‘पाश्चात्त्यांसाठी कृष्णकृत्ये केल्याची शिक्षा’ मिळत असल्याचे म्हणण्याची वेळ पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांवर का आली, हा विचार भारतीयांनीही करावा…
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी ‘स्काय न्यूज’ या वाहिनीस दिलेली मुलाखत काश्मिरात सध्या जे सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते. ‘‘इतिहासात पाश्चात्त्यांसाठी पाकिस्तानने अनेक कृष्णकृत्ये (डर्टी वर्क) केली; त्याची शिक्षा आम्ही आता भोगत आहोत’’, असे हे असीफ म्हणतात. त्याचा संदर्भ आहे तो अमेरिका, इंग्लंड यांच्यासाठी पाकिस्तानने दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालवली वगैरे उद्योगांशी. त्यांचे हे विधान ही कबुली नाही की ते पापक्षालनार्थ केलेले पश्चात्तापदग्ध विधानही नाही. मुलाखतीच्या ओघात पाश्चात्त्य देशांच्या पदरात त्यांच्या पापाचे माप घालण्यासाठी असीफ असे म्हणाले. ‘‘पाकिस्तानला आता तुम्ही बोल लावत असलात तरी एकेकाळी पाकिस्तानने तुमच्यासाठी बरेच काही केले…’’, याची आठवण करून देत पाकिस्तानचे हे संरक्षणमंत्री, पाकिस्तानने जे केले ते केले नसते तर तुमची (पाश्चात्त्यांची) काय पंचाईत झाली असती याची जाणीव करून देतात. म्हणून त्यांच्या या विधानात एक प्रकारचा ‘सुनावण्याचा’ सूर दिसतो. त्यावर भाष्य करण्याआधी पाकिस्तानने इतिहासात पाश्चात्त्यांसाठी नक्की काय केले याची उजळणी करून भारत वेगळा का ठरतो हे समजून घेणे आवश्यक. कारण धोरणकर्त्यांची धारणा केवळ द्वेष या एकच एक भावनेभोवती फिरत राहिली की काय होते याचा पाकिस्तान हा नमुना.
आपल्यासमवेत १९४७ साली अस्तित्वात आल्यापासून पाकिस्तान हा अमेरिकेच्या अंकित राहिला. भारताच्या सोव्हिएत सौजन्यास पर्याय म्हणून अमेरिकेने सुरुवातीपासून पाकिस्तानला गोंजारले आणि राष्ट्र म्हणून स्वतंत्र सत्त्वनिर्मितीस महत्त्व न देता पाकिस्तान या अमेरिकी कुरवाळणीत धन्यता मानत राहिला. नंतर अफगाणिस्तानात १९७९ सालच्या डिसेंबरात सोव्हिएत रशियाचे सैन्य घुसल्यानंतर तर पाकिस्तान हा अमेरिकी लष्कराचा अघोषित तळ बनला. सोव्हिएत रशियाचा पराभव अथवा त्या देशास जमेल तितका अपशकुन करण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले आणि पाकिस्तान त्या देशाच्या तालावर नाचत राहिला. पाकिस्तानचे झिया उल हक यांच्यासारखे लष्करी अध्यक्ष हे तर त्या वेळी अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांचे पगारी नोकर असल्यासारखे वागले. अफगाणिस्तानात तैनात सोव्हिएत सैनिक मोठ्या प्रमाणावर अफूच्या व्यसनात गुरफटावेत यासाठी अमेरिकेने त्या काळात कुटिल योजना आखली आणि पाकिस्तानने ती आनंदाने राबवली. त्याचमुळे जनरल झिया यांच्या स्वीस बँकेतील लॉकरमधून डॉलर्स शब्दश: ओसंडून वाहात होते. या बेजबाबदार धोरणाचा फटका अखेर अमेरिका आणि पाकिस्तानलाच बसला कारण त्या देशांतही अफू व्यसनग्रस्तांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. तरीही पाकिस्तानी नेतृत्वास अक्कल म्हणून काही आली नाही. पुढे पश्चिम आशियाच्या वाळवंटातील अस्थिरतेतही पाकिस्तानने कोणताही साधकबाधक विचार न करता सातत्याने अमेरिकेची तळी उचलली आणि त्याचवेळी धर्माच्या मुद्द्यावर तो देश ओसामा बिन लादेनसारख्यांचा आश्रयदाता बनला. या बदल्यात पाकिस्तानला काहीच मिळत नव्हते असे नाही. पण जे मिळत होते ते पाकिस्तानी नेतृत्व आणि लष्करशहांच्या खिशात जात होते. जगातील अन्य बऱ्याच लष्करांप्रमाणे पाकिस्तानी लष्करी यंत्रणा ही कमालीची भ्रष्ट असून अन्य अनेक लष्करांप्रमाणे तीही ‘राष्ट्रप्रेम’, ‘देशासाठी त्याग’ इत्यादी शब्दावरणांखाली आपले पाप लपवत आली आहे. त्यामुळे ख्वाजा असीफ म्हणतात त्याप्रमाणे इतिहासातील कृष्णकृत्यांचा काहीही फायदा देश म्हणून पाकिस्तानला झाला नाही. उलट त्यातून त्या देशाचे नुकसानच झाले. त्याचीच शिक्षा तो देश सध्या भोगत आहे. असीफ यांच्या विधानातून आपण लक्षात घ्यावे असे प्रमुख मुद्दे दोन.
