११.४ टक्के भारतीयांना मधुमेह झाला आहे तर स्थूलतेचा विकार २८.३ टक्क्यांना… या आकडेवारीमागे आणखी ५० टक्के आहेत…

रोग नाही म्हणजे आरोग्य असे सहसा भारतीय लोक मानतात. त्यावर शिक्कामोर्तब केले आहे ते नुकत्याच आलेल्या ‘द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’च्या ताज्या अहवालाने. या अहवालानुसार शारीरिक पातळीवर सक्रिय नसलेल्या म्हणजेच आरोग्य राखण्यासाठी नियमित कोणताही व्यायाम न करणाऱ्या १८ वर्षांवरील प्रौढ भारतीयांची संख्या ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यात स्त्रियांचे प्रमाण ५७ टक्के तर पुरुषांचे प्रमाण ४२ टक्के आहे. या आकडेवारीच्याच भाषेत बोलायचे तर भारतातील निम्मे प्रौढ लोक व्यायामबियाम करणे फारसे आवश्यक मानत नाहीत. या अहवालानुसार शारीरिक पातळीवर नागरिक फारसे सक्रिय नाहीत, अशा जगातल्या १९५ देशांमध्ये भारताचा क्रमांक १२ वा आहे. भारतासह सगळ्याच आशिया पॅसिफिक आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये ही परिस्थिती आहे. पण त्यातही भारतात ती गंभीर मानण्याचे कारण म्हणजे आपली लोकसंख्या. ५० टक्के प्रौढ लोकसंख्या शारीरिक पातळीवर तंदुरुस्ती राखणे आवश्यक मानत नसेल, त्या दृष्टीने आवश्यक त्या गोष्टी करत नसेल, तर स्थूलत्व, मधुमेह, हृदयविकार हे जीवनशैलीच्या परिणामी होणारे आजार लाल गालिचा अंथरून उभेच असणार. हे आणि असे आजार, त्यांच्यामुळे कमी होणारी शारीरिक क्षमता, मनुष्यबळावर त्याचा होणारा परिणाम, जीवितहानी, औषधोपचारांवर होणारा खर्च हे सगळे पाहिले तर स्वत:च्या तंदुरुस्तीसाठी रोजच्या २४ तासांमधली किमान ४५ मिनिटेही बाजूला न काढणे हे आपल्याच नाही तर देशाच्या दृष्टीनेही घातक ठरते.

‘लॅन्सेट’च्या या अहवालातून पुढे आलेल्या या आकडेवारीकडे आपण डोळे उघडून पाहायला तयार आहोत का हा प्रश्न आहे. कारण असे की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जसजशी प्रगती होते आहे, तसतसे मानवी जीवन अधिक सुखकर, आरामदायी होते आहे. पण त्याचबरोबर आपली शारीरिक सक्रियता कमी होत जाताना दिसते आहे. या अहवालानुसार जागतिक पातळीवर ३१.३ टक्के प्रौढ लोकसंख्या शारीरिक सक्रियता राखत नाही. हे प्रमाण २०१० मध्ये २६.४ होते. १४ वर्षात हे प्रमाण पाच टक्के वाढले आहे. हे प्रमाण साधारणपणे १५ टक्के किंवा त्याहून कमी असायला हवे असे जागतिक आरोग्य संघटनेने गृहीत धरले आहे. पण हे प्रमाण त्यापेक्षा खूपच अधिक आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे, हे जास्त गंभीर आहे. भारतापुरते सांगायचे तर २०१० मध्ये भारतात हे प्रमाण ३४ टक्के होते. आता ते ४० टक्क्यांच्या वर गेले आहे.

हेही वाचा >>> अग्रलेख: ‘महा’पणास आव्हान!

