बेरोजगारी, कौशल्याचा आणि संधींचा अभाव, गरिबी या दुष्टचक्रात आजचा तरुण असल्याचे वास्तव संसदेतील ‘धूरहल्ल्या’तूनही एक प्रकारे अधोरेखित झाले..

‘तुम्ही मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठांवरची गाणी सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो..’ असे ‘कुणी तरी’ म्हटले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना प्रेक्षक दालनातून उडी मारून संसदेच्या सभागृहात येणाऱ्या आणि ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत तथाकथित ‘कलर बॉम्ब’ उडवणाऱ्या तरुणांच्या ओठांवरचे हे शब्द ऐकून हा ‘कुणी तरी’ आपल्या देशाचे भवितव्य सांगू जाईल तर ते नेमके काय असेल? त्याचे म्हणणे काय असेल ते असो, पण ही घटना गंभीर खरीच. लोकशाही देशाचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या संसदेवर वीस वर्षांपूर्वी याच तारखेला म्हणजे १३ डिसेंबरला दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा अवघ्या देशाचा थरकाप उडाला होता. एखाद्या हत्तीच्या गंडस्थळावर वार करण्याइतकाच तो हल्ला गंभीर होता. त्याबद्दल पुढे काय व्हायचे ते सोपस्कार झाले. असे पुन्हा होऊ नये यासाठी सुरक्षाव्यवस्थेची मानके बदलली, ती अधिक कडक झाल्याचेही आपल्याला सांगण्यात आले. अशा कडक सुरक्षाव्यवस्थेला भेदून २०-२२ वर्षांचे दोन तरुण संसदेच्या सभागृहात तर त्यांचे दोन साथीदार संसदेच्या परिसरात नळकांडया फोडून रंगीत धूर पसरवतात आणि घोषणा देतात या प्रकाराला काय म्हणायचे? तो पोरासोरांनी केलेला उद्योग असला तरी पोरखेळ नक्कीच नव्हता आणि ‘धुरा’ला बॉम्ब म्हणावे इतका जीवघेणाही नव्हता. तो करणारी मुले विशिष्ट धर्माची असती, तर कदाचित सगळेच काम ‘सोपे’ झाले असते. पण ही सगळी पोरे निघाली आजकाल ज्याची चलती आहे त्या बहुसंख्याकवादी धर्मामधली. ती एकाच राज्यामधली निघाली असती, तरीही वेगळा रंग मिळाला असता. पण ती निघाली ‘द ग्रेट इंडियन मिडल क्लास’शी नाते सांगणारी. नीट शिकली-सवरलेली. शिक्षण हेच त्यांचे मूल्य, तेच त्यांचे सामर्थ्य आणि तेच त्यांचे दु:खही.. त्यांच्या कृत्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बेरोजगारीच्या मुद्दयाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी संसदेच्या सभागृहात या पद्धतीने गदारोळ माजवला असावा असे सांगितले जात आहे. त्यांच्यावर यूएपीए म्हणजेच अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट या कायद्याच्या १६ आणि १८ या कलमांतर्गत दहशतवादी कृत्य करणे आणि कट रचणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर पुढे व्हायची ती प्रक्रिया होईलही; पण बेरोजगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशातले दोनचार तरुण चुकीच्या मार्गानेच पण थेट संसदेच्या सभागृहात घुसत असतील तर आपण या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणार की नाही?

There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक

हेही वाचा >>> अग्रलेख : जीवाश्मांच्या जिवावर..

विशी-बाविशीच्या पुढचे तरुण ही काही अजाण पोरे नसतात. या पातळीवरचे कृत्य करताना त्याचे परिणाम काय असू शकतात, आपल्याला पुढे जाऊन काय काय भोगावे लागू शकते याची कल्पना त्यांना निश्चितच असू शकते. तरीही देशाच्या संसदेत जाऊन धडकण्याची गरज त्यांना वाटली यावरूनच बेरोजगारीच्या प्रश्नाची तीव्रता, त्याचे गांभीर्य लक्षात यावे. सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार भारतातील बेरोजगारीचा दर ७.९५ आहे. अधिक तपशिलात जायचे तर शहरी भागात तो ७.९३ आणि ग्रामीण भागात ७.४४ आहे. बेरोजगारीच्या बाबतीत जगात भारताचे स्थान ८६ वे आहे. एकीकडे आपला देश सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण याच तरुणांच्या हाताला काम नसेल, त्यांच्या रोजगाराच्या मागणीकडे लक्ष दिले जात नसेल, तर त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, माथी भडकू शकतात, याच्या परिणामांचा ऊहापोह ‘लोकसत्ता’च्या ‘कालौघात कोडगे’ (२९ जानेवारी २०२२) या संपादकीयात होता. त्या वेळी रेल्वे भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळयाची चौकशी व्हावी या मागणीसाठी बिहारमधल्या बेरोजगार तरुणांनी केलेल्या अत्यंत उग्र आंदोलनात रेल्वेचे मोठे नुकसान झाले होते. त्याशिवाय या आंदोलनाचे लोण उत्तर प्रदेशातही पसरले ते वेगळेच. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही नोकरभरती प्रक्रियेत होणाऱ्या गैरव्यवहारांविरोधात तरुणांनी रस्त्यावर उतरण्याचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसते आहे.

