अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा फेकुत्तम निवडला जात असताना मेटा आणि एक्स या दोन कंपन्या फॅक्टचेकिंगला मूठमाती देतात…

सध्या समाजमाध्यमात ‘एन्रॉन एग’ची ध्वनिचित्रफीत चांगलीच लोकप्रिय झालेली आहे. बुडीत खात्यात गेलेल्या ‘एन्रॉन’ कंपनीचे पुनरुज्जीवन होत असून या कंपनीने आता घरोघर वापरता येईल अशी अंडाकृती अणुभट्टी तयार केली असल्याचे सादरीकरण या ध्वनिचित्रफितीत आहे. घरघंटीप्रमाणे आता घरभट्टी. फक्त ती आण्विक इतकेच. ती एकदा सुरू केली सलग दहा वर्षे त्यातून अखंड वीजनिर्मिती कशी होते आणि घराघरांची वीज बिले कशी वाचतात हे त्यातून समजते. ही ध्वनिचित्रफीत इतकी लोकप्रिय झाली की अनेक शहाण्यासुरत्यांनी ती आपापल्या घरांत कशी बसवता येईल याची तपासणी सुरू केली आणि काहींनी तर ‘एन्रॉन’च्या रिबेका मार्क यांच्या आठवणी जागवल्या. या ध्वनिचित्रफितीतील माहिती, या अशा घरभट्ट्या विकसित करण्याचे तंत्रज्ञांचे कौशल्य, तिचे ‘एन्रॉन’ अधिकाऱ्यांनी केलेले सुलभ सादरीकरण सारेच उत्तम आणि निर्दोष. त्रुटी फक्त एकच.

ranveer allahbadia
अग्रलेख : मडकी तपासून घ्या!
representation of people act , governor , conduct ,
अग्रलेख : यांनाही सरळ कराच!
BJP , Manipur , Biren Singh
अग्रलेख : गणंग गेला आणि…
loksatta editorial on arvind kejriwal
अग्रलेख : ‘आप’ले मरण पाहिले…
Indians deported entering us via donkey route
अग्रलेख : ‘डंकी’ डंख!
Chinese company DeepSeek an existential threat to America
अग्रलेख : ती ‘एआय’ होती म्हणुनी…
BMC Budget 2025 Latest Updates in Marathi
अग्रलेख : किती काळ…?
no alt text set
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
Amid Trump Tariff Threats India Cuts Import Duty On American Bikes Cars
अग्रलेख : किती मी राखू तुमची…

ती फेक आहे. ही ध्वनिचित्रफीत इतक्या बेमालूमपणे बनवलेली आहे आणि भलेभले आश्चर्यचकित होत असले तरी ती पूर्ण बनावट आहे आणि समाजमाध्यमी रिकामटेकड्यांची फिरकी घेण्यासाठी ती तयार करण्यात आलेली आहे. जगातील अनेक नामांकित ‘फॅक्टचेकर्स’नी ही ध्वनिचित्रफीत बनावट असल्याचे उघड केले. ही अशी ध्वनिचित्रफीत मनोरंजन म्हणून ठीक. पण विषय गंभीर असेल तर? सद्या:स्थितीत समाजमाध्यमी फोलपटांवर बौद्धिक गुजराण करणारा वर्ग प्रचंड प्रमाणावर वाढलेला असून तो हे सर्व गांभीर्याने घेतो. केस काळे आणि लांब होतात म्हणून रिकाम्या वेळात दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासत बसणारे, हृदयविकार टाळता येतो म्हणून तृतीयपंथीयांच्या पद्धतीने टाळ्या वाजवणारे, प्रभातसमयी उद्यानांत विविध भिकार घटकांचा रस पिणारे इत्यादी उदाहरणे आसपास पाहिल्यास या सत्याची प्रचीती येईल. तरीही यात कोविडची काळी सावली आपल्यावर पडू नये म्हणून घरातल्या ताटवाट्या बडवणाऱ्या आणि दिवे घालवून अंधारात बसणाऱ्या बिनडोकांचा समावेश नाही. तो केल्यास समाजमाध्यमी मलमूत्रावर पोसल्या गेलेल्यांची संख्या किती तरी अधिक भरेल. एरवी या अर्धवटरावांकडे दुर्लक्ष करणे हेच शहाणपण हे खरे. तथापि ‘फेसबुक’कर्त्या ‘मेटा’ कंपनीने यापुढे ‘फॅक्टचेक’ थांबवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे असत्यावतारी अर्धवटरावांची संख्या अतोनात वाढण्याचा धोका असल्यामुळे या विषयावर भाष्य करणे अगत्याचे ठरते. समाजमाध्यमी जीवजंतू तीन घटकांवर पोसले जातात. फेसबुक, आताचे ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आणि तिसरे इन्स्टाग्राम. यांतील फेसबुक आणि ट्विटर या दोन्हीही माध्यमांनी ‘फॅक्टचेकर्स’ना तिलांजली दिली असून याचा अर्थ तेथे कोणालाही काहीही लिहिण्यास/ पसरवण्यास यापुढे मुक्तद्वार असेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा फेकुत्तम निवडला जात असताना या दोन कंपन्यांनी फॅक्टचेकिंगला मूठमाती देणे हे या दोन कंपन्या आणि अमेरिकी अध्यक्ष या दोघांबाबतही भाष्य करणारे ठरते. याचा अर्थ खोटेपणा आणि खोटेपणा हाच या उभयतांचा आधार. ही अशी सत्यास तिलांजली देण्याची गरज या उभयतांस आताच का वाटावी?

