जिमी कार्टर यांनी राष्ट्राध्यक्ष असताना इस्लामवादास खतपाणी घातले खरे, पण निवृत्तीनंतर त्यांनी केलेले काम स्मरणीय ठरले…
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काही दिवसांतच अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन व्हावे आणि त्या वेळी अध्यक्षपदावर जो बायडेन असावेत या सगळ्यांत एक करुण योगायोग दिसतो. मनमोहन सिंग यांच्या प्रमाणे कार्टर हेदेखील कमालीचे सभ्य, सुसंस्कृत आणि शालीन. कार्टर यांना उत्तराधिकारी म्हणून लाभलेले रोनाल्ड रेगन हे सर्व साधनशुचिता खुंटीवर टांगण्यात वस्ताद. त्यांच्या तोंडास लागणे कार्टर यांस काही जमले नाही. रेगन हे हॉलीवूडच्या ‘दे-मार’ चित्रपटातील नायक. अशा इसमापुढे कार्टर अगदीच नेभळट मानले गेले. दुसरी बाब बायडेन यांच्याबाबतची. दोघेही एकाच पक्षाचे आणि दोघांनाही अध्यक्षपदाची दुसरी संधी मिळाली नाही. दोघांचीही अध्यक्षपदाची कारकीर्द चार वर्षांत संपली आणि दोघांनाही नाटकी, बेमुर्वतखोर आणि प्रसंगी बेजबाबदार उत्तराधिकाऱ्याकडून पराभव पत्करावा लागला. यातही कार्टर यांच्यासाठी विशेष योग म्हणजे १९७६ साली जेव्हा त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांना लगेच पाठिंबा देणाऱ्यांत बायडेन आघाडीवर होते. ‘‘अमेरिकेच्या पुढच्या पिढीस सुसंस्कारांसाठी कार्टर यांचे आयुष्य आदर्श आहे’’, अशा शब्दांत अध्यक्ष बायडेन यांनी कार्टर यांस आदरांजली वाहिली. कार्टर यांस उदंड आयुष्य लाभले. आपले उपाध्यक्ष, आपले पूर्वसुरी, उत्तराधिकारी आणि तब्बल ७५ वर्षे साथ देणारी पत्नी अशा अनेकांचे मृत्यू त्यांनी अनुभवले. स्वत: त्वचेच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारावर त्यांनी मात केली. एक-दोनदा पडून त्यांचे खुब्याचे हाड मोडले गेले. त्या सगळ्यातून ते सावरले. आज अखेर त्यांच्या थकलेल्या कुडीने चेतना गमावली. कार्टर यांची कारकीर्द अनेक कारणांसाठी उल्लेखनीय ठरली. तिचा आढावा घ्यायला हवा.
व्हिएतनाम युद्ध आणि वॉटरगेट प्रकरणांनी विदग्ध झालेल्या अमेरिकी राजकीय वर्तुळात जिमी कार्टर यांच्या निवडीने एक आशा निर्माण झाली. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर सरकारी गाडी सोडून जनतेत मिसळून, आपली पत्नी आणि कन्या हिचा हात धरून रस्त्यावरून चालत ‘व्हाइट हाऊस’मध्ये शिरणाऱ्या या अध्यक्षामुळे आता बरे काही होईल असे जनतेस वाटू लागणे साहजिक होते. भुईमूग पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा हा मुलगा. डेमॉक्रॅटिक पक्षासाठीही आश्वासकता घेऊन राजकारणात आला. कार्टर यांच्या अध्यक्षपदी निवडीस धुमसत्या पश्चिम आशियाचीही पार्श्वभूमी होती. त्यातूनच कधी नव्हे ते सौदी अरेबियाने अमेरिकेवर तेल निर्बंध लादले आणि अमेरिकेत इंधन संकट निर्माण झाले. हा काळ जागतिक शीतयुद्धाचाही. सोव्हिएत रशियाचे मिळेल तेथे नाक कापणे ही अमेरिकी प्रशासनाची प्राथमिकता होती. त्यात कार्टर यांस झिबिग्न्यु ब्रेझन्स्की यांच्यासारखा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लाभला. या ब्रेझन्स्की यांनी कार्टर यांस सल्ला दिला ‘आर्क ऑफ इस्लाम’ (इस्लामची कमान) साम्यवादी देशांविरोधात उभी करण्याचा. म्हणजे पश्चिम आशिया, मध्य युरोप आदींत जे इस्लामी देश आहेत त्यांस एकत्र आणून, आपल्या गोटात ओढून साम्यवादी रशियासमोर आव्हान उभे करणे. कार्टर यांना तो पटला. त्यामुळे आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्याच टप्प्यावर त्यांनी इस्लामी देशांस चुचकारायला सुरुवात केली. याबाबत त्यांची पावले चुकली. कारण कार्टर यांनी जवळ केलेला पहिला नेता होता शहा महंमद रझा पहलवी. म्हणजे इराणचे शहा. हे विचाराने आधुनिक होते. पण या आधुनिकतेने त्यांचा घात झाला.
