पाकिस्तान व इराणने परस्परांच्या भूमीत हल्ले केले, पण ‘परस्परांवर’ हल्ले केले नाहीत. त्याऐवजी पदरी बाळगलेल्या उचापतखोरांना लक्ष्य केले..

शेजारी देशावर छुपे हल्ले करण्याची पाकिस्तानला सुरसुरी आणि खुमखुमी फार. खरे तर प्रत्येक देशाची स्वत:ची अशी सहनशीलता असते. ती ओलांडली गेल्यावर प्रतिहल्ले करण्याची हिंमत आणि क्षमता भारतासारखे देश दाखवू शकतात. तशी ती आपण वेळोवेळी दाखवलेलीही आहे. पण विश्व संघर्षमंचावर अलीकडे हे दोन ठरलेले कलाकार सोडून तिसऱ्याच कलाकाराने प्रवेश केला. त्या कलाकाराचे नाव इराण. गेले तीन दिवस या दोन देशांनी परस्परांच्या भूमीवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. ‘आमच्या’ देशाविरुद्ध ‘त्या’ भूमीतून कट रचला जातो, असे दोघांचे मत. या हल्ल्यांनी ईप्सित उद्दिष्ट साध्य केले असे दोघांचे दावे. त्यांतील सत्यासत्यता पडताळून पाहण्याची सध्या कुणाला फुरसत नाही आणि तशी गरजही नाही. आपले घर जळत असतानाही दुसऱ्याच्या घरातील चुलीत पाणी वा तेल ओतणे इतपतच वकूब असलेल्या या दोन देशांचे उपद्रवमूल्य उच्च कोटीचे आहे. तरीही अमेरिका, रशिया, चीन अशा विविध महासत्तांनी या देशांचा स्व-हितसंबंध-वर्धनासाठी वापर करून घेतला. आता परिस्थिती अशी आहे की पश्चिम आशियातील आगडोंब पूर्वेकडे सरकू लागला आहे. तिकडे इस्रायल आणि येथे इराण-पाकिस्तान अशी ही व्याप्ती वाढू लागली आहे. अरबी समुद्रात किंवा एडनच्या आखातामध्ये यापूर्वीच काही व्यापारी जहाजांवर हूथी बंडखोरांचे हल्ले सुरू आहेतच. म्हणजे झळ भारताच्या समीप पोहोचली आहे. या सगळयाच्या मुळाशी राजकीय वा सामरिक विस्तारवाद नसून धर्माधिष्ठित दहशतवाद आहे. धर्मयुद्धाच्या मध्ययुगीन अजागळ संकल्पनांच्या जाळयातून पश्चिम आशिया बाहेर पडलेला नाही आणि लोकशाहीवादी प्रगत म्हणवणाऱ्या अमेरिकेसारख्या देशांच्या कुटिल व्यापारवादामुळे तसा तो पडूही शकत नाही. परंतु धर्माधिष्ठित दहशतवादाने कधीही धर्माचे भले झाले नाहीच. उलट पोशिंद्यांनाच तो डोईजड होतो. जणू सिंदबादच्या त्या कथेतला मानेला वेढून बसलेला ओरांगउटांग. वजन वागवत चालता येत नाही आणि मानेवरून उतरवताही येत नाही अशी स्थिती! इराण आणि पाकिस्तान हे अशा तथाकथित धर्मयोद्धयांचे प्रधान पोशिंदे. इस्रायल आणि काही प्रमाणात सुन्नी अरबांविरोधात इराणने हे केले. भारत आणि पूर्वीच्या अफगाणिस्तानविरोधात पाकिस्ताननेही हेच केले. परिणाम काय? आज विविध प्रकारच्या जिहादी फौजा वापरूनही हे दोन्ही देश विजयी तर सोडाच, निर्धास्तही बनू शकलेले नाहीत. अशा दोन देशांनी परस्परांवर अग्निबाणांचा मारा करणे हा त्यामुळेच काव्यात्म न्याय ठरतो.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Narendra Modi Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा; भारताची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “देशाची अखंडता जपण्यासाठी…”
Only 30 percent of road works were completed during the Eknath Shinde government Mumbai news
‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण

हेही वाचा >>> अग्रलेख : दुआओं का ‘असर’!

