प्रश्न फक्त ‘जेईईमेन’मध्ये निघालेल्या डझनभर चुकांचा नसून ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या विश्वासार्हतेचा आणि पारदर्शकतेचा आहे…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशातील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटींमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली पायरी असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्यच्या, म्हणजे ‘जेईई-मेन’च्या अलीकडच्या प्रश्नपत्रिकेत ७५ पैकी १२ प्रश्न चुकीचे होते. ‘जेईई-मेन’मध्ये इतक्या मोठ्या संख्येने प्रश्न चुकल्याने संबंधित विद्यार्थी आणि शिक्षकवर्गात चर्चा होणे स्वाभाविकच. पण आयआयटी प्रवेशासाठीच्या परीक्षेत डझनभर प्रश्न चुकीचे म्हणून ते वगळण्याची नामुष्की परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय यंत्रणेवर, म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात ‘एनटीए’वर येत असेल, तर उच्च शिक्षणाबद्दलच प्रश्न उभे राहतात. गेल्या वर्षी ‘नीट-यूजी’ ही परीक्षा पेपरफुटीमुळे गाजली होती. आता ‘जेईई-मेन’च्या निमित्ताने यंदाच्या प्रवेश परीक्षा हंगामातील वादांची सुरुवात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेच्या प्रश्न विचारण्याच्या चुकांनी झाली आहे. चुका ‘जेईई-मेन’ या परीक्षेत झालेल्या असल्या, तरी मुख्य प्रश्न परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा सक्षम का नाहीत, हा आहे आणि त्यामुळे त्यावर भाष्य आवश्यक.
‘जेईई-मेन’ ही आयआयटीची पहिली पायरी असण्याबरोबरच यातील गुण देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील अखिल भारतीय स्तरावरील जागा भरण्यासाठीही ग्राह्य धरले जातात. साहजिकच देशभरातून सुमारे १५ लाख विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला बसतात. ही परीक्षा दोन सत्रांत होते. त्यापैकी एक जानेवारीत झाले, ज्याचा नुकताच निकाल लागला आणि दुसरे एप्रिलमध्ये आहे. संगणक आधारित परीक्षा असल्याने दोन वेगवेगळ्या सत्रांत आणि प्रत्येक सत्रात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. पेन-कागद पद्धतीप्रमाणे एकच प्रश्नपत्रिका छापून देशभर वितरित करावी लागत नसल्याने प्रश्नपत्रिकेला परीक्षेआधी पाय फुटण्याच्या शक्यता कमी. त्या अर्थाने ही पद्धत चांगली. मात्र, वेगवेगळ्या सत्रांसाठी वेगवेगळे, पण तेवढ्याच काठिण्यपातळीचे प्रश्न काढावे लागतात, ही यातील थोडी क्लिष्टता. अर्थात, पेपरफुटी टाळण्यासाठी तेही आवश्यक. थोडक्यात, एकाच प्रवेश परीक्षेसाठी शेकड्याने प्रश्न काढण्याची जबाबदारी. पण, म्हणून त्यातले बाराच चुकले, तर एवढे काय, असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. कारण, ‘एनटीए’सारख्या स्वायत्त संस्थेने विषयानुरूप भरपूर प्रश्न काढण्याची जबाबदारी पेलणे अपेक्षितच आहे. किंबहुना, तोच संस्थेच्या स्थापनेचा एक उद्देश असून, त्यासाठी त्यांना देशभरातून विषयतज्ज्ञही उपलब्ध असतात.
यंदा झाले असे की ‘जेईई-मेन’चे पहिले सत्र झाल्यानंतर जी उत्तरसूची प्रसिद्ध झाली, त्यावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांची पडताळणी झाल्यावर ‘एनटीए’ने अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करून त्यातील १२ प्रश्न वगळले. याचा अर्थ प्रश्नपत्रिकेत १२ प्रश्न चुकीचे होते! पदार्थविज्ञान, गणित, रसायनशास्त्र अशा तिन्ही विषयांसाठी काढलेल्या प्रत्येकी २५ प्रश्नांतील काही आणि एकूण १२ प्रश्न चुकले होते. नियमानुसार, परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या १२ प्रश्नांचे पूर्ण गुण मिळणार आहेत, मग विद्यार्थ्याने तो प्रश्न सोडवलेला असो वा नसो. प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण यानुसार ४८ गुण सर्वांना मिळतील. सत्रे वेगवेगळी असल्याने अंतिमत: पर्सेंटाइलच काढले जाणार असल्याने त्याचा एकूण निकालावर वरकरणी फारसा परिणाम होईल, असे नाही. मात्र, तरीही प्रश्नातील चुकांमुळे जे अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत, त्यांची तीव्रता कमी होत नाही.
