कृत्रिम प्रज्ञेबाबत प्रश्न येतो तो तारतम्याचा आणि त्याही पुढे जाऊन आपले अस्तित्व टिकविण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा हा…

‘कृत्रिम प्रज्ञेपेक्षाही मला चिंता आहे, ती आपण नैसर्गिकरीत्या जो मूर्खपणा करतो, त्याची,’ असे युवाल नोआह हरारी म्हणतो, तेव्हा त्याने गृहीत धरलेले असते, की कृत्रिम प्रज्ञेचा वापर मूर्खांच्या हाती जाऊन त्याने विधायकापेक्षा विघातकच अधिक घडेल. त्याचे म्हणणे असते, की मानवाने इतिहासात, विशेषत: नजीकच्या इतिहासात वंशवाद, असमानता, पुरुषी वर्चस्ववाद असा जो काही ‘मूर्ख’पणा करून ठेवलेला आहे, त्याच विदेवर वा माहितीसाठ्याच्या आधारावर कृत्रिम प्रज्ञा पोसली जाणार असेल, तर तीही तशीच ‘वागेल’. यातले दुसरे म्हणणे असेही, की हे तंत्रज्ञान माहितीची सहज मोडतोड करण्यात इतके पटाईत आहे, की अनेकांना नैसर्गिकपणे याच वापराने खुणावले, तर नवल नाही. थोडक्यात, ‘कृत्रिम प्रज्ञा : शाप, की वरदान’ या विषयावरील निबंध हरारीने स्वत:च्या प्रज्ञेने लिहिला, तर त्याचा झुकाव प्रामुख्याने शापाकडे असण्याची शक्यता अधिक. हरारीप्रमाणेच कृत्रिम प्रज्ञेच्या संभाव्य धोक्यांपासून सावध करणारे आणि त्या कारणासाठी गेल्या वर्षी ‘गूगल’मधून बाहेर पडलेले जेफ्री हिंटन यांना सरत्या आठवड्यात त्यांच्या कृत्रिम प्रज्ञेतील कामासाठीच नोबेल पारितोषिक जाहीर झाले, तेव्हा ही चर्चा ओघानेच पुन्हा सुरू झाली.

loksatta editorial on ratan tata
अग्रलेख: जीवन त्यांना कळले हो…
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
loksatta editorial haryana assembly election
अग्रलेख: मते आणि मने!
Haryana and jammu Kashmir assembly election
अग्रलेख: अ-पक्षांचा जयो झाला…
make in india
अग्रलेख: मंदावले ‘मेक इन…’!
israeli attacks targeting hamas and hezbollah fighters
अग्रलेख : अधर्मयुद्धाचा अंत?
Israel hamas war anniversary
अग्रलेख : निष्क्रिय सज्जनांचा श्राद्धदिन!
Classical Language Status For Marathi
अग्रलेख : ‘अभिजात’तेचे भोक!