अर्थात बेरोजगारी हा काही आज निर्माण झालेला प्रश्न नाही. आपल्या देशाची लोकसंख्या, उपलब्ध रोजगार, साक्षरतेचे प्रमाण, इतर सामाजिक प्रश्न हे सगळे पाहता रोजगाराचा प्रश्न नेहमीच उग्र राहिला आहे. पण पन्नासेक वर्षांपूर्वीची बेरोजगारी आणि आजची यामध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे. एकीकडे इंटरनेटमुळे घरबसल्या होणाऱ्या जगाच्या दर्शनाने तरुणांच्या महत्त्वाकांक्षा वाढत आहेत आणि दुसरीकडे आयुष्यामधली उमेदीची पंधराएक वर्षे शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत घालवल्यानंतरही हाताला काम मिळत नाही, बेरोजगाराचा शिक्का घेऊन जगावे लागते याचे शल्य आहे.. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून चाललेले राजकारण बाजूला ठेवू; पण या मागणीसाठी गेली काही वर्षे सुरू असलेल्या आंदोलनांना मिळणारा पाठिंबा तरी दुसरे काय सांगतो? या पद्धतीने आपली ताकद दाखण्याची क्षमता नसलेल्या इतर जातीजमातींमधील तरुणांच्या मनात यापेक्षा वेगळे ते काय असणार आहे?

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘गैरंटी’चे रखवाले!

तरुणपणाला अस्वस्थपणाचा वर आणि आततायीपणाचा शाप असतो असे म्हटले जाते. आता वर, शाप, उ:शाप या कल्पना मानणे/ न मानणे हा वेगळा मुद्दा. पण तरुणांनी अस्वस्थ असलेच पाहिजे, कारण त्यांनाच तर उद्या घडवायचा असतो. भविष्याला आकार द्यायचा असतो. त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा, त्यांची रग उद्याचे जग घडवते किंवा बिघडवते, हे खरेच; पण त्या ऊर्जेला वाट करून द्यायची असते ती आधीच्या पिढीने-  धोरणकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी. त्यांना आपल्या तरुणांनी त्यांच्या अस्वस्थपणातून मंगळाच्या पुढच्या ग्रहावर जायची महत्त्वाकांक्षा बाळगणे अपेक्षित आहे की नोकरी मिळत नाही म्हणून रेल्वेचे डबे जाळणे अपेक्षित आहे? त्यांना आपल्या तरुणांच्या अस्वस्थपणातून वेगवेगळया क्षेत्रांत नवनवी शिखरे पादाक्रांत व्हायला हवी आहेत की हाताला काम नाही म्हणून तरुणांनी संसदेच्या बाकांवरून घोषणा देत उडया मारायला हवे आहे? त्यांना तरुणांनी कौशल्यविकासाच्या संधी घेत जागतिक स्पर्धेत ताठ मानेने उभे राहायला हवे आहे की जातीधर्माच्या फुका अहंकाराचे निखारे फुलवत एकमेकांचे गळे कापायला हवे आहे?

विद्यमान सरकार रोजगार मेळे घेऊन नोकरीची नियुक्तिपत्रे वाटत असल्याचे सरकारी माध्यमे सातत्याने दाखवत असली तरी त्या प्रयत्नांचा रेटा आणखी वाढवावा लागेल, कारण बेरोजगारी, कौशल्यांचा अभाव, संधींचा अभाव, गरिबी या दुष्टचक्रातून आजचा तरुण भरडून निघतो आहे. हे आजचे वास्तव या घटनेतूनही एक प्रकारे अधोरेखित झाले आहे. चारदोन तरुण वयाच्या अनुषंगाने येणाऱ्या जोशात एखादे आततायी कृत्य करतात त्याआधी चारेकशे जणांची तीच मानसिकता तयार झालेली असते, पण ते तेवढे बिथरलेले किंवा कृती करायला उद्युक्त झालेले नसतात, एवढेच. अशा वेळी गरज असते आणि आहे ती त्यांना चुचकारण्याची. चुकलेल्या मुलाला घरातले वडीलधारे भरतात तसे रागे भरण्याची. गरज पडली तर एखादी थप्पड देऊन नीट रस्ता दाखवण्याची. वाट चुकलेले, बिथरलेले प्रत्येकच मूल गावगुंड नसते आणि सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू पाहणाऱ्या प्रत्येकाला ‘देशद्रोही’ ठरवण्यातही अर्थ नसतो. आपण अलीकडे त्याच चष्म्यातून सगळय़ांकडे पाहू लागलो आहोत की काय, हे तपासण्याची खरे तर यानिमित्ताने गरज आहे. ‘वर्तमानाला कळेना आमुची भाषा’ असे म्हणण्याची वेळ आपल्या तरुण पिढीवर येऊ नये, यासाठीच सावध! ऐका पुढल्या हाका..

Story img Loader