भारतीय क्रिकेट संघ जेव्हा ऑस्ट्रेलियासारख्या कठीण दौऱ्यावर निघाला, तेव्हा त्यातील चार खेळाडू कारकीर्दीचा संधिकाल सुरू असलेले होते, आहेत. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर सपाटून मार खाऊन ऑस्ट्रेलियात चाललेल्या या संघाकडून फारशी अपेक्षा नसतानाही या चमूने पहिला सामना जिंकला खरा; पण दुसऱ्या सामन्यातील वाताहत आणि तिसऱ्यात याच मार्गावरून वाटचाल सुरू असताना पाऊस मदतीला आल्याने वाचलेली इभ्रत पाहता, आत्ताचा संघ या दौऱ्यानंतर मोठ्या स्थित्यंतरातून जाणार हे स्पष्ट आहे. त्या स्थित्यंतरातील एक थोडा अनपेक्षित आणि चुटपुट लावून गेलेली ‘कलाटणी’ म्हणजे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची निवृत्ती. अश्विनचे वय पाहता खरे तर त्याची निवृत्ती अकाली वगैरे नाही. कोणताही चांगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वयाच्या विशीत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात करून तिशीच्या उत्तरार्धात निवृत्त होतो, तसा अश्विनही १४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून ३८ व्या वर्षी निवृत्त झाला. निवृत्तीचा निर्णय वैयक्तिक आहे, असे तो सांगत असला, तरी भारतीय क्रिकेटमध्ये जे जे काही होते, ते कधीच वैयक्तिक राहात नाही. अश्विनच्या निर्णयालाही ते लागू होते. सामने जिंकून दिलेल्या क्रिकेटपटूला निवृत्त होताना चांगली मानवंदना मिळायला हवी होती, असे सूर उमटले, ते त्यामुळेच. ‘मी त्याला अशा प्रकारे निवृत्त होऊ दिले नसते,’ असे कपिलदेव यांनी बोलूनही दाखवले. पण, हा केवळ त्याच्याच निवृत्तीचा मुद्दा नाही, तर भरीव कामगिरी केलेल्या खेळाडूंच्या कारकीर्दीच्या संधिकालाबाबत भारतीय क्रिकेटने अधिक समंजस असण्याची गरज आहे, हा यातील महत्त्वाचा धडा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या धड्याकडे वळण्यापूर्वी अश्विनने जो वस्तुपाठ घालून दिला, त्याबाबत. अश्विन हा काही भारतीय क्रिकेटमधील अतिशय लोकप्रिय खेळाडूंचे जे परिमाण आहे, त्यात बसणारा नाही. नैसर्गिक उंची सोडल्यास व्यक्तिमत्त्वात वेगळा रुबाबदारपणा आहे, असेही नाही. त्याला संघात घेऊनही अंतिम ११ खेळाडूंत खेळवले नाही, म्हणून खूप मोठ्या चर्चा झडल्या किंवा त्यामुळेच कसा सामन्याच्या निकालावर परिणाम झाला, असेही अपवाद वगळता कधी म्हटले गेलेले नाही. तो काही जगातील अत्यंत अभिजात ऑफस्पिनर किंवा त्यांचा किमान वारसा चालवणारा वगैरेही नाही. पण, तरी त्याचे क्रिकेटमध्ये वेगळे स्थान आहे. किंबहुना हे सगळे नाही, तरी त्याच्या कामगिरीची क्रिकेटच्या इतिहासाला दखल घ्यावीच लागेल, हे त्याचे वैशिष्ट्य. एरवी १०६ कसोटी सामन्यांत ५३७ बळी घेणे हे गोलंदाजाकडे कला आणि कौशल्य दोन्ही असल्याशिवाय साध्य होत नाही. अश्विनची खासियत अशी की, त्याने कारकीर्दीच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर समस्या निवारकाची भूमिका बजावली आहे. तो अजून पुरता कायमचा फिरकी गोलंदाजही झालेला नसताना – भारताच्या १७ वर्षांखालील संघाच्या शिबिरात असताना त्याला पहिली समस्या कोणती भेडसावली असेल, तर भाषेची. त्यावर त्याने इतर कशाहीपेक्षा व्यावहारिक उत्तर शोधले, ते हिंदीची खासगी शिकवणी लावून. समस्या या सोडविण्यासाठी असतात, याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून तो आपल्या गोलंदाजीबाबतही असेच प्रयोग करत राहिला. ‘तू ऑफस्पिनची अभिजातता जप, जास्त प्रयोग करू नकोस,’ असा कधी आगंतुक सल्ला किंवा हेटाळणीसुद्धा त्याच्या वाट्याला आलीच नाही, असे नाही. त्याने यावर हटकून स्वतंत्र उपाय शोधले, हा त्याचा धाडसीपणा. समोर खेळणाऱ्या फलंदाजाला आपण टाकत असलेल्या प्रत्येक चेंडूवर नवे प्रश्न विचारायचे, हे त्याचे यावरचे उत्तर! कधी टप्पा बदलून, कधी गोलंदाजीची धाव कमी-जास्त करून, कधी ‘बोलिंग क्रीझ’चा अतरंगी वापर करून आणि अनेकदा ‘कॅरम बॉल’च्याच विविध क्लृप्त्या अजमावून फलंदाजाला कायम बुचकळ्यात पाडणे हा त्याचा आवडता छंद. प्रयोगाला अश्विन कधी घाबरला नाही आणि त्यासाठी सराव जाळ्यात वाट्टेल तेवढे कष्ट घ्यायला तो कमीही पडला नाही. भारताबाहेरच्या खेळपट्ट्या फिरकीला पोषक नसतानाही त्याने यश मिळवले, ते या जोरावर. अर्थात, तेथे कदाचित आपल्या गोलंदाजीची फारशी करामत चालणार नाही, ही समस्या असू शकते म्हटल्यावर त्याने फलंदाजी मजबूत करण्याचा उपायही शोधलाच. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन साडेतीन हजारांहून अधिक धावा, सहा शतके आणि १४ अर्धशतके ठोकणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार जणांना जमलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये ११ वेळा मालिकावीर किताब मिळवणे हीसुद्धा काही नेहमी घडणारी गोष्ट नाही. घरच्या मैदानावर सलग १३ वर्षे सर्व कसोटी सामने खेळणाऱ्या अश्विनला एकदिवसीय सामन्यांत मात्र अन्यायकारक पद्धतीने सातत्याने आत-बाहेर ठेवण्यात आले. त्याच्यासारख्या गोलंदाजाशी किमान याबाबत चांगला संवाद तरी साधायला हवा होता. पण अडचणीचे उपायांत रूपांतर करणाऱ्या अश्विनने टी-२० प्रकारात प्रयोगशील गुणवत्तेवर आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि तेथे आपली दखल घ्यायला भाग पाडले.

