सरत्या वर्षांचा शब्द म्हणून ‘ऑक्सफर्ड’ने निवडलेल्या ‘रिझ’ या शब्दाच्या अर्थाबद्दल पुढे मतभेदही झाले; पण भाषेच्या प्रवाहीपणाची, जिवंतपणाची खूणच यातून पटली..

रिझ (rizz) हा शब्द २०२३ या वर्षांचा शब्द किंवा वर्ड ऑफ द इयर असल्याचे ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने जाहीर केले आहे. भाषा ही हजारो वर्षे विकसित होत गेलेली असते, तरी एखाद्या वर्षांत माणसांच्या रोजच्या जगण्यातून एक नवीन शब्द निर्माण होतो ही कमालीची गोष्ट आहे ना? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’सह अमेरिकन डायलेक्ट सोसायटी, केम्ब्रिज डिक्शनरी, कॉलिन्स इंग्लिश डिक्शनरी अशा वेगवेगळय़ा संस्था दरवर्षी हा उद्योग करतात आणि आपापल्या पातळीवर ‘वर्ड ऑफ द इयर’ अर्थात त्यांच्या मते त्या वर्षांमधला सर्वोत्तम शब्द कोणता ते जाहीर करतात. शब्द निवडण्याचे त्यांचे प्रत्येकाचे निकष, भौगोलिक परिसर, प्रक्रिया हे सगळे वेगवेगळे असते. त्यामुळे निवडलेले शब्दही निरनिराळे. उदाहरणार्थ, २०२० या कोविडला वाहिलेल्या वर्षांत अमेरिकन डायलेक्ट सोसायटीचा वर्ड ऑफ द इयर ‘कोविड’ होता, तर केम्ब्रिज डिक्शनरीचा ‘क्वारंटाइन’. कोलिन्स इंग्लिश डिक्शनरीचा ‘लॉकडाऊन’ तर मेरियम वेबस्टरचा ‘पॅन्डेमिक’. ऑक्सफर्डने त्या वर्षी कोणताच शब्द निवडला नव्हता.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र

अमेरिकन डायलेक्ट सोसायटी असे शब्द १९९० पासून दरवर्षी निवडते आहे तर ऑक्सफर्ड २००४ पासून. ऑक्सफर्डच्या निकषांनुसार त्या विशिष्ट शब्दाची निर्मिती त्या १२ महिन्यांच्या काळातच झाली असेल असे नाही, त्याआधीही काही काळापूर्वी ती झालेली असू शकते, पण तो शब्द त्या वर्षी सर्वाधिक वापरला गेलेला असावा लागतो. त्याचा नंतर ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश होतो. ऑनलाइन वाचक आणि भाषातज्ज्ञ यांच्या साहाय्याने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही निवड करते. गेल्या वर्षी ‘गॉबलिनमोड’ हा शब्द निवडला गेला होता. तसा यंदाचा मानकरी ‘रिझ’!

हेही वाचा >>> अग्रलेख: दांडगेश्वरांचा काळ!

या ‘रिझ’चा अर्थ आहे आपले सौंदर्य, स्टाइल, मोहिनी, रोमँटिकपणा यांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यावर मोहिनी घालणे.. काई सीनेट हा समाजमाध्यमांतील इन्फ्लुएन्सर त्याच्या ऑनलाइन कार्यक्रमांमधून त्याच्या प्रेक्षकांना ‘यो, आय गॉट रिझ’ असे म्हणू लागला. त्याचे ऐकून रिझ हा शब्द टिकटॉकवर इतरही अनेक जण वापरू लागले. पण टॉम हॉलंड या हॉलीवूड अभिनेत्याने एका मुलाखतीत ‘रिझ’चा वापर केल्यानंतर तो मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला आणि सतत ‘ऑनलाइन’ असणाऱ्या तरुण पिढीने त्याचा भरपूर वापर आरंभला. पण गमतीची गोष्ट म्हणजे आपण तो एखाद्याच्या ‘असण्याची मोहिनी’ अशा अर्थाने वापरला होता, पण बाकीच्यांनी त्याचा मूळ अर्थच मारून टाकला आणि तो एखाद्याच्या ‘दिसण्याची मोहिनी’ असा त्याचा अर्थ रूढ झाला असे काई सीनेटचे म्हणणे आहे. ‘रिझ’च्या बरोबर स्पर्धेत सिच्युएशनशिप, स्विफ्टी, प्रॉम्प्ट, बीज फ्लॅग, डीइन्फ्लुएिन्सग, हीट डोम आणि पॅरासोशल हे शब्द होते. यापैकी सिच्युएशन हा शब्द बहुतेकांना माहीत असतो. पण ‘सिच्युएशनशिप’ म्हणजे जाहीर न केले गेलेले प्रेमसंबंध; हे माहीत नसते. कारण हा तरुणाईने निर्माण केलेला शब्द आहे. पॉप गायिका टेलर स्विफ्ट हिच्या लोकप्रियतेचे माप म्हणून ‘स्विफ्टी’ हा शब्द वापरला गेला आहे. तर एखादी व्यक्ती संभाषण करायला अत्यंत कंटाळवाणी आहे, हे सांगण्यासाठी ‘बीज फ्लॅग’ या शब्दाचा वापर झाला. ‘प्रॉम्प्ट’ हा शब्द आपल्याला वेगळय़ा अर्थाने माहीत आहे, पण तरुणाईने तो अल्गोरिदमला दिलेल्या सूचना या अर्थाने गेल्या वर्षभरात किंवा त्याआधीच्या काही काळात रूढ केला. एखाद्या सेलिब्रिटी व्यक्तीबद्दल चाहत्यांना जे एकतर्फी आकर्षण वाटत असते, त्या भावनेला तरुणाईने ‘पॅरासोशल’ हे शब्दरूप दिले आहे.

