कट्टरपंथीयांच्या बिनडोकपणाकडे एक वेळ दुर्लक्ष करता येईल; पण मग अन्य नेमस्त इस्लामींनी पुढे येऊन या स्वधर्मीय अतिरेक्यांविरोधात भूमिका घ्यायला नको?

स्वत:चे चालते पाय स्वत:च्या हाताने कुऱ्हाड मारून कसे जायबंदी करावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेत न्यूऑर्लिन्स येथे नववर्षदिनी झालेला दहशतवादी हल्ला. त्यात ११ जणांचा हकनाक बळी गेला. त्यातील आरोपी ‘आयसिस’ या इस्लामी अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याचे प्राथमिक चौकशीतून दिसून येते. त्याआधी जर्मनीतील ख्रिसमस बाजारपेठेतील हल्ल्यात पाच जण ठार झाले. दोन्हीही हल्ल्यांतील मारेकऱ्यांची पद्धत एकच. गर्दीच्या स्थळी सुसाट वेगात वाहन घुसवायचे आणि जमेल तितक्यांस त्याखाली चिरडायचे. ना शस्त्राची गरज ना अस्त्राची. हे हल्ले अमेरिका आणि जर्मनी या देशांत का झाले, यांस तर्कशुद्ध उत्तर नाही. उद्या अन्य कोणत्या देशात तसे हल्ले होतील याचा अंदाज तर्काच्या आधारे बांधता येणार नाही. अमेरिकी सरकारने अलीकडे काही इस्लामचे वाकडे केले होते आणि जर्मनीने इस्लामच्या विरोधात काही पावले उचलली होती, असेही नाही. उलट हे दोन देश इस्लाम आणि इस्लामी याविषयी तूर्त अधिक सहिष्णू आहेत. अमेरिकेत डेमॉक्रॅटिक पक्षाची सत्ता आहे आणि जर्मनीत सहिष्णू असे ‘सोशल डेमॉक्रॅट्स’ सत्तेवर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे इस्लामीविरोधी नाहीत आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्झ यांच्याही मनात इस्लामविषयी शत्रुत्व नाही. तरीही या दोन देशांतील अश्राप नागरिकांस इस्लामी दहशतवाद्यांनी विनाकारण लक्ष्य केले. या दोन देशांतील राजकीय परिस्थिती लवकरच बदलेल. बायडेन यांच्या जागी सरळ सरळ इस्लामविरोधी डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येतील आणि जर्मनीतही होऊ घातलेल्या निवडणुकांत कडव्या उजव्यांस संधी मिळेल. म्हणजे आगामी काळ इस्लामींसाठी अनुक्रमे अमेरिका आणि जर्मनी आणि त्यामुळे युरोपात खडतर असेल. अशा वेळी आगामी काळात आपणास सहानुभूती मिळेल असे वागायचे की आपल्याविषयीचा संताप आणखी वाढेल अशी कृत्ये करायची?

Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
loksatta editorial on school droupout
अग्रलेख : शाळागळतीचे त्रैराशिक!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!

याचे भान इस्लाम धर्मीय मुखंडांना नाही आणि हीच खरी इस्लामींची समस्या आहे. युरोपातील ऑस्ट्रियापासून ते अटलांटिकपलीकडील अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत इस्लाम धर्मीयांबाबत संशयाचे वातावरण तयार होऊ लागले असून त्यास फक्त आणि फक्त इस्लाम धर्मीयच जबाबदार आहेत. आताही अमेरिकेत वा जर्मनीत झाले त्याचा निषेध करण्यास इस्लामी देश पुढे आल्याचे दिसत नाही; ते का? सध्या पश्चिम आशियातील एकाही देशात शांतता नाही. इजिप्त, सीरिया, लेबनॉन, येमेन, इराक, इराण इत्यादी अनेक दाखले देता येतील. यातील पॅलेस्टाइन आणि इस्रायल हा नापाक संघर्ष सोडल्यास अन्यत्रच्या अशांततेसाठी पाश्चात्त्य देशांस बोल लावता येणार नाही. सीरिया, येमेन, इराण आदी देशांतील राज्यकर्तेच नादान निघाले. कोणी जनतेच्या जिवावर अय्याशी करत राहिला तर अन्य कोणी धर्माच्या नावे आपल्याच देशांतील महिलांची मुस्कटदाबी करत राहिला. या इस्लामी- त्यातही तेलसंपन्न- देशांची लूट एके काळची महासत्ता इंग्लंड, नंतर अमेरिका या देशांनी केली हे खरे. ओसामा बिन लादेन वा इस्लामी धर्मवादाची काडी पेटवणारी ‘मुस्लीम ब्रदरहूड’ असो. ही सर्व अमेरिकी अर्थकारणातून आकारास आलेली पिलावळ हेही खरे. तथापि ते अर्थकारण संपले. सौदी अरेबिया, इराण यांसारख्या इस्लामी सत्तांनी आपापले अर्थकारण स्वत: राखण्यास सुरुवात केली. अशा वेळी त्याच अर्थकारणाचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल असे प्रयत्न करण्याऐवजी इस्लामी जगतातील एक घटक दहशतवादाचा अवलंब करताना दिसतो. हे मूर्खपणाचे आहे. ‘आयसिस’ने अमेरिकेत कितीही हाहाकार घडवून आणला तरी त्या देशाचे काहीही दीर्घकालीन नुकसान होणारे नाही. याआधी ‘अल कईदा’ने ‘९/११’ घडवले. त्याहीआधी त्याच वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती स्फोटकेधारी मालमोटारी आदळवून पाडण्याचा प्रयत्न युसुफ रामझी याने १९९३ साली केला. काय वाकडे झाले अमेरिकेचे? पाकिस्तानने भारतात २६/११ घडवून आणले. आज त्या देशाची अवस्था काय? आपली एक ‘टीसीएस’ कंपनी समग्र कराची स्टॉक एक्स्चेंजला खिशात टाकेल, ही त्या देशाची अवस्था.

