तेव्हाचे व आताचे खड्डे वेगवेगळे दिसत असले तरी त्यांमागचा कार्यकारणभाव एकच.. वेगाने दौडणाऱ्या शक्तीला रोखणे हेच सांप्रतकाळच्याही खड्ड्यांचे इतिकर्तव्य!
कमालच आहे.. मुळात रस्त्यावरचे खड्डे हा चर्चा, चिंतेचा विषय होऊच कसा शकतो? त्यामुळे या विषयाला हात घालायचाच असेल तर चिंतन करा. त्यासाठीची योग्य वेळ कोणती तर वाहतूक कोंडीत अडकल्यावरची. एकदा का तुम्ही चिंतनात मग्न झालात की अनेक गोष्टींचा साक्षात्कार तुम्हाला आपसूक होत जाईल. हे खड्डे भ्रष्टाचाराचे प्रतीक नाहीत तर राज्याच्या देदीप्यमान परंपरेचा एक भाग असल्याचेही तुमच्या लक्षात येऊ लागेल. कोंडीत अडकलेली तुमच्या आजूबाजूंची वाहने जेव्हा थकून हॉर्न-वादन थांबवतील तेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेत चिंतनाला आणखी खोली प्राप्त करून दिलीत की ही परंपरा किती प्राचीन आहे याची जाणीव तुम्हाला हळूहळू होत जाईल.
युवाल नोवा हरारी यांनी सेपयिन्स या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे इतिहासपूर्व काळातसुद्धा माणसे सर्वशक्तिमान प्राण्यांना पकडण्यासाठी कसे खड्डे खोदत, आजही हत्तीला पकडायचे असेल तर कसे खड्डे खोदले जातात हे तुम्हाला आठवू लागेल. आता तुम्ही म्हणाल की त्या आणि या खड्डय़ांचा काय संबंध? कुठे हत्तीसारखा अमर्याद शक्ती असलेला प्राणी व कुठे मानवप्राणी! तर अशी तुलना करण्याचे काही कारण नाही. आजच्या व्यवस्थेला मानवाला सर्वशक्तिमान होऊच द्यायचे नाही. त्याची गती मंदावली की तो हळूहळू दुबळा होत जातो. त्यामुळे तेव्हाचे व आताचे खड्डे वेगवेगळे दिसत असले तरी त्यामागचा कार्यकारणभाव एकच आहे हे चटकन तुमच्या ध्यानात येईल. प्रमत्त होऊन वेगाने दौडणाऱ्या शक्तीला रोखणे हेच सांप्रतकाळच्याही खड्डय़ांचे इतिकर्तव्य. त्यापुढे तुम्ही हतबल झालात की त्या खड्डय़ाच्या कर्त्यांकरवित्याला आनंदच होत असतो. तो तुम्हाला दिसत नाही हा तुमच्या दृष्टीचा दोष. आता तुमच्यातील काहींना असे वाटू शकते की ही तर व्यवस्थेने केलेली शिकारच. त्यामुळे संतापून तुम्ही व्यवस्थेच्या नावाने जरूर बोटे मोडू शकता. मात्र हा त्रागा हवेत बाण मारण्यासारखा. कारण व्यवस्था ही काही हाडामांसापासून तयार झालेली एखादी व्यक्ती किंवा प्रतिमा नाही. अनेकांच्या दृश्य, अदृश्य सहभागातून तयार झालेली ही व्यवस्था कुणालाच उत्तरदायी नसते. त्यामुळे मुंबई, ठाणे असो वा नागपूर दरवर्षी खड्डय़ांची घाऊक निर्मिती होत असते. या निर्मितीला कुणा एकाला जबाबदार धरणे अवघड जाते. ज्याचे जन्मदाते शोधता येत नाहीत त्या अनाथाच्या निर्मितीला निसर्ग जबाबदार हा आपल्याकडचा प्रचलित विश्वास. त्यामुळे व्यवस्थेतील सारे खड्डय़ांसाठी वरुणराजाला दोषी ठरवून मोकळे होतात. आरोपांना उत्तर देणे या राजाला जमत नाही, कारण ‘पडल्या’खेरीज या राजाचा आवाजच येत नाही. त्यामुळेच या खड्डय़ांना जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जबाबदार तेच पावसाला दोष देत पुढच्या वर्षी खड्डे पडू देणार नाही अशी ग्वाही देत असतात. त्यात राज्यापासून तर शहर, गावापर्यंतचे सारे आले. दुसरीकडे त्यांच्या मनात एकूण खड्डे किती, ते बुजवायला यंदा किती पैसे लागतील, त्यातले आपल्यापर्यंत किती येतील, दुसऱ्याच्या खिशात किती जातील याचा हिशेब सुरू असतोच.
