एके काळी पाकिस्तानी क्रिकेटला वैभव मिळवून देणारे त्या देशाचे कप्तान इम्रान यांना राजकारणातील फिक्सिंगने का व कशी भुरळ पाडली, हे सांगता येत नाही.

पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून लढण्याची इम्रान खान यांची पात्रता तेथील एका न्यायालयाने रद्द ठरवली आहे. या निवडणुका म्हणजे एक प्रकारचे ‘फिक्सिंग’ असल्याची मल्लिनाथी इम्रान यांनी एका मुलाखतीत केली होती. गेल्या दोन दिवसांत दोन प्रकरणांमध्ये तेथील न्यायालयांनी इम्रान यांना १० आणि १४ वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षा ठोठावल्या आहेत. याआधीच एका प्रकरणात त्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा झालेली होती. म्हणजे आता एकूण तीन शिक्षा. त्या एकाच काळात भोगायच्या की पाठोपाठ भोगायच्या याविषयी स्पष्टता नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इम्रान यांना अपात्र ठरवण्यासाठी काही खटल्यांचा निपटारा विलक्षण तातडीने करण्यात आला. गतवर्षी ऑगस्ट महिन्यापासून इम्रान एका प्रकरणात अटकेत आहेत. त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही असे पाकिस्तानातील विश्लेषक सांगतात. परंतु दरम्यानच्या काळात इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)च्या समर्थकांचीही मोठ्या प्रमाणात धरपकड झाली. गतवर्षी इम्रान यांना पाकिस्तानी कायदेमंडळात अविश्वास ठराव आणून सत्ताच्युत करण्यात आले, त्यावेळी इम्रान यांनी त्यांच्या लोकप्रियतेचा आणि ‘जमावबळा’चा वापर केला होता. तशी संधी त्यांना मिळू नये आणि निवडणूक कार्यक्रमामध्ये त्यांच्या समर्थकांनी वाजवीपेक्षा अधिक व्यत्यय आणू नये याची पुरेपूर खबरदारी पाकिस्तानी लष्कराने घेतलेली दिसते. जो तलवारीच्या बळावर जगतो, तो बहुतेकदा तलवारीनेच संपतो या अर्थाचे एक वचन आहे. पाकिस्तानच्या संदर्भात थोडा बदल करून, जो लष्कराच्या साह्याने सत्ताधीश होतो, तो लष्कराच्याच मर्जीने सत्ताभ्रष्टही होतो असे म्हणावे लागेल. गेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी इम्रान खान हे लष्कराच्या खास मर्जीतले होते. त्यामुळेच तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी त्यांना पंतप्रधानपदावर बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजच्या पाकिस्तानी लष्करी व्यवस्थेला इम्रान नकोसे झाले आहेत. त्यामुळे आणखी कोणी सत्तेवर बसतील. इम्रान यांच्या विरोधात गतवर्षी पाकिस्तानातील दोन प्रमुख पारंपरिक पक्ष एकत्र आले होते. आता ते उद्दिष्ट साध्य झाले आहे आणि इम्रान यांचा काटा दूर झालेला आहे. तो दूर करण्यासाठी ज्या प्रकरणांचा आणि खटल्यांचा आधार घेण्यात आला, त्यांचा धांडोळा प्रथम घ्यावा लागेल.

Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Sunil Gavaskar opinion on Bumrah being a contender for the captaincy sport news
कर्णधारपदासाठी बुमराच दावेदार! नेतृत्वाच्या जबाबदारीचे दडपण घेत नसल्याचे गावस्कर यांचे मत
Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
Yuvraj Singh expresses his feelings on India defeat against New Zealand sports news
न्यूझीलंडविरुद्धचा पराभव सर्वात निराशाजनक; माजी अष्टपैलू युवराज सिंगची भावना

हेही वाचा >>> अग्रलेख: परीक्षा पे चर्चा!

यांतील दहा वर्षांची शिक्षा ही सरकारी गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केल्याबद्दलची आहे. हे प्रकरण ओळखले जाते सायफर केस या नावाने. सरकारी गोपनीयता कायद्याअंतर्गत एक विशेष न्यायालय घाईने स्थापण्यात आले आणि त्यामध्ये इम्रान आणि त्यांचे सहकारी व माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या विरोधात खटला चालला. अशाच प्रकारे यापूर्वीही खटला चालवल्याबद्दल इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दोन वेळा आक्षेप नोंदवत फेरसुनावणी घ्यायला लावली होती. आताही ज्या विनोदी प्रकारे सुनावणी झाली, ती पाहता पुन्हा एकदा खटला घेतला जाण्याची शक्यताच अधिक. आदियाला तुरुंगात विशेष न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली, त्यावेळी बचाव पक्षाला स्वत:चे म्हणणे मांडण्याची संधीही मिळाली नाही. त्यांना वकील पुरवण्यात आला, तोही त्यांच्या संमतीविनाच आणि सरकारी! सरकारी वकीलच बचाव वकील म्हणून उभा राहण्याचा अद्भुत प्रकार केवळ पाकिस्तानातच घडू शकतो. साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची संधी बचाव पक्षाला दिली गेली नाही. जणू काही एखादी कालमर्यादा घालून दिल्यागत खटला चालवला गेला आणि रात्री उशिरा निकालही दिला गेला. सरकारी वकिलांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना मृत्युदंड ठोठावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे इतक्या गंभीर खटल्याची सुनावणी इतक्या हास्यास्पद पद्धतीने घेण्याचे काही प्रयोजन नव्हते. परंतु पाकिस्तानात राजकीय व्यवस्था मुळातच हास्यास्पद पद्धतीने मार्गक्रमित होत असल्यामुळे यात तसे आश्चर्यकारक काही नाही. इम्रान स्वत:च मुळात अनेकदा पंतप्रधानपदावर असतानाही हास्यास्पद प्रकारे वागले होते. सायफर प्रकरणही त्यातलेच.

