जगातील ‘लोकशाहीची जननी’ इत्यादी भरतवर्षाने भारताचा रहिवासीही नसलेल्या सोरोस यांची इतकी भीती का बाळगावी आणि त्यांच्या नावे इतके खडे का फोडावेत?

स्वसामर्थ्याच्या प्रामाणिक जाणिवेचा अभाव असलेले प्रत्येक संकटासाठी इतरांस बोल लावतात तर खरे कर्तृत्ववान श्रेयासह अपश्रेयाचेही धनी होण्यात मागेपुढे पाहात नाहीत. व्यक्तींस लागू असलेला हा नियम व्यक्तिसमूहांच्या प्रदेशासही लागू होतो. या चिरंतन सत्याची जाणीव नव्याने करून देणाऱ्या दोन घटना. पहिलीत अमेरिका आपणास अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असल्याचा अप्रत्यक्ष ठपका आपल्याकडून लावला गेला आणि दुसरीत धनाढ्य गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्यावर आपल्याकडून तशाच स्वरूपाचा आरोप केला गेला. हे वयोवृद्ध सोरोस काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्याशी हातमिळवणी करून जम्मू-काश्मीर आपल्यापासून तोडण्याचा घाट घालत असल्याचे काही सरकारी उच्चपदस्थांचे म्हणणे. या विद्वत्तापूर्ण भाकितावर हसावे की रडावे असा प्रश्न. एरवी हे असले विनोदी वाङ्मय कोणा यूट्यूबरने वगैरे प्रसवले असते तर त्या निर्बुद्ध बडबडीकडे दुर्लक्ष करण्याची सोय होती. या बाबत ती नाही. कारण पाकिस्तानला तीन प्रत्यक्ष युद्धांत आणि असंख्य अप्रत्यक्ष संघर्षांत जे जमले नाही ते वयाच्या नव्वदीतले हे सोरोस पंचाहत्तरीतल्या, तब्येतीने अशक्त अशा सोनिया गांधी यांच्या साह्याने करून दाखवतील असे मानणाऱ्यांस काय म्हणावे? त्याच वेळी; अर्थव्यवस्थेत आपल्यापेक्षा साधारण पाच पट मोठी अमेरिका संरक्षण साहित्य/ विज्ञानसंशोधन/ कारखानदारी आदी क्षेत्रांत तुलनाही होऊ शकत नाही इतक्या अ-गण्य भारतास पाण्यात पाहते असे वाटून घेणाऱ्यांसही काय म्हणावे? त्यासाठी बौद्धिक पातळीवर इलाजापलीकडचे दिव्यांगत्वच हवे. अशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढती असल्याने या युक्तिवादांचा समाचार घेणे आवश्यक ठरते.

Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत

हेही वाचा : अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!

याचे कारण हे आताच होते आहे असे नाही. इंदिरा गांधी यांच्या पराभूत मानसिकतेतील कालखंडात आपल्याकडे असे आरोप अनेकदा झाले. ‘परकीय हात’, ‘परदेशी शक्ती’ इत्यादी शब्दप्रयोग त्या वेळी वारंवार होत. भारतासमोरील सगळ्या अडचणी, संकटे, सरकारी अकार्यक्षमता इत्यादीस त्या वेळी एकच घटक जबाबदार होता. ‘परकीय हात’. हे परदेशांकडे बोट दाखवणे त्या वेळी इतके सर्रास होते की त्या वेळी विरोधी पक्षांत असलेले अटलबिहारी वाजपेयी आदी नेते इंदिरा गांधी यांची सर्रास खिल्ली उडवत. कोणा एका नेत्याच्या पत्नीस दिवस राहिले तर त्यामागे तर परदेशी हात नाही ना असे विचारण्याइतका चोथा या कारणाचा त्या वेळी विरोधकांनी केला होता. आता त्याच विरोधकांचे वंशज सत्तेवर आहेत आणि पुन्हा एकदा ‘परदेशी हात’ भारतीय राजकारणात वळवळू लागला आहे. हा योगायोग बरेच काही सूचित करतो. ‘अमेरिकेचे ‘डीप स्टेट’ भारतात अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे’ हे सरकारी विधान आणि सोरोस आणि सोनिया गांधी यांच्यातील कथित व्यवहारांबाबत काही सत्ताधाऱ्यांची टीका यांतून हा ‘परदेशी हात’ डोकावतो. प्रथम अमेरिकी ‘डीप स्टेट’च्या कटकारस्थानाबाबत.

‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारच्या साहाय्याने पण सरकारपरोक्ष गुप्त चळवळी, यंत्रणा यांचे सुरू असलेले गुप्त उद्याोग. अलीकडच्या काळात तुर्की या देशात हा शब्दप्रयोग वापरला गेला. आपला संबंध आहे तो अमेरिकेतील ‘डीप स्टेट’शी. म्हणजे त्या देशाच्या सीआयए, एफबीआय वगैरे यंत्रणांतील पाताळयंत्री भारताविरोधात काही कारस्थाने करीत आहेत आणि त्यास सरकारी उच्चपदस्थांची फूस आहे असा त्याचा अर्थ. पण या संदर्भात प्रश्न असा की अचानक आपल्या मर्द-मजबूत, पुरुषार्थी वगैरे सरकारातील अत्यंत हुशार, कार्यक्षमादी मंत्र्यांस अचानक ‘डीप स्टेट’ची गरज का भासावी?

हेही वाचा : अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!