हेही वाचा >>> अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ

‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ असे शुचिर्भूत उत्तर या दोघांकडून दिले जाते. पण अभिव्यक्तिस्वातंत्र्य याचा अर्थ वाटेल ते पसरवण्याची मुभा असा होत नाही. निवडणुकीच्या प्रचारात ट्रम्प यांनी अमेरिकेतील स्थलांतरित हे स्थानिक नागरिकांचे पाळीव कुत्रे-मांजरी खात असल्याचे विधान केले. ते १०० टक्के खोटे होते. अलीकडे त्यांनी युरोपीय देश आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधांबाबतही असेच दणकून काहीएक भाष्य केले. फॅक्टचेकर्सनी यातील खोटेपणा लगेच उघड केला. पण यापुढे ‘फेसबुक’ हा खरेखोटेपणा सिद्ध करण्याच्या फंदात पडणार नाही. ‘एक्स’च्या इलॉन मस्कने तर त्याच्याही पुढची पायरी गाठली. त्याच्या ‘एक्स’वर जास्तीत जास्त वाचल्या जाणाऱ्या, पसरवल्या जाणाऱ्या पोस्ट्सना तो यापुढे पैसे देणार. जगात प्रगतीच्या कोणत्याही टप्प्यावर गंगेपेक्षा गटारगंगेत डुंबणाऱ्यांची, ज्ञानेश्वरीपेक्षा अज्ञानेश्वरीत रुची घेणाऱ्यांची संख्या नेहमीच जास्त असते. त्यामुळे ‘एक्स’वर काही बुद्धिगम्य, मूलभूत असे काही लिहिणाऱ्यांपेक्षा आचरट, बिनडोक आणि खोटे लिहिले गेलेलेच अधिक वाचले जाईल आणि अधिकाधिक पसरवले जाईल. आता त्यांस मस्क मोबदला देईल. ट्रम्प यांच्या फेरउदयाआधी ‘एक्स’वरही फॅक्टचेकिंग होत असे. मस्क याने ते दूर केले. याचा अर्थ सरळ आहे. वाईटसाईट, अश्लील आणि असत्य, नामीपेक्षा बदनामीकारक लिहिणाऱ्यांस यापुढे ‘एक्स’कडून थेट उत्तेजन मिळेल. ते दुहेरी असेल. म्हणजे कोणाहीविषयी काहीही लिहा, ते पसरवा आणि पैसे मिळवा. पूर्वी आपल्याकडे ‘‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’’ अशा प्रकारची मोहीम सरकारने चालवली होती. यापुढे लवकरच ‘‘फेसबुक आणि एक्स यावर सत्य काय आहे ते कळवा आणि हजार रुपये मिळवा’’ असा प्रचार करावा लागेल. ट्रम्प यांच्यासमोर या दोन कंपन्यांनी घातलेले हे सपशेल लोटांगण. यातील ‘एक्स’चा प्रमुख हा तर टम्प यांचा पापसाथी.