अशा चढ-उतारांच्या प्रवासात त्याची निवृत्ती हे त्यातील जरा अनपेक्षित वळण. अनेक भले भले क्रिकेटतज्ज्ञ या आकस्मिकतेचे विश्लेषण करत असले, तरी अश्विन स्वत: मात्र या गुंत्यातून पाय मोकळे करून बसला आहे. त्याला ही समस्याच वाटत नसावी. पण त्याला काही वाटत नसले – किंवा तो तसे दाखवत असला – तरी भारतीय क्रिकेट चालविणाऱ्यांनी त्याच्या निवृत्तीच्या निमित्ताकडे समस्या नाही, तरी किमान उत्तरदायित्व म्हणून पाहणे गरजेचे. क्रिकेटच्या एखाद्या पिढीवर आपली छाप सोडणाऱ्या क्रिकेटपटूंना निवृत्तीचा निरोपही संस्मरणीय मिळावा, ही काही वावगी अपेक्षा नाही. तसा तो सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे आदी गेल्या पिढीतील क्रिकेटपटूंना मिळालाही. त्यानंतरच्या काळात भारतीय क्रिकेटची धुरा ज्यांनी खांद्यावर वाहिली, त्यांपैकी अश्विन होता. अश्विनची निवृत्तीची वेळ चुकली असे झालेले नाही, कारण त्यानेच म्हटल्याप्रमाणे गेली दोन वर्षे झोपताना त्याला त्याने टिपलेले बळी, काढलेल्या धावा अशा कोणत्याच आठवणी डोळ्यांसमोर येत नव्हत्या. असे होते आहे, म्हणजे थांबण्याची वेळ झाली आहे, याची जाणीव होणे आणि ती झाल्यावर जाणतेपणाने निर्णय घेणे हे अश्विनचे वैशिष्ट्यच. अर्थात, हे सांगताना त्याने आपल्यातील क्रिकेट संपलेले नसल्याने क्लब क्रिकेट खेळत राहू, हेही सांगितले आहे आणि इथेच जरा अडखळायला झाले आहे. अश्विनच्या आधी, अशी दौरा चालू असताना एकदम तडकाफडकी निवृत्तीची घोषणा जाहीर करणारे अलीकडचे ठळक उदाहरण महेंद्रसिंह धोनीचे. बरोबर दहा वर्षांपूर्वी त्यानेही अशीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर अचानक निवृत्ती घेऊन अचंब्यात टाकले होते. धोनी काय किंवा अश्विन काय, त्यांच्या निवृत्तीचे निमित्त भारतीय क्रिकेटमधील एक कटू वास्तव दर्शविण्यास पुरेसे आहे. ते हे, की महान खेळाडूंना त्यांच्या कारकीर्दीच्या उतारावर टाकाऊ वस्तू म्हणून बघणे.

सांघिक खेळात एखाद्यालाच नायक बनवून डोक्यावर बसवणे जसे चूक, तसे उत्तम खेळाडूला किमान आदरपूर्वक निरोप मिळण्याची संधी नाकारणेही अयोग्यच. भारतीय क्रिकेट चालविणाऱ्यांनी, कितीही कठोर वाटला, तरी कारकीर्दीचा संधिकाल सुरू झालेल्या खेळाडूंशी निवृत्तीच्या योजनेबाबतचा संवाद साधणे, नियोजन करणे गरजेचे आहे. सध्याच्या संघातील रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांच्यावर हा निर्णय घेण्याची वेळ येईल, तेव्हा ते अनपेक्षित असण्यापेक्षा नियोजित असलेले बरे. तरीही निवृत्तीचे दु:ख खेळाडूला असणारच; पण त्याला उगाच औचित्यभंगाच्या वेदनेची किनार नसावी. संधिकालाला तिमिराचा उदय म्हणण्यापेक्षा प्रकाशाचे सांध्यपर्व म्हणणे अधिक उचित.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on ravichandran ashwin retires from indian cricket amy