सन १९५८ नंतर कृष्णवर्णीयांचा संघर्ष अनेकांच्या सहयोगाने नावारूपाला येऊ लागला. या संघर्षांचा सर्वात मोठा हुंकार सर्वार्थाने पेले हेच होते..
एडसन आरांटेस डो नासिमेंटो हे नाव धारण करणाऱ्या व्यक्तीस जग ‘पेले’ या एकाच नावाने ओळखते. ते गौरेतर, बिगरयुरोपीय होते आणि फुटबॉलसारख्या वैश्विक खेळामध्ये तीन वेळा जगज्जेतेपद पटकावणारे आणि आयुष्यात हजारांहून अधिक गोल करणारे ते एकमेव. फुटबॉल जगज्जेतेपद मिळवणारे एकूण देश आठ. जवळपास ९२ वर्षांमध्ये कित्येक फुटबॉलपटू यादरम्यान आपापल्या देशांसाठी खेळले. मग पेलेच अधिक वेगळे, अधिक लोकप्रिय आणि म्हणून अधिक महान का? या प्रश्नाचे उत्तर ज्या काळात पेले यांचा उदय झाला, त्या काळात आणि त्यातून आकारास आलेल्या पेले यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेले आहे. पेले यांचे गारूड विशाल जगतावर आणि पिढय़ान् पिढय़ांवर कसे काय होऊ शकले, याची उत्तरे शोधण्यासाठी थोडा इतिहास डहुळावा लागतो.
आणखी वाचा – एकमेवाद्वितीय! पेले: १९४० -२०२२
फुटबॉल आणि ब्राझील हे समीकरण ज्या एका व्यक्तीमुळे सर्वाधिक रूढ झाले, ते पेलेच. या देशाने सर्वाधिक पाच वेळा फुटबॉल जगज्जेतेपदाला गवसणी घातली. परंतु जगज्जेतेपद पटकावणारा ब्राझील काही पहिलाच देश नव्हता. ब्राझीलच्याही आधी उरुग्वे, इटली, पश्चिम जर्मनी हे जगज्जेते ठरले होते. अर्जेटिना, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी जागतिक उपविजेते बनले होते. पण मग या प्रतिष्ठित ‘क्लब’मध्ये उशिरानेच दाखल झालेल्या ब्राझीलविषयी आजही इतके आकर्षण कसे काय टिकून आहे? १९५८ मध्ये स्वीडनमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत १७ वर्षीय पेलेने मोक्याच्या सामन्यांमध्ये गोल केले. जागतिक पातळीवर ब्राझीलसारख्या संघाने विश्वचषक जिंकला. ब्राझील हा तेव्हा संघात बऱ्यापैकी गौरेतर खेळाडू बाळगणारा संघ होता. दक्षिण अमेरिकेतील इतर दोन मातब्बर संघ अर्जेटिना आणि उरुग्वे हे तेव्हाप्रमाणेच आजही गौरबहुल. उलट ब्राझीलच्या संघात तेव्हाही आणि आजही गौरेतरांचे प्रमाण लक्षणीय. सरधोपटपणे विचार करता गोरे- त्यातही युरोपीय हे वसाहतवादाचे प्रतीक, तर गौरेतर आणि विशेषत: कृष्णवर्णीय हे वंचितांचे प्रतीक. तेव्हा नि काही प्रमाणात आजही. पेले यांचे पूर्वज गुलाम होते. पन्नासच्या दशकात वसाहतवादाच्या जोखडातून अनेक देश मुक्त होत असताना, पेलेसारखा १७ वर्षीय गोरेतर पोरसवदा खेळाडू मर्यादित प्रसिद्धिस्रोतांमधूनही या देशांमध्ये पोहोचला आणि त्यांना विलक्षण आपलासा वाटून गेला. त्या मुलाला रोखणारे गोरे होते. या गोऱ्यांविरोधात गोल झळकावल्यानंतर त्या मुलाच्या मुखावर उमटलेले निव्र्याज, निर्विष बालहास्य वसाहतवाद-पीडितांना चटकन आपलेसे करून गेले, यात नवल नाही. समोरचा देश स्वीडन होता, की इंग्लंड होता, की फ्रान्स होता हे महत्त्वाचे नव्हते. खरे तर स्वीडनने इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन किंवा नेदरलँड्सप्रमाणे वसाहती ओरबाडून नेल्या नाहीत. तरीदेखील वैश्विक म्हणवल्या जाणाऱ्या खेळामध्ये एका मोठय़ा गौरेतर वर्गाचा प्रतिनिधी म्हणून लहानगा पेले नावारूपाला आला. आजच्या फ्रान्स, जर्मनी किंवा इंग्लंडच्या संघांमध्ये अनेक मिश्रवर्णीय किंवा कृष्णवर्णीयांचा समावेश असतो. त्यामुळे