अलीकडल्या काळात दुर्मीळ असे सच्चेपण लाभलेला फेडरर कोणतेही बिरुद अधिकृतपणे न मिरवताही जगभरातल्यांचा सदिच्छामूर्ती आणि सदिच्छादूत बनला..
ब्रिटन आणि जगभरातील तीन पिढय़ांना राणी एलिझाबेथ यांच्या या दुनियेत ‘नसण्या’ची जशी सवय नाही, तशीच जगभरातील टेनिसरसिकांच्या एका अख्ख्या पिढीला रॉजर फेडररच्या टेनिस कोर्टवर ‘नसण्या’ची सवय नाही. सवयीचा त्याग चटकन करता येत नाही. फेडरर गेला काही काळ टेनिस कोर्टवर जवळपास दिसेनासा झाला होता. परंतु तरीही पुनरागमन करण्याविषयी बोलत होता. त्याचे बोल शिरसावंद्य मानून टेनिसरसिक आणि फेडररचे प्रतिस्पर्धी त्याची वाट पाहात होते. मात्र टेनिससारख्या खेळात वयाचे सोंग आणता येत नाही. त्याच्या मागून आलेले आणि त्याच्या विक्रमांना ओलांडून पुढे गेलेले राफाएल नडाल आणि नोव्हाक जोकोविच हेदेखील तंदुरुस्ती आणि दुखापतींच्या तक्रारींनी बेजार झाले आहेत. २४ वर्षे उच्च दर्जाचे स्पर्धात्मक आणि व्यावसायिक टेनिस खेळून गात्रे थकली हे फेडरर आणि त्याच्या चाहत्यांना कळत होते. पण निरोप घेण्याची इच्छा कुणालाच नसावी. ती वेळ आली असे अखेर फेडररनेच ठरवले. ती वेळ येऊच नये, या आशेवर त्याचे चाहते होते. त्यांना फेडररने त्याच्या सुपरिचित लोभस आणि विनम्र शैलीत वास्तवाची जाणीव करून दिली. चाहते अधाशी आणि असंतुष्ट असतात. त्यांच्या अपेक्षा ज्यांच्याकडून असतात, त्यांच्यासाठी त्या अन्याय्यही ठरू शकतात. मात्र अपेक्षांमध्ये प्रेम असते. बऱ्याचदा त्या प्रेमाची उत्कटता आदर्शमूर्तीच्या कौशल्याशी, विजिगीषेशी, दीर्घकालीन अस्तित्वाशी सम प्रमाणात असते. त्या प्रेमातून ते अस्तित्वच कालातीत असावेसे वाटू लागते. यातूनच लता मंगेशकरांचे गाणे सुरूच राहावे, सचिन तेंडुलकरच्या धावा होतच राहाव्यात आणि फेडररच्या नावावर आणखी किमान एखादे ग्रँड स्लॅम जमा व्हावे या वेडय़ा आशेवर आपले जीवन पुढे सरकत असते. ते होत नाही आणि पूर्णविराम घेतला जातो त्या वेळी आयुष्य थबकल्याचा भास सार्वत्रिक असतो. पण असे भाग्य सर्वाच्या नशिबी येत नाही, हेही सत्य.
हेही वाचा >>> अग्रलेख : तेलाचा तळतळाट!
