इतक्या सगळ्या जणांना विकासच हवा तोही याच निवडणुकीत, हे पाहून मराठीजन प्रफुल्लित व्हायला हवेत. पण मराठी मन आणि जन भांबावलेले दिसतात…

सोमवार, १८ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी महाराष्ट्रात एक सामूहिक हुंकार निनादला. चहुदिशांनी त्याचा उमटलेला प्रतिध्वनी अजूनही विचारस्तब्धता न झालेल्या अनेकांच्या कानांवर आदळला असेल. या महानादी राज्यातील दशकभर कोटी नागरिकांनी एकाच वेळी सोडलेल्या नि:श्वासाचा हा निनाद होता. या नागरिकांस एकाच वेळी असा नि:श्वास सोडावा असे वाटले कारण बुधवारी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार (एकदाचा) संपला म्हणून. या नि:श्वासात निवडणूक आयोग या कथित स्वायत्त यंत्रणेप्रति धन्यवादाची भावनाही होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका अनेक टप्प्यांत घेतल्याचा किती फटका सत्ताधीशांस बसतो हे सत्य उजागर झाल्याने महाराष्ट्रातील निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या गेल्या. ते योग्यच. अन्यथा कान किटवणारी किरकिर आणि कटकट आणखी काही काळ ऐकावी लागली असती. तेव्हा सत्ताधाऱ्यांची सोय म्हणून का असेना; निवडणूक आयोगाने राज्यात एकाच टप्प्यात मतदान घेतले आणि मराठी जनांचा प्रचारी प्रवचनानंद सुसह्य केला. या वेळच्या निवडणुकांतील प्रचार पाहून खरे तर प्रत्येक मराठी माणसाचे हृदय अभिमानाने भरून आले असणार. आणि का येऊ नये? प्रचार होताच तसा. त्यातून तो करणाऱ्यांची तळमळ दिसत होती. त्यांची कष्ट करण्याची तयारी दिसून येत होती. त्यांची लवचीकता समोर येत होती. या सर्वांचे हे निवडणुकीय प्रयत्न एकच एक उद्दिष्टासाठी होते. जणू ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ या ‘गर्जा जयजयकार’ काव्यातील वास्तव समोर प्रत्यक्षात यावे, तसेच हे. या सगळ्यांचे ध्येय एकच. महाराष्ट्राचा विकास.

dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?

हेही वाचा : अग्रलेख : मणिपुरेंगे!

मराठी जनांस एव्हाना या विकासाचा निश्चित अतिरेक होऊन अपचन झाले असणार. सुग्रास झाले म्हणून काय झाले, तेही जास्त पोटात गेले की अपचन निश्चित. तसेच विकासाचेही नव्हे काय? निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येकास विकासाचा ध्यास या काळात दिसून आला. इतके सगळे आपल्या विकासासाठी आसुसलेले आहेत हे पाहून अनेकांस किती धन्य धन्य झाले असेल, या कल्पनेनेही अंगी शहारा यावा. खरे तर आपले विद्यामान सत्ताधीश, भावी सत्ताधीश, कडेकडेचे सत्ताधीश, सत्ताधीशांच्या छत्राखालचे सत्ताधीश आदी सगळ्यांस आपल्या विकासाची इतकी चाड आहे ही भावना खरे तर मराठी मनांस ‘आनंदी आनंद गडे’ म्हणत नाचू-गाऊ लावणारी वाटायला हवी. पण तसे होताना दिसत नाही. उलट मराठी मन आणि जन भांबावलेले दिसतात. उदाहरणार्थ इतक्या साऱ्या विकासाचे करायचे काय, आजच या मंडळींनी इतका विकास करून टाकला तर पुढच्या पिढीस करण्यासाठी हाती राहणार काय असे काही प्रश्न अनेकांस पडलेले दिसतात. प्रदूषित हवामानाच्या प्रदेशातून शुद्ध हवेच्या प्रांतात गेल्यानंतर सुरुवातीला काहींस सर्दी-पडशाचा त्रास होतो. कारण स्वच्छ हवेस हाताळण्याची सवय नसल्याने स्वच्छ हवा मिळाल्यावर फुप्फुसे गांगरतात. सांप्रती समस्त मराठी जनांचे या गोंधळलेल्या फुप्फुसांसारखे झाले आहे. अविकसित, अविकसित म्हणता म्हणता इतके सारे विकासाभिमुख राजकारणी पाहून ‘‘आता या विकसित महाराष्ट्रात आपले काय होणार’’ असा प्रश्न पडून मराठी मने गांगरलेली दिसतात. या इतक्या साऱ्या विकासाच्या वाटेवरून निवडणूक प्रचारात घोडदौड सुरू असताना रस्त्यावरच्या मराठी जनांनी काही निरीक्षणे नोंदवली. ती प्रचार-सांगताक्षणाच्या मुहूर्तावर सर्वांसाठी समोर मांडणे हे कर्तव्य ठरते.

