वेगळे पाहण्यासाठी जितके धाडस लागते, त्याच्या कित्येक पट धाडस ते सादर करण्यासाठी लागते. गोदार यांनी ते दाखवले, पण मिरवले नाही ही त्यांची महती!

ज्याँ-लुक गोदार या फ्रेंच दिग्दर्शकाचे मोठेपण सध्याच्या पिढीला फारसे माहीत असण्याचे तसे काही प्रयोजन नाही. कारण ‘ओटीटी’ प्रसारामुळे, गोदार यांनी सहा दशकांपूर्वी मांडले तसे प्रवाहापेक्षा वेगळे आणि कमीअधिक तऱ्हेवाईक, धक्कादायक सिनेमे बघण्यास ही पिढी पुरेशी सरावलेली आहे. हे सरावणे कल्पनेतही नव्हते त्या काळात, म्हणजे सिनेमाविश्वात ज्याला फ्रेंच नवप्रवाह किंवा न्यू वेव्ह असे मानले गेले, त्या चित्रक्रांतीच्या ऐन भरात ज्याँ-लुक गोदार यांनी एकाहून एक वेगळे, पूर्णपणे भिन्न धाटणी आणि हाताळणीचे सिनेमे सादर केले. १९६०चे ते दशक मुळातच प्रयोगशीलतेचे होते आणि कोणत्याही क्षेत्राप्रमाणे चित्रपटांच्या क्षेत्रातही प्रयोगशीलतेचे झालेले आद्यस्वागत गोदार यांच्याही वाटणीला आले. तरीही त्यांचा अवलिया किंवा क्रांतिकारक असा उल्लेख त्या प्रयोगपर्वानंतरही केला जातो, त्याचे कारण काय असावे? आपल्या सत्यजित राय यांच्यापासून ते पलीकडले मार्टिन स्कोर्सेसी, क्वेंटिन टॅरेंटिनो अशी अनेकविध पार्श्वभूमी असलेले दिग्दर्शक त्यांच्या चित्रकृतींनी प्रभावित कसे झाले? या प्रश्नांची उत्तरे गोदार यांच्या अनेक चित्रपटांसारखीच गुंतागुंतीची आहेत. दिग्दर्शकांचे एक वेळ सोडा. कारण गोदार यांच्यावर टीका करणाऱ्या प्रतिभावान दिग्दर्शकांची संख्याही खंडीभर आहे. परंतु रसास्वादक आणि चित्रपट महोत्सवी समुदायांपलीकडे असंख्यांनी त्यांच्या सिनेमांमधून ‘काही तरी वेगळे’ पाहायला मिळाल्याची कबुली अनेकदा दिली. वेगळे पाहण्यासाठी जितके धाडस लागते, त्याच्या कित्येक पट धाडस ते सादर करण्यासाठी लागते. गोदार यांनी ते दाखवले, पण मिरवले नाही ही त्यांची महती! सिनेमा या संकल्पनेचे त्यांच्यावर गारूड होते आणि त्यातूनच त्यांनी नेहमीच्या धाटणीपलीकडे सिनेमे बनवले आणि प्रस्थापित चौकटी मोडल्या. पण तरी चित्रपट व्यवसायाची मक्का मानल्या गेलेल्या हॉलीवूडची त्यांनी कधी निर्भर्त्सना केली नाही. उलट हॉलीवूडमधील चित्रपटांविषयी त्यांना प्रेमच होते. सिनेमानिर्मितीची परिभाषा त्यांनी क्रांती करण्याच्या उद्देशातून बदलली नाही, ते सहजप्रवृत्तीतून घडून आले. यापेक्षा वेगळय़ा पद्धतीने ते सिनेमे बनवूच शकले नसते, हे त्यांच्या सबंध कारकीर्दीचा अभ्यास करता आढळून येईल. त्यांच्या बहुतेक सर्व सिनेमांप्रमाणे गोदार यांची कारकीर्दही अद्भुत आणि धक्क्यांनी भरलेली आहे. त्या कारकीर्दीचा साक्षेपी धांडोळा घेण्याचा प्रस्तुत संपादकीयाचा उद्देश नाही. ज्याँ-लुक गोदार प्रत्येकाला कसे भावले वा आकळले हा सर्वस्वी व्यक्तिनिष्ठ मुद्दा ठरतो. सिनेमा बनवण्याचे, मांडण्याचे, दाखवण्याचे आणि आस्वादण्याचे साचे त्यांनी विशेषत: ६०च्या दशकात ज्या प्रकारे मोडून काढले ते मात्र नक्कीच उल्लेखनीय आणि अभ्यासनीय ठरते.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच

कथानक, कॅमेरा, कलाकार हे ‘क’ चित्रपटनिर्मितीसाठी पुरेसे असतात, असे मानणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये ज्याँ-लुक गोदार अग्रणी. या ‘क’त्रयीला करमणुकीचा चौथा ‘क’ जोडणे या क्षेत्रातील अनेक धुरीणांना महत्त्वाचे वाटले. सिनेमातील दोन प्रवाहांची ती सुरुवात होती. चित्रपट कसा बनवावा यापेक्षाही अधिक महत्त्व तो तिकीटबारीवर कसा ‘वाजवावा’ याला येऊ लागले होते आणि हॉलीवूडमधील स्टुडिओ संस्कृती किंवा अगदी आपल्याकडेही सिनेमा कंपन्यांतून या कलेचे साचे तयार होऊ लागले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषत: युरोपातील देश होरपळ सोसून पूर्वपदावर येत असताना, तसेच इकडे भारतासारख्या देशांच्या बाबतीत नवस्वातंत्र्याच्या जल्लोषातून स्वावलंबनाचे कडू-गोड वास्तव जाणवू लागले असताना, चित्रपटांमध्ये त्या जनमानसाचे प्रतििबब पडणे अगदीच स्वाभाविक होते. पण आशय सादर करताना, त्याचे ‘पॅकेजिंग’ आणि विक्रीचे बंधन कशासाठी घ्यायचे, असे प्रश्न विचारू लागलेल्या नवतावादी आणि नवताप्रेमी दिग्दर्शकांच्या एका फळीमध्ये गोदार होते. माझ्या सिनेमाला प्रारंभ, मध्य आणि अन्त असेल, पण हे याच क्रमाने दाखवले जाईलच असे नाही, या अर्थाचे त्यांचे सुपरिचित विधान रसास्वाद कार्यशाळांमध्ये उद्धृत केले जाते. कथा, त्या कथेवर बेतलेली पटकथा, पात्रांच्या हालचाली आणि भावमुद्रा, प्रकाशयोजना, दृश्य आणि ध्वनिसंकलन, त्या संकलनाच्या माध्यमातून निर्माण होणारा सिनेमाचा वेग आणि लय हे सारे घटक एकत्र आणून प्रेक्षकांसमोर सिनेमा नावाचे रसायन सादर केले जाते. या प्रत्येक घटकाची मोडतोड करून सिनेमारूपात आणण्याचे धाडस गोदार यांनी दाखवले. १९५०च्या दशकात ते आणि त्यांच्यासारखे फ्रान्सवा त्रुफुवा, ज्याक रिवेट, एरिक रोमर यांच्यासारखे समविचारी फ्रान्समधील प्रस्थापित सिनेमानिर्मितीच्या तंत्र आणि आशय-विषयांना कंटाळले होते. प्रयोगशीलतेला स्थान न देणाऱ्या आणि आशयापेक्षा निर्मितीला महत्त्व देणाऱ्या त्या परंपरेवर समीक्षेच्या माध्यमातून गोदार प्रभृतींनी कोरडे ओढले. मग विचार असा आला, की केवळ समीक्षा करत बसण्यापेक्षा आपल्याला हवे त्या पद्धतीचे आणि विषयाधारित सिनेमेच का बनवू नयेत?

