..कोणास पनवती वगैरे ठरवण्याची उठाठेव करण्यापेक्षा स्वत:च्या नावे काही राजकीय पराक्रम लागेल आणि आपली पदोन्नती होईल हे राहुल गांधी यांनी पाहावे; त्यात अधिक शहाणपण आहे..
विज्ञानवादाची कास धरणारे, आयआयटी-आयआयएम्स उभारणारे, भाक्रा-नानगल बांधणारे, जमिनीतून खनिज तेल उसळताना पाहून त्या प्रवाहाच्या वर्णनार्थ ‘वसुधारा’ असा सुंदर शब्द जन्मास घालणारे, उत्कृष्ट लेखक, आपले कडवे टीकाकार प्रतिस्पर्धी निवडून यावेत यासाठी जातीने लक्ष घालणारे खरे लोकशाहीवादी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पणतूने एखाद्याचे वर्णन ‘पनवती’ असे करावे यातून केवळ मूर्खपणाचे दर्शन होते असे नाही, तर त्याचबरोबर प्रचलित जनभावनेच्या लाटेत वाहून जाण्याची वृत्ती, अवैज्ञानिकता तसेच स्वत:चे कथानक स्वत: रचण्याचा बौद्धिक तसेच शारीरिक आळस इत्यादी द्रु्गुणही या शब्दनिवडीतून दिसून येतात. हे राहुल गांधी यांनी नि:संशय टाळायला हवे होते. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारतास किरकोळीत धूळ चारत असताना त्या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान तेथे उपस्थित होते. भारतीय संघ जिंकला असता तर साहजिकच कोणत्याही चतुर राजकारण्याप्रमाणे त्या विजयाचा परावर्तित प्रकाश त्यांच्याही चेहऱ्यावर पडावा असे प्रयत्न झाले असते आणि भाजप समर्थक वा भक्तगणांनी त्यांच्यामुळे आपण जिंकलो इतक्या बिनडोकपणे युक्तिवाद केले असते. याच परिस्थितीचा व्यत्यास आपण पराभूत झाल्यामुळे समोर आला. आणि विजयीवीरांचे कौतुक करण्याच्या उदात्त हेतूने मैदानस्थळी योग्य वेळी हजर झालेल्या पंतप्रधानांवर भारतीय खेळाडूंचे सांत्वन करण्याची वेळ आली. तेव्हा विजयाचे राजकारण झाले असते हे जर खरे असेल तर पराजयाचेही राजकारण केले जाणार हेही तितकेच खरे. भारत विजयी झाला असता तर पंतप्रधानांची उपस्थिती शुभशकुनी म्हणून गौरवली गेली असती. तसे झाले नाही. भारत अपयशी ठरला. त्यामुळे या अपयशाचा अपशकुनही या सध्याच्या कमालीच्या राजकीयभारित वातावरणात त्यांना चिकटवला जाणार हे उघड आहे. पण असली बिनडोकी कृती समाजमाध्यमांतील रिकामटेकडया वाचाळवीरांवर सोपवणे इष्ट. ते काम हा वर्ग इमानेइतबारे करीत असताना राहुल गांधी यांनी हा शब्दप्रयोग उसना घेण्याची गरज नव्हती. असा शब्दप्रयोग कोणत्याच व्यक्तीसाठी, कोणीही, कधीही वापरता नये. मग ती व्यक्ती देशाची पंतप्रधान असो वा अन्य कोणी. याचे कारण ‘पनवती’, ‘पांढऱ्या पायाचा’, ‘अशुभ’, ‘नाट लावणारा’ इत्यादी घृणास्पद शब्दप्रयोग ते करणाऱ्याची वर्णवर्चस्ववादी तसेच अवैज्ञानिक मानसिकता दाखवून देतात.
हेही वाचा >>> अग्रलेख : कोट्याच्या कपाळी..
म्हणजे वैज्ञानिक मूल्यांच्या आणि मानवी बौद्धिक क्षमतेच्या परिसीमेचे दर्शन घडवत तयार करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या विमानांचे स्वागत करताना त्यांस मिरची/लिंबू बांधणे वा उपग्रह प्रक्षेपणाआधी इष्टदेवतांचे आशीर्वाद(?) घेत शुभशकुनाची इच्छा बाळगणे हे जितके अवैज्ञानिक तितकेच अपशकुनाची चिंता बाळगणे वा एखाद्यास अपशकुनी म्हणणे हे अशास्त्रीय आणि अतार्किक. शकुन, अपशकुन या कल्पनाच मुळात व्यक्तीच्या अपरिपक्व बुद्धीचे दर्शन घडवतात आणि त्यांतून त्यांच्यातील आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. ‘‘हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक रेणू कोणत्याही कुमुहूर्तावर एकत्र आले तरी त्यातून पाणी तयार होणारच,’’ असे वि. दा. सावरकर म्हणत. राहुल गांधींस सावरकर नकोसे. तेव्हा त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण स्मरावे. राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर राष्ट्रपती भवनात राहावयास कोणत्या मुहूर्तावर जाणार असे विचारता कलाम यांनी आपल्यासाठी सर्व ग्रहदशा सारख्याच असे उत्तर दिले. राहुल गांधी गोल्फ खेळतात किंवा काय हे माहीत नाही. हा खेळ खेळत नसले तरी त्यांनी विख्यात गॉल्फर गॅरी प्लेयर यांचे एक वाक्य लक्षात ठेवावे. ‘‘मी जितका अधिकाधिक कसून सराव करतो, तितका अधिकाधिक नशीबवान ठरतो,’’ असे प्लेयर म्हणतात. हे विधान राजकारणासही लागू होते. सबब एखाद्यास पनवती वा अपशकुनी म्हणण्याचा मूर्खपणा करू इच्छिणाऱ्या मूर्खाची आपल्याकडे कमी नाही, हे खरे असले तरी राहुल गांधी यांनी त्यात एकाची भर घालण्याचे कारण नाही.
