रतन टाटा यांचे निधन हे केवळ एका उद्याोगपतीचे जाणे नाही. संस्कृतीच्या मूल्यसाखळीतील महत्त्वाचा दुवा त्यांच्या निधनामुळे आपल्यातून नाहीसा झाला आहे…
रतन टाटा यांचे निधन हे केवळ एका उद्योगपतीचे देहावसान नाही. ते त्यापेक्षा अधिक काय आहे हे समजून घेण्यासाठी रतन टाटा यांनी काय काय केले यापेक्षा मुळात काय केले नाही, याचा विचार करावा लागेल. जगातील पहिल्या पाच-दहा धनाढ्यांत आपले नाव असावे यासाठी रतन टाटा यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. टाटा समूह केवळ कमाई या मुद्द्यावर जगात वा देशात सर्वात बलाढ्य उद्याोगसमूह व्हावा यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. अन्य स्पर्धकांच्या तुलनेत आपल्या कारखान्यास, प्रकल्पास अधिकाधिक मंजुऱ्या मिळाव्यात यासाठी रतन टाटा यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. सिंगापूर एअरलाइन्ससमवेत टाटा समूहाचा विमान सेवा कंपनीचा प्रकल्प जेव्हा दोन राजकारण्यांच्या विरोधामुळे मागे पडत गेला तेव्हा त्या राजकारण्यांविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार करण्याचा उद्याोग रतन टाटा यांनी केला नाही. त्यांनी प्रकल्प बाजूला ठेवला. मुंबईत स्वत:च्या मालकीचे बहुमजली इमले उभारून आलिशान ऐषारामी जीवन जगावे असे टाटा यांना वाटले नाही की अन्य तृतीयपर्णी उद्योगपतींप्रमाणे पैसा फेकत पार्ट्या देत स्वत:च्या प्रसिद्धीच्या टिमक्या त्यांनी कधी वाजवल्या नाहीत. यातील काहीही रतन टाटा यांनी केले नाही. करावे असे त्यांना कधी वाटलेही नाही. हे वा यातील काही न करताही या देशात सात्त्विकतेने संपत्ती निर्मिती होऊ शकते आणि सभ्य, सुसंस्कृत, सालस, सोज्वळतेने राहता येते हे रतन टाटा यांनी दाखवून दिले. या साऱ्या गुणांवरच्या विश्वासास आणि भवितव्यास रतन टाटा यांच्या निधनाने तडा जातो. म्हणून रतन टाटा यांचे निधन हे केवळ एका उद्याोगपतीचे जाणे नाही. संस्कृतीच्या मूल्यसाखळीतील महत्त्वाचा दुवा त्यांच्या निधनामुळे आपल्यातून नाहीसा झाला आहे.
आडनाव टाटा असले तरी ते सोन्याचा वा चांदीचा चमचा मुखी घेऊन जन्मास आले नाहीत. टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांना दोन चिरंजीव. दोराब आणि रतन. पण या दोघांसही अपत्यप्राप्ती झाली नाही. टाटा स्टील, ताज हॉटेल आदी थोरल्या टाटांच्या स्वप्नांची पूर्तता दोराब यांनी केली. त्यांचे कनिष्ठ बंधू ‘सर’की प्राप्त रतन टाटा यांस कला, संस्कृती यात अधिक रस होता आणि मोहंजोदडो येथील सिंधू संस्कृतीचे उत्खनन असो वा गोपाळ कृष्ण गोखले यांचा भारत सेवक समाज वा महात्मा गांधी यांचा दक्षिण अफ्रिकेतील संघर्ष! या सर्वांस सर रतन नेमाने रसद पुरवत राहिले. मधल्या काळात दोराबजी यांच्या मदतीस आर. डी. टाटा फ्रान्समधून आले. टाटा साम्राज्याच्या विस्तारात या ‘आरडी’ यांचे पुत्र जेह ऊर्फ जेआरडी यांना नंतर मोठी संधी मिळणार होती. जेआरडी हेही नि:संतान होते. त्या काळात रतन यांच्या कुटुंबाने पारसी अनाथाश्रमातून एक चुणचुणीत मुलगा दत्तक घेतला. ते नवल टाटा. म्हणजे आज निवर्तलेल्या रतन टाटा यांचे वडील. त्यांना टाटा साम्राज्याचे सारथ्य करण्याची संधी मिळाली नाही. ती बऱ्याच प्रतीक्षेनंतर का असेना पण रतन टाटा यांस मिळाली. वास्तविक अमेरिकेत असताना रतन टाटा यांना ‘आयबीएम’ या बलाढ्य कंपनीचे बोलावणे होते. त्यांनी ते नाकारले आणि त्याऐवजी भारतात परत येऊन टाटा समूहाच्या पोलाद कारखान्यात एखाद्या अन्य कुशल कामगाराप्रमाणे नोकरी पत्करली. तेथून पुढे कित्येक वर्षे अन्य कोणत्याही कर्मचाऱ्याइतकेच स्थान रतन यांचे टाटा समूहात होते. पुढे काही काळासाठी त्यातही खंड पडला कारण आपल्या गंभीर आजारग्रस्त आईच्या शुश्रूषेसाठी रतन टाटा तिच्यासमवेत अमेरिकेत राहू लागले. या काळात टाटा समूहाने आपले परंपरागत उद्याोग सोडून नव्या काळासाठी कसे तयार व्हायला हवे, याचे अत्यंत सविस्तर, दीर्घ टिपण त्यांनी तयार केले आणि तोपर्यंत टाटा समूहाची धुरा ज्यांच्याकडे आलेली होती त्या जेआरडींस ते पाठवून दिले.