हेही वाचा : अग्रलेख : सं. ‘मागा’पमानाची मौज!

ती इस्लामी धर्ममार्तंडांस दिसत नाही काय? दिसत असेल तर आता तरी जरा शहाण्यासारखे वागावे असे त्यांस वाटत नाही काय? या अशा दहशतवादी हल्ल्यांतून काय हाती लागणार? मुळात हे दहशतवादी काय मिळवू पाहतात? सद्या:स्थितीत इस्लामी जगाचा संताप एका कारणासाठी वैध असू शकतो. ते म्हणजे इस्रायलने पॅलेस्टिनी भूमीत चालवलेले वांशिक शिरकाण. इस्रायलला रोखण्याची ताकद फक्त अमेरिकेत आहे आणि अमेरिका त्यासाठी पुरेशी प्रयत्न करताना दिसत नाही, हे मान्य. या मुद्द्यावर अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन अगदीच नेभळट निघाले, हेही मान्य. पण म्हणून अमेरिकेतील निरपराधांची हत्या कशी क्षम्य ठरते? ‘आयसिस’ वा अन्य कोणा दहशतवादी संघटनेस इतकीच खुमखुमी असेल तर त्यांनी आपले जे काही आहे ते शौर्य पॅलेस्टिनी भूमी रक्षणार्थ दाखवावे. अमेरिकेत नववर्षाचा आनंद साजरा करू पाहणाऱ्यांवर गाड्या चालवण्यात कसला आला आहे धर्म? परत त्यातही यांची लबाडी अशी की हे इस्लामवादी पाश्चात्त्य जगातील भौतिक सुख-सोयींचा लाभ घेणार. तेथील सहिष्णू सामाजिकतेचा फायदा घेत स्वत:ची भौतिक प्रगती साधणार. आणि परत त्याच सहिष्णुतेने दिलेल्या सोयीसवलती दहशतवादासाठी वापरून स्थानिकांच्याच जिवावर उठणार, हे कसे आणि किती काळ सहन होईल?

जगभरातील अनेक देशांत सध्या राष्ट्रवादी ताकदींचे पुनरुत्थान मोठ्या प्रमाणावर होत असताना आपली कर्मभूमी ही मातृभूमी न मानणाऱ्या इस्लामी कट्टरपंथीयांसाठी आगामी काळ अधिकाधिक खडतर होत जाणार हे समजून न घेणे बिनडोकपणाचे आहे. या कट्टरपंथीयांच्या या बिनडोकपणाकडे एक वेळ दुर्लक्ष करता येईल. पण मग अन्य नेमस्त इस्लामींचे काय? त्यांनी पुढे येऊन या स्वधर्मीय अतिरेक्यांविरोधात भूमिका घ्यायला नको? अन्य कोणाचे ऐकतील न ऐकतील. पण इस्लामी कट्टरपंथीयांस स्वधर्मीय बांधवांकडे दुर्लक्ष करणे अवघड जाईल. कारण आधीच अन्य धर्मीयांमध्ये इस्लामच्या विरोधकांत वाढ होत असताना स्वपक्षीयांनीही पाठ फिरवली तर मग धर्म राहील कोणासाठी हा प्रश्न. आधीच जगात सध्या द्वेषाचे प्याले ओसंडून वाहत आहेत. अशा वेळी ही द्वेषभावना कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ते राहिले बाजूला. या इस्लामी कट्टरपंथीयांस या वास्तवाची जाणीवच नाही. अमेरिकेतील ताजा हल्ला करणाऱ्या ‘आयसिस’चे कार्यक्षेत्र लिबिया, इराकचा काही भाग, सीरिया आणि ‘लेवान्त’ नावाने ओळखला जाणारा पश्चिम आशियातील प्रदेश. हे ‘आयसिस’चे वेडेपीर अमेरिकेत जाऊन काय दिवे लावणार?

हेही वाचा : इस्लाम खतरे में है..

उलट या अशांमुळे शांततापूर्ण मार्गाने जगणाऱ्या अन्य इस्लामींचे आयुष्य अधिक खडतर होईल. आधीच ‘‘सर्व इस्लामी दहशतवादी नसतात; पण सर्व दहशतवादी इस्लामी असतात’’ अशी सुभाषिते फेकणाऱ्या मूर्खशिरोमणींची सध्या अनेक ठिकाणी चलती आहे. त्यांच्या संख्येत अशा दहशतवादी हल्ल्यांनी वाढच होईल. या इस्लामींच्या राजकीय मागण्या असतील तर त्यांनी त्या राजकीय मार्गांनी धसास लावाव्यात. हिंसा कोणत्याही धर्माने केली तरी ती निषेधार्हच असते. ‘लोकसत्ता’ ही भूमिका सातत्याने मांडत असून दहा वर्षांपूर्वी ‘इस्लाम खतरे में है’ या संपादकीयातूनही (७ डिसेंबर २०१५) ती व्यक्त करण्यात आली होती. तिचा पुनरुच्चार करण्याची गरज आणि वेळ आली आहे. कारण या अशा अतिरेक्यांमुळे इस्लाम आता खरोखरच खतरे में आहे.

Story img Loader