हेही वाचा >>> अग्रलेख : लाळघोटे लटकले!

गतवर्षी विरोधकांच्या एकीसमोर आणि रेट्यापुढे पायाखालची जमीन सरकू लागल्याची जाणीव होताच कट कथानकाचा हुकमी एक्का इम्रान यांनी बाहेर काढला. यातून त्यांचाच ऱ्हास होईल, हे उमगण्याची परिपक्वता इम्रान यांच्यात कधीही नव्हती. त्यांनी दावा तरी काय करावा? तर गतवर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या विरोधात विरोधकांमार्फत अविश्वास ठराव आणून त्यांना पराभूत करण्याचा कट म्हणे अमेरिकेने रचला, पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने! याची वाच्यता करणारी तार अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूतांनी इम्रान खान सरकारला पाठवली. तो चिटोराच समर्थकांसमोर नाचवत कट कथानकाच्या जोरावर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न इम्रान यांनी केला. तोच अंगाशी आला. ती चिठ्ठी गोपनीय होती आणि सार्वजनिक मंचावर प्रसृत करण्यासारखी नव्हती, इतका मुद्दा इम्रान यांना दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यास पुरेसा ठरला. या शिक्षेच्या दुसऱ्याच दिवशी इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना तोशखाना या आणखी एका गाजलेल्या तोशखाना प्रकरणात प्रत्येकी १४ वर्षे कारावास आणि जबर दंडाची शिक्षा झाली. तोशखाना प्रकरणे दोन. यांतील पहिल्या प्रकरणात झालेल्या तीन वर्षांच्या शिक्षेमुळे इम्रान यांना यंदाची निवडणूक लढवता येणार नाही, हे निश्चित झाले. दुसऱ्या प्रकरणामध्ये आणखी मोठा कारावास सुनावत इम्रान यांना राजकारणातून पूर्ण हद्दपार करण्याचा प्रयत्न दिसतो. तोशखाना म्हणजे सरकारी दिवाणखान्यामध्ये, पंतप्रधान म्हणून इम्रान यांना मिळालेल्या भेटवस्तूंची व्यवस्था लागणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या वस्तू पोहोचल्या इम्रान यांच्या खासगी दिवाणखान्यात! वास्तविक अशा प्रकारे सरकारी भेटवस्तू लंपास करणारे ते काही पाकिस्तानातील पहिले राजकारणी नव्हेत. परंतु छोट्यातील छोट्या चुकीबद्दल कठोरातील कठोर शासन करण्याचा इम्रान यांच्याविषयीचा लष्कराचा मनसुबा अलीकडे वारंवार दिसून येत आहे. पाकिस्तानी राजकारणात शाश्वत असे काही नसते. काही वर्षांपूर्वी नवाझ शरीफही राजकारणातून संपले असे वाटत असताना, आता त्यांचे पुनरुज्जीवन होताना दिसत आहे. बहुवार्षिक शिक्षा ठोठावली जाऊन आणि निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जाऊनही आज हीच व्यक्ती उजळ माथ्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यास सिद्ध झाली आहे. याचे कारण नवाझ शरीफ आणि त्यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) पक्षाचे चलनमूल्य उच्च आहे. हेच बेनझीरपश्चाततील पाकिस्तान पीपल्स पार्टीबद्दलही म्हणता येईल. झरदारी-भुत्तो वंशज बिलावल यांचे राजकीय वजन तेथे सध्या वाढलेले दिसते. एके काळी या दोन्ही पक्षांना सळो की पळो करून सोडलेले लष्करशहा परवेझ मुशर्रफ मात्र गतवर्षीच परक्या देशात खंग-विकलांग दशेत संपून सुपूर्द-ए-खाक झाले. त्या देशात शाश्वत असते लष्कराची राजकारण, अर्थकारण, न्यायकारणावरील पकड. याशिवाय शाश्वत असते अमेरिकेविषयी प्रेम-नफरतीचे चक्र. आणि शाश्वत असते जिहादी दहशतवाद्यांचे अस्तित्व आणि महत्त्व. त्याच्या बरोबरीने काश्मीर आणि क्रिकेटची नशा. हे सर्व घटक ‘फिक्स’ म्हणजे शाश्वत असतात नि पाकिस्तानी लष्करशहा हे तेथील खरेखुरे ‘फिक्सर’ असतात. एके काळी पाकिस्तानी क्रिकेटला वैभव मिळवून देणारे त्या देशाचे कप्तान इम्रान यांना राजकारणातील फिक्सिंगने का व कशी भुरळ पाडली, हे सांगता येत नाही. पण लष्कर आणि अमेरिकेला शिंगावर घेऊन या बेगडी ‘फिक्सर’ची आज जी फजिती झाली, ती पाहता या खाँसाहेबांनी क्रिकेटमधील सिक्सरपुरतीच आपली महत्त्वाकांक्षा सीमित ठेवायला हरकत नव्हती, असे म्हणायला हरकत नाही.

Story img Loader