केवळ द्वेषामुळे ज्याच्या नायनाटाचा प्रयत्न केला जातो, तोच अंतिमत: स्मरणीय ठरतो. जल्पक अंधारातच, पण त्यांचा सामना करणारे प्रकाशात राहतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायल कपाडिया हिचे अभिनंदन केले ते बरे झाले. पायलच्या चित्रपटास सध्या सुरू असलेल्या कान महोत्सवात उत्कृष्ट कलाकृतीसाठीचे पारितोषिक मिळाले. भारतीय चित्रपट निर्मात्याचा असा काही गौरव गेल्या ३० वर्षांत झाला नव्हता. फ्रेंच रिव्हिएरातील या नयनरम्य स्थळी दरवर्षी भरणाऱ्या या जगन्मान्य चित्रपट महोत्सवात कोणा भारतीय कलाकृतीचा गौरव इतक्या प्रदीर्घ कालानंतर होत असेल तर त्याचा रास्त अभिमान भारतीयांस वाटणे आणि सर्वोच्च नेतृत्वाकडूनही त्यासाठी अभिनंदन केले जाणे नैसर्गिकच! आपल्यातील एखाद्याचे कौतुक आंतरराष्ट्रीय मंचावर झाल्यावर(च) त्याची/तिची महती आपणास कळणे हे तसे नवीन नाही. तरीही पंतप्रधानांनी जातीने पायल यांचे अभिनंदन करणे ही समाधानाची बाब.

Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Yavatmal Bhumika Sujeet Rai, Bhumika Sujeet Rai,
दृष्टिहीन ‘भूमिका’ची वाचनाप्रती डोळस भूमिका! सलग १२ तास ब्रेल लिपीतील…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….

हेही वाचा >>> अग्रलेख: करू नये तेंचि करी..