अदानी हे त्याचे उत्तर. ते औपचारिकपणे कोणी मान्य करणार नाही. तथापि या सरकारचा इतिहास लक्षात घेतल्यास त्यांची कार्यपद्धती लक्षात येईल. आपल्यावर शेकेल, आपणास चिकटेल असे काही आरोप, टीका विरोधकांकडून सुरू झाली की तिचे प्रत्युत्तर त्यांच्यावरील आरोपाने द्यायचे किंवा विषय बदलून टाकायचा असा या सरकारचा खाक्या. दिल्लीपासून मुंबईपर्यंत तो अनेकदा दिसतो. म्हणजे कोकणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्यावर मध्येच बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे ‘एन्काउंटर’ होते आणि चर्चेची दिशा बदलते. किंवा निवडणुकीत ऐन भरात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांचे बिटकॉइन गैरव्यवहारातील आरोपीशी न झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग बाहेर येते आणि विरोधकांचा पुढचा वेळ खुलासे करण्यातच जातो. तसे हे. आता खरे तर अदानी प्रकरण हे काही सरकारने स्वत:च्या अंगास लावून घ्यावे असा विषय नाही. या देशातील एक खासगी उद्याोजक आणि त्यावर अमेरिकी नियामक यंत्रणांनी केलेली कारवाई, इतकाच काय तो मुद्दा. ही कारवाई किती खरी, किती खोटी, योग्य-अयोग्य वगैरे अद्याप काहीही समोर आलेले नाही. पण तरीही या उद्याोगपतीच्या बचावार्थ जणू काही घरचेच कार्य असल्याच्या थाटात केंद्रीय मंत्री सरसावले. आताही आणि याआधीही. त्यामुळे भारतीय नियामक यंत्रणांची क्षमता आणि प्रामाणिकपणा यावर प्रश्न निर्माण झाले. त्याबाबतही खुलासा करण्यात सदर नियामकांपेक्षा सत्ताधारीच अधिक उतावीळ. या कार्यकारणभावासंदर्भात त्यामुळे काही प्रश्न निर्माण केले गेले असतील तर तसे होणे नैसर्गिक.

म्हणून मग त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी सोरोस आणि कंपनीची मदत. सोरोस अमेरिकावासी. जगात लोकशाहीच्या प्रचारार्थ त्यांची संघटना कार्य करत असते. आपले केंद्र सरकारही लोकशाही तत्त्वाचा आदर करते. आपण लोकशाहीवादी असल्याचा दावा सरकारकडून वारंवार केला जातो आणि इतकेच काय; भरतभू हीच ‘लोकशाहीची जननी’ आहे हे सरकारातील उच्चपदस्थांकडून किती वेळा जनसामान्यांच्या मनावर ठसवले जाते! असे असताना खरे तर लोकशाहीच्याच प्रसारासाठी झटणाऱ्या जॉर्ज सोरोस यांच्याविषयी सरकारला ममत्व नसणे अनाकलनीय म्हणायचे. ते नाही तर नाही; पण निदान त्यांना खलनायक ठरवण्याची तरी गरज नाही. विश्वविख्यात अभ्यासक, समाजभाष्यकार नोम चोम्स्की हे अमेरिकेचे कडवे टीकाकार. त्यांनी जितके अमेरिकेवर कोरडे ओढले असतील तितके अमेरिकेच्या टीकाकारांनीही केले नसेल. पण तरीही चोम्स्की यांस अमेरिकेत आदरानेच वागवले जाते आणि विश्वविद्यालयांत उच्चपदांवर त्यांची नियुक्ती केली जाते. असे असताना जगातील ‘लोकशाहीची जननी’ इत्यादी भरतवर्षाने भारताचा रहिवासीही नसलेल्या सोरोस यांची इतकी भीती का बाळगावी आणि त्यांच्या नावे इतके खडे का फोडावेत, हा प्रश्न. इतकी हजारो वर्षांची संस्कृती, इतिहास, सामर्थ्य असलेल्या देशासमोर सोरोस नामक जराजर्जर वृद्ध आणि सोनिया गांधी नामे तितकीच अशक्त वृद्धा हे कसे काय आव्हान निर्माण करू शकतात? जम्मू-काश्मीर भारतापासून विलग करण्याची ताकद खुद्द बड्या देशांतही नसताना हे काम सोरोस-सोनिया हे दोघेच कसे काय करू शकतील? आणखी एक बाब.

हेही वाचा : अग्रलेख : भाषेची तहान…

ती अशी की अमेरिकी सरकारी यंत्रणेने भारतीय कंपनीवर दिवसाढवळ्या कारवाई केली आहे आणि उघडपणे प्रश्न विचारले आहेत. अमेरिकी यंत्रणेबाबत, त्या देशाच्या ‘डीप स्टेट’बाबत आपणास असा काही संशय असल्यास अमेरिकेच्या भारतातील आस्थापनांवर थेट कारवाई करण्याची हिंमत आपणही दाखवायला हवी. ते इंदिरा गांधी यांस जमले नव्हते. म्हणून तरी विद्यामान सरकारने ते करून दाखवावे. गांधी कुटुंबीयांस न जमलेले करून दाखवण्याचा आनंद काही औरच! पण तसे न करता साप म्हणून भुईस किती वेळ धोपटणार? शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’मधे नायकाच्या वडिलांच्या भुताचे एक पात्र आहे. ते खुद्द नायकाखेरीज कोणालाच दिसत नाही. तरीही ते असते आणि हॅम्लेटच्या बापाचे भूत असेच त्यास म्हटले जाते. त्या धर्तीवर हे ‘परदेशी हाता’चे भूत आहे किंवा काय असा प्रश्न.

Story img Loader