हे सगळे आजच्या डिजिटल युगात वावरणाऱ्या पिढीच्या बोलीभाषेमधले शब्द. या पिढीचा भोवताल, त्यामधल्या ताण्याबाण्यांचे या पिढीचे आकलन, तिच्या बुद्धय़ांकाइतकाच कार्यरत असलेला ‘भावनांक’ यातून ते घडत आहेत.. जगणे जितके प्रवाही तितकीच भाषाही प्रवाही. जगणे जितके जिवंत तितकीच भाषाही जिवंत. त्यामुळेच दरवर्षी सर्वोत्तम ठरणारे शब्द वेगळे असणेही अगदी स्वाभाविक. हे सगळे इंग्रजीच्या बाबतीत घडते कारण आज ती जागतिक पातळीवरची भाषा आहे. ज्ञानविज्ञानाची आणि व्यापार-व्यवहाराचीही भाषा आहे. एके काळी इंग्रजी भाषाही असेल चारचौघींसारखीच; पण इंग्रजांचे धाडस, साम्राज्यविस्ताराच्या भुकेबरोबरच नवे ग्रहण करण्याची आस, यातून इंग्रजीला आजचे स्थान मिळाले आहे. त्याहीपलीकडे जाऊन नोंद घ्यायला हवी ती या भाषेच्या लवचीकतेची. जगभरात जवळपास ८८ देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये इंग्रजी ही एक तर अधिकृत किंवा प्रशासकीय भाषा आहे किंवा निदान सांस्कृतिक भाषा तरी आहे. अमेरिका हा जगातला जिथे सर्वाधिक इंग्रजी बोलली जाते असा पहिल्या क्रमांकाचा तर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या देशांमध्ये इंग्रजीची विविध रूपे बोलली जातातच, शिवाय त्या देशांमधल्या स्थानिक भाषांतले अनेक शब्द इंग्रजीनेही सामावून घेतले आहेत. लूट, अवतार, जंगल, पंच, रोटी, गुरू, भाई, बापू,.. अशी यादी मोठी आहे. त्यातही हे हिंदी शब्द. मराठीतल्या ‘मुंगूस’सारखे इतर भारतीय भाषांमधले शब्दही इंग्रजीने सहज सामावून घेतले आहेत. 

हेही वाचा >>> अग्रलेख : नवे बँक-बुडवे कोण?

आपल्याला आपल्या भाषेत- मराठीत- गेल्या वर्षभराचे जाऊ द्या, गेल्या पाच वर्षांत नव्याने समाविष्ट झालेला एखादा शब्द स्मृतीला फार ताण न देता पटकन सांगता येईल? आपली मुले आपल्या भाषेतून किती वेगाने बाहेर पडतात यातच धन्यता वाटून घेणाऱ्यांना एकेका शब्दाबाबत, त्याच्या निर्मितीबाबत काय पडले असणार म्हणा.. ही स्थिती एकटय़ा मराठीची नाही, तर सगळय़ाच भारतीय भाषांची आहे, हे आणखी वेदनादायक आहे. कारणे काहीही असोत. आपण दुसरी भाषा आपली म्हणून निवडतो तेव्हा आपली भाषा नाकारतो. ती नाकारताना आपली सगळी संस्कृती, तिचे संचित नाकारत असतो. ते काही एका रात्रीत उभे राहिलेले नसते. पानेफुलेफांद्या यांच्या समूहाला झाड का म्हणायचे ते कुणी एकाने ठरवलेले नसते. प्रत्येक शब्द, त्याची रचना, त्याचा उच्चार, त्याचे व्याकरण हे सगळे आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत पोहोचवू पाहिले आणि आपणही कुणाचे तरी पूर्वज असणार आहोत, याचे भान भाषेच्या वापराबाबत तरी अगदी आता-आतापर्यंत पाळले. काळाच्या ओघात त्यातील अनेक गोष्टी नष्टही होत गेल्या असतील, पण जे आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहे, तो आपला सांस्कृतिक ठेवा आहे, याची आपल्याला खरोखरच जाण आहे का?  शंभरेक वर्षांपूर्वी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मराठी भाषा मुमूर्षू झाली आहे का, असा प्रश्न विचारला होता. तशी ती झाली नसली तरी तिची स्थिती काही फार बरी आहे, असे म्हणता येत नाही. तिच्याच राजधानीत मराठी पाटय़ा लावण्याची आज सक्ती करावी लागते. मराठी शाळा टिकाव्यात यासाठी संघर्ष करावा लागतो. आपल्या मुलांना इंग्रजी येते याचा अभिमान बाळगणाऱ्या पालकांना मुलांना मराठी नीट येत नाही, याची जराही खंत नसते. मराठी ज्ञाननिर्मितीची भाषा नाही, की धननिर्मितीची भाषा नाही. अशा भाषेत कुठून येणार नवे शब्द? त्यातून सर्वोत्तम शब्द निवडण्याची उलाढाल दरवर्षी करता येईल, अशी परिस्थिती तरी कशी असू शकते? नवनवीन शब्दनिर्मितीच्या इंग्रजीच्या वैभवापुढे ‘माय मरो.. मावशी जगो’ ही म्हण आपल्या भाषेलाच लागू व्हावी यापेक्षा वाईट ते काय?