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार कोणत्याही निरोगी व्यक्तीने आठवड्याला ३०० मिनिटे एवढा शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. तरच ती व्यक्ती मधुमेह, स्थूलपणा, हृदयरोग अशा आजारांना लांब ठेवू शकते. २०२३ मधल्या आकडेवारीनुसार भारतात मधुमेहींची संख्या किमान ११.४ टक्के आहे. ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता (प्रीडायबेटिक) आहे, त्यांची संख्या १५.३ टक्के आहे. तर जवळपास २८.६ टक्के भारतीय स्थूलपणा या विकाराला बळी पडतात. ही आकडेवारी चिंताजनक आहेच, पण त्याहूनही जास्त गंभीर आहे, ते असे आजार टाळण्याचा मार्ग वापरण्याबद्दल अजिबातच गांभीर्य नसणे. हे सगळे जीवनशैलीचे आजार म्हटले जातात. ज्यांच्या जगण्यात शारीरिक हालचालींना फारसे प्राधान्य नसते, ज्यांची बैठी जीवनशैली असते, त्यांना ते सहसा होतात. अर्थात त्याला ते एकटेच कारणीभूत नाहीत. गेली काही दशके वाढत असलेल्या शहरीकरणाने, अत्याधुनिक होत चाललेल्या जीवनमानाने रोजचे जगणे कमालीचे बदलत चालले आहे. अगदी ५० वर्षांपूर्वी ‘अमुक साबण ज्याचे घरी, आरोग्य तेथे वास करी’ ही जाहिरात खरीच वाटे, ती तोच साबण तेव्हा घरोघरी असायचा म्हणून नव्हे! पाचेक दशकांपूर्वी ज्या गोष्टींसाठी किमान शारीरिक हालचाली उत्साहाने होत असत, त्याही आता कराव्या लागत नाहीत. कुठेही जायचे असेल तर घरापासून बस स्टॉप किंवा रिक्षा स्टॅण्डपर्यंत चालण्याचीही गरज नाही. मोबाइलचे एक बटण दाबले की तुम्ही असाल तिथे एखादे वाहन येऊन उभे राहते. खरेदी करायची तरी मोबाइलवरून हवी ती वस्तू, खाद्यापदार्थ तुमच्या दारात येतात. एवढेच नाही तर काही काही कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची मुभा देऊन टाकली आहे. त्यामुळे एकीकडे जगण्यातील काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत तर काही गोष्टी कठीण. जगण्याची, उभे राहण्याची, टिकून राहण्याची, इतरांच्या पुढे जाण्याची, अधिक वेगाने पुढे जाण्याची जीवघेणी स्पर्धा अपवाद वगळता कुणालाच टाळता येत नाही. या स्पर्धेसाठी मोडणाऱ्या वेळाव्यतिरिक्त सारे क्षण आरामाचे मानणे, वेगवेगळ्या अपरिहार्य वाटणाऱ्या कारणांमुळे आहारशैलीत झालेला बदल, कधी गरज तर कधी चैन म्हणून, तर कधी फॅशन म्हणून सातत्याने बाहेरचे निकस अन्न (जंक फूड) खाणे, दूरचित्रवाहिनी तसेच ओटीटी माध्यमांच्या भरताणामुळे झोपेचे खोबरे, आर्थिक-सामाजिक पातळीवरची असुरक्षितता, वाढत चाललेले शारीरिक तसेच डिप्रेशनसारखे मानसिक आजार हे सगळे आज शहरी-निमशहरी समाजाचे वास्तव आहे. या सगळ्यामध्ये व्यायामासाठी, शारीरिक हालचालींसाठी वेळ कुठून आणायचा हा प्रश्न संबंधितांकडून तज्ज्ञांना नेहमीच विचारला जातो.

हेही वाचा >>> अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!

तो रास्त असला तरी कोणत्याच प्रश्नावर मार्ग निघू शकत नाही असे कधीच होत नाही. त्याची पहिली पायरी म्हणजे जगणे हे असेच असणार आहे, हे सगळ्यात आधी मान्य करणे. आणि मग आजारी पडल्यावर उपचारांमागे धावण्यापेक्षा आपण आजारी पडूच नये यासाठी मुळात प्रयत्न करणे. लोकमान्य टिळकांच्या बाबतीत असे सांगितले जाते की त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात ते सतत आजारी पडत. आपल्याला जे करायचे आहे, त्यासाठी असे सतत आजारी पडणे उपयोगाचे नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी सरळ एका वर्षाची सुट्टी घेतली आणि ‘शरीरमाद्यां खलु धर्मसाधनम्’ असे म्हणत वर्षभर नेटाने शरीर कमावले. ठरवून शरीर कमावणे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा. त्यासाठी आयुष्यातले एक वर्ष देण्यापेक्षा आजच्या काळात रोजची ३० ते ४५ मिनिटे देणे केव्हाही श्रेयस्कर. अनेक लहान लहान कामे आपली आपण करणे, जिथे पोहोचायचे आहे तिथपासून पाचदहा मिनिटे आधीच वाहन सोडून उतरणे, कार्यालयांत दर तासाभराने उठून छोटीशी चक्कर मारणे, खुर्चीत बसल्या बसल्या करायचे व्यायाम अशा शक्यतेच्या कोटीमधल्या अनेक गोष्टी तज्ज्ञांकडून सुचवल्या जातात. घरी खाद्यापदार्थ करणे शक्य नाही म्हणून आम्ही बाहेर खातो आणि त्यातही जंक फूड सहज उपलब्ध असते म्हणून खातो असे म्हणणाऱ्यांना आहारतज्ज्ञांकडून अनेक मार्ग सुचवले जातात. प्रश्न आपल्या इच्छाशक्तीचा असतो. रोज नियमित व्यायाम करायला हवा, आहार सकस हवा, नियंत्रणात हवा ही जागरूकता ज्यांच्यामध्ये आहे, त्यांचे प्रमाण अत्यंत कमी म्हणता येईल असे आहे. एरवी एक्झरसाईज आणि एक्झर्शन यातला फरक न समजणारेच जास्त. व्यायाम व्हावा म्हणून मी घरात मदतनीस ठेवत नाही, सगळी कामे माझी मीच करते असे म्हणणाऱ्या स्त्रियांनी तर तो समजून घेणे तर अधिक गरजेचे आहे. लहान मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी जसे सतत टोकले जाते, तसेच त्यांनी हातातल्या मोबाइलमध्ये गेम खेळण्यापेक्षा मोकळ्या हवेत मनमुक्त खेळावे यासाठी टोकणे जास्त गरजेचे आहे. खेळून दमल्यावर समोर ताटात येईल ते सगळेच रुचकर लागते. ते चवीने खाल्ल्यावर येणारी झोप सुखद असते, हे सांगायला कोणत्याच संस्थेच्या अहवालाची गरज नाही. तो ज्याचा त्याने घ्यायचा अनुभव आहे.