पुष्किनचे स्वातंत्र्यप्रेम, स्वच्छंदतावाद आणि मानवी दु:खाची सखोल जाणीव यांचा विचारही न करता ‘पुष्किन आमचाच’ असे रशियन सत्ताधारी वर्गाला म्हणायचे आहे..
पुतिन यांचा रशिया कोणत्या देशात काय उत्पात घडवेल याचा नेम नाही. राजकीय विरोधक कोणत्याही देशात गेले तरी तेथे त्यांची ससेहोलपट करणे, थोडयाथोडक्या नव्हे तर दीडेकशे पुतिनविरोधी पत्रकारांचा आकस्मिक मृत्यू ओढवणे, लोकशाही म्हणवणाऱ्या अन्य मोठया देशांमधील निवडणुकांवर इंटरनेट आणि समाजमाध्यमांद्वारे घुसखोरी करून आपल्याला हवे तेच सरकार येईल यासाठी उचापती करणे.. यापैकी काहीही पुतिन यांचा रशिया घडवून आणू शकतो. पण या पाताळयंत्रीपणालाही काहीएक पातळी असावी की नाही? वाचनालयांमधून पुस्तके चोरणे- सभ्य भाषेत ‘पुस्तक ढापणे’- हेदेखील आता पुतिनाधीन रशियाने करावे? पण तेही झालेच. थोडेथोडके नाही तर मोठया प्रमाणावर झाले. जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, फिनलंड, पोलंड, इतकेच नव्हे तर लाटव्हिया, लिथुआनिया यांसारख्या गोरगरीब देशांतील सार्वजनिक वाचनालयांतून केवळ रशियन पुस्तकांच्याच जुन्या प्रतींची चोरी गेल्या दोन वर्षांत झाली. ही पुस्तके साधीसुधी नव्हेत. सन १८०० ते १८५० या काळात ती छापली गेली आहेत. म्हणजे या प्रती दुर्मीळ आणि संग्राह्य आहेत. आकडयांतच सांगायचे तर, एकटया लिथुआनियातून गायब झालेल्या फक्त १७ जुन्या रशियन पुस्तकांची किंमत आहे ४,४०,००० युरो म्हणजे ३९ कोटी ४५ लाख रुपये. याचा अर्थ असा की सर्व देशांतल्या वाचनालयांतून गेल्या दोनच वर्षांत चोरीस गेलेला रशियन पुस्तकांचा ऐवज १०० कोटी रुपयांवर असणार. या अफाट पुस्तकचोरीचा तपास आधी एकेकटया देशांमध्ये झाला, पण हे कारस्थान मोठे असल्याचा सुगावा लागताच ‘युरोपोल’तर्फे संघटित तपासही सुरू झाला. या तपासमोहिमेला आता नावही देण्यात आलेले आहे- ‘ऑपरेशन पुष्किन’! पण पुष्किनच का?
हेही वाचा >>> अग्रलेख : या गॅरंटीचे काय?