गोदार यांनी १९५०च्या उत्तरार्धात प्रथम लघुपट आणि मग सिनेमे दिग्दर्शित करायला सुरुवात केली. पण जागतिक चित्रपट नकाशावर त्यांना अढळपद देणारा सिनेमा होता ‘ब्रेथलेस’! पोलिसावर गोळय़ा झाडून पळून जाणारा गुन्हेगार आणि पत्रकारितेत नुकतेच पदार्पण केलेली अमेरिकी युवती यांची ही कथा. कथा गुंतवून टाकणारी होतीच, पण त्याहीपेक्षा लक्षात राहिले ते गोदार यांचे सादरीकरण. आजही काही मोजक्या रसिकप्रिय वेगळय़ा धाटणीच्या सिनेमांमध्ये ‘ब्रेथलेस’चा उल्लेख आवर्जून केला जातो. ‘बँड ऑफ आऊटसायडर्स’मध्ये दोन युवक आणि एक युवती (तिघेही परस्परांशी परिचित) निष्काम भाव चेहऱ्यावर ठेवून नृत्य करत असतात. ते सुरू असताना प्रत्येकाच्या मनात काय विचार सुरू आहेत हे पडद्यामागून कथेकरी (नॅरेटर) सांगत असतो. परस्पर नाटय़मय संवादांची आणि हावभावांची गरजच तेथे भासत नाही. ‘द वीकेण्ड’मध्ये एक जोडपे प्रवास करत असताना त्यांची मोटार ट्रॅफिकमध्ये अडकते. कानठळय़ा बसवणारा हॉर्नचा आवाज करत ती मोटार पुढेपुढे सरकत असते. जवळपास आठ मिनिटांच्या त्या चलदृश्यात अनेक वाहने अडकून पडलेली असतात आणि जोडप्याप्रमाणेच आपणही अस्वस्थ होऊ लागतो. अखेरीस मोटार वेग घेते, दरम्यान रस्त्यावर पोलीस दिसतात. भयंकर अपघात झाल्याचे आढळते. अपघातग्रस्त दोन मोटारी उलटलेल्या, त्यांतील प्रौढ आणि लहान मुले मृत झालेली आणि रस्त्याच्या कडय़ाला अस्ताव्यस्त पडलेली. या सगळय़ाला ओलांडून आपली मोटार पुढे निघून जाते आणि नकळत आपण नि:श्वास टाकतो! भांडवलशाहीतील आत्मकेंद्री असंवेदनशीलतेवर गोदार यांची ही टिप्पणी असल्याचे सांगितले जाते. ‘द लिटल सोल्जर’मध्ये अल्जीरियातील फ्रेंच हस्तक्षेपाचा आणि त्याच्या विविध पैलूंचा विषय आहे.

गोदार यांच्या बहुतेक सिनेमांमध्ये त्यांनी काहीएक भूमिका घेतल्याचेही आढळून येते. त्या काळातील दिग्दर्शक प्रभावळीप्रमाणे त्यांच्यावरही मार्क्‍सवादाचा प्रभाव होता. शेतकरी, विद्यार्थी या मुद्दय़ांवर त्यांनी मतप्रदर्शन केलेले आहे. पण त्यांचा पिंड दिग्दर्शकाचा होता. १९६० ते १९६७ या काळातील त्यांचे सिनेमे विशेष गाजले. ते सरधोपटपणे वर्णिले जातात त्याप्रमाणे बोजड वगैरे अजिबात नव्हते. उलट गोदार यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांची बहुतेक पात्रेही विलक्षण शैलीदार रंगवली गेली. पुढे या स्वरूपाच्या चित्रपटांचे चलनच संपत गेले. चित्रपटजगतावर हॉलीवूडचा प्रभाव वाढत गेला, हमखास यशाच्या सूत्रामागे भारतीय सिनेमाही भरकटत गेला. गोदार यांनी हे सगळे बदल पाहिले, पण त्याविषयी त्यांनी कधीही विषाद व्यक्त केला नाही. उलट डिजिटल माध्यमही त्यांनी समरसतेने हाताळले. त्यांचे प्रवाहाबाहेरील सादरीकरण आजच्या प्रवाहबंदिस्त बॉलीवूड चित्रपटांच्या ढळढळीत अपयशाच्या आणि ओटीटी माध्यमांच्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर अधिकच अधोरेखित होते. गोदार यांचे शरीर कालवश झाले, तरी त्यांचे सादरीकरण कालजयी ठरले. या प्रयोगवंताला ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.

Story img Loader