क्रिकेटपटू, कर्णधार, प्रशिक्षक, प्रशासक, समालोचक अशा विविध भूमिकांमधून क्रिकेटशी संबद्ध राहिलेल्या बिशनसिंग बेदींची मूल्ये आणि निष्ठा कधीही विचलित झाल्या नाहीत.
बिशनसिंग बेदी यांची डावखुरी गोलंदाजी म्हणजे जणू अनेक नैपुण्यांचा एकत्रित आविष्कारच. पदलालित्य, मनगटावरील नियंत्रण, अंगुलीकला, एकाग्रता, आत्मविश्वास आणि या सर्वांच्या जोडीला दिलेर स्वभाव… ‘पोएट्री इन मोशन’ असे त्यांच्या नितांतसुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी शैलीचे यथार्थ वर्णन इंग्लिश क्रिकेट समीक्षकांनी केले होते. छोटीशीच धाव घेत एखाद्या नर्तकासारखा शरीराला झोक देत बेदी चेंडूला गती, उंची, दिशा आणि वळणही द्यायचे. प्रत्येक चेंडूच्या वेळी या सर्व क्रिया वेगवेगळ्या तीव्रतेने आणि नजाकतीने सादर व्हायच्या. फिरकी गोलंदाजी करतानाची बेदींची स्थिरचित्रे त्यामुळे एखाद्या निष्णात नर्तकाच्या मुद्रेसारखी भासतात. ती पाहताना आज जसे आपण खिळून जातो, तसे त्या काळी फलंदाजही खेळपट्टीवर खिळून जायचे. खरे तर त्या काळातील अनेक गोऱ्या क्रिकेट लेखकांच्या नजरेतून भारतीय क्रिकेटपटू म्हणजे कारागीर/कलाकार अधिक आणि खेळाडू कमी असायचे. म्हणजे बोटांत नि मनगटात कला आहे. त्यातून औटघटका मनोरंजन होणार हेही ठरलेले. पण ही मंडळी विजयी म्हणता येऊ शकत नव्हती. बिशनसिंग बेदींनी हा समज मुळासकट उखडून टाकला. भारतीय फिरकी गोलंदाजी हे गोऱ्या किंवा गौरेतर तेज गोलंदाजीइतकेच विध्वंसक अस्त्र ठरू शकते हे त्यांनी जगासमोर सिद्ध केले. त्यांच्या आधी वा नंतर असंख्य फिरकी गोलंदाज झाले. यांतील काही बेदींपेक्षा अधिक यशस्वी ठरले. पण एखाद्या देशाचा सामूहिक हुंकार ज्या पद्धतीने बेदींनी मांडला, तसा तो क्वचितच इतर कोणास मांडता आला. याचे कारण म्हणजे बिशनसिंग बेदी हे निव्वळ मैदानावरील फिरकी गोलंदाज नव्हते. मैदानातील त्यांच्या रंगीत फेट्यांप्रमाणेच बेदींच्या व्यक्तिमत्त्वाचे रंगही अनेक होते. या रंगांनी भारतीय क्रिकेटचा पोत बदलला. निष्ठा आणि नैतिकता यांचे पालन कालातीत आणि स्थलातीत असते हे निक्षून सांगत बेदी त्यानुसार अखेरपर्यंत वागत राहिले. शिष्टसंमत शाब्दिक बुडबुड्यांची पखरण करण्याऐवजी चार स्पष्ट शब्द समोरच्याला ऐकवणे केव्हाही हितकारक, असा त्यांचा रांगडा पंजाबी खाक्या होता. त्यामुळे ते बहुतेक आजी-माजी भारतीय खेळाडूंपेक्षा वेगळे दिसतात आणि ठसठशीत वाटतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंची आणि रंगांची त्यामुळे स्वतंत्र दखल घेणे भाग पडते.
हेही वाचा >>> अग्रलेख : मोरू झोपलेला बरा..
बेदी-प्रसन्ना-चंद्रा आणि वेंकट या सुप्रसिद्ध फिरकी चौकडीपैकी बेदी एक. चौघांमध्ये ते एकमेव डावखुरे फिरकी गोलंदाज आणि एकमेव उत्तर भारतीयही. वेस्ट इंडिजने १९७०च्या उत्तरार्धात तेज गोलंदाज चौकडी वापरून क्रिकेट विश्वाला दहशतीत टाकण्याच्या आधी भारतीय फिरकी चौकडीने जगभरातील फलंदाजांची भंबेरी उडवण्यास सुरुवात केली होती. फिरकी चौकडीपैकी दोघे ऑफस्पिनर (प्रसन्ना व वेंकट) होते, एक लेगस्पिनर (चंद्रा) होता. यांच्या तुलनेत बेदींसारख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजासमोर बळी मिळवण्याचे आव्हान खडतर होते. पण बेदी त्या चौकडीचे अघोषित नायक होते. कारण दाक्षिणात्य नेमस्तपणा त्यांच्या ठायी नव्हता. मात्र ते असभ्यही नव्हते. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील भारताच्या पहिल्या कसोटी मालिकाविजयात त्यांचे योगदान अमूल्य होते. जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही मैदानावर त्यांची फिरकी गोलंदाजी खणखणीत यशस्वी ठरली. प्रदीर्घ काळ इंग्लिश कौंटी क्रिकेट खेळणाऱ्या मोजक्या गौरेतर फिरकी गोलंदाजांपैकी ते एक. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी २६७ बळी मिळवले, पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी मिळवलेले १५०० हून अधिक बळीदेखील तितकेच उल्लेखनीय ठरतात. निव्वळ बचावात्मक गोलंदाजी करून धावा वाचवण्यापेक्षा गडी बाद करण्याकडे त्यांचा कल असे. यासाठी प्रसंगी धावा मोजण्याचीही त्यांची तयारी असे. ‘सचिन माझ्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवतो तेव्हा काय करू?’ या शेन वॉर्नच्या अगतिक प्रश्नावर ‘तो फटके मारतो तर तुझ्या गोलंदाजीवर बादही होऊ शकतो’ असा दिलासा बेदींनी दिला होता. फिरकी गोलंदाजाने प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि यासाठी त्याचे हृदय विशाल पाहिजे, असे बेदी यांचे मत. आज असे विशालहृदयी गोलंदाजच काय; पण खेळाडूही आढळत नाहीत आणि त्यांना तशी मुभा देऊ धजणारे कर्णधार तर आणखी दुर्मीळ बनले आहेत. क्रिकेट संस्कृतीमधील हा बदल बेदींनी पाहिला, पण स्वीकारला मात्र नाही!