हेही वाचा : अग्रलेख: मते आणि मने!
रतन टाटा यांच्या दृष्टीची चुणूक यानिमित्ताने पहिल्यांदा जेआरडींस आली. भारतात परतल्यावर त्यांनी ‘नेल्को’ या एका अगदीच लहानशा कंपनीची जबाबदारी रतन टाटा यांस दिली. ही रतन यांच्यासाठी खरे तर वेदनादायक घटना होती. पण त्याचा कोणताही बभ्रा न करता त्यांनी ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि त्या कंपनीचे भले करून दाखवले. तरीही बराच काळ रतन टाटा यांच्याकडे अधिक मोठी जबाबदारी सोपवण्यास जेआरडी तयार नव्हते. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्या वेळी टाटा समूहात असलेले एकापेक्षा एक तगडे ढुढ्ढाचार्य. एकेक उद्याोग जणू त्यांच्या मालकीचा. टाटा स्टील रुसी मोदी यांचे, ताज हॉटेल अजित केरकर यांचे, टाटा मोटर्स म्हणजे सुमंत मुळगावकर, एसीसी ही नानी पालखीवालांची जहागीर, टाटा केमिकल्स ही दरबारी सेठ यांची मक्तेदारी इत्यादी. यातील मोदी यांच्यासारख्याची मनीषा आपण जेआरडी यांचे उत्तराधिकारी व्हावे अशी होती आणि त्यात काही गैर नव्हतेही. तथापि समग्र टाटा समूहास वाहून नेण्याइतके यातील कोणाचे खांदे रुंद आहेत याबाबत जेआरडी साशंक होते आणि रतन टाटाही या जबाबदारीसाठी तयार आहेत किंवा काय हा प्रश्न त्यांना होता. शेवटी शापूरजी पालनजी मिस्री समूहाच्या मिस्री यांनी आपले वजन रतन यांच्या पारड्यात टाकले आणि टाटा समूहाची धुरा रतन यांच्या हाती आली. मिस्री हे टाटा समूहाचे सर्वात मोठे समभागधारक. त्यामुळे त्यांचे मत निर्णायक ठरले. तथापि याच मिस्री यांचा मुलगा सायरस यांच्याकडे सोपवलेली टाटा समूहाची जबाबदारी काढून घेण्याचे वेदनादायी कृत्य रतन टाटा यांस उत्तरायुष्यात करावे लागले. ही त्यांच्या आयुष्यातील शेवटपर्यंत न भरून आलेली जखम ठरली.
एखाद्या परिसरातील झाडे अस्ताव्यस्त वाढलेली असावीत तसा जेआरडींच्या काळात टाटा समूह होता. त्यातील काही झाडांची योग्य छाटणी करून त्यास भव्य, नेत्रदीपक उद्यानाचे रूप देण्याचे श्रेय रतन टाटा यांचे. त्यांनी त्यावेळी टाटा समूहातील कंपन्यांकडून स्वामित्व मूल्य आकारण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला. पण रतन टाटा त्या विरोधास बधले नाहीत. टाटा समूहातील अनेक ज्येष्ठांस स्वत:च्याच समूहास स्वामित्व मूल्य देणे मान्य नव्हते. पण रतन टाटा यांनी तो निर्णय अमलात आणला. त्यातून टाटा न्यासासाठी पैसे कमावणे हा त्यांचा हेतू अर्थातच नव्हता. या आलेल्या अतिरिक्त निधीतून त्यांनी टाटा समूहातील कंपन्यांत टाटांची मालकी वाढवत नेली. एक काळ असा होता की टाटा समूहात खुद्द टाटांपेक्षा बिर्ला समूहाची मालकी अधिक होती. रतन टाटा यांनी हे सर्व दूर करत टाटा समूहास एक आखीव-रेखीव आणि भविष्यवेधी रूप दिले. रतन टाटा यांच्या आधी जेआरडींच्या काळातील ढगळ, सर्वसमावेशक असा उद्याोग समूह रतन टाटा यांच्या काळात अधिक धारदार बनला आणि त्याला सुस्पष्ट दिशा मिळाली. या अशा उद्याोगाने पुढे टेटली, जग्वार, लँड रोव्हर आदी जागतिक कंपन्यांस स्वत:त सामावून घेणे नैसर्गिक होते. रतन टाटा यांच्या काळात टाटा समूहाचे रूपांतर एका बलाढ्य वैश्विक कंपनीत झाले. आज अमेरिकी सैनिक वापरतात ती ‘अपॅचे’ नावाने ओळखली जाणारी हेलिकॉप्टर्स असोत, जगातील बहुसंख्यांचा दिवस ज्याने सुरू होतो तो चहा असो वा जगभरातील अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांच्या शहरातील वाहतूक सुविधा आदींचे नियमन करणारी ‘टीसीएस’ असो. जगण्याचे एक क्षेत्र असे नाही की ज्यास टाटा या नावाचा स्पर्श झालेला नाही.
हेही वाचा : अग्रलेख: अ-पक्षांचा जयो झाला…
आणि तरीही या सगळ्यापासून ‘इदं न मम’ म्हणत रतन टाटा दूर राहिले. हे त्यांचे खास टाटापण. सर्वात असूनही कशातच नसणारे! ‘‘जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो’’, या बाकिबाब बोरकरांच्या शब्दांचे यथार्थ वास्तव रूप म्हणजे रतन टाटा. आज त्यांचे अस्तित्वच ‘मी पणा’च्या पक्व फळाप्रमाणे निघून गेले. त्यांच्या स्मृतीस ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.