कारण बरोबर नऊ वर्षांपूर्वी याच पायल कपाडिया यांना ‘देशद्रोही’ ठरवण्यापर्यंत आपली मजल गेली होती. त्यामुळे ‘देशद्रोही’ ते ‘देशाची मान उंचावणाऱ्या’ अशा दोन टोकांवर पायल यांचा हा नऊ वर्षांचा प्रवास आहे. तो त्यांचा एकटीचा असला तरी देशातील सद्या:स्थितीत तो अत्यंत प्रतीकात्मक ठरतो. त्या पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ या राष्ट्रीय संस्थेच्या स्नातक. त्या संस्थेच्या प्रमुखपदी कोणा गजेंद्र चौहान या ‘क’ वा ‘ड’ दर्जाच्या कलाकाराची (?) नेमणूक झाली म्हणून त्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांत पायल यांचा सहभाग होता. या संस्थेवर अत्यंत संस्कारी केंद्राचे नियंत्रण असते. तरीही तिचे प्रमुखपद भुक्कड लैंगिक चित्रपटांतील ‘कामा’च्या अनुभवावर चौहान यांच्याकडे दिले गेले हे या विद्यार्थ्यांच्या रागाचे कारण. चौहान यांची राजकीय विचारधारा हे या विद्यार्थ्यांच्या विरोधाचे कारण नव्हते. तर त्यांचा संबंधित क्षेत्राचा अननुभव त्यामागे होता. वास्तविक आर. के. लक्ष्मण, श्याम बेनेगल, मृणाल सेन, अदूर गोपालकृ़ष्णन, गिरीश कार्नाड, यू. आर. अनंतमूर्ती आदी एकापेक्षा एक महानुभावांनंतर या कोणा गजेंद्र चौहान यांची नेमणूक करताना ती करणाऱ्या जनांस काही वाटले नसले तरी खुद्द चौहान यांच्या मनास तरी काही वाटावयास हवे होते. तसे काही झाले नसणार. त्यांनी हे पद स्वीकारले. शेवटी विद्यार्थ्यांनीच त्याविरोधात आंदोलन छेडले. ते प्रदीर्घ काळ चालले. त्यात विद्यार्थ्यांवर या केंद्राचे चौहान यांच्याच दर्जाचे एक संचालक प्रशांत पाठराबे यांनी गुन्हा दाखल केला. वास्तविक कला विद्यालये, विद्यापीठे, संस्था अशा सर्वांत एक प्रकारची व्यवस्थेविरोधातील ऊर्जा नेहमीच फुरफुरत असते. ही ऊर्जा रिचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कलेच्या अभिव्यक्तीद्वारे तीस वाट करून देणे. त्यातूनच उत्तमोत्तम कलाकृती आकारतात आणि एकापेक्षा एक सरस कलाकारही आकारास येतात. पण त्यासाठी ही संस्था चालवणाऱ्यांच्या अंगी सर्जनशीलता असावी लागते आणि त्यांचा कलेच्या उदारमतवादी अभिव्यक्तीवर विश्वास असावा लागतो. तीच तर आपली खरी बोंब. त्यामुळे आपल्याकडे महत्त्वाच्या संस्थांवर टुकार होयबा नेमले जातात. कमालीची आज्ञाधारकता हेच त्यांचे भांडवल आणि इतकेच त्यांचे कर्तृत्व! हे सगळे आपण इतके गोड मानून घेतो की किमान बौद्धिक उंची नसलेली व्यक्तीही ‘आयआयटी’, ‘आयआयएम’ प्रमुखांच्या नेमणुका करते आणि प्रसंगी अनिल काकोडकर यांच्यासारख्यांचा सहज अवमान करू शकते. तेव्हा एफटीआयआय, विविध विद्यापीठांचे नाट्यशास्त्र विभाग, कलाशाखा आदींचे नेतृत्व सुमारांच्या हाती दिले जाणे हे ओघाने आलेच. आणि यास विरोध करणाऱ्यांस राष्ट्रद्रोही, अर्बन नक्षल इत्यादी ठरवले जाणेही पाठोपाठ आलेच. या ‘राष्ट्रद्रोही’ पायल कपाडिया यांच्यावर व्यवस्थेचा इतका राग होता की त्यांना त्या वेळी परदेशी जाण्याची संधीही नाकारली गेली आणि शिष्यवृत्तीचे आर्थिक साहाय्यदेखील अव्हेरले गेले. आता त्याच कापडिया यांनी जागतिक पातळीवर भारतीयांची मान उंचावली आणि ज्यांच्या सरकारच्या नेमणुकीत पायल राष्ट्रद्रोही ठरवल्या गेल्या त्याच सरकारातील प्रमुखांवर पायल यांच्या कौतुकाची वेळ आली. यातून पायल कपाडिया यांची कामगिरी झळाळून दिसते. पण गजेंद्र चौहान आणि तत्सम बुजगावणी कोणाच्या खिजगणतीतही नसतील. हे असेच होते. केवळ द्वेषामुळे ज्याच्या नायनाटाचा प्रयत्न केला जातो, तोच अंतिमत: स्मरणीय ठरतो. ‘पोएट्री बँडिट’ ऊर्फ जॉन ल्युपिन हा कॅनेडियन कवी म्हणतो त्याप्रमाणे जल्पकांना (ट्रोल्स) पुलाखाली अंधारात लपून राहावे लागते आणि ज्यास ट्रोल केले जातो तो मात्र स्वच्छ प्रकाशात उजळ माथ्याने वावरत असतो. पायल कपाडिया हे त्याचे उदाहरण.

हेही वाचा >>> अग्रलेख: वैधावैधतेचं वंध्यत्व!

