परग्रहांवरील जीवसृष्टी स्पष्टपणे नाकारणे अवघड असे अनेक शास्त्रज्ञ म्हणतात… पण ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी तसे म्हटल्याने चर्चा वाढली…

विज्ञानकथाकार आर्थर सी. क्लार्क यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे : ‘एक तर आपण (म्हणजे मानव जात) विश्वात एकटे आहोत किंवा नाही. दोन्ही शक्यता तितक्याच घाबरविणाऱ्या आहेत.’ एकटेपणाच्या याच भीतीतून पृथ्वीसारख्याच अन्य एखाद्या किंवा अनेक ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते का, हा प्रश्न जसा कथाकारांना गेली अनेक वर्षे पडत आला आहे. तसा तो वैज्ञानिकांच्या कुतूहलाचाही विषय आहेच. कथा-कादंबरीकाराला कल्पनेचे अनेक झोके घेता येत असल्याने, तो सहजपणे या झोक्यांवर हिंदोळे घेत या परजीवसृष्टीच्या कल्पनांच्या भराऱ्या मारू शकतो. वैज्ञानिकांना विज्ञानकथेमध्ये ही मुभा थोडीफार असते. पण एखाद्या वैज्ञानिकाने तसा ठाम दावा करणे आणि ‘त्याचे प्रत्यक्ष पुरावे नसले, तरी माझी सचेतन जाणीव यावर विश्वास ठेवते,’ असे म्हणणे धाडसाचे व पर्यायाने चर्चेचे ठरते. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनीच तसे, रणवीर अलाहाबादिया या प्रसिद्ध चर्चकाला दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते आणि त्यावरून परजीवसृष्टीच्या गूढाबद्दल कायमच असलेले आकर्षण पुन:पुन्हा उचंबळून वर येते आहे. याला अगदी अलीकडचे निमित्त घडले आहे, ते म्हणजे सोमनाथ यांनी ऑगस्ट महिन्यात दिलेल्या या सुमारे पावणेदोन तासांच्या मुलाखतीतील परजीवसृष्टीवरील साडेआठ मिनिटांच्या एका चित्रफितीचे सध्या सुरू असलेले सायबरविश्वातील मनसोक्त बागडणे. सोमनाथ यांनी प्रत्यक्षात जेव्हा ही मुलाखत दिली, तेव्हा याबाबत थोडीफार चर्चा झाली. पण, मुलाखतीतील नेमक्या परजीवसृष्टीबाबतच्या संभाषणाचा तेवढा तुकडा अलीकडे समाज माध्यमांत फिरवला गेला. मुलाखत घेणाऱ्या चर्चक रणवीरने चारच दिवसांपूर्वी ‘एक्स’ मंचावर हा तुकडा, ‘जागतिक पॉडकास्टविश्वाच्या भल्या मोठ्या जंजाळात ही एक फीत कधीही हरवू नये,’ असा संदेश लिहून पुन्हा एकदा टाकली. त्याची ‘बातमी’ झाली आणि परजीवसृष्टीवरची चर्चाही सुरू झाली.

Chandrababu Naidu and MK Stalin Push For More Kids
अग्रलेख : जनांचा प्रवाहो आटला…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
loksatta editorial on fake court set up in ahmedabad zws
अग्रलेख : भामटे आणि तोतये…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
India china agreement on patrolling along with lac in eastern Ladakh
अग्रलेख : सहमतीतील अर्थमती
steering committee approves maharashtras revised curriculum
अग्रलेख : आम्ही अडगेची राहू….

हेही वाचा :अग्रलेख : मुहूर्ताची मँडरिन मिठाई!

सोमनाथ जे म्हणाले, त्यावर चर्चा करण्यापूर्वी ते नेमके काय म्हणाले होते, हे आधी उद्धृत करणे गरजेचे. ‘परजीवसृष्टीचे तुम्हाला कुतूहल वाटते का?’ असा प्रश्न त्यांना विचारला गेला आणि त्यांनी ‘हो,’ म्हटल्यावर, ‘त्यातील कोणती बाब तुम्हाला अधिक भावते’, असा उपप्रश्न केला गेला. सोमनाथ यांनी यावर सविस्तर उत्तर दिले आहे. त्याचे थोडक्यात सार सांगायचे तर, त्यांच्या मते परजीवसृष्टीचे दोन प्रकार. आपल्यापेक्षा अतिशय प्रगत, हुशार किंवा आपल्यापेक्षा थोडी अप्रगत. आता पृथ्वीवरील मानवाच्या उत्क्रांतीचा विचार केला, तर आपला इतिहास काही लाख वर्षांचा आहे; पण विज्ञान-तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे गेल्या १०० वर्षांतील आहेत. अत्याधुनिक उपकरणे निर्माण करण्यापासून अवकाश मोहिमा करण्यापर्यंत आपण गेल्या शतकभरात प्रगती केली. आणि, याच दरम्यान परजीवसृष्टीची सर्वाधिक चर्चा होऊ लागली. यापैकी काही ग्रहांवरील जीवसृष्टी २०० वर्षे मागे, तर काही ठिकाणची हजारेक वर्षे पुढे असू शकते. यातील पुढे असलेली जीवसृष्टी कदाचित आपली ही प्रगती पाहात असेल आणि त्यांना आपण अगदी किड्यामुंग्यांप्रमाणे वाटत असू, कारण आपल्यापेक्षा पुढे असल्याने त्यांची तंत्रज्ञानात्मक प्रगती किती तरी पटींनी जास्त असेल, तर मागे असलेल्यांना याचा काही गंधही नसेल. उत्क्रांतीचे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे हे विविध टप्पे पाहिले, तर आपली जीवसृष्टी विश्वाच्या पसाऱ्याचा विचार करता, तशी अलीकडची आहे. त्यापूर्वी नक्कीच एखादी जीवसृष्टी अस्तित्वात आलेली असणार आणि ‘त्या जीवसृष्टीतील कुणी तरी पृथ्वीला भेटही दिलेली असू शकते,’ असे सोमनाथ यांचे म्हणणे. त्यांनी पुढे जाऊन ‘या जीवसृष्टीची रचना वेगळी असू शकते,’ असाही तर्क मांडला आहे. म्हणजे, पृथ्वीवरील मानवाची जी जनुकीय रचना आहे, त्यापेक्षा वेगळीच काही तरी रचना या जीवसृष्टीची असू शकेल. ऑक्सिजन हा आपल्यासाठी प्राणवायू आहे, दुसऱ्या जीवसृष्टीसाठी तो मिथेन असू शकतो, अशी काही कल्पित उदाहरणे त्यांनी त्यासाठी सांगितली आहेत.

आता खुद्द ‘इस्रो’च्या अध्यक्षांनी परजीवसृष्टीबाबतचा हा सिद्धान्त मांडलेला असल्याने आणि तो अलीकडे पुन्हा साथ पसरावी, तसा समाज माध्यमांतून फैलावल्याने त्यावर मतमतांतरे होणार हे ओघानेच आले. परग्रहांवरील जीवसृष्टीबाबत सोमनाथ जे म्हणाले, त्या आधी आणखी कुणी तसे प्रतिपादन केले नव्हते असे नाही. परग्रहावरील जीवांनी पृथ्वीला भेट दिल्याचा सनसनाटी दावा गेल्याच वर्षी अमेरिकेत संरक्षण विभागाच्या- ‘पेंटागॉन’च्या- अधिकाऱ्याने केला होता. अमेरिकेने हे दडवून ठेवल्याचेही तो म्हणाला, पण नंतर ‘पेंटागॉन’ने त्याचे म्हणणे खोटे असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘हार्वर्ड रिसर्च’नेही परजीवसृष्टीबाबत दावा करताना, त्यातील काही पृथ्वीवर राहात असल्याचे आणि आपल्या नकळत आपल्यात मिसळत असल्याचे म्हटले होते. थोडक्यात, ‘परग्रहावर जीवसृष्टी असल्याचे ठामपणे म्हणता येण्याजोगे पुरावे नाहीत, पण पुराव्यांची अनुपलब्धता म्हणजे परजीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या शक्यतेला नकार, असेही म्हणता येत नाही’ असे हे म्हणणे! त्याचे साधे कारण म्हणजे विश्वाच्या पसाऱ्यातील अनेकानेक आकाशगंगांमध्ये नेमके किती ग्रह आहेत, याचा अजून तितकासा अभ्यासच झालेला नाही. पृथ्वीची निर्मिती साधारण १३.८ अब्ज वर्षांपूर्वीची आहे, असे मानतात. आपण ज्या सौरमालेत आहोत, ती अनेकांतील एक आणि त्या प्रत्येकात अनेकानेक आकाशगंगा. या एवढ्या मोठ्या पसाऱ्यात तारे, ग्रह यांची गणती करणेच अशक्य. अशा वेळी अनेक ग्रह पृथ्वीपूर्वी अस्तित्वात आलेले नसतील, असे कसे म्हणणार, असा प्रश्न. त्यातून चंद्र आणि मंगळावरच्या मोहिमांत तेथे राहण्याजोगे वातावरण आहे का, पाण्याचे अस्तित्व आहे का, याचे शोध मानव घेतोच आहे. असे सगळे असेल, तर परजीवसृष्टी स्पष्टपणे नाकारणे अवघड होऊन जाते, असे बहुधा शास्त्रज्ञांना म्हणायचे असावे. म्हणून तर सोमनाथ यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, या परजीवसृष्टीची चर्चा ‘इस्रो’तीलही अनेक वैज्ञानिक अनौपचारिकपणे आपसांत करत असतात.

हेही वाचा : अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

कथा-कादंबऱ्या आणि चित्रपटांनी तर परजीवसृष्टीबाबतच्या कल्पनांचे अनेक इमले रचून मानवाच्या मनोरंजनाची कायमच सोय केली आहे. मनुष्यालाही रटाळ दैनंदिन जीवनातून सुटका हवी असताना परजीवसृष्टीसारख्या कल्पना त्याला स्वत:च्या ‘विश्वा’पलीकडे नेतात, हे त्यातील प्रमुख आकर्षण. परजीवसृष्टीचा पृथ्वीवरील हल्ला आणि त्यातून वाचण्याच्या मानवाच्या क्षमतेचे संघर्ष या नेहमीच्याच कथाबीजात मानवाचा विजय होऊन पृथ्वी वाचण्याची जी आशा असते, ती आश्वस्त करणारी असते. अलीकडच्या काळात पृथ्वीवर आश्वस्त करणाऱ्या घटनांची मारामारच असताना हे ‘मनोरंजन’ रोजच्या जगण्यातून सुटकेसारखेच. ‘इस्रो’च्या अध्यक्षांच्या मुलाखतीची ‘चित्रफीत’ अमाप कुतूहलाची का, याचे उत्तर यात मिळेल. यात फक्त एक फरक अधोरेखित करायला हवा. खगोलशास्त्रज्ञांना परग्रहावरील जीवसृष्टीचे कुतूहल स्वस्थ बसू देत नाही, हे खरेच. ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांनी ‘यक्षांची देणगी’ ही विज्ञानकथा लिहिली, त्यातही मानवी मेंदूवर आणि पर्यायाने विचारशक्तीवर ताबा मिळवू पाहणाऱ्या परग्रहावरील जीवांचा उल्लेख येतो. पण, नारळीकरांचे वेगळेपण असे, की या कथेच्या अखेरीस त्यांनी, ‘पृथ्वीचे महत्त्व ओळखून हे (परजीव) इथे आले आणि तिचा आपण मात्र दुरुपयोग करतोय, ’ असे वाक्य लिहिले आहे. पृथ्वीवरील मानवाच्या सद्य:स्थितीवर भाष्य करताना, ती जपून ठेवण्याचे महत्त्व ते जाता जाता अधोरेखित करतात. विज्ञानकथांच्या उद्दिष्टाबाबतही नारळीकरांनी म्हटले आहे, ‘विज्ञानाचा जागरूकपणे वापर करणे मानवाला अनिवार्य आहे आणि हा दृष्टिकोन सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम वैज्ञानिक, विचारवंतांचे आहे. त्यासाठी विज्ञानकथा या तंत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो.’ ‘इस्रो’च्या अध्यक्षांनीही परजीवसृष्टीचे अस्तित्व आहे, असे म्हणताना त्याला अशी ‘अस्वीकृती’ (डिस्क्लेमर) जोडली असती, तर ते अधिक बरे झाले असते, असे म्हणूनच वाटत राहते. ‘तारे’ तोडणे हे त्या अर्थाने जरा तर्कशुद्ध वाटले असते, इतकेच.