ज्या साडेबारा लाख विद्यार्थ्यांनी जानेवारीत परीक्षा दिली, त्या सर्वांना ४८ गुण आयतेच मिळणार असले, तरी काही विद्यार्थ्यांनी हे १२ प्रश्न सोडविण्यासाठी बरीच डोकेफोड करण्यात वेळ घालवला आणि त्यापायी त्यांचे पुढचे काही प्रश्न सोडवायचे राहिले, वा पुढील प्रश्नांवर विचार करायलाच फारसा वेळ मिळाला नाही आणि म्हणून कदाचित त्यांची उत्तरे चुकली, असे झाले असेल, तर त्याचे काय? अशा घटनांचे मोजमाप करता येणे शक्य नाही, हे मान्य, पण हे असे घडलेले असू शकते आणि त्यासाठी ‘एनटीए’ने काढलेले चुकीचे प्रश्न कारणीभूत ठरले, हे नाकारणार कसे? प्रवेश परीक्षा अधिक पारदर्शक आणि स्पर्धात्मक पद्धतीने व्हाव्यात, यासाठी एनटीए ही स्वायत्त संस्था स्थापण्यात आली. विषयतज्ज्ञ, माहिती तंत्रज्ञानातील सेवा आणि सुरक्षितता व्यावसायिक आदींची मदत घेऊन परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर करण्याचा मनोदय ‘एनटीए’ने आपल्या संकेतस्थळावरही जाहीर केलेला आहे. असे असूनही अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न, भाषांतरातील चुका, इंग्रजीतील प्रश्नपत्रिकेत ज्या प्रश्नासाठी एकाच उत्तराचा पर्याय बरोबर आहे, त्या प्रश्नासाठी भारतीय भाषांतील प्रश्नपत्रिकेत बरोबर उत्तराचे दोन पर्याय उपलब्ध असणे, अशा चुका हे हलगर्जीचे लक्षण नाही, तर काय आहे? गेल्या वर्षी याच ‘एनटीए’ने घेतलेल्या ‘नीट’ परीक्षेत गैरप्रकार झाले. अनेक विद्यार्थ्यांना, त्यातही काही ठरावीक केंद्रांवरील विद्यार्थ्यांना मिळालेल्या पैकीच्या पैकी गुणांवर अनेक शंका उपस्थित झाल्या. संपूर्ण परीक्षा पुन्हा झाली नसली, तरी संशय मात्र मिटला नाही. अशा वेळी ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली, त्यांचा विचार परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेने केला, असे म्हणायचे का?
प्रश्न फक्त ‘जेईई-मेन’मध्ये निघालेल्या १२ चुकांचा नाही, तर ‘एनटीए’च्या विश्वासार्हतेचा आणि पारदर्शकतेचा आहे. ‘एनटीए’ जेईई-मेनसह नीट, यूजीसी-नेट, जेएनयूची प्रवेश परीक्षा, जीपॅट, सीमॅटसह विविध व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा, ‘आयसीएआर’ची अखिल भारतीय प्रवेश परीक्षा, ‘आयआयएफटी’ची प्रवेश परीक्षा, ‘इग्नू’ची पीएचडी आणि ओपनमॅट परीक्षा, दिल्ली विद्यापीठाची प्रवेश परीक्षा आदी विविध प्रकारच्या परीक्षा घेते. दरवर्षी होणाऱ्या गैरप्रकारांमुळे या सर्व प्रवेश परीक्षांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. पदवी प्रवेशांच्या परीक्षांसाठी ‘एनटीए’सारखी स्वायत्त संस्था स्थापूनही ही अवस्था आहे, हा झाला एक भाग. दुसरा त्याहीपेक्षा नामुष्कीचा. आपल्या देशात कोणती परीक्षा यथास्थितपणे होते? बारावी, दहावीच्या परीक्षांत सामूहिक कॉपीबद्दल आजही कडक इशारे द्यावे लागतात. तरीही कॉपी होतेच. याचा ठपका परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेवर ठेवता येणार नाही, हे ठीक. पण ‘ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली, त्यांचे काय?’ हा प्रश्न यातूनही उरतोच.
परीक्षा देणाऱ्यांची- त्यासाठी प्रयत्नांत कसूर न करणाऱ्यांची पर्वा कुणाला, हा त्याही पुढला प्रश्न. तो तर आपल्या व्यवस्थांची लक्तरेच दाखवणारा. यूपीएससी, एमपीएससी आदी स्पर्धा परीक्षांबाबत, त्या कधी होणार इथपासून त्या सुविहित पार पडणार का, इथपर्यंतच्या प्रश्नांनी उमेदवारांची पाठ सोडणे थांबवलेले नाही. या सर्व परीक्षांना देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. या विद्यार्थ्यांना त्याची चांगली तयारी करता यावी, यासाठी या विद्यार्थ्यांचे पालक लाखो रुपये खर्च करून शिकवण्या लावतात. त्यासाठी घरे, जमिनी गहाण ठेवून पैसे उभे केले जातात. हे सगळे चांगल्या करिअरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असते. पहिल्या प्रयत्नात कमी गुण मिळाले, म्हणून दुसऱ्यांदा परीक्षेला बसणारेही अनेक जण आहेत. अशा वेळी प्रश्नपत्रिकेत इतक्या चुका करून किंवा गैरप्रकारांना आळा घालण्यात कमी पडून आपण किती जणांच्या आशा-आकांक्षांशी खेळतो आहोत, याचे भान परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांना खरेच आहे का? यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एकूणच परीक्षा व्यवस्थेविषयी अविश्वासाचे तण माजू लागले आहे. परीक्षांची पर्वा ज्या देशात- बरेच अप्रामाणिक परीक्षार्थी असूनसुद्धा- अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांना असते, त्या देशातल्या व्यवस्थेनेही परीक्षेचे गांभीर्य ओळखून कारभार सुधारायला हवा.