हेही वाचा : अग्रलेख : महाराष्ट्राचे उत्तरायण
या इराणी आधुनिकतेविरोधात भावना भडकावण्याचे काम फ्रान्समध्ये राहून करत होते अयातोल्ला रूहल्ला खोमेनी. त्यांना शहा यांची आधुनिकता मंजूर नव्हती आणि शेजारील इराकमधील निधर्मी सद्दाम हुसेन याची राजवट खुपत होती. इराण हा शियापंथीय तर इराक सुन्नी. दोघांच्या मध्ये कुर्द विभागलेले. आपल्या देशातील धर्मभावनेस फुंकर घालत खोमेनी यांनी इराणमध्ये ‘क्रांती’ केली आणि परागंदा व्हावे लागलेल्या शहा महंमद रझा पहलवी यांना वाचवण्याची वेळ अध्यक्ष कार्टर यांच्यावर आली. त्यांनी कर्करोगग्रस्त शहा यांना अमेरिकेत आसरा दिला. त्यामुळे खोमेनी चिडले. त्यांनी यशस्वी क्रांतीनंतर तेहरानमधील अमेरिकी दूतावासावर आपल्या समर्थकांकरवी हल्ला करविला आणि अमेरिकन कर्मचाऱ्यांस ओलीस ठेवले. कार्टर यांच्या प्रतिमा घसरणीची ती सुरुवात. कार्टर यांनी जंग जंग पछाडले. पण हे ओलीस काही ते मुक्त करू शकले नाहीत. खोमेनी यांचे इराणला परतणे आणि तिकडे अफगाणिस्तानात रशियन फौजा शिरणे हे दोन्ही १९७९ च्या डिसेंबरात घडले. रशियन फौजांनी अफगाणिस्तानचा कब्जा घेणे हे कार्टर यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील मोठे अपयश मानले गेले. त्यानंतर अफगाणिस्तानातील रशियन फौजांना नामोहरम करण्याच्या हेतूने कार्टर हे अधिकच इस्लामवादी झाले. ब्रेझन्स्की यांचा तसा सल्ला होताच. पण यातूनही काही भरीव घडेना. त्यात अफगाणिस्तानात एका मोहिमेवर निघालेले अमेरिकी हेलिकॉप्टर वाळूच्या वादळात कोसळले आणि कार्टर यांच्या उरल्यासुरल्या इभ्रतीचीही वाळू होऊन त्यांच्या हातून ती निसटली. यात पुन्हा अमेरिकेत करावे लागलेले इंधन-रेशन हेदेखील कार्टर यांच्या मुळावर आले. एव्हाना त्यांच्या राजवटीची तीन वर्षे होत आली आणि निवडणुकांची चाहूल लागली. या निवडणुकीत एक मुद्दा कार्टर यांच्या विजयासाठी आवश्यक होता. तो म्हणजे ओलिसांची सुटका. ती झाली असती तर कार्टर यांस त्याचा राजकीय फायदा निश्चितच मिळता. कार्टर यांच्या समोर होते उच्छृंखल रोनाल्ड रेगन. ते मागास रिपब्लिकन पक्षाचे. कार्टर यांचा विजय रोखण्यासाठी रेगन यांनी काय करावे?
