केंद्रीय मंत्रिमंडळातील १५ मंत्री पुढल्या पिढीतले आणि ज्या पक्षांशी भाजपने घरोबा केला आहे वा होता त्यापैकीही अनेक पक्ष एका कुटुंबाहाती; हे वास्तव…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय राजकीय परिप्रेक्ष्यातून काही काही विषय कायमचे बाद करण्याची गरज आहे. त्यातील एक म्हणजे भ्रष्टाचार. हा मुद्दा केवळ सभासंमेलनांपुरता मांडला जातो आणि प्रत्यक्ष भ्रष्ट कृतींचे प्रमाण कमी होण्याबाबत त्यातून काडीचाही फरक पडत नाही. त्यात अलीकडे एक नवीनच प्रथा सुरू झालेली दिसते. विरोधकांतील भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या पंगतीत येऊन बसला की त्याचे रूपांतर पुण्यात्म्यात होते आणि माध्यमांसह संबंधित राजकारणी या व्यक्तीच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यास आनंदाने बगल देतात. या निवडणुकीत या नवीन गुणधर्माचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले. म्हणजे ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होऊन काही दिवस उलटायच्या आत साक्षात पंतप्रधानांनी ज्यांच्यावर आरोप केला ते अजितदादा पवार पंतप्रधानांच्या पक्षात मोक्याच्या जागी येऊन बसले. अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, कृपाशंकर सिंह आदी नामांकित व्यक्तिमत्त्वे सदाचारी, नैतिकवादी भाजपच्या दृष्टीने आधी भ्रष्ट होती. या सर्वांवरून भ्रष्टाचाराचे बालंट कायमचे दूर व्हावे या उदात्त हेतूनेच बहुधा भाजपने त्यांना गळामिठीत घेतले असणार. भारतास भ्रष्टाचारमुक्त करणे म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांस स्वपक्षात घेऊन त्यांस त्या आरोपांपासून मुक्त करणे असा त्याचा अर्थ भाजपस अभिप्रेत असल्याचे समग्र भारतवर्षास एव्हाना लक्षात आले असणार. सबब यापुढे भ्रष्टाचार या विषयास निवडणूक वा राजकीय आरोप-प्रत्यारोपांतून वगळणे आवश्यक. उगाच क्षुल्लक मुद्द्यावर वेळ घालवण्यात काय हशील! तसेच भ्रष्टाचारापाठोपाठ कायमची फुली मारून टाकणे आवश्यक असा विषय म्हणजे राजकारणातील घराणेशाही. भ्रष्टाचाराइतकाच हा विषयही केंद्रीय सत्ताधारी भाजपच्या अत्यंत जिव्हाळ्याचा. या मुद्द्यावर जितकी पोटतिडीक भाजपने आतापर्यंत दाखवलेली आहे तितकी घराणेशून्यांसही कधी आतापर्यंत दाखवता आली नसेल. परंतु कालौघात भ्रष्टाचार या मुद्द्याप्रमाणे घराणेशाही हा विषयही राजकारणाच्या विषयपत्रिकेवरून कायमचा कटाप व्हायला हवा.

हेही वाचा >>> अग्रलेख : उपयोगशून्यांची उपेक्षा!

याचे कारण नुकत्याच स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात एखाददुसरा, वा तिसरा नव्हे तर तब्बल किमान १५ मंत्री हे ‘राज’घराण्यातील आहेत. ही यादी पाहा. पीयूष गोयल, एच. डी. कुमारस्वामी, रामनाथ ठाकूर, जयंत चौधरी, चिराग पासवान, राव इंदरजित सिंग, किरण राम मोहन नायडू, धर्मेंद्र प्रधान, अनुप्रिया पटेल, रक्षा खडसे, कमलेश पासवान, शंतनू ठाकूर, किरेन रिजीजू आदी किती उदाहरणे द्यावीत! जोडीला तूर्त भाजपवासी असलेले ज्योतिरादित्य शिंदे आणि जतीन प्रसाद वगैरे मूळ काँग्रेसी घराणेवाले आहेतच. याचा अर्थ या सर्वांचे वैयक्तिक कर्तृत्व काहीच नाही, असा अजिबात नाही. पण इतरांच्या तुलनेत वाडवडिलांमुळे या मान्यवरांस आपले कथित कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी तुलनेने सहज आणि लवकरही मिळाली. भाजपचे शीर्षस्थ नेते नेहमी स्वकर्तृत्व, सामान्य पार्श्वभूमीमुळे पूर्वार्धात करावा लागलेला संघर्ष इत्यादी इत्यादी मुद्दे भावनेचे कढ काढत सांगत असतात. पण कॅबिनेट मंत्र्यांतील जवळपास निम्मे मंत्री पूर्वसुरींमुळे या स्थानी आहेत. हे झाले विद्यामान कॅबिनेट मंत्र्यांचे वास्तव. त्याखेरीज राजनाथ सिंग यांच्या सुपुत्राचे लोकप्रतिनिधी असणे वा वरिष्ठ नोकरशहापुत्रास मोक्याच्या मतदारसंघात स्थान मिळणे किंवा समग्र भारतवर्ष ज्याच्या क्रिकेट- व्यवस्थापननैपुण्याने अचंबित झाला त्या व्यक्तीने साक्षात गृहमंत्र्यांच्याच पोटी जन्म घेतलेला असणे इत्यादी घटकांची मोजदाद न केलेलीच बरी. याचा अर्थ घराणेशाही या मुद्द्यावर सर्व पक्ष सारखेच. एकास झाकावा आणि दुसऱ्यास काढावा अशी स्थिती.

