पक्षनिरपेक्ष काम करणाऱ्या, सत्तेपुढे न झुकणाऱ्या, नेक व्यक्ती आपल्याकडे चांगल्या प्रमाणात निपजल्या; याचे बँकिंग क्षेत्रातील एक उदाहरण म्हणजे नारायणन वाघुल…

देश उभारणी म्हटले की लष्करी विजय, काही महत्त्वाचे नेते, उद्याोगसमूह इत्यादींभोवतीच आपल्याकडील लेखन फिरत राहते. बँकिंग हे क्षेत्र आणि हा विषय वरील अन्य विषयांइतकाच रोचक असू शकतो याची जाणीव अद्याप आपल्याकडे पुरेशी नाही. इंग्रजीत बँकिंग या विषयावर लिखाण विपुल. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक बँक स्थापन होत असताना तिचे प्रमुख रॉबर्ट मॅक्नामारा यांचे लिखाण, याच काळात युद्धोत्तर जगाची उभारणी करणाऱ्या चार बँकर्सवर लियाकत अहमद यांचे ‘लॉर्ड्स ऑफ फायनान्स’, हेरॉल्ड जेम्स यांचे ‘डॉएच्चे बँक अँड नाझी इकॉनॉमिक वॉर’, नाणेनिधी- जागतिक बँक व जागतिक व्यापार संघटनेबद्दल रिचर्ड पीट यांचे ‘अनहोली ट्रिनिटी’, वा गोल्डमॅन सॅकवरील ‘मनी अँड पॉवर’ अशा काही या विषयावरील आकर्षक पुस्तकांची नावे सहज सांगता येतील. आपल्याकडेही बँकिंग क्षेत्रात अनेक उलथापालथी झाल्या. पण पडद्यामागील या साऱ्या नाट्याच्या नोंदी नाहीत. तशा त्या असत्या तर नारायणन वाघुल यांची बँकिंग कारकीर्द जनसामान्यांसाठी किती प्रेरणादायी आहे हे लक्षात आले असते. कोणतेही आर्थिक वलय नाही, अर्थशास्त्राचे/ बाजारपेठेचे एमबीए-छाप उच्चभ्रू शिक्षण नाही आणि जोडीला सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी! असे असतानाही या देशातील अनेक तरुणांनी अर्थशास्त्रात इतिहास घडवला तो एकाच गुणाच्या भांडवलावर. नेकी. हा एक गुण अंगी असेल तर एखादी व्यक्ती स्वत: घडता घडता किती जणांस घडवू शकते याचे वाघुल हे एक उदाहरण. स्वत:च्या नैतिक मूल्यांवर ठाम विश्वास असलेल्या ‘त्या’ पिढीचे प्रतिनिधी वाघुल यांचे निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण अनेक कारणांसाठी महत्त्वाचे ठरते.

RBI likely to cut repo rate by 25 basis points
या दोन कारणांनी होईल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात… ,नवीन गव्हर्नरांकडून पहिल्याच बैठकीत निर्णय अपेक्षित
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
व्यक्तिवेध: एस. राधाकृष्णन
Chandrapur District Bank Recruitment , AAP ,
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची ‘ईडी’कडे तक्रार
indian banks facing various challenges amid high interest rate
भारतीय बँकांना नफ्याला कोरड; जगातिक संस्थेचा इशारा नेमका काय?
Liquidity deficit in indian banking system hits lowest level in nearly 15 years
भारतीय बँकिंग व्यवस्थेची तरलता १५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर… खडखडाटामुळे कर्जे आणखी महागणार?
Liquidity in the banking system fell to a 15 year low print eco news
बँकिंग व्यवस्थेतील तरलता १५ वर्षांच्या तळाला; उपायादाखल रिझर्व्ह बँकेकडून ६०,००० कोटींची लवकरच रोखे खरेदी

हेही वाचा >>> अग्रलेख: उच्चपदस्थांची कानउघडणी!

यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाघुल यांनी एका आयुष्यात उभारलेल्या संस्था आणि उभी केलेली एकापेक्षा एक कर्तृत्ववान माणसे. आयएएस होऊ इच्छिणारे वाघुल वयोमर्यादेच्या कारणांनी शासकीय रस्ता चुकले आणि सहज म्हणून दिलेल्या बँक अधिकारी परीक्षेत उत्तीर्ण होऊन स्टेट बँकेत रुजू झाले. त्या काळात माणसे वरिष्ठांस काय वाटेल या विचारांनी आपली मते बेतत नसत आणि वरिष्ठही कनिष्ठांच्या मतभिन्नतेचा आदर करत. वाघुल स्टेट बँकेत रुजू झाले तेव्हा बँकेचे अध्यक्ष होते आर. के. तलवार. तेही अलीकडेच निवर्तले. (‘लोकसत्ता’ने ९ मार्चच्या अंकात ‘सत्ता समानता’ या शीर्षकाच्या लेखात त्यांना आदरांजली वाहिली होती.) वाघुल यांची बौद्धिकता आणि धिटाई तलवार यांच्या नजरेत भरली आणि त्यांनी या तरुणास स्वत:चे कार्यालयीन सचिव केले. म्हणजे पुढील आयुष्यात अनेक व्यक्तिमत्त्वांस घडवणाऱ्या वाघुल यांची जडणघडण खुद्द तलवार यांच्यासारख्याकडून झाली. स्टेट बँकेत ते झपाट्याने प्रगती करीत होते. महाराष्ट्रात हा काळ शिवसेनेच्या ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ या बँकांतील दाक्षिणात्यांच्या भरतीविरोधी आंदोलनाचा. त्यामुळे आपल्या प्रगतीच्या संधी आक्रसतील असे लक्षात आल्याने वाघुल यांनी स्टेट बँक सोडली आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट’ या बँक प्रशिक्षण केंद्रात ते अध्यापक बनले. तेथेही वयाच्या तिशीतील वाघुल यांच्याकडे त्या संस्थेचे प्रमुखपद आले. कल्पकता आणि कार्यतत्परता या त्यांच्या गुणांचा लौकिक बँकिंग क्षेत्रात कायम होता. तेव्हा मुख्य बँकिंगपासून दूर अध्यापन क्षेत्रात त्यांना फार काळ राहू दिले जाणार नाही, हे उघड होते.

हेही वाचा >>> अग्रलेख : बुद्धस्मिताचे सुवर्णस्मरण!

त्यातूनच चाळिशीही पार व्हायच्या आधी वाघुल यांच्याकडे ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’चे कार्यकारी संचालकपद चालून आले आणि पुढच्या चार-पाच वर्षात तर ‘बँक ऑफ इंडिया’चे अध्यक्षपदही सोपवले गेले. गुरू तलवार यांच्याप्रमाणे शिष्य वाघुल यांनाही सर्वात लहान वयात बँक अध्यक्षपद मिळाले. त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते मनमोहन सिंग. तथापि बँक ऑफ इंडियात वाघुल अधिक काळ रमले नाहीत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या नात्याने मनमोहन सिंग यांनी वाघुल यांनी बँकेत अधिक काळ राहावे यासाठी प्रयत्न केले. पण वाघुल बधले नाहीत. बँक सोडल्यावर ते वृत्तपत्रात स्तंभ लेखनात रमले. पण याही वेळी त्यांना बँकेपासून मुक्ती नव्हती. एव्हाना पंतप्रधानपदी आलेले राजीव गांधी हे आधुनिक काळातील पायाभूत आणि औद्याोगिक विकासासाठी एक स्वतंत्र वित्तसंस्था स्थापू इच्छित होते. संपूर्ण नवी कल्पना असल्याने तिच्या प्रमुखपदी नेमावयाची व्यक्ती अशीच ‘उद्याचा’ विचार करणारी असणे गरजेचे होते. वदंता अशी की मनमोहन सिंग यांनी राजीव गांधी यांस वाघुल यांचे नाव सुचवले. ही संस्था म्हणजे ‘इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’. म्हणजेच आजची आयसीआयसीआय. या संस्थेचा आरंभ, नंतर फेररचना आणि पुढे या संस्थेच्या छत्राखाली अन्य काही संस्थांचा जन्म या सगळ्यामुळे वाघुल यांचे नाव ‘आयसीआयसीआय’शी कायमचे जोडले गेले. ते १९८५ पासून सलग ११ वर्षे या बँकेचे अध्यक्ष होते; नंतर २००९ पर्यंत कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

