सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानापैकी २२० कोटी डॉलर्स न देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेऊनही, हे विद्यापीठ बधले नाही…
अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष जॉन अॅडम्स, नंतरचे थिओडोर रुझवेल्ट, फ्रँकलिन डी रुझवेल्ट, जे. एफ. केनेडी, बराक ओबामा असे एक नाही दोन नाही तर तब्बल आठ अध्यक्ष, तत्त्वज्ञ हेन्री थोरो, वैज्ञानिक रुदरफोर्ड, ओपेनहायमर, ‘रोड लेस ट्रॅव्हल्ड’ लिहिणारे कवी रॉबर्ट फ्रॉस्ट, दृष्टिहीनांसाठी बरेच काही करणाऱ्या हेलेन केलर, कवी टी. एस. एलियट, हेन्री किसिंजर, बेनझीर भुत्तो, अल गोर, बिल गेट्स, ‘फेसबुक’चा जन्मदाता मार्क झकरबर्ग, रतन टाटा, राहुल बजाज, पी. चिदम्बरम, आनंद महिंद्रा, चित्रपट निर्मात्या मीरा नायर इत्यादी किती नावे सांगावीत! या सर्वांस जोडणारा एक समान धागा आहे. तो म्हणजे हार्वर्ड विद्यापीठ. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य-स्वप्न प्रत्यक्षात आणणारी मोहीम सुरू होण्याआधी, म्हणजे १६३६ साली अमेरिकेत हे विद्यापीठ प्रत्यक्षात आले. इंग्लंडातून जीव वाचवण्यासाठी अमेरिकेत आलेल्या शिक्षक जॉन हार्वर्ड यास अमेरिकेत अकाली मृत्यूने गाठले. त्या वेळी मृत्युशय्येवरून अखेरची इच्छा त्याने व्यक्त केली ती अशी एखादी शैक्षणिक संस्था काढण्याची. ती प्रत्यक्षात आली तेव्हा अमेरिकेचा जन्म १४० वर्षे दूर होता. याचा अर्थ हे विद्यापीठ वयाने अमेरिकेसही थोरले. आणखी ११ वर्षांनी ते चतुर्थ शताब्दी साजरी करेल. या काळात तब्बल १४९ नोबेल पारितोषिक विजेते, मानवी संस्कृती पुढे नेणारे जगभरातील अनेक प्रज्ञावंत, वैज्ञानिक, साहित्यिक या विद्यापीठाच्या मांडवाखालून गेले. अशी शिक्षण संकुले म्हणजे अमेरिकेने स्वकर्तृत्वाने, स्वकष्टाने स्वत:च्या हातावर स्वहस्ते कोरलेल्या भाग्यरेषाच जणू. शिक्षणावर, संस्कृतीवर आणि मुख्य म्हणजे सुसंस्कृततेवर प्रेम करणाऱ्या जगातील प्रत्येकास आज यातील मेरुमणी हार्वर्डविषयी अभिमानाची भावना दाटून आली असेल. याचे कारण शिक्षणशत्रू धनदांडग्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नमते घ्यायला या विद्यापीठाने दिलेला ठाम नकार.
हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता कोणत्याही देशात, कोणत्याही धर्मात आणि कोणत्याही संस्कृतीत असो. त्याचा पहिला राग असतो तो स्वतंत्र शिक्षण संस्थांवर. कारण अशा स्वतंत्र शिक्षण संस्थांतूनच उद्याचे प्रतिभावंत आकारास येत असतात आणि त्यांच्याकडून हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यांस धोका असतो. म्हणून अशा नेत्यांस हव्या असतात होयबांची पैदास करणाऱ्या साच्यातील मूर्तिशाला. यास; अमेरिकेसारख्या कमालीच्या स्वतंत्र हवेत जन्माला येऊनही ट्रम्प अपवाद नाहीत. आपली प्रदूषित मानसिकता आणि त्याहूनही प्रदूषित विचारसरणी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठावर लादण्याचा प्रयत्न केला. या विद्यापीठातील विद्यार्थी चळवळी दंतकथा वाटाव्यात इतक्या खऱ्या. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष असो वा पारलैंगिकता वा अभिव्यक्तिस्वातंत्र्य वा अन्य काही. या विद्यापीठातील विद्यार्थी प्राणपणाने संघर्ष करतात. ट्रम्प यांस हे मान्य नाही. विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांस वेसण घालावी असा फतवा त्यांनी काढला. ज्यू धर्मविरोधी (अँटीसेमाईट) भावना या विद्यापीठात वाढीस लागल्याचे दिसते, सबब विद्यापीठाने या विद्यार्थ्यांचे कडक नियमन करावे, त्यांच्या अभ्यासेतर चळवळींवर नियंत्रण आणावे आणि अशा चळवळ्या विद्यार्थ्यांची माहिती सरकारहाती द्यावी, असा ट्रम्प यांचा आदेश. अमेरिकेत भिन्नतेला महत्त्व खूप. भिन्नवर्णीय, भिन्नधर्मीय, भिन्नलिंगी अशांस सर्वांस समान संधी कशा मिळतील असा प्रशासनाचा प्रयत्न. तो ट्रम्प यांस अमान्य. अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून ही भिन्नता कशी समूळ नष्ट करता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे. विद्यापीठाने ही भिन्नता सोडावी असे त्यांनी बजावले आणि सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा तपशील सरकारदरबारी सुपूर्द करावा असाही आदेश काढला. गेल्या शुक्रवारी विद्यापीठास प्रशासनाकडून हे पाच पानी आज्ञापत्र सादर केले गेले.