रॉजर फेडरर आता एकेरीत सर्वाधिक यशस्वी ग्रँड स्लॅम जेता राहिलेला नाही. राफाएल नडाल (२२) आणि नोव्हाक जोकोविच (२१) हे आकडेवारीनुसार त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात. टेनिसविश्वातील हे तीन महानतम टेनिसपटू, पण परस्पर द्वंद्वामध्येही नडाल आणि जोकोविच फेडररपेक्षा जरा अधिक सरस ठरलेले दिसतात. तरीही या दोघांपेक्षा फेडरर किती तरी अधिक लोकप्रिय ठरला, त्याची कारणे अनेक. खेळात उत्तुंग कामगिरी महत्त्वाची, पण तिला सौंदर्याची जोड मिळाली तर बहार येते. फेडररचे टेनिस कोर्टवर वावरणे म्हणजे एक चैतन्यवादळ होते. त्याचा बहुतांश शांत चेहरा आणि सौम्य व्यक्तिमत्त्व त्याच्यातील आक्रमक आणि जोखीमप्रेमी टेनिसपटूचा फारसा परिचय होऊ देत नसत. इतर दोघांपेक्षाही सर्वाधिक काळ नेटजवळ येऊन खेळ करण्याची हुनर आणि आत्मविश्वास फेडररपाशी होता. मॅचपॉइंटसारख्या सामन्यातील परमोच्च क्षणीदेखील बॅकहँड फटक्याची जोखीम पत्करण्याची िहमत फेडररच्या ठायी होती. नडाल आणि जोकोविच त्याच्यापेक्षा अधिक व्यवहार्य ठरतात. कारण ते सहसा अशी जोखीम घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कदाचित त्यामुळेही त्यांनी फेडररपेक्षा अधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या असाव्यात. नडाल वारंवार दुखापतग्रस्त होत राहिला ही गोष्ट खरी. तरीही पूर्ण तंदुरुस्त नडाल सामना कितीही लांबला तरी शेवटपर्यंत खेळत राहण्याची ऊर्जा बाळगून असतो. जोकोविचच्या हालचाली अधिक चपळ असतात आणि त्याच्या तंदुरुस्तीचा स्तर इतर दोघांपेक्षा निश्चितच वरचा आहे. तरीही या दोघांपेक्षा फेडररला अधिक विशाल चाहतावर्ग लाभला. तो या दोघांपेक्षा आधी चमकू लागला हेदेखील एक कारण असू शकेल. त्याने विम्बल्डन या टेनिसमधील सर्वाधिक आदरणीय आणि लोकप्रिय स्पर्धेत सर्वाधिक आठ वेळा अजिंक्यपद पटकावले, हे दुसरे कारण असू शकेल.
हेही वाचा >>> अग्रलेख : कालजयी प्रयोगवंत..
पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण फेडररच्या खेळातील उच्च दर्जाचे सौंदर्यमूल्य हे होते. त्याचा बँकहँड फटका, त्याचा फोरहँड फटका, ड्रॉपमधील अलगद नजाकत, नेटच्या विरुद्ध दिशेला पळत जात दोन पायांमधून अनेकदा मारलेला अद्भुत फटका यांचे वर्णन करण्याच्या फंदातच बऱ्याचदा समालोचक पडायचे नाहीत. ‘ओह..’ या उत्स्फूर्तोद्गारापलीकडे बाकी काही सांगण्याचे राहिलेले नसायचे. सरळसोट शरीर, बऱ्याचदा डोक्याला बांधलेला पट्टा, कोर्टभर धावाधाव करताना उडणारे केस आणि चेहऱ्यावरील धोरणी भाव मात्र नेहमी कायम असायचे. एका मर्यादेपलीकडे निराशा किंवा आनंदाचे प्रदर्शन त्या चेहऱ्यावर कधी दिसले नाही. हे सगळे रसायन टेनिसरसिकांच्या पसंतीस उतरले. त्याचे पराभव टेनिसरसिकांच्या हृदयात कालवाकालव करून जायचे. फेडरर कधी हरूच नये, असे त्याच्या प्रत्येक सामन्यात त्याच्या लक्षावधी चाहत्यांना वाटायचे. ब्रॅडमन, पेले, मोहम्मद अली, स्टेफी ग्राफ, तेंडुलकर आणि फेडरर हे काही मोजके खेळाडू, ज्यांच्या कामगिरीशी असंख्यांच्या भावना अशाच जुळलेल्या राहात.
हेही वाचा >>> अग्रलेख : महाराष्ट्राविना..?
