पश्चिम आशियातील नरसंहारातून नेतान्याहू यांची बेमुर्वतखोरी जितकी दिसते त्यापेक्षा अधिक अमेरिका नामे महासत्तेची अगतिकता प्रकर्षाने उघड होते…

गतवर्षी याच दिवशी (७ ऑक्टोबर) हमास या दहशतवादी संघटनेच्या आततायी नेतृत्वाने इस्रायलवर अत्यंत निंदनीय नृशंस असा हल्ला केला आणि स्वत:च्या पायावर धोंडा नव्हे, तर कुऱ्हाड मारून घेतली. त्यात हजारांहून अधिक निरपराध यहुदी हकनाक मारले गेले. त्यामुळे मुळात युद्धखोर प्रवृत्तीच्या, देशांतर्गत राजकारणात गंभीर संकटात सापडलेल्या इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना आयतीच संधी मिळाली. त्याचे वर्णन ‘लोकसत्ता’ने गतवर्षीच्या संपादकीयात ‘बिबिंचा पुलवामा’ असे केले. ते किती सार्थ होते आणि आहे हे हत्याधुंद नेतान्याहू यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून ध्यानी येईल. गेल्या वर्षभरात हमासच्या कृतीने उद्युक्त होऊन नेतान्याहू यांनी सुरू केलेल्या चौफेर हल्ल्यात पन्नासएक हजारांचे प्राण गेले. तरीही नेतान्याहू यांची भूक शांत होताना दिसत नाही आणि इस्रायलची समस्याही मिटताना दिसत नाही. जे झाले, जे सुरू त्यावर ‘लोकसत्ता’ने गेल्या वर्षभरात वेळोवेळी भाष्य केले. त्यामुळे त्या मुद्द्यांची पुनरुक्ती टाळून त्यापेक्षा जे सुरू आहे त्यात पश्चिम आशियातील अभागी जनांशिवाय कोण आणि काय बळी गेले याचा धांडोळा घेणे गरजेचे आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य

नेतान्याहू यांच्या कृतींच्या अप्रत्यक्ष बळींत सर्वात पहिले नाव आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन. इस्रायलच्या कृतींने बायडेनबाबांस मेल्याहून मेल्यासारखे करून टाकले. निकोलस क्रिस्टॉफ यांच्यासारखा नेमस्त आणि अत्यंत अभ्यासू भाष्यकार ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये बायडेन यांच्या सध्याच्या अवस्थेचे वर्णन ‘‘ग्राऊची अँड इम्पोटंट… अ सेल्फ डिमिनिशिंग प्रेसिडेंट’’ (करवादलेला आणि नपुंसक… स्वकर्माने आकसत चाललेला अध्यक्ष) अशा टोकदारपणे करतो त्यावरून बायडेन आणि त्यामुळे अमेरिका यांचे किती नुकसान नेतान्याहू यांनी केले आहे हे लक्षात येते. हा बायडेन यांचा जसा व्यक्तिगत ऱ्हास आहे त्यापेक्षा अधिक ही अमेरिकेची क्षती आहे. पश्चिम आशियातील नरसंहारातून नेतान्याहू यांची बेमुर्वतखोरी जितकी दिसते त्यापेक्षा अधिक अमेरिका नामे महासत्तेची अगतिकता प्रकर्षाने उघड होते. याचा फटका आगामी अध्यक्षीय निवडणुकांत बायडेन यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षास किती बसणार हे आणखी महिनाभरात कळेलच. अमेरिकेच्या ‘स्विंग स्टेट्स’ (म्हणजे निकाल बदलवू शकणारी राज्ये) नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही राज्यांत अरब आणि पश्चिम आशियातून आलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना बायडेन यांची निष्क्रियता अजिबात रुचलेली नाही. हे वास्तव लक्षात घेऊनच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी या सर्वास चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आणि नेतान्याहू यांच्याविरोधात कडक भूमिका घेतली. त्यावरून त्यांचे वळण लक्षात येते. त्यावरून पश्चिम आशिया आणि विशेषत: इस्रायलच्या मुद्द्यावर हॅरिस या ओबामा यांच्या मार्गाने जातील अशी लक्षणे आहेत. याचा अर्थ ओबामांच्या काळात ज्या प्रमाणे नेतान्याहू यांचे फाजील लाड अमेरिकेने केले नाहीत; त्या प्रमाणे अध्यक्षपदी निवडून आल्यास हॅरिस यादेखील नेतान्याहू आणि इस्रायल यांची फार पत्रास ठेवणार नाहीत, असे मानण्यास जागा आहे. त्याचमुळे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांआधी अधिकाधिक संहार करवून घ्यावा, आपले मनसुबे पूर्ण करून घ्यावेत असा नेतान्याहू यांचा प्रयत्न दिसतो. त्यात त्यांचे यश दुहेरी आहे. एक म्हणजे मनसोक्त संहार आणि दुसरे म्हणजे या युद्धाची व्याप्ती वाढवणे. यातील पहिल्याविषयी अधिक लिहिण्याची गरज नाही. आणि दुसऱ्याविषयी लिहायला हवे याचे कारण ही ज्याप्रमाणे इस्रायलची इच्छा आहे त्याचप्रमाणे ती मनीषा हमास, हेझबोल्ला आणि इराण यांचीदेखील आहे. ज्या वेळी दहशतवादी आणि त्यांस कथित विरोध करणारे हे एकाच प्रतलावर असतात त्या वेळी त्या संघर्षाचा फोलपणा ठसठशीतपणे दिसून येतो.