त्यांनी थेट खोमेनी यांच्याशी संधान बांधले आणि अमेरिकी राजकारणातील एक नीचांकी अध्याय लिहिला गेला. रेगन यांनी खोमेनी यांस भरपूर आर्थिक, लष्करी मदतीचे आश्वासन देऊन एक अट घातली. अमेरिकी निवडणुका होईपर्यंत ओलिसांची मुक्तता न करण्याची. म्हणजे देशांतर्गत प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करण्यासाठी परदेशी शत्रूशी हातमिळवणी करण्याचे अधम कृत्य रेगन यांनी केले. या अशा बेमुर्वत प्रतिस्पर्ध्याविरोधात कार्टर यांचा निभाव लागणे शक्य नव्हते. तसेच झाले. ते पराभूत झाले. या क्षुद्र राजकारणाची अखेर रेगन यांचे अध्यक्षारोहण होत असताना तिकडे तेहरानमध्ये त्याच वेळी अमेरिकी ओलिसांची सुटका होण्यात झाली. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’सारख्या अनेक अमेरिकी वर्तमानपत्रांनी त्या दिवशी रेगन यांचा अध्यक्षीय शपथविधी आणि तेहरानमधून अमेरिकी ओलिसांची सुटका अशी दोन छायाचित्रे शेजारी शेजारी छापून या राजकारणावर भाष्य केले. पुढे रेगन यांनी इराणला खरोखरच मदत केली आणि त्यासाठी इस्रायलने मध्यस्थाची जबाबदारी पार पाडली. त्यातूनच इराण-काँट्रा प्रकरण घडले आणि रेगन यांना पुढे अनेक आरोपांस सामोरे जावे लागले.
हेही वाचा : अग्रलेख: मार्दवी मार्तंड!
पण एव्हाना कार्टर यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीचा शोकान्त झाला. पुढे बराच काळ कार्टर हे टिंगलीचा विषय राहिले. अलीकडेच रेगन-कुलीन डोनाल्ड ट्रम्प यांनीही कार्टर यांची खिल्ली उडवली होती आणि कार्टर यांच्या पनामा कालवा त्या देशास देण्याच्या भूमिकेवर टीका केली होती. तथापि हा असा नेसूचे सोडून डोईस गुंडाळणाऱ्या राजकारण्यांचा आणि त्यांच्या बिनडोक अनुयायांचा वर्ग सोडला तर कार्टर यांच्याविषयी अमेरिकेत बरेच मोठे मतांतर झाले आहे. बेजबाबदार, हडेलहप्प्यांपेक्षा नेभळट वाटणारा संस्कारी परडवला अशी भावना तेथेही मोठ्या प्रमाणात रुजताना दिसते. राजकीय पराभवानंतर कार्टर यांनी जागतिक शांतता, मानवी हक्करक्षण यासाठी जे प्रयत्न केले त्याचे विशेष कौतुक होते. त्यासाठी कार्टर यांनी पदरास खार लावून विशेष संस्था काढली आणि जगभरातील अशा शांततावाद्यांचे ते प्रतीक बनले. आज ट्रम्प यांच्यासारखा नवा दांडगट सत्तारूढ होत असताना कार्टर यांनी डोळे मिटणे हेदेखील सूचक म्हणायचे. अंथरुणास खिळलेल्या कार्टर यांनी त्याही अवस्थेत ट्रम्प विरोधात प्रचार केला. तो वाया गेला. असे होते. दांडगट आणि डांबरट यांच्या दुनियेत सभ्य-नेमस्तांस माघार घ्यावी लागते. तो त्यांचा पराभव नसतो. ती संस्कृती या संकल्पनेची हार असते. आज त्याच संस्कृतीकडे पाहात अनंताच्या वाटेवरील कार्टर म्हणत असतील : बड़े बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले। बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले! सुसंस्कृत ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे कार्टर यांस आदरांजली.