फेडररने २००१ मधील विम्बल्डन स्पर्धेत तत्कालीन महान टेनिसपटू पीट सँप्रासचा पराभव केला. ती एका युगाची नव्हे, तर बहुधा शैलीचीही समाप्ती ठरली. विम्बल्डनवर त्या काळात सँप्रास, अँडी रॉडिक, लेटन ह्युइट, गोरान इवानिसेविच अशा कौशल्यापेक्षा ताकदीवर भर देणाऱ्या टेनिसपटूंची चलती होती. फेडररमुळे ती संपुष्टात आली. फेडररने २००३ मध्ये पहिल्यांदा विम्बल्डन जिंकले आणि त्यानंतर पुढील सात वर्षे तो टेनिसविश्वाचा अनभिषिक्त सम्राट ठरला. फ्रेंच स्पर्धेत मातीच्या कोर्टवर जवळपास त्याच दरम्यान राफाएल नडालचा उगम झाला आणि फेडररला किमान एक किंवा दोन वार्षिक ग्रँड स्लॅम जिंकण्यापासून त्याने वंचित ठेवले. तरीही त्या दशकातली फेडररची कामगिरी थक्क करणारी ठरते. २००३ ते २००९ या काळात तो २८ पैकी २१ ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या अंतिम फेरीत पोहोचला. यात विम्बल्डनची हिरवळ, फ्रेंच स्पर्धेची लाल माती आणि अमेरिकन-ऑस्ट्रेलियन स्पर्धाचे टणक पृष्ठभाग या साऱ्यांचा समावेश होता. यात विम्बल्डन आणि अमेरिकन स्पर्धामधील सलग पाच अजिंक्यपदांचा समावेश होता. त्याचे हे बहुपैलुत्व फेडररला निराळा ठरवते. गुणवत्ता आणि नजाकत यांचा सौंदर्यमेळ दर वेळी साधला जाईलच असे नाही. बेकेनबाउर-क्रायुफ, पेले-सॉक्रेटिस, मार्टिना-एव्हर्ट, स्टेफी-साबाटिनी, गावस्कर-विश्वनाथ, कपिल-बेदी, सचिन-लक्ष्मण, विराट-रोहित, रोनाल्डो-मेसी, फिशर-ताल, कार्लसन-आनंद या एकच व्यक्ती असत्या तर काय बहार आली असती! तसे अकल्पित, अशक्यप्राय मिश्रण टेनिसरसिक, विश्लेषकांना फेडररमध्ये दिसून आले. तो एकाच वेळी महाकाव्य होता नि शोधनिबंधही! त्याच्यात उत्तम शिल्प दिसायचे, तसेच उच्च तंत्रज्ञानही! मैदानावर तो जितका मोठा खेळाडू होता, तितकाच महान तो मैदानाबाहेर माणूस म्हणूनही भावला. त्यामुळेच त्याची लोकप्रियता देशातीत, वर्णातीत, धर्मातीत होती. त्याचे सच्चेपण अलीकडल्या काळात तर दुर्मीळ म्हणून हवेहवेसे वाटायचे. कोणतेही बिरुद अधिकृतपणे न मिरवताही तो जगभरातल्यांचा सदिच्छामूर्ती आणि सदिच्छादूत बनला. कारकीर्दीत यशापयश आणि चढउतार हे येत राहतात. पण सर्जकता ही कालातीत असते आणि या सर्जकतेचे आकर्षण मानवजातीला शतकानुशतके वाटत आले आहे. मोझार्ट, शेक्सपिअर, दा विन्ची यांचे योगदान महत्त्वाचे ठरते, कारण त्यांच्या कृतींना स्थळ-काळाचे बंधन नसते. फेडररचे टेनिस त्या दर्जाचेच होते. ते जितक्या सहजपणे टेनिस कोर्टवर सादर झाले, तितक्याच सहजपणे त्याचा त्याग करण्याचा मोठेपणाही फेडररने दाखवला. त्याच्या या निर्णयाने जगभरातील विविध भागांमध्ये हळहळ उमटली असेल. कारण त्याच्या चाहत्यांना विशिष्ट अशा देशाची ओळख नाही. फेडरर या एकाच नावाने त्यांना गुंफलेले आहे. एखाद्या ‘फेडरर रिपब्लिक’सारखे!