हेही वाचा : अग्रलेख : ‘अभिजात’तेचे भोक!

उदाहरणार्थ गाझा पट्ट्यातील २२ लाख पॅलेस्टिनींची आजची अवस्था ही १९४८ सालच्या परिस्थितीपेक्षाही गंभीर आहे. त्या वेळी इस्रायल अस्तित्वात येताना झालेल्या हिंसाचारात १५ हजार पॅलेस्टिनी मारले गेले आणि ७.५ लाख पॅलेस्टिनी निर्वासित झाले. तर गेल्या वर्षभरातील हिंसाचारात ४५ हजारांहून अधिकांचा बळी गेला आहे आणि तेथे उरलेले पॅलेस्टिनी १९४८ सालापेक्षाही अधिक आज असाहाय्य आहेत. आपल्या मातृभूमीतच या सर्वांवर पुन्हा एकदा बेघर होण्याची वेळ ताज्या युद्धाने आणली. याचा सर्वात मोठा फायदा कोणास होत असेल तर तो हमास या संघटनेस. जगभरात या संघटनेच्या समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून अमेरिकी निष्क्रियता आणि इस्रायलची अमानुषता यांस रोखण्यासाठी ‘हमास’चे हात बळकट करण्यास पर्याय नाही अशी भावना परदेशस्थ पॅलेस्टिनींत जोर धरू लागली आहे. इंग्लंड, फ्रान्स, अन्य युरोपीय देश, अमेरिका आदी ठिकाणी पॅलेस्टिनी मोठ्या संख्येने विखुरलेले आहेत आणि त्यांच्यातील संघटन दृढ होऊ लागलेले आहे. लंडनसारख्या ठिकाणी तर मध्यवर्ती ‘पॅलेस्टिन हाऊस’मधील वाढत्या वर्दळीवर अलीकडेच स्थानिक माध्यमांनी विस्तृत वृत्तांत प्रसिद्ध केले. तेथून पॅलेस्टिनी नभोवाणी, माहिती केंद्र आदी ‘सेवा’ चालवल्या जातात. विविध संस्थांनी गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ठिकाणी जनमताचे कौल घेतले. त्या सर्व पाहण्यांत इस्रायलविरोधी भावना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढीस लागल्याचे दिसून येतेच; पण इस्रायलचा मुकाबला करण्यासाठी विद्यमान पॅलेस्टिनी प्रशासन आणि अध्यक्ष महमूद अब्बास हे किती नेभळट आहेत असे मत प्राधान्याने व्यक्त होताना दिसते. याच्या जोडीने शेजारील अनेक देशांत इस्लामी कट्टरपंथीयदेखील आपला पाया विस्तारताना दिसतात. जॉर्डनसारख्या देशात ताज्या निवडणुकांत ‘हमास’ची बंधु संघटना ‘इस्लामिक अॅक्शन फ्रंट’ला प्रचंड मताधिक्य मिळाले ही सद्या:स्थितीची परिणती.

हेही वाचा : अग्रलेख : जातीचा तुरुंग आणि तुरुंगातील जात!

म्हणजे जी भावना इस्रायल चिरडू पाहते तीच भावना अधिक प्रबळपणे त्याच देशाच्या आसपास मोठ्या जोमाने वाढत असल्याचे उघड होते. त्याच वेळी ‘हमास’चा प्रमुख याह्या सिन्वर हादेखील याच आत्मघाती विचारांचे अनुकरण करताना दिसतो. या सिन्वर यांस इस्रायल आपणास मारणार याची पूर्ण जाणीव आहे, इस्रायली फास आपल्या गळ्यापर्यंत आलेला आहे हे तो स्वत:च मान्य करतो, गेले काही आठवडे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाशिवाय तो जगत असून केवळ मानवी संदेशवहनाच्या आधारे त्याचे दळणवळण सुरू आहे. तरीही हा हिंसाचार कमी व्हावा असे त्यास वाटत नाही. हा हिंसाचार आसमंतात जितका अधिक पसरेल तितका इस्रायलवर अधिक दबाव येईल आणि जितका हा दबाव वाढेल तितके हमासवरील दडपण कमी होईल, असे तो मानतो. त्याचमुळे शस्त्रसंधी होऊच नये असा त्याचा प्रयत्न आहे आणि त्यात तो यशस्वी होताना दिसतो. यातील दु:खदायक वास्तव असे की हा शस्त्रसंधी हाणून पाडण्याच्या त्याच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका आहे ती इस्रायलचीच. उभयतांत शस्त्रसंधीची चर्चा करत होता ‘हमास’चा संस्थापक आणि राजकीय प्रमुख इस्माईल हनिया. या चर्चेत मध्यस्थ होता ओमान हा देश आणि अमेरिका. पण हमासच्या; या तुलनेने मवाळ आणि तडजोडवादी नेत्याला इस्रायलने अकारण ठार केले. तेही इराणमध्ये. म्हणजे त्यामुळे शस्त्रसंधीची होती नव्हती तीही संधी संपुष्टात आली आणि याह्या सिन्वर यांच्यासारख्याचे फावले.

आणि तरीही हे सर्व थांबवण्याची क्षमता असलेली अमेरिका दिशाहीन आणि नेतृत्व दिङ्मूढ! समर्थ सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या दुष्कृत्यांस अधिक जबाबदार असते आणि त्यामुळे हे सज्जन दुर्जनांपेक्षा अधिक दोषी असतात. आजचा दिवस हा या निष्क्रिय सज्जनांचा श्राद्धदिन.

Story img Loader