रोजचे सगळे विसरायला लावणारी, ‘झिंग झिंग झिंगाट’ करायला लावणारी कोणतीही गोष्ट या गर्दीला चालणार आहे, हे क्रिकेटपटूंच्या मिरवणुकीत दिसले…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशात हाथरस येथे कोणा बाबाच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीवरून झाडाझडती सुरू असताना मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकून आलेल्या क्रिकेटपटूंचे स्वागत करण्यासाठी जमलेली गर्दी भल्याभल्यांना धडकी भरवणारी होती. कुणाला ती तशी न वाटता फक्त भारतीयांच्या निस्सीम क्रिकेटप्रेमाची निजखूण वाटत असेल तर अशांनी खरोखरच आपल्या बुद्धीचा एक्स-रे काढून घेण्याची गरज आहे. एखाद्या समाजाने एखाद्या खेळावर निरतिशय प्रेम करणे, त्यातील विजयाने आनंदून जाणे हे समजण्यासारखे आहे. पण ते करताना उत्साह आणि उन्माद यातली सीमारेषाच पुसली जात असेल तर खरोखरच काही तरी चुकते आहे. काही निवडक देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या आणि आपल्या देशात कमालीची लोकप्रियता लाभलेल्या एका क्रीडाप्रकारातील दर चार वर्षांनी होणारी एक स्पर्धा आपण जिंकली, म्हणजेच ज्यांचा अभिमान बाळगायला हवा असे या खेळात कमालीचे प्रावीण्य असलेले खेळाडू आपल्याकडे आहेत, एवढेच खरे तर क्रिकेटपटूंच्या जंगी मिरवणुकीमागचे वास्तव. पंतप्रधानांपासून ते तरुण पोरासोरांपर्यंत सरसकट सगळ्यांनी भारावून जरूर जावे; पण त्याचे इतके प्रदर्शन कशासाठी? विजयी वीरांना भेटणे ही पंतप्रधानांसाठी औपचारिकता असू शकते. बाकीच्यांचे काय? विश्वचषकाचा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या संख्येने जर तरुणाई तिथे गेली असेल, तर मग याच तरुणांना त्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या गैरव्यवहारांचा जाब विचारण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरावे असे वाटत नसेल? की त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या जीवनमरणाच्या प्रश्नांपेक्षा, त्यांच्या भवितव्यापेक्षा एखादा विश्वचषक जिंकणे जास्त महत्त्वाचे वाटते? तसेच असेल तर दुसऱ्या एखाद्या क्रीडाप्रकारात आपण जगज्जेते ठरलो किंवा एखाद्या खेळाडूने जागतिक सुवर्णपदकासारखे सर्वोच्च यश मिळवले तर ते साजरे करण्यासाठी ते अशाच झुंडीने जातील का?

हेही वाचा >>> अग्रलेख: कैलासवासी ‘कू’!

‘नाही’ हेच या प्रश्नाचे उत्तर. क्रिकेटच्या वाट्याला येते तसे लोकांचे प्रेम इतर खेळांच्या वाट्याला येत नाही, हे आपल्याकडचे सर्वमान्य वास्तव आहे. त्यामुळेच क्रिकेट सामन्यांमध्ये पराभव झाला की खेळाडूंना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते आणि विजय झाला की अशा टोकाच्या प्रेमाला. खेळ म्हटल्यावर जय-पराजय या दोन्ही गोष्टी होणार, हे आपल्याला सहजपणे स्वीकारताच येत नाही. कारण आपण त्याच्याकडे निव्वळ खेळ म्हणून, खिलाडू वृत्तीने बघूच शकत नाही. क्रिकेट हा आपल्याकडे जणू धर्मच आहे, असे म्हटले जाते, ते यामुळेच. पण म्हणूनच अत्यंत टोकाची व्यावसायिकता गाठलेल्या या खेळामधल्या जय-पराजयात आपण समाज म्हणून आपली ओळख, आपली अस्मिता शोधतो. आपण कुठे तरी, कशात तरी जगज्जेते आहोत, कुणापेक्षा तरी वरचढ आहोत, जगात आपण कुणाला तरी नमवू शकतो याचाच आपल्याला आनंद होतो. पण तसे असेल तर मग तो फक्त खेळातल्या विजयाचा आनंद असे अजिबातच म्हणता येणार नाही. तो उन्मादच. काही लाख लोकांना आपल्या हातातल्या गोष्टी बाजूला ठेवून गुरुवार संध्याकाळच्या मरिन ड्राइव्हवरच्या त्या जल्लोषाच्या गर्दीत स्वत:ला लोटून द्यावेसे वाटणे, त्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली तर आपले काय होईल, असा प्रश्नही न पडणे हादेखील निव्वळ ‘फॅन मोमेंट’ म्हणता येणार नाही. तोही उन्मादच. किंवा वैयक्तिक आयुष्यातली हतबलता, निराशा, अपयश, कोंडमारा हे सगळे काही क्षणांपुरते विसरण्यासाठी, आपणही कुणी तरी आहोत हे स्वत:ला आणि जगाला सांगण्यासाठी घेतलेला एक प्रकारचा मुखवटा. तो घालून त्या प्रचंड गर्दीत स्वत:ला भिरकावून देणाऱ्यांच्या नेणिवेत त्या क्षणापुरते तरी समूहाच्या ताकदीचे भान जागे झाले असणार. आपल्याला वाटते तेच इतरही लाखो लोकांना वाटते आहे, यापेक्षा ‘फील गुड’ आणखी वेगळे काय असते? पण हे ‘फील गुड’ म्हणजे एक प्रकारचा अॅनेस्थेशिया आहे, ज्याला मराठीत भूल किंवा गुंगी म्हणतात.