म्हणजे असे की ही काही या राज्याने अनुभवलेली पहिलीच निवडणूक नव्हे. याआधीही निवडणुका झाल्या आणि यानंतरही (बहुधा) त्या होतील. परंतु प्रश्न असा की याआधीच्या निवडणुकांत ‘विकास’ हा मुद्दा नव्हता काय? त्या वेळी आजच्या इतके विकासवादी, विकासस्नेही आणि विकासाभिमुख राजकारणी निवडणुकीच्या रिंगणात नव्हते काय? या प्रश्नाचे उत्तर ‘‘होय… ते नव्हते’’ असे असेल तर ते का, असा प्रश्न. बहुधा या देशवासीयांस विकास म्हणजे काय हेच मुळात २०१४ नंतर कळाले हे या प्रश्नाचे उत्तर असू शकते. ते गृहीत धरूनच पडणारा पुढचा प्रश्न म्हणजे त्यासही आता दशक उलटले. त्या काळात दोन निवडणुका झाल्या. त्या वेळी हे इतके विकासवादी राजकारणी नक्की कोठे होते? राजकारणाच्या मैदानात ते तेव्हाही असतील, हे सत्य. पण मग त्या वेळी या मंडळींनी इतका विकास का नाही केला? या राज्यातील जुने-जाणते काँग्रेसी आणि त्यांच्याच गुणसूत्रांचे राष्ट्रवादी यांस एक वेळ यातून वगळू. कारण त्यांनी काही विकास न केल्याने तर नव्यांचा उदय झाला. हे नवे म्हणजे शिवसेना, नवनेतृत्वाची राष्ट्रवादी, तळ्यात-मळ्यात खेळणारी मनसे, बहुजन वंचित विकास आघाडी, शेकड्याने उगवलेले अपक्ष आणि या सर्वांचा आश्रयदाता भाजप. हे गेली दहा वर्षे नक्की काय करत आहेत? या सगळ्यांना आताच इतकी विकासाची भूक तीही एकाच वेळी कशी काय लागली? या दहा वर्षांपैकी गेल्या तीन वर्षांत खरे तर राज्यातील नगरे, महानगरे यांच्या निवडणुका लटकल्या. या महापालिकांतही या विकासवाद्यांचे अनुयायी आहेत. त्यांनी या निवडणुका व्हाव्यात आणि आपल्या विकास-ऊर्मीस नगरानगरांतून वाट मिळावी यासाठी काय केले? या काळात राज्याचा विकास हवा तितका होत नसताना या विकासाभिमुख राजकारण्यांचा विकास मात्र कसा काय भरघोस झाला? महाराष्ट्राच्या आडातच पुरेसा नसलेला विकास या मंडळींच्या अंगणातून मात्र कसा काय दुथडी भरून वाहू लागला? आताच्या निवडणुकीत या मंडळींनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे पाहिली की या सगळ्यांच्या विकास-वेगाचा झपाटा पाहून डोळ्यापुढे अंधारी यावी. स्वत:चा इतका विकासच विकास हे सारे करू शकले ही बाब खचितच कौतुकाची. पण सामान्य मराठी जनाचे उत्पन्न वाढत्या महागाईशी जुळवून घेईल इतकेही वाढत नसताना या विकासवाद्यांच्या उत्पन्नात शंभर वा अधिक पटींची कशी काय भर पडते? या मंडळींनी याचे गुपित तरी सामान्य मराठी जनांस सांगावे. तेवढेच त्यांचे भले करण्याची संधी!

हेही वाचा : अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…

आणि या निवडणुकीतील दुसरे एक डोळ्यात भरणारे निरीक्षण म्हणजे सर्व विकासाभिमुख आणि विकासविरोधी राजकारण्यांकडून एकच एका उद्याोगपतीचा वारंवार होणारा उल्लेख. तो पाहिल्यावर या देशात अन्य कोणी उद्याोजक, उद्योग समूह हयात आहेत की नाही, असा प्रश्न पडल्यास त्यात काय चूक. सध्या राज्याच्या विकासाची सूत्रे हाती असलेले आणि ती निवडणुकांनंतर आपल्या हाती घेऊ पाहणारे या दोन्हीहीकडच्यांच्या मुखी याच उद्योगपतीचे नाव कसे? अर्थात सत्ताधारी आणि ती घेऊ पाहणारे या दोहोंचे निदान या उद्योगपतीच्या मुद्द्यावर तरी एकमत आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब, असेही म्हणता येईल. राज्याचा विकास करता करता स्वत:चा विकास साधण्यात या उद्योग समूहाची उपयुक्तता अनन्यसाधारण, हे कारण यामागे असेलही. त्यामुळे सर्वच विकासवादी राजकारण्यांसाठी या उद्योग समूहाच्या मांडवाखालून (वा बंगल्यातून) जाणे अपरिहार्य असावे. निवडणुकेच्छू राजकारण्यांच्या प्रचार गर्दीत एखादा उद्याोग समूह इतका गुंतल्याचे आतापर्यंत निवडणुकांच्या इतिहासात कधी दिसले नव्हते. कदाचित राजकारण्यांप्रमाणे या उद्योग समूहाची विकासभूक सध्या वाढली असावी.

पण यानिमित्ताने आपल्या महाराष्ट्रात इतक्या राजकारण्यांना राज्याच्या विकासाची इतकी आस आहे हे सत्य पुढे आले. लोकशाहीचा फायदा तो हाच. तथापि या राज्याच्या विकासाची या इतक्या सगळ्यांची इच्छा पाहून त्यांना केवळ विकासाभिमुख ठरवणे हे त्यांच्या निवडणुकीतील महत्कार्यास कमीपणा आणणारे ठरेल. त्याऐवजी विकासासाठी वखवखलेले हा शब्दप्रयोग योग्य.