पॅलेस्टाईनमध्ये इस्रायली करत असलेल्या अमानुष हत्याकांडाचे कोणासही सोयरसुतक नाही. तथापि याचे गंभीर जागतिक परिणाम संभवतात..

इंग्रजीत ‘बुल इन चायना शॉप’ असा वाक्प्रचार आहे. कपबशा, काचेची भांडी इत्यादी असलेल्या दुकानात मस्तवाल बैल घुसल्यास काय होईल हे या वाक्प्रचारातून सूचित होते. गाझा परिसरात गेले महिनाभर इस्रायली फौजा जो हैदोस घालत आहेत तो पाहिल्यावर आणि मुख्यत: त्या फौजांचे सूत्रधार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे या काळातील वर्तन पाहिल्यावर या वाक्प्रचाराची आठवण होते. या इस्रायली ‘बैलास’ घुसण्याची संधी ‘हमास’ने दिली हे मान्य. ‘हमास’ने पहिला हल्ला केला त्यामुळे त्याचा प्रतिशोध घेण्याचे कारण इस्रायलला मिळाले हेही खरे. पण असा सूड उगवताना देशप्रमुखाने गावगुंडासारखे वागायचे नसते आणि तसे कोणाचे वर्तन होत असेल तर अन्य शहाण्यांनी हे बेभान सूडनाटय़ थांबवायचे असते, हे या सगळय़ांहून खरे. आज हमास आणि इस्रायल यांतील संघर्षांस एक महिना झाला. जवळपास दहा हजारांहून अधिक पॅलेस्टिनींनी या काळात इस्रायली प्रतिशोधात प्राण गमावले. त्यातील चार हजारांहून अधिक केवळ बालके आहेत. तितकेच या इस्रायली सूडहल्ल्यात जखमी आहेत आणि त्यांना उपचारही मिळू नयेत अशी नेतान्याहू यांची इच्छा आहे. एका लोकशाही देशाचे पंतप्रधानपद भूषविणारी व्यक्ती अब्रू गेल्यामुळे बेभान झालेल्या आणि त्यामुळे समोर येईल ते उद्ध्वस्त करणाऱ्या गावगुंडाच्या पातळीवर कशी उतरू शकते हे यातून दिसते. उच्च सांस्कृतिक परंपरा, उदात्त इतिहास, बौद्धिकतेचा वारसा इत्यादी इत्यादी सांगणाऱ्या देशाचे नेतृत्व किती आदिम आहे हे या गेल्या महिन्याभरात दिसून आले. सारे जग आणि जगातील संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटना हताश होऊन हा मानवी विध्वंस पाहात असताना इस्रायली ‘शौर्याचा’ मासिक आढावा यानिमित्ताने घ्यायला हवा.

firing incident Gurudwara area ​​Nanded morning gate
नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले, एकाचा मृत्यू, गुरुद्वारा गेट क्र.६ भागातील घटना
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
insurance policy latest news
विमा कवच घेताय…मग हे महत्त्वाचे!
Congo
Congo Mass Murder : ‘काँगो’मध्ये बंडखोरांच्या हल्ल्यानंतर भीषण नरसंहार! तुरूंगातील शेकडो महिलांवर बलात्कार करून जिवंत जाळलं
Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
Woman murdered in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी

हेही वाचा >>> अग्रलेख : भूक निर्देशांक सत्य?

जे मुळात आपले नव्हते; ते ज्यांचे होते त्यांच्याकडून हिसकावून घेतल्यानंतर मूळ मालकांस कसे हुसकावून लावायचे आणि वर आपल्या मालकीचा कांगावा कसा करायचा हे इस्रायलच्या वर्तनातून या गेल्या महिनाभरात पुन्हा दिसून आले. पण असे झाल्यानंतरही पंच म्हणून ज्यांची जबाबदारी होती तेदेखील या गंभीर वास्तवाकडे कसा काणाडोळा करतात हेही यातून कळून आले. हा यातील अधिक दु:खदायक भाग. म्हणजे या महिनाभराच्या हिंसाचारात पॅलेस्टिनींविषयी अधिक वाईट वाटून घ्यावे असे काही नाही. मेलेले कोंबडे आगीस भीत नाही त्याप्रमाणे पॅलेस्टिनींचे झालेले आहे. डोळय़ादेखत घरातली चिल्लीपिल्ली किडामुंगीसारखी मारली जातात आणि मागे उरलेल्या आई-बापांस आपल्या अपत्यांची कलेवरे घेऊन अंतिम मुक्तीसाठीदेखील जागा सापडत नाही, असे पॅलेस्टिनींचे वास्तव. पॅलेस्टिनी भूमीत ना खनिज तेल निघते ना त्या देशाच्या फाटक्या भूमीत काही मौल्यवान खनिज साठे आहेत. असे काही असले की राजवट कितीही अत्याचारी असली तरी तिकडे दुर्लक्ष केले जाते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया. तितके भाग्य पॅलेस्टिनींच्या नशिबी नाही. त्यामुळे त्यांच्या जगण्याची गरज जशी कोणास नाही तशी त्यांच्या मरणाची किंमतही कोणास नाही. उपयुक्तता आणि उपद्रवक्षमता दोन्ही नसलेल्यांस वैयक्तिक आयुष्यात चेपणे इतरांसाठी नेहमीच सोपे आणि सोयीचे असते. पश्चिम आशियाच्या वाळवंटातील येमेन, पॅलेस्टाईन आदी प्रांतांच्या नशिबी सामर्थ्यवान आणि जगासाठी उपयुक्त शेजाऱ्याकडून मार खात राहणे आहे. त्यामुळे येमेनवर लगतच्या सौदी अरेबियाकडून सुरू असलेल्या अत्याचारांची गंधवार्ताही कोणास नाही आणि पॅलेस्टाईनमध्ये इस्रायली करत असलेल्या अमानुष हत्याकांडाचे कोणासही सोयरसुतक नाही. तथापि याचे गंभीर जागतिक परिणाम संभवतात.

उदाहरणार्थ पॅलेस्टिनी संहार थांबवण्यात अमेरिकेस रस नसेल तर उद्या चीनने याच पद्धतीने तैवान वा अन्य शेजारी प्रांतांचा घास घेण्याचा प्रयत्न केला तर तेव्हाही अमेरिकेस बघ्याची भूमिका घ्यावी लागेल. यात फरक इतकाच की पॅलेस्टिनमध्ये हस्तक्षेप करण्याची इच्छा अमेरिकेस नाही. पण तैवानबाबत अशी काही वेळ आल्यास हस्तक्षेप करण्याचे सामर्थ्यच अमेरिकेस असणार नाही. आताही युक्रेन-रशिया युद्धात रशियाचे पुतिन अमेरिकेस एक पैचीही किंमत देताना दिसत नाहीत. अमेरिका आणि अमेरिका-केंद्री पाश्चात्त्य देश पुतिन यांच्या नावे फक्त गळा काढतात. त्यास कोणी विचारत नाही. त्यातही आपले आर्थिक हित सांभाळण्याची व्यापारी वृत्ती अमेरिका दाखवून देते. पण तैवान-चीन असा काही संघर्ष झाल्यास अमेरिकेस तेवढेही काही करता येणार नाही. पॅलेस्टिनी संघर्षांत सूड-भावना शांत झाल्यावर इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांना आवरण्याची हिंमत आणि शहाणपणा अमेरिकेने दाखवायला हवा होता. ते अमेरिकेचे कर्तव्य होते. पण या महासत्तेचे प्रमुख अध्यक्ष जो बायडेन अगदीच नेभळट निघाले. त्यांच्याच पक्षाचे, त्यांचे पूर्वसुरी माजी अध्यक्ष बराक ओबामा हे इस्रायलप्रकरणी ठाम भूमिका घेत असताना हे बायडेनबाबा पुटपुटण्यापलीकडे काही करताना दिसत नाहीत. इतके दिवस जागतिक राजकारणात, संघर्षांत काहीएक मूल्य पाळणाऱ्या अमेरिकेचा दरारा होता. तो आधी विदूषकी विकृत डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि नंतर बुळबुळीत बायडेन यांनी पार घालवून टाकला. म्हणजे नेतान्याहू यांनी आपल्यातील बेमुर्वतखोरपणाचे प्रदर्शन करत हजारो पॅलेस्टिनींचे प्राण घेतले; पण त्याच वेळी त्यांनी आपल्या कृत्यांनी बायडेनबाबांची अब्रूही घेतली.

हेही वाचा >>> अग्रलेख :‘वर’चे वर!

आज केवळ अमेरिकेतच नव्हे तर युरोपातील अनेक देशांत इस्रायलला आवर घालण्याची मागणी मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली आहे. अगदी आयर्लंडसारख्या एरवी चर्चेतही नसलेल्या देशातसुद्धा पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ मोर्चे निघू लागले आहेत. खुद्द इस्रायलमध्येही लाखालाखांची निदर्शने पॅलेस्टिनींसाठी घडली. आपले पंतप्रधान पॅलेस्टिनींचे शिरकाण थांबवत नाहीत यामागे आपल्या सुरक्षेपेक्षाही त्यास स्वत:वरील भ्रष्टाचाराचे खटले आणि त्यातून येणारी राजकीय अस्थिरता याची काळजी अधिक आहे हे कळण्याइतका सुज्ञपणा इस्रायली जनतेत आहे. म्हणूनच इस्रायली फौजा इतके ‘शौर्य’ दाखवत असल्या तरी नेतान्याहू यांची लोकप्रियता जराही वाढलेली नाही. ‘हारेट्झ’सारखी वर्तमानपत्रे, युआल नोआ हरारीसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान याही काळात इस्रायली सरकारच्या धोरणांची पिसे काढण्यात हयगय करीत नाहीत. उगाच देशप्रेम, राष्ट्रवाद अशी कारणे पुढे करीत दांडगाई करणाऱ्या आपल्या पंतप्रधानावर सर्वसामान्य इस्रायली भाळून जाताना दिसत नाहीत; हा एका अर्थी इस्रायली समाजाचा मोठेपणा. हे युद्ध जितके होईल तितके लांबवण्यात देशाचे हित असेल/ नसेल पण आपल्या पंतप्रधानाचे हित आहे हे त्या देशातील जनता जाणते ही बाब खरेच कौतुकास्पद. त्याच वेळी इस्रायलच्या तारणहार अमेरिकेतही अध्यक्ष बायडेन यांच्या याबाबतच्या निष्क्रिय आणि निष्प्रभ नेतृत्वावर संताप व्यक्त होतो, हेही तितकेच कौतुकास्पद. एके काळी आपल्या अध्यक्षाच्या शब्दाबाहेर नसणारे इस्रायली नेतृत्व आता आपल्या अध्यक्षास जराही भीक घालत नाही, उलट त्यांचा अपमानच करते ही बाब अमेरिकनांसही जाणवू लागलेली आहे. अत्याचारी इस्रायलला रोखणे राहिले दूर, उलट आपले अध्यक्ष त्या देशाच्या मागे फरपटत जात हवा तितका निधी त्या देशास पुरवण्याची भूमिका घेतात याचा परिणाम बायडेन यांच्या लोकप्रियतेवर होणारच होणार. आज कधी नव्हे ते न्यू यॉर्कसारख्या प्रांतात रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प हे लोकप्रियतेत बायडेन यांच्यावर आघाडी घेतात हे अमेरिकेच्या इस्रायल धोरणाचे फळ. अध्यक्षीय निवडणुकीस जेमतेम एक वर्ष राहिले आहे. हा लोकप्रियतेचा कल असाच राहिला तर बायडेन यांचे काही खरे नाही. ‘बिबी’ या टोपणनावाने ओळखले जाणारे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे आपल्याबरोबर बायडेनबाबांसही बुडवतील; हे निश्चित.

Story img Loader