चमकदार कल्पना फक्त ज्येष्ठांना सुचतात असे न मानणाऱ्यांतील वाघुल हे एक. नवनव्या कल्पनांचा सहज स्वीकार करत असताना विद्यामान व्यवस्थेतील त्रुटी आणि त्यावरील उपाय सुचवणाऱ्यांचे वाघुल यांच्याकडे कायम स्वागत असे. अलीकडे प्रशासन हे पदकेंद्री दिसते. कनिष्ठाने कोणा वरिष्ठाशी बोलायचे आणि या वरिष्ठास त्याच्या कोणा वरिष्ठापुढे जाण्याचा अधिकार हे स्पष्ट असते. हा वर्गविग्रह न मोडण्याचाच सर्वांचा कल दिसतो. वाघुल हे यास अपवाद होते. ठरावीक अंतराने काही वेळ ते सर्वांस मुक्त संवादासाठी देत आणि अशा चर्चांतून उद्याचे नेते कोण हे ते चाणाक्षपणे हेरत. त्यांना संधी देत. एकट्या वाघुल यांनी घडवलेली व्यक्तिमत्त्वे पाहिली तरी बँकिंग क्षेत्रासाठी त्यांनी किती काय केले ते कळेल. आयसीआयसीआय बँक आणि नंतर आशियाई बँकेचे नेतृत्व करणारे के. व्ही. कामथ, जेपी मॉर्गनसारख्या वित्तसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना मोरपारिया, अॅक्सिस बँकेच्या प्रमुखपदी गेलेल्या शीखा शर्मा, चंदा कोचर, सोशल बँकिंगसाठी विख्यात मराठमोळे नचिकेत मोर असे एकापेक्षा एक वित्तवेत्ते वाघुल यांनी घडवले. हे इतकेच नाही. आज आर्थिक मानांकनात अग्रगण्य असलेली ‘क्रिसिल’ असो वा आर. एच. पाटील यांच्यासारख्या द्रष्ट्याच्या सहकार्याने उभे केलेले ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ (एनसई) वा कमॉडिटी डेरिव्हेटिव्हज्साठीचे ‘एनसीडीईएक्स’ असो. या सगळ्याच्या उभारणीत वाघुल यांचा मोठा वाटा होता. क्रिसिलसारख्या आज जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे तर ते पहिले अध्यक्ष होते. इतके असूनही व्यक्तिमत्त्वातील साधेपणा त्यांना कधी सोडून गेला नाही. निवृत्तीनंतर ‘दास डोंगरी रहातो’ या वृत्तीने ते आपली जन्मभूमी चेन्नईत स्थायिक झाले आणि विविध सामाजिक कामांत स्वत:स त्यांनी गुंतवून घेतले. तेथूनही अनेकांसाठी ते मार्गदर्शन करीत. स्वत:वर विनोद करण्याची क्षमता हे मोठेपणाचे एक वैशिष्ट्य मानले तर वाघुल हे त्या आघाडीवरही मोठे ठरतात. वास्तविक हे वाणिज्य शाखेचे पदवीधर. पण जेव्हा भारताने आपला उपग्रह अवकाशात सोडला तेव्हा सदर संस्थेच्या मुख्यालयात जाऊन या बदलत्या तंत्रांचा भारतीय बँकिंगला कसा उपयोग होईल हे एखाद्या विद्यार्थ्याच्या उत्सुकतेने समजून घेण्याचा उत्साह त्यांच्या अंगी होता. पक्षनिरपेक्ष काम करणाऱ्या, सत्तेपुढे न झुकणाऱ्या, नेक व्यक्ती आपल्याकडे चांगल्या प्रमाणात निपजल्या हे आज अविश्वसनीय भासले तरी सत्य आहे. वाघुल हे या सत्याचे प्रतीक. पुढच्या पिढीचे बँकर्स घडवणाऱ्या नारायणन वाघुल यांस आदरांजली.

Story img Loader