आणखी कित्येक फलक कोसळण्यासाठी सर्वत्र सिद्ध आहेत. त्याखाली प्राण जात नाहीत तोवर ते बेकायदा होते हे प्रशासन आपणास सांगणार नाही..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माणसे मरण्याचे नवनवे प्रकार नागर जीवनात वाढीस लागणे हे तिसऱ्या जगाचे एक अलीकडचे वैशिष्ट्य. ते आपणास तंतोतंत लागू होते. त्यासाठी हे अगदी ताजे नमुने पाहा : पुण्यात शाळेतून घरी येत असलेला एक विद्यार्थी रस्त्यावरच्या डबक्यात उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसल्याने गतप्राण झाला. दुसरीकडे महामार्गावर उंच वाहनांस रोखण्यासाठी जे आडवे खांब लावले जातात त्यावरच आपटून ट्रकचालक गतप्राण झाला आणि तिसरी घटना ही मुंबईतील. वळिवापूर्वी सुटलेल्या वादळात एक महाकाय जाहिरात फलक शेजारच्या पेट्रोल पंपावर कोसळला आणि त्याखाली चेंगरून १४ जणांचे प्राण गेले तर कित्येक जखमी झाले. गतसाली पुण्याजवळील महामार्गावर असाच जाहिरातीचा फलक वादळात कोसळून तीन-चार जण मृत्युमुखी पडले. माणसे मारणारा हा एक नवाच प्रकार. आतापर्यंत विजेच्या तारा, खांब, पूल, इमारत बांधणीसाठी उभारलेल्या परांची, झाडावरील नारळ इतकेच काय पण इमारतीवर विमान कोसळून आपल्याकडे माणसे मरण्याचा प्रघात होता. त्यात आता जाहिरात फलक कोसळून माणसे मरण्याच्या नव्या पद्धतीची भर निश्चितच पडेल आणि त्यात राज्यातील अशाच कार्यक्षम शहर प्रशासन यंत्रणा आपापल्या परीने हातभार लावतील. मुंबईत सोमवारी जे घडले ते घडल्यानंतर, डझनाहून अधिकांचे प्राण गेल्यावर जे कोसळून हे सगळे घडले ते बांधकाम बेकायदा होते, असा खुलासा आपले प्रशासन करते. छान. म्हणजे जे गेले त्यांस अधिकृताखाली गुदमरण्याचेही समाधान नाही. जे झाले त्याचा अर्थ काय?
हेही वाचा >>> अग्रलेख : डोळे वटारता वटारता…
तो शोधण्यासाठी जराही प्रयास करावे लागणार नाहीत. कोणत्याही शहरातील कोणताही मार्ग, कोणत्याही शहरांना जोडणारा महामार्ग किंवा ओसंडून वाहणाऱ्या गर्दीबोळांत वर नजर टाकली तरी हे दृश्य सहज दिसेल. सरकारी खर्चाने मार्ग-महामार्ग बांधायचे. ते उभारले गेले की त्याच्या शेजारी दुतर्फा असलेली सरकारी जागा खासगी जाहिरातबाजीसाठी आंदण द्यावयाची. त्या कंत्राटांतूनही पैसे करायचे. आणि आपल्या स्वत:च्या वा आपल्या चिल्ल्यापिल्ल्या चिरकुट नेत्यांच्या वाढदिवशी कार्यसम्राट म्हणून कवतिक करून घ्यावयाचे हा या जाहिरात फलकांचा मुख्य उपयोग. या फलकांवर कार्यसम्राट हे बिरुद आता तर जे उद्याोग करू नयेत ते करणाऱ्यासही अभिमानाने लावले जाते. खेरीज ‘आभाळाएवढे कर्तृत्व’, ‘कार्यतत्पर’, ‘गॉडफादर’ (म्हणजे ‘परमेश्वराचा पिता’ असा उदात्त अर्थ जाहिरातकर्त्यांस अभिप्रेत असावा. असो.) अशा शेलक्या विशेषणांनी फलक-नायकाचा गौरव. त्यासमवेत त्या लहानमोठ्या नेत्याची मोबाइल-धारी चालतानाची अथवा स्वत:च्या देहाकारापेक्षा किमान दुप्पट मोठ्या खुर्चीत बसून फोनवर बोलत असतानाची छबी. यावरून ते कोणाशी बोलत असावेत हे जनतेस कळते असा या नेत्यांच्या चिरकुट चमच्यांचा समज असावा. आणि या फलक-नायकाच्या आसपास उद्याच्या फलक-नायकांची काळ्या गॉगलधारी, सोन्याच्या ‘चैन’धारी आणि केसांच्या चित्रविचित्र स्टाइलधारी तरुण चेहऱ्यांची रांगोळी. हे दृश्य नाही असे एकही गाव/ शहर/ महानगर या देशात नाही. आता तर या जाहिरात फलकांच्या खांबांवर, रस्त्यांवरील दिव्यांच्या खांबांवर सर्पिलाकार दिव्यांच्या माळा लावण्याची नवीच प्रथा पडलेली दिसते. एखादी प्रथा किती वाईट हे जोखायचे असेल तर तिच्या प्रसाराचा वेग लक्षात घेणे इष्ट. त्या निकषावर या खांबांवरील दिव्यमाळांचे उदाहरण देता येईल. इतके दिवस हे फलक फ्लेक्स, कापड इत्यादींत रंगवलेले असत. काही दिवसांनी ते विरून जात वा वाऱ्याने फाटत. पण एकदा का एखादा गैरव्यवहार सहज पचनी पडला, स्वीकारला गेला की तो करणारे अलगद पुढचे पाऊल टाकतात. या फलकांबाबत असे झालेले आहे. म्हणजे आता हे जाहिरात फलक जणू टीव्हीचे प्रचंड पडदे असावेत अशा पद्धतीने त्यावर ध्वनिचित्रफिती सादर केल्या जातात. रात्रीच्या वेळी या जाहिरातींची दृश्यमानता इतकी तीव्र असते की त्यामुळे वाहनचालकांच्या डोळ्यासमोर अंधारीच यावी. ती तशी येते याचा अनुभवही अनेकांनी घेतला असेल. अर्थात या टीव्ही स्क्रीन-सदृश जाहिरातींमुळे अद्याप घात-अपघात झालेले नाहीत आणि त्यामुळे कोणाचे प्राणही गेलेले नाहीत. ते जात नाहीत तोपर्यंत जे सुरू आहे ते बेकायदा होते हे प्रशासन आपणास सांगणार नाही. या अशा बटबटीत आणि हीन दर्जाच्या सादरीकरणामुळे दोन मुद्दे प्रकर्षाने समोर येतात.