हेही वाचा >>> अग्रलेख : सातत्य सांत्वनातच!
आणि दुसरे असे की असा अपशकुनी असण्याचा आरोप राहुल गांधींवर उलटू शकतो. कारण राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आणि काँग्रेसचा ऱ्हास सुरू झाला. सबब राहुल गांधी हे काँग्रेससाठी पनवती असे कोणी म्हटल्यास त्यात गैर ते काय? तेव्हा एखाद्याशी राजकीय मतभेद आहेत, त्यास पराभूत करण्यासाठी तुम्ही कितीही तळमळत आहात इत्यादी खरे असले तरी त्यासाठी असा शब्दप्रयोग करण्याची गरज नाही. एखाद्याचे एखादे यश हा योगायोग असू शकतो. यशातील सातत्य राखावयाचे असेल तर सतत कष्ट करण्यास पर्याय नाही. हे सत्य जितके भारतीय आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया संघास लागू होते तितकेच ते काँग्रेस आणि भाजप या राजकीय पक्षांसही लागू होते. तेव्हा भाजपच्या यशाचा, आणि विशेषत: त्यातही मोदी यांच्या यशाचा, कितीही संताप राहुल गांधी यांस असला तरी तो व्यक्त करण्यासाठी अशा शब्दाची निवड सर्वथा अयोग्य. मोदी असो वा अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक अंतिम सामन्यास जमलेले बहुसंख्य असोत. यातील फारच कमी जण उत्तम दर्जाच्या क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी तेथे जमले होते. ‘अशा’ सर्वांस रस होता तो भारतमातेच्या मस्तकावर विश्वविजेतेपदाचा मुकुट ठेवला जाणे पाहण्यात. त्यातही या मुकुटाची प्राणप्रतिष्ठापना निवडणुकांच्या तोंडावर साक्षात पंतप्रधानांनी करताना पाहणे हा तर देवदुर्लभ योग म्हणायचा. तो साधण्यासाठी अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते हे खरे. त्या मुहूर्तासाठी पंतप्रधानही भारतीय क्रिकेटपटूंच्या वस्त्ररंगात आले होते हेही खरे. पण तरी ही पुण्याई फळली नाही. आपण हरलो. त्याचे खापर अपशकुनावर फोडणे म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाच्या कष्टांस, सातत्यास कमी लेखणे. ते करण्याचा राहुल गांधींस काय अधिकार? भाजपचे यश ज्याप्रमाणे त्या पक्षाच्या नेत्यांकडून बारा महिने चोवीस तास केल्या जाणाऱ्या प्रयत्नांत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणीपणात आहे त्याचप्रमाणे काँग्रेसचे अपयश हे या सगळयाच्या अभावात आहे. म्हणून त्या अपयशासाठी राहुल गांधींचा शकुन काढणे जितके अयोग्य तितकेच भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवासाठी कोणास पनवती ठरवणे अश्लाघ्य. भले राहुल गांधींस पप्पू ठरवण्यात त्यांच्या विरोधकांनी पातळी सोडली असेल, भले एखाद्या स्त्रीचे वर्णन परदेशी जर्सी गाय असे अत्यंत असभ्य शब्दांत एखाद्याने केले असेल, भले विरोधी पक्षीय खासदाराच्या महिला जोडीदारासाठी एखाद्याने ‘५० कोटींची गर्लफ्रेंड’ असा क्षुद्र शब्दप्रयोग केला असेल तरी या सगळया विरोधात संतापून एखाद्याचे वर्णन पनवती असे करणे अजिबात समर्थनीय ठरत नाही. आपले सगळे मानसिक अस्वास्थ्य दूर करण्याचा एक उत्तम राजमार्ग राहुल गांधी यांस उपलब्ध आहे, तो म्हणजे राजकीय विजय. तो ज्यांनी मिळवलेला आहे त्यांनी कितीही अनुदार उद्गार काढले असले तरी राहुल गांधी यांनी विवेकास रजा देण्याचे कारण नाही. आपल्या संस्कृतीत पराक्रमी पदोन्नतांस सारे क्षम्य असते. त्याच वेळी पराभूताची आणि पदावनताची पापे अधिक मोजली जातात, हा प्रघात आहे. तेव्हा कोणास पनवती वगैरे ठरवण्याची उठाठेव करण्यापेक्षा स्वत:च्या नावे काही राजकीय पराक्रम कसा लागेल आणि आपली पदोन्नती कशी होईल हे राहुल गांधी यांनी पाहावे. त्यात अधिक शहाणपण आणि कर्तृत्व आहे.