तथापि असा युक्तिवाद भाजप नेत्यांस मान्य नसतो. त्यांचे म्हणणे घराणेशाही म्हणजे ज्या पक्षांचे नियंत्रण एखाद्या कुटुंबाहाती असते, असे पक्ष. भाजपच्या मते ही घराणेशाही निंदनीय आहे आणि तो पक्ष अशा कौटुंबिक मालमत्ता असलेल्या पक्षांस कधीही जवळ करत नाही. या अशा पक्षांचा लोकशाहीवर विश्वास नसतो, असेही भाजपस वाटते. ते योग्यच. पण मग ‘तेलुगु देसम’ हा पक्ष कसा आहे? चंद्राबाबू नायडू यांच्या हाती पक्षाची सूत्रे आणि त्यांचे सुपुत्र नारा लोकेश हे कोण? रामविलास पासवान आणि चिराग पासवान यांच्या पक्षाचे काय? या पक्षातील अन्य तेजस्वी नेत्यांची नावे भाजप नेते तरी सांगू शकतील काय? घराणेशाहीसाठी भाजप तमिळनाडूतील द्रमुक वा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना इत्यादींबाबत नाके मुरडतो. पण या सगळ्यांपेक्षा तेलुगु देसम वेगळा कसा? आणि मुख्य म्हणजे ज्या शिवसेनेस भाजपने दत्तक घेतल्यासारखे आहे त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काय? या पक्षाच्या आणि मुख्यमंत्री शिंदे सुपुत्र श्रीकांत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी कल्याण परिसरात पायधूळ झाडली, ती का? महाराष्ट्रात सध्या भाजपस प्यारा असलेला दुसरा पक्ष म्हणजे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी. तो पक्ष घराणेशाहीपासून दूर आहे याचा साक्षात्कार भाजपस कोणत्या कोनातून त्याकडे पाहिल्यामुळे झाला? ‘अपना दल’ पक्षाचे काय? हरयाणात अलीकडेपर्यंत चौताला यांच्या कौटुंबिक पक्षाशी भाजपचे सौहार्दाचे संबंध होते आणि उभयतांत सत्ता स्थापनेचे देवाणघेवाणीचे व्यवहारही होते. तेव्हा अशा सत्तासोबतींचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा भाजपच काय अन्य कोणीही कधीही घराणेशाहीस आक्षेप घेतल्याचे दिसत नाही.

हेही वाचा >>> अग्रलेख: बाजारबोंबांचा बहर

असे अनेक दाखले देता येतील. त्या सर्वांवरून भ्रष्टाचाराप्रमाणे घराणेशाही या मुद्द्यावरही आपण आणि आपले राजकीय पक्ष किती दांभिक आहोत याचे प्रत्यंतर येईल. हा दुटप्पीपणा हास्यास्पद म्हणायचा. वास्तविक ज्या समाजजीवनात ‘गवयाचे पोरही सुरात रडते’ अशा अर्थाचा वाक्प्रचार सर्रास वास्तवात आलेला असतो, त्या समाजात खरे तर घराणेशाही हा मुद्दाच असता नये. आता तर ही घराणेशाही आणखी एका बाबतीत नव्या उंचीवर आपल्याकडे गेलेली आढळेल. ही बाब म्हणजे बाबाबापूंची. परमेश्वराची आराधना आणि साधना सातत्याने केल्यामुळे देवगुणांचा स्पर्श होऊन आपल्या अंगी काही प्रमाणात का असेना देवत्व आल्याचे असे कोणाकोणास वाटू शकते. कोणी काय वाटून घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. तथापि असे अन्य काहींसही वाटू लागते आणि पाहता पाहता अशा व्यक्तीचे रूपांतर सिद्ध साधकात होऊन अशी व्यक्ती अनेकांस वंदनीय वाटू शकते. तेही एकवेळ ठीक. तथापि या अशा देवत्वाचा स्पर्श झालेल्या व्यक्तीच्या देवत्वाचा वसा पुढच्या पिढीकडेही कसा काय संक्रमित होतो, हा सामान्य जनांस न कळलेला प्रश्न. त्यामुळे या व्यक्तीचा सुपुत्र वा सुपुत्रीही वंदनीय ठरून भाविकांचे श्रद्धास्थान ठरते. सबब ज्या समाजात हे असे देवत्वही एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असेल तर अशा समाजात घराणेशाहीविरोधात इतका कंठशोष करण्याचे खरे तर काही कारण नाही. गायक/ गायिकेचा मुलगा/ मुलगी गायक/गायिका होणार, वकिलाचा मुलगा तीर्थरूपांस मिळालेली सनद पुढे चालवणार, सरन्यायाधीशांचा मुलगा, नातू हेही त्या पदावर बसणार, चित्रपट तारे/ तारकांच्या पुढच्या पिढीस वारशानेच प्रभावळ मिळणार, डॉक्टर सुपुत्र/ सुपुत्रीस वडील-आईंनी जमवलेले रुग्ण एकगठ्ठा मिळणार अशा समाजात राजकारण्याच्या पोरा/ पोरींस आईवडिलांची मतपेटी ओघाने मिळणार हे सरळ आहे. हे वास्तव आपण स्वीकारलेले आहे. उगाच त्यावरून आरोप/ प्रत्यारोपात वेळ दवडणे योग्य नाही. उलट आपले मंत्रिमंडळ हे असे घराणेदार आहे याचा सत्ताधाऱ्यांनी अभिमान बाळगावा आणि तो मिरवावादेखील. भ्रष्टाचाराच्या मुद्द्याप्रमाणे हा मुद्दाही त्यामुळे नामशेष होण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on legacy of political families in narendra modi led nda cabinet zws