हिंटन यांना प्रिन्स्टन विद्यापीठातील प्राध्यापक जॉन हॉपफिल्ड यांच्या जोडीने हे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. आधुनिक कृत्रिम प्रज्ञेचा पाया रचण्याचे क्रांतिकारी काम केल्याबद्दल या दोघांना हा सन्मान जाहीर होत असल्याचे नोबेल समितीने म्हटले. या दोघांचे कार्य काय, तर त्यांनी असे ‘आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क’ किंवा कृत्रिम मज्जातंतू जाळे तयार केले, की जे मानवी मेंदूप्रमाणे आठवणी साठवू शकते आणि वेळ पडेल, तेव्हा ती परत आठवू शकते! इतकेच नाही, तर हे जाळे त्यांना पुरविल्या जाणाऱ्या माहितीद्वारे स्वत: शिकूही शकते. यातील हॉपफिल्ड यांना ज्या कारणासाठी गौरविण्यात आले आहे, त्याचे महत्त्व असे, की त्यांनी या कृत्रिम मज्जातंतू जाळ्यात अशा प्रकारची सहयोगी स्मृती तयार केली, की जी माहितीसाठ्यातील प्रतिमा आणि इतर काही प्रकारचे आकृतिबंध साठवूही शकेल आणि त्यांची पुनर्बांधणीही करू शकेल. म्हणजे सोपे करून सांगायचे, तर एकदा का प्रतिमा स्वरूपातील माहितीसाठा पुरवला, की त्याद्वारे वेगवेगळ्या प्रतिमा किंवा आकृतिबंध निर्माण करणे शक्य होईल. तर, हिंटन यांचा सन्मान अशासाठी, की त्यांनी कृत्रिम मज्जातंतू जाळे माहितीसाठ्याच्या वैशिष्ट्यांचा स्वतंत्रपणे शोध घेऊ शकेल, अशी पद्धत शोधून काढली. हिंटन यांनी शोधून काढलेली ही पद्धतच सध्या कृत्रिम प्रज्ञेच्या उपयोजनात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. आता दोघांनाही हे पारितोषिक मिळाले आहे, ते भौतिकशास्त्रासाठी. पण, यावर एक प्रश्न उपस्थित होतो आहे, तो असा, की ‘आर्टिफिशयल न्यूरल नेटवर्क’चा भौतिकशास्त्रातील संशोधनात प्रचंड उपयोग आहेच, पण हे जाळेच मुळात भौतिकशास्त्रातील संशोधनाचा परिणाम असेल, तर त्या परिणामातील संशोधनाला नोबेल कसे काय मिळू शकते? थोडक्यात, हे भौतिकशास्त्रावर उभ्या असलेल्या संगणकशास्त्रातील संशोधन आहे, मूलभूत भौतिकशास्त्रातील संशोधन नाही, असे टीकाकारांचे म्हणणे. अर्थात, त्याला प्रतिवादही आहेच. तो असा, की कृत्रिम प्रज्ञा विज्ञानातच परिवर्तन घडवत असताना आणि तिचा वापर कण भौतिकी, खगोल भौतिकीमधील प्रगत संशोधनात होत असताना, तिच्या शोधातील पितामहांना गौरविणे औचित्याचे. प्रचंड प्रमाणातील माहितीसाठ्याचे विश्लेषण करू शकणारे कृत्रिम मज्जातंतू जाळे अस्तित्वात येईल, असा विचारही नवे शतक सुरू होताना कुणी केला नव्हता, ते आता प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे, ऐंशीच्या दशकात त्याचा पाया रचणाऱ्यांचा गौरव खचितच योग्य, असे हिंटन आणि हॉपफिल्ड यांच्या संशोधनाला मूलभूत मानणाऱ्यांचे म्हणणे. या दोघांच्या संशोधनामुळेच आज आपण यंत्रांच्या साह्याने काही क्षणांत अचूक भाषांतर मिळवू शकतो, चेहरेपट्टी ओळखणारी यंत्रणा हजेरीपट म्हणून वापरू शकतो आणि जे ‘जनरेटिव्ह एआय’चे आविष्कार मानले जातात, असे चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड असे चॅटबॉट तर आपले रोजचे सहकारी झाले आहेत.

हेही वाचा : अग्रलेख: मते आणि मने!