त्यांची गोऱ्यांच्या खेळातील संस्मरणीय कामगिरी वगैरे नवलाईसम राहिलेली नाही. ब्राझीलचे जगज्जेतेपदही आताशा दुर्मीळ बनत चालले आहे. सहा दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. पेलेंच्या विश्वचषकातील कामगिरीच्या काळातच अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर उदयाला आले. मोहम्मद अली जगाला परिचित झाले. सिडनी प्वाटिये हे ऑस्कर जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय अभिनेते बनले. कृष्णवर्णीयांचा संघर्ष नावारूपाला येऊ लागला. या संघर्षांचा सर्वात मोठा हुंकार सर्वार्थाने पेले हेच होते. १९६२ मधील ब्राझीलच्या विश्वविजयी संघात त्यांचा वाटा फारसा नव्हता, कारण स्पर्धा सुरू झाल्यानंतर लगेचच ते जायबंदी झाले. १९६६ मध्येही ते फारसे खेळू शकले नाहीत. पण ब्राझीलने १९७० मध्ये विक्रमी तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला, त्या वेळी त्या विजयाचे एक शिल्पकार पेले होतेच. कृष्णवर्णीय संघर्षांचे एक वर्तुळ पूर्ण झाले. त्या वेळी किंवा सुरुवातीसही पेलेंनी रूढार्थाने कधीही कृष्णवर्णीयांचे नेतृत्व स्वीकारले वगैरे नव्हते. पण त्याची गरजही नव्हती. पेलेंना आसपासच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. आपण जाहीर न करताही जगातील एक मोठा वर्ग आपल्या कामगिरीकडे- ब्राझीलच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून आहे, याविषयी ते संवेदनशील होते.
पेले यांचा जन्म आणि बालपण गरिबीत गेले. त्यांचे वडीलही उत्तम फुटबॉलपटू होते, परंतु गुडघा दुखावल्यामुळे ते फुटबॉलमधून बाहेर फेकले गेले. तरीही फुटबॉलप्रेम कायम राहिले आणि त्यांच्या मुलाला- एडसन किंवा पेले- त्यांनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहित केले, हे ब्राझील आणि फुटबॉल जगताचे भाग्यच. १९५० मध्ये साओ पावलोत जवळपास दीड लाख प्रेक्षकांसमोर विश्वचषक अंतिम सामन्यात उरुग्वेने यजमान ब्राझीलला धक्कादायकरीत्या पराभूत केले. त्या वेळी अश्रू ढाळलेल्या लाखोंपैकी पेले एक. त्या आघाताने पेले यांचे ब्राझीलप्रेम आणि फुटबॉलप्रेम अधिक दृढ झाले. निष्णात खेळाडू, कलाकार, कवी, गायक, शास्त्रज्ञ यांचा निर्धार अनेकदा तीव्र आघाताने तुटण्याऐवजी अधिक पक्का होतो, तसेच हे. लहानग्या पेलेंनी प्रथम त्यांचा स्थानिक क्लब आणि नंतर सांतोस या बऱ्यापैकी मोठय़ा क्लबमध्ये स्थान पक्के केले. सांतोसकडून पेले ज्युनियर स्तरावर खेळत असताना, त्यांना सीनियर संघात खेळवण्याची विनंती सीनियर सहकाऱ्यांनीच केली! त्या वेळी पेले अवघे १५ वर्षांचे होते. सांतोसला ब्राझिलियन अजिंक्यपद मिळवून देण्यात या छोटय़ा चणीच्या फुटबॉलपटूने मोठे योगदान दिले आणि १७ व्या वर्षीच पेले यांना ब्राझिलियन संघात खेळण्याची संधी मिळाली. स्वीडनमध्ये १९५८ ची विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ते जायबंदीच होते. पण याही वेळी ब्राझीलच्या सीनियर संघातील खेळाडूंनी त्यांना खेळवण्याचा आग्रह प्रशिक्षकांजवळ धरला आणि पेले खेळले. उपांत्य सामन्यात हॅटट्रिक आणि विश्वचषक अंतिम सामन्यात गोल झळकावणारे सर्वात युवा फुटबॉलपटू हा त्यांचा विक्रम आजतागायत शाबूत आहे. पुढे १९६२ आणि १९७० मधील स्पर्धामध्ये ते खेळले, पण १९७० मधील कामगिरीसाठी अधिक लक्षात राहिले.
