच बाब आरोग्य संघटनेबाबत. ट्रम्प अत्यंत विज्ञानद्वेषी आहेत. करोनाकाळात जगाने त्याचा अनुभव घेतला. माणसे त्या काळात औषधोपचारांअभावी मरत असतानाही त्यांचा करोना लशीस विरोध होता. या संकटसमयी आपली मते आपल्यापाशी ठेवावीत, इतका पोच त्यांस नाही. त्यामुळे त्यांनी लशींस असलेला विरोध व्यक्त केला. त्या काळात जागतिक आरोग्य संघटना सक्रिय होती आणि अमेरिकेची डॉ. अँथनी फौची यांच्यासारखी व्यक्ती साथ नियंत्रणात आघाडीवर होती. आता अमेरिका या संघटनेतूनच बाहेर पडणार आहे. याच गतीने ट्रम्प कारभार करत राहिले तर उद्या हा इसम ‘संयुक्त राष्ट्रा’तून अमेरिकेस वेगळे करण्यास कमी करणार नाही. या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. न जाणो तेही येथून हलवा असे ते म्हणणारच नाहीत, याची खात्री नाही.

हेही वाचा : अग्रलेख : ट्रम्पोदयाचे टरकणे

अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या ट्रम्प यांनी स्थलांतरितांवर लगेच आसूड चालवायला सुरुवात केली. हे स्थलांतरित हा त्यांचा मोठाच रागाचा विषय. या मुद्द्यावरही ट्रम्प यांची तळी उचलणारे आपल्याकडेही मोठ्या संख्येने आहेत. या आसूडाचे वळ आपल्या पाठीवर उमटत नाहीत तोपर्यंत अशा उपायांचे स्वागत केले जाते. या ट्रम्प स्वागतोत्सुकांस हे माहीत नसेल की कोणतेही अधिकृत परवाने नसताना अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांची संख्या जवळपास ७.५ लाख इतकी आहे. यातील अनेकांस ट्रम्प यांचा बडगा बसून पुन्हा स्वदेशसेवेस यावे लागेल. इतकेच नाही, तर ट्रम्प यांनी सरकारवर नवीन नेमणूक बंदी जारी केली. याचा अर्थ अमेरिकेत नव्या नोकऱ्या आता तितक्या संख्येने मिळणार नाहीत आणि ज्यांना त्या मिळालेल्या आहेत, त्यांच्या त्या राहतीलच याची हमी नाही. आपले अनेक तरुण अभियंते/ कुशल कामगार/ कारकून इत्यादी अमेरिकेत स्थानिकांपेक्षा कमी वेतनात काम करतात. स्थानिकांच्या दृष्टिकोनातून या गुणवान मजुरांकडे पाहू गेल्यास त्यांचे वर्णन ‘भय्ये’ असेच करावे लागेल. येथील एके काळच्या शिवसेना वा नंतरच्या मनसेप्रमाणे ट्रम्प त्या देशातील सर्व भय्यांस हाकलून लावू इच्छितात. तशी त्यांनी सुरुवातही केली असून मेक्सिको देशीयांवर हा पहिला बडगा उचलला गेला आहे. भारतीयांचा क्रम कधी ते आता पाहायचे. येथे ट्रम्प यांच्या विजयाने उचंबळणारे समाजमाध्यमी अर्धवटराव त्यांनी भारतीय अभियंत्यांवर कारवाई सुरू केल्यानंतरही ट्रम्प यांच्याविषयी तीच कृतकृत्यतेची भावना दर्शवतील, ही आशा. भारत हा परदेशी उत्पादनांवर कर आकारण्यात आघाडीवर आहे, अशी टीका त्यांनी केलेली आहेच. त्यातून भारतीय उत्पादनांवरही ते आता तितकेच कर आकारणार याचा अंदाज येतो. हे झाले त्यांच्या निर्णयाविषयी.

हेही वाचा : अग्रलेख : राखावी बाबूंची अंतरे..

बाकी त्यांचा सत्ताग्रहण सोहळा दिव्यच होता म्हणायचे. ट्रम्प यांचे गुणगान करताना एका ख्रिाश्चन धर्मगुरूच्या अंगात आल्यासारखेच झाले. त्याने घागर फुंकली नाही, इतकेच. ‘‘परमेश्वराने मला अमेरिका महान करण्यासाठी वाचवले’’ अशा अर्थाचे विधान ट्रम्प यांनी केले आणि त्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे खरेच. ट्रम्प यांस ‘वॉशिंग्टनची कुऱ्हाड’ ही कथा माहीत आहे किंवा काय हे कळावयास मार्ग नाही. काहीही असो. ट्रम्प स्वत:च ही कुऱ्हाड बनणार हे निश्चित.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on first day of donald trump in office and series of sweeping executive actions css