चिंतन करता करता तुम्ही या आर्थिक मुद्दय़ावर जेव्हा येता तेव्हा आणखी चडफडता, पण त्याशिवाय तुमच्याकडे काही इलाज नसतो. मग नाइलाजाने तुम्ही मोठमोठय़ाने हॉर्न वाजवून जणू निषेध व्यक्त करता. वाहतुकीची कोंडी थोडी फुटली व वाहनाने वेग घेतला की तुमचे चिंतन आणखी वेग घेते. जो दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतो, तोच एक दिवस त्यात फसतो अशी एखादी म्हणही तुम्हाला आठवू शकते. मग हे व्यवस्थेतले लोक आजवर का फसले नाहीत? प्रत्येक वेळी तेच तेच चेहरे का दिसत राहतात? या साऱ्यांना न फसण्याची किमया कशी साधली असेल? हे सारे सहीसलामत सुटतात व खड्डय़ांमुळे मरतात मात्र सामान्य, हा अन्याय नाही का? यासारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात फेर धरू लागतात. त्या प्रश्नांमुळे आपल्याही मनात व्यवस्थेविषयी एक खड्डा निर्माण झाला अशी भावना मग घर करू लागते. संत तुकारामांसाठी मंबाजीने खड्डा खोदला, पण या संतश्रेष्ठांची शिकवण जनमानसात अधिक रुजली असाही विचार तुमच्या मनात तरळून जाऊ शकतो. एकूणच प्रतिभेला, कार्यक्षमतेला मरण नाही. निसर्गाने म्हणा की व्यवस्थेने म्हणा, कोणी कितीही खड्डे निर्माण करून अडथळे आणले तरी मानवजात त्यालाही पुरून उरेल, अशी आशा तुमच्या मनात निर्माण होताच वाहनाचा वेग वाढतो आणि थोडय़ाच वेळात तुम्ही पुन्हा नव्या वाहतूक कोंडीत अडकता.
एकदा थांबले की मनातले विचारचक्र सुरू होणे हा मानवी स्वभावच. त्यामुळे चिंतन पुढे सुरू होते. रस्त्यावर खड्डेच पडले नाहीत तर ते बुजवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही मग भर पावसात डांबर, गिट्टी-खडीचे मिश्रण डोक्यावर घेऊन ते बुजवण्याच्या कामात गुंतलेल्या हजारो मजुरांच्या पोटापाण्याचे काय? त्यांना तर काम मिळत राहायला हवे ना! कदाचित त्यांच्यासाठी तर ही खड्डय़ांची निर्मिती जाणीवपूर्वक केली जात नसेल? व्यवस्था बघा, कशी साऱ्यांची काळजी घेत असते, अशी निष्पाप शंका तुमच्या मनात डोकावून जाऊ शकते. नंतर हळूहळू खोलात शिरत गेले की खड्डे निर्माण करा व बुजवा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे व ती तशीच चालू राहावी यातच व्यवस्थेचे हित सामावले आहे. कामे निघत राहिली, पैसा खर्च होत राहिला तरच व्यवस्था ताजीतवानी राहाते, अन्यथा तिलाही मरणासन्न अवस्था प्राप्त होऊ शकते. अशा स्थितीत मग त्यावर अवलंबून असणाऱ्या लहानमोठय़ा पुढाऱ्यांचे काय? प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे काय? त्यांच्या पोटातले खड्डे कसे भरतील? असले प्रश्न तुम्हाला पडू लागतात. खड्डे बुजवण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान अंगीकारणे, त्यावर अमाप पैसा खर्च करणे व्यवस्थेला का आवडू लागले आहे, त्यापेक्षा खड्डेच पडणार नाहीत असे रस्ते का तयार केले जात नाहीत, असा प्रश्नार्थक विचारही तुमच्या मनात येऊ शकतो. इतके सारे प्रश्न व त्याची उत्तरे शोधता शोधता तुमच्या मनाची दमछाक होते. ही व्यवस्था एक अजब रसायन आहे. भल्याभल्यांना ती कळत नाही. विकासकर्ते, उद्धारकर्ते म्हणून जे मिरवतात आणि व्यवस्थेवर बऱ्यापैकी अंकुश ठेवून असतात, त्यांना मात्र हे रसायन कसे हाताळायचे हे बरोबर कळलेले असते, अशी मनाची समजूत काढत तुम्ही वाहतूक कधी मोकळी होईल याची वाट बघत राहाता.
या खड्डय़ांमुळे होणारे अपघात, जाणारे जीव, मोडणारी हाडे, कर्तव्यावर होणारा परिणाम हे सारे नेहमीचेच विषय आठवून तुमची चिडचिड आणखी वाढते. व्यवस्थेसमोर सामान्य माणूस नेहमी अगतिक व हतबल असतो हे ठेवणीतले वाक्य तुमच्या ओठावर येते व चिंतनातही तुम्हाला हसू फुटते.
मात्र ही व्यवस्था बदलण्याची ताकद आपल्यातच आहे, त्यासाठी किमान मतदानाच्या वेळी तरी काळजीपूर्वक विचार करणे आपले कर्तव्य आहे याची पुसटशी जाणीवही तुमच्या मनाला होत नाही. खड्डे आणि कोंडी यांचा मार्ग आणखीच प्रशस्त होतो!