फुटबॉलला ‘जोगो बोनितो’ म्हणजे सुंदर खेळ या अर्थाचे पोर्तुगीज-ब्राझिलियन बिरुद चिकटले, याचे मूर्तिमंत कारण म्हणजे पेले. छोटय़ा-छोटय़ा पासेसवर चेंडूवर ताबा मिळवत सामन्यावर नियंत्रण आणण्याच्या, ‘डॅन्युबियन’ फुटबॉल शैलीच्या त्या जमान्यात एकांडी धाव घेत, चेंडूला पावलाच्या साह्याने सफाईने दिशा आणि वेग देत चढाई करणाऱ्या प्रवाही फुटबॉलची ओळख पेले आणि ब्राझीलच्या त्या पिढीने जगाला करून दिली. फुटबॉलचा खेळ खऱ्या अर्थाने नेत्रसुखद आणि त्या माध्यमातून लक्षावधी सामान्यांना आकळण्याजोगा आणि आस्वादण्याजोगा बनला. पाच फूट आठ इंच चणीच्या पेलेंचा मैदानावरील वावर अत्यंत चपळ आणि आत्मविश्वासपूर्ण होता. कोणतीही मानवी भिंत त्यांना रोखण्याइतकी समर्थ नव्हती. फुटबॉलपटूंना बाजारमूल्य आणि फुटबॉलला बाजारपेठ मिळवून देणारे ते पहिलेच. त्यांच्या सरकारने पेलेंना कधीही युरोपमध्ये क्लब फुटबॉल खेळू दिले नाही. त्याचा किती तोटा झाला, याचा हिशेब पेलेंनी कधी मांडला नाही. मैदानावरील रसरशीतपणा आणि फुटबॉलप्रेम पेलेंमध्ये अखेपर्यंत जिवंत होते. अंथरुणाला खिळलेले असूनही त्यांनी नुकताच झालेला विश्वचषक आवर्जून बघितला.
ब्राझीलमधील लष्करशाहीसमोर मान न तुकवणारे पेले त्या देशात लोकशाही अस्तित्वात आल्यावर क्रीडामंत्रीपद स्वीकारते झाले आणि फुटबॉल क्लब्सचे भले करू शकले. ‘‘लहान मुलाची उत्साही निरागसता, चेंडू मिळाल्याचा आनंद आणि तो न सोडण्याचा आग्रह मोठय़ा माणसात सामावल्यावर कसा दिसेल तसे पेले खेळताना दिसत’’ हे नेल्सन मंडेला यांनी त्यांचे केलेले वर्णन. ‘‘बिथोवेन सिम्फनीसाठी, शिल्प-चित्रकलेसाठी मायकेलअँजेलो, त्याप्रमाणे माझे अस्तित्वही केवळ फुटबॉलसाठीच आहे,’’ असे पेले यांचे स्वत:विषयीचे विख्यात विधान. फुटबॉलची ही सिम्फनी आज संपली. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे या खेळाडू-कलाकारास आदरांजली.