अशी उदाहरणे अनेक सापडतील आणि तीही अशीच आपापले नाव काढतील. याचे कारण आपल्या शैक्षणिक संस्थांत विद्यार्थी आणि भावी कार्यकर्ते/ स्वयंसेवक यात केली जाणारी गल्लत. स्वत:च्या बुद्धीचा कमीत कमी वापर करणारा हा बरा; आणि बुद्धी गहाण ठेवण्यास तयार तो विद्यार्थी उत्तम मानण्याची आपली शैक्षणिक परंपरा. अशा संस्थांतून त्यामुळे बाहेर पडणारे आपले विद्यार्थी हे साच्यातल्या मूर्तीसारखे ‘समान उंचीचे’च निपजतात. सर्व भर अधिकाधिक सुमार कसे निपजतील यावर. स्वतंत्र विचार नको आणि स्वतंत्र कल्पनाशक्ती तर अजिबातच नको. एखादा स्वतंत्र विचार करू शकतो याचा संशय जरी आला तरी आसपासचे व्यापक कटकारस्थान करून त्याच्या विचारभुजा छाटून छाटून त्यास आपल्याच आकाराचे बनवण्याची तत्परता दाखवू लागतात. या अशा वातावरणात यश म्हणजे केवळ उत्तीर्ण होणे इतकेच ठरते आणि अधिकाधिक गुणांनी उत्तीर्ण होणे म्हणजेच स्पर्धा मानली जाते. म्हणून देशभरचे दहावी/बारावीचे निकाल बघितले तर आपल्याकडे शब्दश: कोटींनी गुणवान दिसतात. पण तरीही समाज म्हणून कोणत्याच पातळीवर गुणवत्ता दिसत नाही. वास्तविक जगाच्या कर्तृत्वाचा इतिहास हा अनुत्तीर्ण आणि वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा झालेल्यांच्या कल्पनाशक्तीचा इतिहास आहे. वेळच्या वेळी गृहपाठ करणारे आणि केसांचा कोंबडा करून आज्ञाधारकतेचे प्रदर्शन मांडणारे जास्तीत जास्त सांग-कामे होतात. नेते नाहीत. आईन्स्टाईन म्हणून गेला त्याप्रमाणे कलात्मक उद्धटपणाचे स्वागत करायचे ते यासाठी. पायल यांचे चित्रपट, माहितीपट यांतून याचे दर्शन घडते. पुण्यात एफटीआयआयमधल्या आंदोलनावर आधारित ‘नाइट ऑफ नोइंग नथिंग’ या माहितीपटाचाही कान महोत्सवात २०२१ साली गौरव झाला. सरकारी वृत्तीमुळे विद्यार्थ्यांत दाटलेले नैराश्य आणि विद्यार्थ्यांची अवस्था हा या माहितीपटाचा विषय. आपल्या चित्रपट महाविद्यालयाने भले त्यांना आर्थिक मदत वा परदेश संधी नाकारली असेल. पण त्यांच्या कलाजाणिवा आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा दर्जा यामुळे अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांना नेहमीच मदत केली. पायल यांच्या कलाकृतींतून नेहमीच महिला आणि त्यांच्या जगण्यातील आव्हाने यावर ‘चर्चा’ असते. त्या मूळच्या मुंबईच्याच. ‘‘आपल्या देशातील इतर प्रांतांच्या तुलनेत मुंबईत महिलांना निश्चितच अधिक स्वातंत्र्य असते. पण ते स्वातंत्र्यही तुमच्या कमाईशी निगडित आहे. गरीब महिलांना हे स्वातंत्र्य परवडत नाही’’, असे पायल म्हणतात ते खरे नाही असे म्हणणे अवघड. ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ ही त्यांची आताची पुरस्कारप्राप्त कलाकृतीही महिलांच्या संघर्षावर आधारित आहे. केरळातून मुंबईत जगण्यासाठी आलेल्या दोन परिचारिकांची आयुष्याशी सुरू असलेली झटापट जेव्हा त्या पडद्यावर मांडतात तेव्हा ती कहाणी फक्त मुंबईतील महिलांची राहत नाही. ती वैश्विक होते. जो आपणास अंधारभेदी प्रकाश वाटत होता तो प्रत्यक्षात प्रकाश नाही, तर केवळ आभास आहे, हे या चित्रपटाचे शीर्षकी सत्यही वैश्विकच ठरते. ते मांडले म्हणून या प्रकाशाचा ‘पायल’ पायरव जागतिक कलाविश्वात निनादला. त्यासाठी पायल यांचे ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन.

Story img Loader