ही परिस्थिती उद्भवली, याची कारणे जशी तात्कालिक, तशी ऐतिहासिकही. काही दिवसांपूर्वी इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात ११ पोलीस मारले गेले. हे झाले तात्कालिक कारण. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सक्रिय असलेल्या ‘जैश अल-अदल’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा इराणचा दावा आहे. बलुचिस्तान हा क्षेत्रफळानुसार पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत. इराणमध्येही सिस्तान-बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानी सीमेलगतच आहे. या दोहोंचे स्वतंत्र बलुचिस्तान राष्ट्र व्हावे, अशी दोन्ही देशांतील बलुच राष्ट्रवाद्यांची इच्छा. त्यामुळे इराण-पाकिस्तान सीमेवर चकमकी सुरूच असतात. जैश अल-अदल हा सुन्नी दहशतवादी गट इराणमध्ये जैश अल-धुमल या नावाने सक्रिय आहे. शियाबहुल इराणविरोध हे या गटाचे प्रमुख उद्दिष्ट. जैशला आश्रय देणारा पाकिस्तानच, ही नवी बाब नाही. तो त्यांच्या राष्ट्रीय धोरणाचाच जणू एक भाग. पोलिसांवरील हल्ल्यांमुळे इराणने याच ‘जैश’च्या पाकिस्तानमधील तळांवर हल्ले केले. याला पाकिस्तानने वरकरणी सार्वभौमत्वावरील हल्ला म्हटले. प्रत्यक्षात प्रत्युत्तर हल्ल्यांमध्ये इराणस्थित बलुच दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यात आले. म्हणजे दोन्ही देशांनी परस्परांच्या भूमीत हल्ले केले, पण ‘परस्परांवर’ हल्ले केले नाहीत. त्याऐवजी पदरी बाळगलेल्या उचापतखोरांना लक्ष्य केले. हे झाले तात्कालिक कारण.

ऐतिहासिक कारण दोन्ही देशांच्या गंभीर धोरणदोषात आणि संकुचित दृष्टीत दडलेले आहे. अमेरिकाविरोध आणि इस्रायलविरोध ही या धोरणातील एक छटा. ती इराणच्या बाबतीत ठसठशीत आणि गडद आहे, तर पाकिस्तानच्या बाबतीत बरीचशी पुसट. दोन्ही देशांना इस्लामी जगताचे नेतृत्व करण्याची खुमखुमी आहे. म्हणजे आकांक्षा कोणती, तर आपल्याच टापूत नि आपल्याच धर्मात महासत्ता बनण्याची! तशीच ती सौदी अरेबिया आणि तुर्कीये यांच्यातही आहे. आता नेतृत्व करण्यासाठी पदरी संसाधनमूल्य तरी हवे किंवा उपद्रवमूल्य तरी. सौदी अरेबिया तेल आणि इस्लामची जन्मभूमी या भांडवलावर दावा सांगत होता. तर पारपंरिक संपत्ती आणि युरोपशी जवळीक ही तुर्कीयेसाठी जमेची बाजू ठरत होती. इराण आणि पाकिस्तानने उपद्रवमूल्याचा मार्ग अनुसरला. पाकिस्तानने गतशतकाच्या उत्तरार्धात अणुबॉम्ब विकसित करून या शर्यतीत आघाडी घेतली. त्या उपलब्धीचे वर्णन पाकिस्ताननेच ‘इस्लामी बॉम्ब’ असे केले. इराणमधील इस्लामी क्रांतीनंतर मुबलक खनिज तेल व नैसर्गिक वायूचा साठा आणि समृद्ध संस्कृती असे भांडवल असूनही इराणच्या इस्लामी नेतृत्वाने दहशतवाद्यांच्या टोळया पोसण्याचा अधिक उथळ मार्ग पत्करला. सीरिया, लेबनॉन, इराक, येमेन या देशांमधील विस्कळीत सरकारे आणि शिया-सुन्नी दुभाजन या धोरणाच्या पथ्यावर पडले. हेझबोला, हूथी आणि काही प्रमाणात हमास या संघटनांनी एका विस्तीर्ण पट्टयामध्ये उच्छाद मांडला.