त्याची कारणे दोन. ती दोन्ही कारणे पुढे पाहूच, पण त्याआधी आणखी एक तपशील. तो या चोरीच्या पाताळयंत्रीपणाची पुरेपूर साक्ष देणारा ठरतो, म्हणून महत्त्वाचा. तो असा की, ही एवढी पुस्तके चोरण्यासाठी कोणत्याही वाचनालयावर चोरटयांनी दरोडा घातला नाही किंवा जबरी चोरी केली नाही. ही गोडीगुलाबीची चोरी होती! हे चोरटे म्हणे मूळचे जॉर्जिया या भूतपूर्व सोविएतसंघी देशातले. युक्रेनयुद्ध सुरू झाल्यानंतर हे चोरटे प्रत्येक वाचनालयात अभ्यासक म्हणून आले, दहाएक दिवस त्यांनी ही पुस्तके हाताळली आणि मग पुढली कमाल त्यांनी केली. ती अशी की, चोरलेल्या प्रत्येक पुस्तकाची जशीच्या तशी दिसणारी पण नकली प्रत त्यांनी वाचनालयात ठरल्या जागी ठेवून दिली! या नक्कलप्रती अगदी हुबेहूब दिसत असल्या कारणाने, आधी तर संशयही आला नाही. दुर्मीळ प्रतींच्या कपाटात या नकलादेखील सुखेनैव नांदल्या. पण वार्षिक नोंदी करण्याच्या वेळी म्हणा अथवा अन्य कारणाने त्या पुन्हा हाताळल्या गेल्या, तेव्हा मात्र बिंग फुटले. ही वार्ता कर्णोपकर्णी होताच फ्रान्स वा जर्मनीसारख्या देशांनी तर आपापल्या हद्दीतील बाकीच्याही सर्व वाचनालयांना हुकूम दिला.. रशियन पुस्तकांची पडताळणी करा! ही ‘ऑपरेशन पुष्किन’ची सुरुवात होती. पण हेच नाव त्या मोहिमेला देण्यामागच्या दोन कारणांचे काय?
त्यापैकी पहिले कारण असे की, चोरीला गेलेल्या पुस्तकांमध्ये ‘रशियाचा शेक्सपिअर’ मानला जाणारा कवी- लेखक अलेक्सांद्र पुष्किन याचीच पुस्तके सर्वाधिक आहेत. पुष्किनलाच एवढे प्राधान्य मिळाले कारण तो १७९९ मध्ये जन्मला आणि वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला, तेवढया काळात त्याने काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटके, स्फुटलेख आणि इतिहासाचेसुद्धा एक पुस्तक लिहिले होते. म्हणजे तो कालानुक्रमे सर्वात जुना, त्यातही बरेच साहित्य लिहिणारा. पण हे एवढेच नाही. अलेक्सांद्र पुष्किन यांची स्वच्छंदतावादी कविता शेली- बायरन- कीट्स या ब्रिटिश स्वच्छंदतावादी कवींपेक्षा सरसच होती. ‘आम्ही कवी म्हणजे जगाचे लोकप्रतिनिधी’ असे शेली म्हणाला पण जगाचे कायदे बनवण्याची ताकद कवीकडे कशी काय असणार हे समजण्यासाठी पुष्किनच्या साहित्याचे वाचन करावे लागते! बायरनवर तर पुष्किनने टीकाच केली होती- ‘शेक्सपिअर हा तळाचा थांग न लागणारा महासागर आहे, तर बायरन उथळ आहे’ असे पुष्किनचे मत. ते अभ्यासून प्रकटलेले होते, कारण मुळात झार-कालीन रशियातल्या उमराव घराण्यात वाढलेल्या पुष्किनने वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत फ्रेंचसह अनेक भाषा शिकून, होमरच्या इलियड आणि ओडेसी या ग्रीक महाकाव्यांसह फ्रान्सचा बाल्झाक, ब्रिटनचा शेक्सपिअर अशा साऱ्यांचेही परिशीलन केले होते. १५ व्या वर्षी पुष्किन कविता करू लागला तो थांबलाच नाही. त्याच्या नंतरही बरेच महान साहित्यिक रशियात घडले तरी पुष्किन हा मानदंडच, कारण सोल्झेनित्सिनचे स्वातंत्र्यप्रेम पुष्किनच्या साहित्यात आधीच दिसले आहे, तसे चेकॉव्हचे निवेदनचातुर्यही पुष्किनकडे होतेच आणि टॉलस्टॉयच्या ‘अॅना करेनिना’ या कादंबरीची बीजे मुळात पुष्किनच्या एका अपूर्ण कादंबरीत सापडतात, असे अभ्यासकांनी सिद्धच केलेले आहे. युरोपभरच्या सर्व देशांमध्ये पुष्किनच्या साहित्याची प्रभा फाकली; पण रशियावर तर पुष्किनचा थेट प्रभावच राहिला- तोही आजतागायत! म्हणून तर पुष्किनला आजही रशियाचा राष्ट्रपुरुष मानले जाते.