हेही वाचा >>> अग्रलेख: श्रद्धा निर्मूलन!
आपला जाहिरातीचा सोस आणि जनतेच्या खर्चाने ही जाहिरात हौस पुरवून घेण्याच्या नादात सर्रास होत असलेले नियमांचे उल्लंघन. प्रथम नियमनांच्या उल्लंघनाबाबत. एका मार्गावर किती अंतराने किती जाहिरात फलक असावेत, त्यांची उंची/ रुंदी/ बांधणी कशी असावी, ती तशी आहे किंवा काय हे तपासण्याची यंत्रणा कोणती, किती तीव्र वादळात हे फलक टिकून राहू शकतात, तसेच या जाहिरातींतून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाची तीव्रता किती असावी असे एक ना दोन अनेक मुद्दे या निमित्ताने समोर येतात. या संदर्भात महामार्ग, शहरांतील मार्ग आणि गल्ल्या यासाठी स्वतंत्र नियमावली आहे काय? वास्तविक अनेक महामार्गांच्या खर्चाची वसुली सरकार जनतेकडून टोल आदी आकारून करत असते. असे असताना परत महसुलाच्या गरजेसाठी हा असला जाहिरातींचा मार्ग प्रशासनास का चोखाळावा लागावा? कोणताही नवा उद्याोग सुरू होत असेल तर त्यात गुंतलेल्यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास उपचारांची तरतूद विमा रकमेद्वारे केली जाते. जाहिरात फलकांची उभारणी करताना जीव धोक्यात घालणारे कर्मचारी आणि हे असले जाहिरात फलक पडून जीव गमावणारे नागरिक यांच्यासाठी असा काही विमा आकारला जातो काय? विकसित देशांत हे जाहिरात फलक कसे आणि कोठे लावले जावेत याविषयी काही नियमावली आहे. महामार्गाच्या दुतर्फा उंच फलकांऐवजी महामार्ग दुभंगावर वाहनाच्या उंचीनुसार ठरावीक आकाराच्या आयताकृती फलकांवरच तेथे असे फलक लावले जातात. त्यातील प्रकाश मंद असेल आणि वाहनचालकांच्या डोळ्यात सुयांसारखा तो घुसणार नाही, याची खबरदारी तिकडे घेतली जाते. हे असले काही आपल्याकडे विचाराच्या पातळीवरही नाही. आचारात येणे राहिले मैलोगणती दूर. याच मुद्द्याचा विचार होत नसल्यामुळे जाहिरातबाजीची आपणास इतकी गरज का, याचे उत्तरही मिळण्याची शक्यता नाही. गावातील कोणा उनाडाच्या विवाहापासून ते स्थानिक, राज्यस्तरीय राजकारण्याची क्षुल्लक कर्तृत्वगाथा मिरवण्यापर्यंत प्रत्येकाकडून या जाहिरात फलकांचा सतत गैरवापर होत असतो. आता तर निवडणुकांचा हंगाम. म्हणजे वास्तवाचे मृगजळ या महाकाय जाहिरातींद्वारे महामार्गांवर दुथडी भरभरून वाहण्याचा काळ. एरवी या मृगजळ गंगेबाबत आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. पण या मृगजळाचे महाकाय मायावी जाहिरात फलक कोसळून माणसे मरू लागतात तेव्हा या जाहिरातबाजीचा सोस हा निषेधार्ह ठरतो. देशातील सर्वात प्रगत राज्याच्या राजधानीत एका सहज टाळता येण्याजोग्या अपघातात १४ जणांचा प्राण जातो ही एकच बाब हा जाहिरातीचा सोस किती उबग आणणारा आहे हे समजावून देण्यास पुरेशी आहे. आपल्याकडे देश/ राज्य यांची भाग्यरेखा फळफळत असेल/ नसेल, पण या फलक-नायकांचे हे फळफळणे आता जीवघेणे ठरू लागले आहे. या दोन अपघातांनंतर तरी या फलक-नायकांच्या नियमनाची काही गरज आपणास वाटेल, ही आशा. नपेक्षा आणखी कित्येक फलक हे वाऱ्याने कोसळण्यासाठी सर्वत्र सिद्ध आहेत.