पहिला म्हणजे आपल्या तत्कालीन राज्यकर्त्यांचा द्रष्टेपणा. आपल्या आजच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुदृढतेचे श्रेय निर्विवादपणे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे. पं. नेहरू यांच्या कथित सोव्हिएत प्रेमास आज अनेक खुरटे बोल लावताना दिसतात. या अर्धवटरावांस हे माहीत नसते की अमेरिकेच्या तत्कालीन नेतृत्वाच्या आडमुठेपणामुळे आपणास सोव्हिएत रशियाची मदत घेणे भाग पडले. मुंबईच्या समुद्रात ‘बॉम्बे हाय’साठी अगदी साधा तेलविहीर उभारणीस सहाय्य करण्याचा मुद्दा असो वा त्याआधी देशात पोलाद खाणी आणि कारखान्यांचा प्रश्न असो. आपणास अमेरिकेने त्यासाठी तंत्रज्ञान नाकारले. आज लक्षावधी भारतीयांसाठी अमेरिकी ग्रीनकार्ड हा मुक्तीचा मार्ग असला तरी आणि त्या देशात सुखोपभोग घेत असताना भारतमातेच्या प्रेमाने या अमेरिकावासी भारतीयांचा कंठ दाटून येत असला तरी अमेरिकेने भारतास अनेकदा कस्पटासमान वागवले, हे सत्य. परिणामी पं. नेहरू आणि त्या पश्चात लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी ‘लौंदासी आणून भिडवावा दुसरा लौंद’ या समर्थ रामदासी उक्तीप्रमाणे अमेरिकी लौंदाविरोधात रशियन लौंदास जवळ केले. पण तरीही आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणातील तटस्थतेस तिलांजली देऊन आपले पूर्वसुरी ना अमेरिकेच्या कह्यात गेले ना सोव्हिएत रशियाच्या. पं. नेहरू यांनी घालून दिलेल्या मार्गानेच आपले विद्यामान सत्ताधीश मार्गक्रमण करताना दिसतात हे सत्य लक्षात घेतल्यास पहिल्या पंतप्रधानांच्या मोठेपणाची खात्री पटावी. आर्थिक पातळीवर सरकारी मालकीच्या कंपन्यांची पाठराखण ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील तटस्थता यातील सर्व मुद्द्यांवर कोणी कितीही काहीही आदळआपट केली तरी पं. नेहरू यांच्या धोरणांपासून आपणास आजही फारकत घेता आलेली नाही, हे सत्य लपून राहणे अवघड. त्यामुळे पाकिस्तानच्या विद्यामान सत्ताधीशांवर जशी पूर्वसुरींच्या चुकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कबुली देण्याची वेळ आली तशी आपल्या राज्यकर्त्यांवर आली नाही. यासाठी तरी विद्यामान सत्ताधीश पं. नेहरू आदींचे ऋण निश्चित मानतील. ते न मानण्याचा कोतेपणा दाखवण्याइतके ते कृतघ्न नाहीत. हा एक मुद्दा.
आणि त्याच वेळी आपल्या पूर्व नेतृत्वाने पाकिस्तानी राज्यकर्त्यांप्रमाणे धर्मवाद्यांस कधी डोक्यावर बसू दिले नाही ही बाबदेखील तितकीच कौतुकाची. आज पाकिस्तानची अशी दशा होण्यामागील प्रमुख कारण तो देश धर्मसत्ता की राजसत्ता यांतील प्राधान्यक्रम कधीच निश्चित करू शकला नाही; हे आहे. सोव्हिएत रशियाविरोधात अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या बाजूने ओढण्यात धर्माचा चतुर वापर केला, हा इतिहास. ‘धर्म न मानणाऱ्या साम्यवाद्यांना’ रोखण्यासाठी आम्हास साथ द्या ही अमेरिकेने सौदी अरेबिया ते पाकिस्तान अशा अनेक इस्लामी देशांस घातलेली साद. धर्मसत्तेच्या प्रभावाखाली असलेल्या पाकिस्तानादी देशांचे नेतृत्व अमेरिकेने फेकलेल्या या धर्मजाळ्यात फसले. त्याची परिणती कशात झाली ते आज या देशांकडे पाहिल्यावर कळावे. त्यातील अनेक देशांच्या बरोबर स्वतंत्र झालेला भारत या सगळ्या वाताहतीपासून वाचला याचे एकमेव कारण आपल्या पूर्वसुरींनी धर्मवाद्यांस कधीही डोक्यावर बसू दिले नाही; हे आहे. पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यामागे त्या देशाच्या राज्यकर्त्यांचा धर्मविचार होता आणि १९९८च्या अणुचाचण्यांनंतर अमेरिकेने भारत-पाकिस्तान दोघांवरही निर्बंध लादलेले असताना सौदी अरेबियासह अनेक देशांनी पाकिस्तानला रसदपुरवठा सुरू ठेवला त्यामागेही धर्मच होता. असे काहीही आपल्याबाबत झाले नाही. कारण धर्मसत्तेस राजसत्तेपासून चार हात दूर ठेवण्याचा शहाणपणा आपल्या आधीच्या राज्यकर्त्यांनी दाखवला. हे भान सुटल्याने पाकिस्तानचे विद्यामान संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांच्यावर इतिहासातील चुका मान्य करण्याची वेळ आली. तथापि ‘जाहल्या काही चुका…’ अशी केवळ कबुली दिल्याने भागणारे नाही. त्याचबरोबर धर्मवाद्यांनी दिलेले ‘तू दिलेले गीत माझे आवडीने गाईले…’ असे न म्हणता ते गीत त्याजण्याची तयारीही हवी. भारताने ती हिंमत दाखवली म्हणून आपला ‘पाकिस्तान’ झाला नाही; ही बाब नजरेआड न करण्याचा विवेक आपले राज्यकर्ते दाखवतील ही आशा.