‘सिग्नलगेट’सारखी आगळीक घडते ती व्यवस्था आणि जबाबदारीप्रति ट्रम्प आणि त्यांच्या सहकारी, सोयऱ्यांमध्ये गांभीर्यच नसल्यामुळे…

राज्यशकट हाकणे ही गंभीर बाब असते. मोठ्या देशाचा गाडा हाकणे हे तर अधिक गंभीर. महासत्तेचा कारभार तर गंभीरात गंभीर. पण हे गांभीर्य नको तेथे नको तितके दाखवले गेले नि हवे तेव्हा व तेथे आढळून आले नाही, की काय होते हे अमेरिकेत नुकत्याच घडलेल्या प्रकाराने दाखवून दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवली नि ते दुसऱ्यांदा या पदावर निवडून आले. त्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या पदावर एक कार्यकाळ व्यतीत केलेला आहे. तेव्हा अध्यक्ष म्हणून अमेरिकेचा कारभार चालवण्याचा त्यांना चार वर्षांचा अनुभव आहे. पण त्या वेळी जसे ते मनाने वॉशिंग्टनमध्ये कमी आणि फ्लोरिडातील त्यांच्या मौजप्रासादातील मेजवान्यांमध्ये आणि प्रासाद परिसरात गोल्फ खेळण्यात अधिक रमायचे, तसेच आताचे चित्र आहे.

किंबहुना अध्यक्ष म्हणजे एकापाठोपाठ एक अध्यक्षीय आदेशांवर सही करून मोकळे व्हायचे हा नवाच छंद त्यांनी या वेळी जोपासलेला दिसतो. यंदा त्यांच्या आजूबाजूला – फ्लोरिडात नि वॉशिंग्टनमध्ये – निराळा विरंगुळा म्हणून उद्याोगरत्न इलॉन मस्क बागडताना दिसतात. व्हाइट हाऊसला तशी निवासी चतुष्पादांची मोठी परंपरा. पण ट्रम्प यांनी मस्करूपे द्विपादाची योजना करून ती हौसही भागवून घेतली म्हणायची. मस्क यांचा तेथील वावर अनंत काळ असतो. ओव्हल ऑफिस या व्हाइट हाऊसमधील अध्यक्ष दफ्तरी कामकाज वा पत्रकार परिषद सुरू असताना तेथे चतुष्पाद घुटमळत असल्याचे आजवर आढळून आले नव्हते. मस्क मात्र पिलावळीसकट व्हाइट हाऊसमध्ये जात-येत असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजेरी लावतात. कोणी एखादा राष्ट्रप्रमुख भेटीस आला, की त्याच्या आजूबाजूला घुटमळतात. त्यांची पिलेही पाहुण्यांच्या अंगाखांद्यावर लडिवाळतात. तसे पाहता अमेरिकेतील अनेक सरकारी आस्थापना म्हणजे गोपनीयतेच्या तटबंद्याच. एरवी दुसऱ्या देशांच्या प्रमुखांचीही सुरक्षेच्या नावाखाली शरीर तपासणी वगैरे होत असेल.

मस्क यांच्यावर हे असले बंधन नाही. त्यामुळे हे महाशय कोणत्याही सरकारी कार्यालयांत बिनदिक्कत प्रवेशतात. नोकरकपात करायची म्हणून कार्यालयीन डिजिटल यंत्रणांमध्ये घुसखोरी करतात नि परस्पर कर्मचाऱ्यांना ‘उद्यापासून घरी बसावे’ असे कळवूनही टाकतात. कुण्या न्यायाधीशाने ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती दिली, की त्याच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची भाषा करतात. कॅप- जम्पर- जीन्स अशा पेहरावात अध्यक्षांच्या आजूबाजूस अधिकृत कामकाजादरम्यान वावरतात. जेथे प्रत्येक द्विपाद नि चतुष्पादाची हजेरी सरकारदफ्तरी नोंदली जाते आणि काटेकोर तपासली जाते, तेथे ही मंडळी मॉलमध्ये असल्यासारखी बागडत असतात. ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी अतिशय उदात्त भावनेतून त्यांच्या असंख्य समर्थकांना कॅपिटॉल या अमेरिकी काँग्रेसच्या इमारतीची ‘सहल’ घडवून आणली. आता त्यांतील काहींनी तिकडे मोडतोड केली, पोलिसांना धक्काबुक्की केली हा काही ट्रम्प यांचा दोष नाही. त्या वेळी काँग्रेसमध्ये जो बायडेन यांच्या अध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तबाचे सोपस्कार पार पडत होते. लवकरच अशा जथ्याने येणाऱ्यांसाठी व्हाइट हाऊसची हिरवळही सामूहिक सहलीसाठी खुली करून दिली जाईल.