हेही वाचा >>> अग्रलेख : पायाभूताचा पाया पोकळ
नेमके हेच दुसरे कारण.. रशियन पुस्तकचोरीच्या संघटित युरोपीय तपासाला ‘ऑपरेशन पुष्किन’ असे नाव मिळण्यामागचे! पण या कारणाकडे जरा दुरान्वयाने पाहावे लागेल. पुष्किनचे लिखाण इतके विपुल आहे की, त्यातून कुणालाही हवी ती विधाने उद्धृत करता येतात. उदाहरणार्थ ‘माझे नाव गाजेल युरोपच्याही पल्याड। साऱ्या सागरांच्या काठी.. माझी गाणी सर्वांसाठी असतील। रुळतील साऱ्या लोकांच्या ओठी’ अशा अर्थाच्या ओळी पुष्किनने एका कवितेत (इंग्रजी शीर्षक ‘मेमोरियल’) लिहिल्या होत्या. किंवा ‘सत्ता निसर्गनियमाने नव्हे, लोकेच्छेने मिळते’ यासारखे विधान ‘ओड टु लिबर्टी’ या लोकशाहीच्या साऱ्याच तत्त्वांचा उद्घोष करणाऱ्या कवितेत पुष्किनने केले होते, ते आता पुतिनसुद्धा सहज वापरतात- अगदी जाहीर भाषणातसुद्धा पुष्किनचा हवाला देऊन पुतिन म्हणू शकतात की मी रीतसर निवडून आलो आहे! किंवा युक्रेनयुद्ध कसे जगाच्या भल्यासाठीच आहे, हे सांगतानाही पुष्किनच्या ‘मेमोरियल’मधल्या आकांक्षेला पुतिन वेठीस धरू शकतात!
हे असले पुष्किनप्रेम अतिरेकी आहेच; पण ते पोकळ आहे- आपले मर्ढेकर ज्याला ‘संज्ञाहीन’ म्हणतात तसे आहे. मुळात पुष्किन-पुस्तकांच्या जुन्या आणि अस्सल प्रती चोरीला जातात त्या हा ‘असली माल’ प्रचंड किमतीला विकला जातो म्हणून! ‘ख्रिस्टीज’ या प्रख्यात लिलावगृहाने २०२२ मध्ये अशा एकंदर १७० रशियन पुस्तकांचा लिलाव पुकारून २१ अब्ज ६९ कोटी रुपयांची विक्री केली होती. पुष्किन हा राष्ट्रपुरुष. म्हणून तो आपल्या संग्रहात हवा, अशी हाव धरणाऱ्या रशियन धनाढयांचे पुतिनकृपेने बरे चालले आहे, अधिकृत लिलावाऐवजी काळया बाजारात ही चोरीची पुस्तके विकली इतपत ‘यंत्रणा’ रशियाकडे आहे, तोवर अशा चोऱ्या होतच राहतील. पुष्किनचे स्वातंत्र्यप्रेम, पुष्किनचा स्वच्छंदतावाद आणि त्यामागे असलेली मानवी दु:खाचीही सखोल जाणीव याचा विचारही न करता ‘पुष्किन आमचाच’ असे रशियन सत्ताधारी वर्गाला म्हणता येते. हेच देशोदेशींच्या राष्ट्रपुरुषांबद्दल होत असते. पण ही लबाडी करण्यासाठी दक्षिण आफ्रिका मंडेलांना किंवा भारत गांधीजींना जसे वापरतो, तितके साधे मार्ग वापरण्याचे रशियाने का बरे टाळले, याचे रहस्य मात्र ‘ऑपरेशन पुष्किन’नंतरही सुटणार नाही.