सोमवारी विद्यापीठाचे अध्यक्ष अॅलन एम गार्बर यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आणि ट्रम्प यांच्या आदेशवाणीस विद्यापीठ केराची टोपली दाखवत असल्याचे जाहीर केले. ‘‘विद्यापीठाने काय शिकवावे, कसे वागावे, कोणते अभ्यासक्रम आखावेत आणि कोणते आखू नयेत, विद्यार्थ्यांना कसे वागवावे वगैरे सांगण्याचा प्रशासनास काडीचाही अधिकार नाही. आपल्या प्रशासनाने काढलेले आदेश हे मर्यादाभंग आहेत. अमेरिकी घटना नागरिकांस, संस्थांस जे स्वातंत्र्य देते त्यावर आपल्या आदेशाने गदा येते. आम्ही ते पाळणार नाही’’, इतक्या स्पष्टपणे हार्वर्ड विद्यापीठाने आपल्या अध्यक्षास शब्दश: खुंटीवर टांगले. याचे पडसाद केवळ शैक्षणिक वर्तुळातच नव्हे तर अमेरिकेच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उमटले असून माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेकांनी हार्वर्डचे अभिनंदन केले. ‘‘हा ट्रम्प यांच्या राजवटीस कलाटणी देणारा क्षण’’, अशी भविष्यवाणी अमेरिकेत यानंतर केली जात असून गार्बर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो. अध्यक्ष ट्रम्प यांना हे सहन होणे अर्थातच अशक्य. त्यांनी स्वत: यावर काही भाष्य केले नसले तरी त्यांच्या वतीने प्रशासनाने हार्वर्डविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासन तेथेच थांबले नाही. त्यानंतर लगेच विद्यापीठाचे तब्बल २२० कोटी डॉलर्सचे अनुदान थांबवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने जाहीर केला. या विद्यापीठास अमेरिकी सरकारकडून ९०० कोटी डॉलर्स येतात. त्यापैकी ७०० कोटी डॉलर्स विद्यापीठाच्या बोस्टन, केंब्रिज, मॅसेच्युसेट्स इत्यादी ठिकाणची रुग्णालये आणि वैद्याकीय संस्थांतील संशोधनावर खर्च होतात. अल्झायमर्स, मधुमेह, कर्करोग इत्यादी गहन विकारांवर या केंद्रातून महत्त्वाचे संशोधन सुरू आहे. असे असतानाही केंद्रीय सरकारकडून विद्यापीठास दिल्या जाणाऱ्या रकमेतील जवळपास एकपंचमाश रक्कम गोठवण्याचा निर्णय ट्रम्प घेतात. यावरून त्यांची असंवेनशीलता आणि अक्षरशत्रुत्व तेवढे दिसून येते.
तरीही विद्यापीठाने अध्यक्षांच्या मनमानीपुढे मान तुकवण्यास नकार दिला, ही बाब कमालीची महत्त्वाची. विशेषत: कोलंबिया विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनासमोर अलीकडेच नांगी टाकली हे वास्तव असताना हार्वर्डचे हे शौर्य सर्वार्थाने कौतुकास्पद ठरते. कोलंबियाचे ४० कोटी डॉलर्सचे अनुदान रोखण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आणि ते विद्यापीठ सरकारशी चर्चा करण्यास तयार झाले. हार्वर्ड विद्यापीठास मात्र अशी चर्चेची कोणतीही गरज वाटली नाही. त्यांनी सरळ ट्रम्प यांचा आदेश धुडकावूनच लावला. या विद्यापीठाची महती अशी की गेल्या एका वर्षातच, २०२४ साली, त्यास परदेशातून जवळपास ५३०० कोटी डॉलर्स देणगी रूपात मिळाले. आपल्या रतन टाटा यांनीही साधारण १५ वर्षांपूर्वी नव्या इमारत बांधणीसाठी या विद्यापीठास तब्बल पाच कोटी डॉलर्सची देणगी दिली आणि सध्या विद्यामान सत्ताधीशांचे आनंददूत मानले जाणारे आनंद महिंद्रा यांनाही याच विद्यापीठास कोटभर डॉलर्स देणगीदाखल द्यावेसे वाटले. यावरून या विद्यापीठाची महत्ता ध्यानी यावी. जगभरातील शंभरहून अधिक देशांत या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, हितचिंतक विखुरलेले असून ट्रम्प यांच्यामुळे विद्यापीठास आर्थिक चणचण जाणवू लागल्यास हे सर्व मदतीस पुढे येतील. याचे कारण उत्तम शिक्षण आणि त्यासाठी आवश्यक निर्भय वातावरण यांची महती ट्रम्प यांस नसली तरी या सर्वांस ती आहे. म्हणून जगातील सर्व लोकशाहीवादी हार्वर्डचे अभिनंदन करतील.
या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने मंगळवारच्या अंकात पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेली आपल्या शैक्षणिक संस्थांच्या हेळसांडीची बातमी अधिक वेदनादायी ठरते. महासत्ता, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था इत्यादी इत्यादी होऊ पाहणाऱ्या आपल्या मायभूमीतील काही आयआयटी, आयआयएम अशा महत्त्वाच्या १७ केंद्रीय शिक्षण संस्थांस प्रदीर्घ काळ पूर्णवेळ प्रमुखच नाही. सर्व काही हंगामी. यात ‘बनारस हिंदू विश्वविद्यालय’ही आले. ही आपली शिक्षणाशी असलेली बांधिलकी. अशा वेळी सत्ताधीशांच्या दांडगाईसमोर ठाम उभे राहण्याचे ‘हार्ड वर्क’ अमेरिकेत का असेना कोणी करते ही समाधानाची बाब. तेवढाच आनंद!