कृत्रिम प्रज्ञेच्या पितामहांना नोबेल मिळणे याबाबत उलटसुलट चर्चा होणार, हे अपेक्षितच होते. त्यासाठी कारणीभूत ठरते आहे, ती हिंटन यांनी गूगल सोडताना मांडलेली भूमिका. त्यांचे म्हणणे आहे, की कृत्रिम प्रज्ञेचा गैरवापर हा येत्या काळात मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न होऊ शकतो. आता अशा हिंटनना कृत्रिम प्रज्ञेच्याच शोधासाठी नोबेल मिळणे ही विसंगती नाही तर काय! पण तरी त्या विसंगतीतून विनोद किंवा व्यंग्य नाही, तर तारतम्याच्या दिशेने घेऊन जाणारी एक वाट दिसते ती पाहायला हवी. हिंटन यांनी गूगल सोडले, त्या वेळी गूगलची प्रतिस्पर्धी कंपनी मायक्रोसॉफ्टने त्यांच्या बिंग या सर्च इंजिनमध्ये कृत्रिम प्रज्ञाधारित चॅटबॉटचा वापर सुरू केला होता आणि गूगलला आपल्या सर्च इंजिन व्यवसायाला धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊन त्यांनीही सर्च इंजिन प्रभावी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले होते. हिंटन यांचे म्हणणे असे, की हे चॅटबॉट फारच धोकादायक ठरू शकतात. उदाहरणार्थ, या चॅटबॉटकडे भरपूर प्रमाणात माहिती तयार करण्याची क्षमता असल्याने एखादी एकाधिकारशाही व्यवस्था त्याचा वापर करून सर्व मतदार, मतदान यंत्रणेवर प्रभाव टाकून तिला आपल्या आधिपत्याखाली आणू शकते. त्यांच्या मते, ज्या प्रकारची कृत्रिम प्रज्ञानिर्मिती सुरू आहे, ती मानवाच्या प्रज्ञेच्या तुलनेत खूप वेगळी आहे. एखाद्या ठिकाणी दहा हजार लोक आहेत आणि त्यातील एकाला काही तरी समजले, तर इतर ९,९९९ जणांना ते आपसूक समजेलच, इतक्या वेगाने या चॅटबॉटची ‘बुद्धी’ वाढू शकते. त्यामुळे एका चॅटबॉटला एका सामान्य माणसापेक्षा किती तरी अधिक माहिती-ज्ञान असणे आता सहज शक्य होणार आहे. ही कृत्रिम प्रज्ञा माणसाच्या बौद्धिक क्षमतेला मागे टाकेल, हा धोका ते कायम अधोरेखित करतात.

हेही वाचा : अग्रलेख: जीवन त्यांना कळले हो…

आता प्रश्न असा, की इतके धोके असतील, तर त्याची निर्मिती का केली गेली आणि त्याहून म्हणजे त्यासाठी त्याला नोबेलने गौरविण्याचे कारण काय? इथेच आहे ती उपरोल्लेखित विसंगती. त्याचे उत्तर असे, की मानवी बुद्धीने कृत्रिम प्रज्ञेला ‘जर’ हिंटन म्हणतात, तशा पद्धतीने वापरायचे ठरवले, ‘तर’ त्याचा धोका खूप जास्त आहे. एरवी, कृत्रिम प्रज्ञा आरोग्य, डिजिटल साह्य, कारखान्यांतील उत्पादकता यांसाठी प्रचंड उपयोगी आहेच की. प्रश्न येतो तो तारतम्याचा आणि त्याही पुढे जाऊन आपले अस्तित्व टिकविण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा हा. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्यातील पहिली ओळ सांगते, ‘यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किं।’ स्वत:चे डोके न वापरण्याला शास्त्रही काही मदत करू शकत नाही, असा ढोबळ अर्थ. पण, अन्वयार्थ असा, की तरतम भाव नसेल, तर विवेकाला ओहोटी लागलीच समजा. कृत्रिम प्रज्ञेच्या बाबतीतही हेच खरे. हा तरतम भाव ठेवून करायचे काय, तर कृत्रिम प्रज्ञा आपली मालक होणार नाही, हे किमान शिकणे. तिला योग्य प्रश्न विचारणे आपल्या हाती आणि त्यावर तिच्याकडून मिळालेल्या उत्तराचे पृथक्करण करून त्यातील योग्य काय तेच घेणेही आपल्या हाती. आता त्यातील योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक कसे ठरवायचे, हाही प्रश्नच. पण, ते तर आपल्या दैनंदिन आयुष्यातही आहेतच. नियम पाळून गाडी चालवावी, हे तारतम्य, तो तोडला की शिक्षा होणार, हा परिणाम आणि दुसऱ्याने तोडला, तर आपला अपघात होण्याची शक्यता, हे शेवटी प्राक्तन. आपण तारतम्य ठेवलेले बरे!

हेही वाचा : अग्रलेख: अ-पक्षांचा जयो झाला…

बाकी, हिंटन यांची माहिती गूगलवर शोधू जाता, गूगल त्यांची कृत्रिम प्रज्ञेच्या विरोधातील भूमिकेची माहिती वा बातम्या दडवून ठेवत नाही. आता ही व्यापक लोकशाही वगैरे दृष्टी आहे, की निव्वळ व्यावसायिक भूमिका, असा प्रश्न पडतो. तो प्रस्तुत, की अप्रस्तुत याचे उत्तर ज्याने-त्याने आपापल्या प्रज्ञेने मिळवावे!