हेही वाचा >>> अग्रलेख: नोटिशीचे नक्राश्रू!

रोजच्या जगण्यामधल्या वास्तव प्रश्नांना भिडणे शक्य नसते, जमत नसते, तेव्हा हे ‘फील गुड’ फार म्हणजे फार उपयोगी पडते. नसू देत तरुणांच्या हाताला काम, नसू देत रस्ते चांगले, वाढू देत महागाई, खोळंबू देत परीक्षा… ही रोजची लढाई नेहमीचीच आहे. ते सगळे विसरायला लावणारी, ‘झिंग झिंग झिंगाट’ करायला लावणारी कोणतीही गोष्ट या गर्दीला चालणार आहे. मग ती क्रिकेटपटूंची मिरवणूक असेल, कुणा नेत्याचा ‘रोड शो’ असेल, कुणा बुवा-बाबाचा सत्संग असेल किंवा एखाद्या धरणाला वळसा घालून केलेली जिवावर बेतलेली वर्षासहल असेल. समूहाने आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे ती बरोबरच असते, अशी धारणा समूहाबरोबर असल्यावर आपोआपच तयार होते. त्यामुळेच मग मरिन ड्राइव्हवरच्या त्या गर्दीत जखमी झालेल्यांच्या, घुसमटून अस्वस्थ झालेल्यांच्या बातम्यांना या गर्दीच्या लेखी फारसे महत्त्व उरत नाही. मिरवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी मिरवणूक मार्गावर पादत्राणांचा ढीग दाखवणाऱ्या समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या चित्रफिती आदल्या दिवशी काय घडले असेल याची काळजी वाढवणाऱ्या आहेत, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. त्या विजयोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना आपली पादत्राणेदेखील सांभाळता आली नाहीत, ती तशीच सोडून त्यांना तिथून निघून जावे लागले, हे कशाचे निदर्शक आहे, हेदेखील या गर्दीचे कौतुक करणाऱ्यांना समजत नाही. मुख्य म्हणजे एखादा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो तेव्हा कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी संभाव्य गर्दीचे नियोजन करणे ही आयोजकांची जबाबदारी असते, हे त्यांच्या गावीही नसते. मुंबईसारख्या नोकरदारांच्या शहरात, मरिन ड्राइव्हसारख्या परिसरात संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर अशा पद्धतीने मिरवणूक काढून तिथून रोज ये-जा करणाऱ्यांची कोंडी करणे, त्या परिसरातले आठ महत्त्वाचे रस्ते बंद करणे हे नागरी हक्कांवर गदा आणणारे आहे, हे राजकारण्यांपासून कुणाच्याही ध्यानीमनी नसते ते यामुळेच. मागील वर्षी नवी मुंबईत भर उन्हाळ्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान उन्हाच्या काहिलीमुळे अनेक जण मृत्युमुखी पडले तेव्हा त्यांना ‘मोक्ष’ मिळाला अशी मखलाशी केली गेली होती. या कोडगेपणाला कोणताही धर्म, पंथ अपवाद नाही हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. कोणतीही गर्दी जमवली जाते तेव्हा तिचा सगळ्यात मोठा ताण येतो तो पोलीस यंत्रणेवर. नागरी सुविधांवर, त्या पुरवणाऱ्यांवर आणि परिसरातल्या नागरिकांवर. गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे या यंत्रणांचे व्याकरण असते. त्यांना दिल्या गेलेल्या माहितीनुसार शक्यतो त्या आपले व्यवस्थापन करतात. पण त्यांना नीट माहिती दिली जात नाही, तेव्हा हाथरससारख्या घटना घडतात, असे प्रथमदर्शनी दिसते. गर्दी जमवून ज्यांना शक्तिप्रदर्शनच करायचे असते, त्यांना ना या यंत्रणांशी देणेघेणे असते, ना गर्दीशी – हेच आजवरच्या वेगवेगळ्या घटनांमधून दिसते. अशांना हवी असलेली ‘मुकी बिचारी कुणी हाका…’ अशी मेंढरे आपण बनायचे का, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मरिन ड्राइव्हवरच्या मिरवणुकीमधली गर्दी पाहता अशी काही दुर्घटना घडली नाही, हे खरे तर मुंबईकरांचे आणि यंत्रणांचे निव्वळ सुदैव. पण आपल्या उन्मादापेक्षा काही बरेवाईट घडले नसल्याचा उसासा अधिक प्रामाणिक ठरतो याची थोडी तरी जाणीव त्या गर्दीत सहभागी झालेल्यांना आहे का हा प्रश्नच.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on massive crowd gathered for team india world cup victory parade zws
Show comments