हेही वाचा >>> अग्रलेख : आहे महाराष्ट्र परी..

तिकडे पाकिस्ताननेही भारताशी थेट युद्धांमध्ये होणाऱ्या पराभवांनंतर अप्रत्यक्ष युद्धाचा मार्ग पत्करला. केवळ काश्मीर खोऱ्यात नव्हे, तर भारतात अन्यत्रही घातपाती कृत्ये करण्याचे कट पाकिस्तानात शिजत होते. कधी ‘लष्कर’, कधी ‘जैश’ अशी बिरुदे लावत या संघटना आणि त्यांचे म्होरके पाकिस्तानात उजळ माथ्याने वावरले. सोव्हिएत माघारीनंतर अफगाणिस्तानातील अस्थैर्याचा फायदा उठवण्यासाठी तालिबानला पोसले. अफगाण सीमेवर ओसामा बिन लादेन आणि त्याच्या अल-कैदाला आश्रय दिला गेला. इराणमधील धर्मसत्ता आणि पाकिस्तानातील लष्करशाहीची या दहशतपेरणीमागे निश्चित अशी गणिते होती. सुन्नी दहशतवाद हे काही प्रमाणात सौदी अरेबिया आणि तुर्कीये यांचे पाप. पण येमेनचा अपवाद वगळता आणि सीरियातील काही हल्ले वगळता, सौदी आणि तुर्की सरकारांनी दहशतवादी टोळया पोसल्या नाहीत. याउलट इराण आणि पाकिस्तानचे मात्र ते राष्ट्रीय धोरण बनले. यातून त्यांना मिळाले काय? गेली दोन वर्षे इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांची तीव्रता वाढली. निर्बंधजर्जर इराणी अर्थव्यवस्था आजही पूर्वपदावर आलेली नाही. दहशतवादाला थारा दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि पाश्चिमात्य देशांनी पाकिस्तानला मदतीचा हात आखडता घेतला. क्षेपणास्त्रे आहेत, पण बाजारात जीवनावश्यक वस्तूंची वानवा अशी कहाणी. या दोन देशांनी पश्चिम आणि दक्षिण आशियाचे अतोनात नुकसान केले हे खरेच. पण यात त्यांचे स्वत:चे नुकसान गणतीपलीकडचे झाले हेही खरे. लोकशाही मुरली नाही आणि एकीकडे धर्मसत्ता तर दुसरीकडे लष्करशाही हीच धोरणे ठरवणारी केंद्रे बनली. द्वेष हे यांचे टॉनिक. त्याचे पोषणमूल्य शून्य. विवेक आणि विचारापासून भरकटलेली व्यक्तीच दहशतवादी बनू शकते. अशा व्यक्तींमध्ये मग वर्चस्ववाद आणि संहार या आदिम भावना जागृत होतात. इराण आणि पाकिस्तानमध्ये असे ‘आदिमानव’ आधुनिक काळातही देश चालवतात, म्हणूनच संहार आणि संघर्षांच्या फेऱ्यातून यांची सुटका संभवत नाही. यातून भविष्यात दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी यांनी तेहरान आणि इस्लामाबादवर हल्ले केले तरी आश्चर्य वाटायला नको. दहशतवाद विरुद्ध दहशतवाद या लढयात अखेर विजयी कोणीच होणार नाही. पण हे कळण्याइतके दोन्ही देशांतील नेतृत्व सुजाण नाही.

Story img Loader