हेही वाचा >>> अग्रलेख: धर्म? नव्हे अर्थ!

‘मेटा’च्या झकरबर्ग याचे असे नव्हते. तो अलिप्त असल्याचे दाखवत तरी होता. आता हा देखावाही त्याने सोडला. या दोन कंपन्या आता प्रोपगंडा यंत्रणेचा अधिकृत भाग बनतील. त्यांना आतापर्यंत दूर राखले होते ते अमेरिकी राजकारणाने, ही बाब लक्षात घ्यावी अशी. म्हणजे २०२० च्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत झाले, डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन विजयी झाले आणि या दोन कंपन्यांनी फॅक्ट चेकर्सना अधिक महत्त्व द्यायला सुरुवात केली. त्याआधी २०१६ सालचा ट्रम्प यांचा विजय आणि इंग्लंडमध्ये झालेले ब्रेग्झिट या दोन घटनांशी असलेला असत्याचा संबंध उघड झाला होता. खोटा प्रचार, प्रोपगंडा किती विध्वंसक असू शकतो हे त्यातून दिसून आले होते. त्यामुळे समाजमाध्यमांच्या या नतद्रष्ट व्यवसाय प्रारूपाविषयी मोठा जनक्षोभ निर्माण झाला आणि त्यातून ‘फॅक्टचेकिंग’ची गरज निर्माण झाली. ‘फेसबुक’ने आपला मंच तटस्थ फॅक्टचेकर्सना उपलब्ध करून दिला. त्यामुळे काही प्रमाणात का असेना पण अफवा प्रसारास आळा बसला. कारण एकदा एखादी बातमी/ घटना फॅक्टचेकर्सनी खोटी ठरवली की ती बातम्यांच्या रांगेत तळास जाईल अशी व्यवस्था केली गेली. तरीही कोणी ती पाठवू पाहात असेल तर त्यास ‘‘हा मजकूर असत्य आहे’’ असा इशारा या माध्यमांतून दिला जात असे. आता ही व्यवस्था नसेल. या दोन्हीही कंपन्यांनी फॅक्टचेकिंग न करण्याचे ठरवले असल्यामुळे यापुढे ही दोन्ही माध्यमे असत्यवाद्यांच्या चावड्या बनतील यात शंका नाही. पण ‘फेसबुक’बाबत त्यातल्या त्यात एक दिलासा. तो म्हणजे त्यास हे असे करण्याची मुभा युरोपीय देशांत असणार नाही. समाजमाध्यमी कंपन्यांबाबत युरोपीय देश कमालीचे सजग आहेत. या कंपन्यांची वाटेल ती थेरे त्या देशांत चालू दिली जात नाहीत, याची पूर्ण कल्पना असल्यानेच ‘मेटा’च्या झकरबर्ग याने फॅक्टचेकर्स रद्द करण्याचा निर्णय तूर्त अमेरिकेपुरताच घेतला. कारण युरोपीय बडग्याची कल्पना त्याला आहे. अमेरिकेपेक्षा युरोपनेच या ‘मेटा’सारख्या बेजबाबदार कंपन्यांचा जीव आपल्या तगड्या नियमनाने अनेकदा ‘मेटा’कुटीस आणला. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशानेही याबाबत आधीपासूनच सावधगिरी बाळगावी आणि अमेरिकेतील असत्यप्रसाराची थेरे येथे चालणार नाहीत, अशी स्वच्छ भूमिका घ्यावी. अन्यथा या समाजमाध्यमांमुळे आपले समाजजीवन फेकुचंदांच्या फाल्गुनोत्सवात अधिकच फिसकटेल.

Story img Loader