त्या अर्थी ते क्रिकेटच्या विश्वातले स्वप्नाळू (रोमँटिक) ठरतात. क्रिकेटच्या सभ्य मूल्यांवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. क्रिकेट हा निव्वळ खेळ आहे. ते युद्ध नव्हे, हे त्यांचे मत. त्यामुळेच मैदानावर त्यांच्यासमोर चाचपडणाऱ्या प्रतिस्पर्धी फलंदाजाला नेट सरावादरम्यान युक्तीच्या गोष्टी सांगण्यात बेदींना कोणतीही असुरक्षितता वाटली नाही. क्रिकेट आनंदासाठी खेळावे, पण नैतिक मूल्यांना अंतर देण्याची गरज नाही हे त्यांचे तत्त्वज्ञान. ते प्रत्येकाला झेपेल असे नव्हे. मुंबई क्रिकेट आणि मुंबईकर क्रिकेटपटूंविषयी त्यांची स्वत:ची धारणा होती. हे क्रिकेट बचावात्मक आणि आत्मकेंद्री असते, असे त्यांचे निरीक्षण. त्याचा प्रतिवादही इथल्यांनी वेळोवेळी केलेला आहे. काही वेळा भावनेच्या भरात त्यांनी टोकाची वक्तव्येही केली. १९९२ मधील एका दौऱ्यात व्यवस्थापक असताना, खराब कामगिरी केलेल्या भारतीय संघाला प्रशांत महासागरात बुडवण्याची भाषा त्यांनी केली होती! विख्यात ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनचा उल्लेख ते अनेकदा भाला फेकणारा (जॅव्हलिन थ्रोअर) असा करत. कारण त्याची गोलंदाजी शैली नियमाधारित नाही, असे त्यांचे ठाम मत. ते व्यक्त करताना त्यांनी कशाचाही मुलाहिजा बाळगला नाही.
हेही वाचा >>> अग्रलेख: महुआ-मायेचे मूळ!
बिशनसिंग बेदींच्या रोखठोक वृत्तीची प्रचीती काही वर्षांपूर्वी पुन्हा एकदा आली. नवी दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानाचे नामकरण ‘अरुण जेटली स्टेडियम’ असे करायचे ठरले. त्या वेळी बेदी यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेला पत्र लिहून, ‘राजकारणी मंडळींचा गौरव करण्याची जागा संसद आहे, खेळाचे मैदान नव्हे!’ असे सुनावले होते. त्याचप्रमाणे, कोटला मैदानातील एका स्टँडला दिलेले त्यांचे नावही काढून टाकावे, असे विनवले होते. क्रिकेटपटू, कर्णधार, प्रशिक्षक, प्रशासक, समालोचक अशा विविध भूमिकांमधून बेदी त्यांना नितांत प्रिय असलेल्या क्रिकेटशी संबद्ध राहिले. या प्रत्येक भूमिकेत बेदींची मूल्ये आणि निष्ठा कधीही विचलित झाल्या नाहीत. कर्णधार म्हणून ते फार यशस्वी ठरले नाहीत. पण एका सामन्यात विंडीज गोलंदाजांकडून शरीरवेधी गोलंदाजी अव्याहत सुरू राहिल्यावर बेदींनी डावच घोषित करून टाकला. पाकिस्तानमध्ये एका सामन्यात खराब पंचगिरीचा निषेध म्हणून विजयाच्या उंबरठ्यावर असताना बेदींनी सामना पाकिस्तानला बहाल केला. आजच्या काळात असे वागणे कदाचित तऱ्हेवाईकपणाचे वाटू शकेल. पण आपल्या संघासाठी, खेळाडूंसाठी असा वाईटपणा घेण्याची तयारी बेदींनी नेहमीच दाखवली. आयपीएल संस्कृती त्यांना कधीही मानवली नाही. घोड्यांप्रमाणे खेळाडूंचे लिलाव करून सर्वोत्तम खरेदीदाराला ते विकणे यात कसले क्रिकेट असे मत बेदींनी नोंदवले होते. बिशनसिंग बेदींचे वर्णन भारतीय क्रिकेटमधील नैतिकतेचे तारणहार असे केले जाते. ही नैतिकता लोप पावलेली नाही, पण कमालीच्या वेगाने आकसत नक्की आहे. आता बेदींच्या पश्चात हे आकसणे अधिक वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या निसरड्या वाटेवर भारतीय क्रिकेट धुरीणांचे कान पकडणारे ‘बिशन पाजी’ आता आपल्यात नसतील. अर्थात सढळ शब्दांनी कौतुक करणारा नि रोकड्या स्वरात जाब विचारणारा, ‘बिशन पाजीं’च्या दुनियेतला भारतही आता कुठे राहिला आहे? या सरळमार्गी वळणदार किमयागाराच्या नजाकतीस आणि लढवय्या नैतिकतेस ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली!