जे सर्वांत आधी व्हायला हवे, ते सर्वांत शेवटी अगदी गळ्याशी आल्यानंतर करणे हे आपल्या व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण महानगरातील हवा बिघडल्यानंतरच्या उपायांतूनही दिसते…
रोजच्या जगण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि धडपणे, घरापर्यंत पोहोचण्याची चिंता मुंबईकरांच्या पाचवीला पुजली आहे. चाकावरचे जीवन जगताना केवळ जिवंत असण्याचे समाधान सांभाळत रोजचा दिवस ढकलणाऱ्या मुंबईकरांना साधा श्वासही नीट घेता येईनासा होणे हा संकटाचा कळस. गेले काही दिवस हवेच्या प्रदूषणाने क्षतिग्रस्त झालेले मुंबई परिसरातील रहिवासी समस्येला तोंड देत आहेत आणि सरकार-प्रशासन त्यावर काही तरी थातूरमातूर उपाययोजनेची मलमपट्टी करण्यात दंग आहे. हवा शुद्ध करण्यासाठी कुठे फवारणी कर, नागरिकांना मुखपट्टी लावण्याचे आदेश काढ, कचरा उघड्यावर जाळल्यास शिक्षेची धमकी दे… यांसारख्या उपायांनी कोंडलेला श्वास मोकळा होण्यास कितीशी मदत होणार? दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाच्या बातम्या गेली काही वर्षे वाचत असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना हे संकट आपल्या दारातून आत आल्याची आता जाणीव झाली आहे. दिल्लीपेक्षाही अधिक प्रदूषण मुंबई शहर आणि परिसरात होत असल्याच्या बातम्या त्यामुळे जीव घाबरवून सोडणाऱ्या ठरतात. तरीही जगण्याचे उसने बळ गोळा करून रोज सकाळी पुन्हा जगण्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे ‘मुंबई स्पिरिट’ दाखवण्याखेरीज पर्यायच उरत नाही. देशाची राजकीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई ही दोन अतिशय महत्त्वाची शहरे प्रदूषणग्रस्त होण्यामागे नियोजन, नियमन आणि अंमलबजावणीचा अभाव हीच कारणे आहेत.
हेही वाचा >>> अग्रलेख : ‘खेळ’ खल्लास…
शहरे अस्ताव्यस्त वाढू देताना भविष्यातील धोक्यांचा जराही विचार न करण्याची नियोजनशून्यता हे अशा संकटाचे आद्या कारण. हवेच्या प्रदूषणाबाबत मुंबई दिल्लीच्याही पुढे गेली असली, तरीही या दोन शहरांतील त्यामागील कारणे वेगवेगळी आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा समावेश होतो. आता वेगळ्या कारणांमुळे का होईना, परंतु मुंबईचाही त्यात समावेश होऊ शकतो. उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंच्या बदलांच्या काळात हे प्रदूषण वाढते. दिल्लीला लागून असलेली पंजाब, हरियाणा आणि अन्य राज्यांतील शेतकरी नेमक्या याच काळात शेतातील पेंढा जाळतात. त्याचा धूर थेट दिल्लीपर्यंत पोहोचतो आणि त्याने प्रदूषण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचते. मुंबईला समुद्रकिनारा हे हवा शुद्धीकरणाचे आजवरचे मुख्य साधन ठरले होते. शहरातील हवा वेगवान वाऱ्यासारखी समुद्राच्या दिशेने वाहते, तेव्हा आपोआप हवेतील धूलिकण शहराबाहेर पडतात. गेल्या काही दिवसांत मुंबईला वाऱ्यानेही दगा दिला, त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक अतिवाईट या अवस्थेप्रत पोहोचला. महानगरात येऊन, नोकरी-व्यवसाय करून गावाकडच्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्यांना शहराबद्दल आपुलकी वाटावी, अशी आजची स्थिती नाही. पर्याय आणि इलाजच नाही, म्हणून या शहरात येणाऱ्यांना या प्रदूषणामुळे आगीतून फुफाट्यात पोहोचल्याची जाणीव झाल्यावाचून राहात नाही. उद्याोगांचे प्रचंड जाळे, त्यामुळे बांधकामाचा अतिरिक्त वेग, त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वांत कमी मायक्रॉनचे धूलिकण, त्याला वाळू, लाकूड, लोखंड यांच्या वापरातून निर्माण होणाऱ्या कणांची मदत, अतिवेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वर्षागणिक वाहनांच्या संख्येत होणारी वाढ, घरांची उपलब्धता वाढवण्यासाठी बेसुमार वृक्षतोड, कचरा, राडारोडा ही सगळ्याच महानगरांपुढील जटिल समस्या. मुंबईसारख्या शहरात तर ती अधिकच कठीण. शहराच्या सर्व क्षमतांच्या मर्यादा ओलांडून पुढे गेलेल्या या शहराला अजूनही विश्रांती मिळण्याची शक्यता नाही. परिसरातील नगरे-उपनगरेही आता महानगरांच्या दिशेने वाटचाल करू लागल्याने, या शहराला येत्या काही दशकांत प्रदूषणाबरोबरच अन्यही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मोकळ्या जागा ही शहरांची फुप्फुसे असतात. हवा खेळती राहण्यासाठी त्यांची आवश्यकता असते. गेल्या काही वर्षांत अशा अनेक मोकळ्या जागा बिल्डरांनी गिळंकृत केल्या. उंच इमारतींमधील वरच्या मजल्यांवर तरी स्वच्छ हवा मिळेल, अशी अपेक्षा करणाऱ्यांना लागून उभ्या राहणाऱ्या नव्या उंच इमारतींमुळे अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागते.
हेही वाचा >>> अग्रलेख: बाबू ते बाबूराव!
भारतात शहरे नियोजनबद्ध रीतीने वसवण्याची पद्धत रुळलीच नाही. शहरे वाढत जातात, तसतशा त्यासाठीच्या सोयींच्या व्यवस्था उभ्या राहतात. त्यामुळे भविष्याचा अंदाज घेऊन, शहरांमधील मूलभूत सोयीसुविधांचा विचारच होत नाही. रस्ते अरुंद राहतात, वाहनांची संख्या वाढते, परंतु इमारतींमध्ये त्यांना सुरक्षित जागा मिळत नाही. परिणामी ती रस्त्यावरच उभी करणे भाग पडते, त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर कोंडी होते. इमारतींचे बांधकाम सुरू असताना, निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या, आकारांच्या धूलिकणांना हवेत मिसळू न देण्यासाठी जागेवरच पाण्याची फवारणी करण्याची व्यवस्था नसते. तसा नियमच नसतो, त्यामुळे शहरात धुरके तयार होते आणि सारे शहरच वेठीला धरले जाते. हवेची गुणवत्ता ढासळू लागल्यानंतर उशिरा जाग आल्यासारखी नियमांची आखणी होते आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला जातो. जे सर्वांत आधी व्हायला हवे, ते सर्वांत शेवटी अगदी गळ्याशी, नाकातोंडाशी आल्यानंतर करणे हे भारतीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण. सत्ताधाऱ्यांना या प्रश्नांची तीव्रता लक्षात येत नाही आणि त्यांच्या मागे मागे करणाऱ्या प्रशासन यंत्रणेला जाग येत नाही. आग लागल्यावर पाण्याचा स्राोत शोधत बसण्यासारखा हा खेळ गेली अनेक दशके सुरू आहे. बिल्डर, प्रशासन आणि राजकीय नेते यांचे त्रिकूट अशा प्रश्नांना खिजगणतीतही मोजत नसल्याने रस्त्यावर चालावेच लागणाऱ्या, जगणे एवढेच ध्येय असलेल्या सामान्यांच्या जगण्यात प्रश्नचिन्हांचा आकार फक्त रोजच्या रोज मोठा होत जातो. त्यांची उत्तरे शोधण्याएवढीही उसंत नसलेल्यांना कसेही करून जिवंत राहायचे एवढेच कळत असते. त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याच्या बाता हे फक्त मृगजळ. हवेच्या प्रदूषणाचे हे लोण आता राज्याच्या अन्य मोठ्या शहरांमध्येही पसरू लागले आहे. उद्याोगनगरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील हवाही चिंताजनक झाल्याचे दिसत आहे. नव्याने वाढत असलेल्या अन्य शहरांमध्ये येत्या काही वर्षांत हीच स्थिती उद्भवली, तर आश्चर्य वाटायला नको. प्रदूषणाचा हा प्रश्न यंदाच्याच वर्षी निर्माण झाला, असेही नाही. मागील वर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात हवा प्रदूषणाने सलग काही काळ विळखा घातला होता. गेल्या काही वर्षांत शहराच्या हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. अशा प्रदूषणाची आणि त्याच्याशी लढण्याची आता मुंबईला सवय झाली आहे, असे सांगत समस्त नागरिकांचा होणारा अपमान जिव्हारी लागणारा आहे. अशा हवेत सुखाने राहण्याची सुतराम शक्यता नसताना, आपला जीव धोक्यात घालून कोण या शहरात राहण्याची इच्छा बाळगेल? तरीही सर्वाधिक सहनशक्ती असणारे हे शहर. इथे बॉम्बस्फोट आणि दंगली घडवल्या जातात, रेल्वेच्या डब्यात रोजच चेंगराचेंगरी होते, अशाच चेंगराचेंगरीने रेल्वे स्थानकातील पादचारी पूलही कोसळतात… कोसळले नाहीत तरी निव्वळ पूल पडल्याच्या अफवेने चेंगराचेंगरी होते, रस्त्यावरील गटारांची झाकणे उघडी ठेवल्याने काहींचा त्यात पडून हकनाक मृत्यू होतो, जगण्याला चिंचोक्याची किंमत मिळते आणि या शहराचे नागरिक असण्याचा अभिमानही गळून पडतो. प्रचंड मोठ्या स्वप्नांना बळ देणारे हे अद्भुतरम्य शहर, केवळ नियोजनशून्यता, नियमांचा अभाव आणि अंमलबजावणीकडे दुर्लक्ष यांसारख्या दोषांना बळी पडून हवेच्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकणे, हे नागरिक या घटकालाच हवेच्या हवाल्यावर सोडून दिल्याचे लक्षण आहे.