हे सगळे काय आणि का सुरू आहे? याचे एकमेव कारण म्हणजे एकूणच व्यवस्था आणि जबाबदारीप्रति ट्रम्प आणि त्यांच्या सहकारी, सोयऱ्यांमध्ये असलेला गांभीर्याचा अभाव! यामुळेच ‘सिग्नलगेट’सारखा वरकरणी फजितीसम पण प्रत्यक्षात अत्यंत गंभीर प्रकार घडला. त्यावरही ही ‘छोटीशी चूक’ असल्याचा अध्यक्ष महोदयांचा निर्वाळा. येमेनमध्ये हुथी बंडखोरांच्या तळांवर हल्ल्याची योजना आखली गेली नि तिच्या नियंत्रण व अंमलबजावणीसाठी ‘सिग्नल’ नामे उपयोजनाच्या माध्यमपीठावर एक ‘चॅटरूम’ बनवली गेली. ट्रम्प वगळता झाडून सारे उच्चपदस्थ या ‘चॅटरूम’मध्ये समाविष्ट झाले.

उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्त्झ, सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ, राष्ट्रीय गुप्तवार्ता विभागप्रमुख तुलसी गॅबार्ड वगैरे… यात वॉल्त्झ यांनी आणखी एका व्यक्तीला समाविष्ट केले, त्यांचे नाव जेफ्री गोल्डबर्ग. हे गोल्डबर्ग ‘दि अटलांटिक’ या अत्यंत जबाबदार कॅनेडियन विचारपत्राचे संपादक. संरक्षणमंत्री हेगसेथ यांनी संपूर्ण बारकाव्यांसह हुथींवरील कारवाईची माहिती आणि वेळ या संवादामध्ये जाहीर करून टाकली. प्रत्यक्ष कारवाई दोन तासांनी सुरू झाली. कारवाईदरम्यानही चर्चा सुरू होती. मुळात अशा प्रकारच्या खासगी उपयोजनाधारित माध्यमपीठावर इतक्या संवेदनशील कारवाईची चर्चा करणे, माहिती पुरवणे हा केवळ संकेतभंग नव्हे, शुद्ध वेडाचार होता. गोल्डबर्ग यांच्या जागी आणखी कुणी असते, तर ही माहिती समाजमाध्यमांवर प्रसृत झाली असती. त्याने हुथी सावध झाले असते. अपेक्षित ठिकाणाहून पळून गेले असते किंवा अमेरिकी लढाऊ विमानांवर त्यांनी क्षेपणास्त्रेही डागली असती. यातून अमेरिकेची हकनाक सैन्यहानी होऊ शकली असती. एखाद्या शालेय विद्यार्थ्यांच्या समूहातील संवादही परिपक्व वाटेल, इतक्या उथळपणे ही मंडळी व्यक्त होत होती. उपाध्यक्षांना संरक्षणमंत्री काय करतात याचा पत्ता नाही.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कुणाकुणाला संवाद समूहात ‘अॅड’ करताहेत याचा त्यांना पत्ता नाही. एक जण कुणी हुथी बंडखोरांना थोपवण्याची क्षमता युरोपीय देशांच्या आरमारांमध्ये नाहीच अशी मल्लिनाथी करतो. त्यावर सगळे ‘युरोपीय सगळे दुबळे नि संधिसाधू’ हा ट्रम्प यांच्या मंत्रोच्चाराचा पुनर्जप करतात. मधूनच व्हान्स म्हणतात, आपण हे सगळे का करायचे? आपली तर जहाजे तेथून जात नाहीत ना… त्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणतात की जातात ना… आपलीही जहाजे तेथून जात-येत असतात. किती ते मात्र ठाऊक नाही. संरक्षणमंत्री म्हणतात, आता नाही केली, तर नंतरही आपल्यालाच कारवाई करावी लागणार. नाही तर इस्रायल ती संधी साधेल. मग सौदी अरेबिया आणि आखातात तेलाचे भाव भडकतील. हे सगळे चऱ्हाट गोल्डबर्ग यांनी प्रसृत केले, त्यावर ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे असे की ही काही गोपनीय (क्लासिफाइड) माहिती नव्हतीच. कारण कारवाई तर होऊन गेली! यावर बहुधा गोल्डबर्ग यांनीच कपाळावर हात मारून घेतला किंवा कसे, हे कळलेले नाही. यातील धोकादायक भाग असा, की हा सगळा उथळपणा आणि हा गांभीर्याचा अभाव एक दिवस हजारोंच्या किंवा लाखोंच्या जिवावर उठू शकतो. विध्वंसक अस्त्रांचे नियंत्रण उद्या मस्क वा तत्समांकडे येणारच नाही याची काय हमी? किंबहुना अत्यंत महत्त्वाच्या पदांवर ट्रम्प यांनी जे गणंग बसवलेत त्यांच्याकडून तरी जबाबदारीचे पालन होईलच याची शाश्वती नाही. सरकारदरबारी विराजमान झाल्यानंतर जबाबदारीचे भान यावे लागते.

अमेरिकेच्या इतिहासात अनेक मोक्याच्या पदांवर- अगदी अध्यक्षपदावरही- उथळ महात्मे विराजमान झाले नाहीत असे नाही. पण पद आणि व्यवस्थेतून काहीएक भान झिरपले आणि तो बदल पुढे त्यांच्यात दिसून आला. अलीकडे ही परिस्थिती झपाट्याने बदलताना दिसते आहे. त्यामुळे ब्रिटनचा पंतप्रधानही करोनाबंदीच्या काळात स्वत:च्याच निवासस्थानी मेजवान्या झोडू शकतो. आपल्याकडेही केंद्रात किंवा राज्यात मंत्रीपदी असलेले लोक गावगन्ना कार्यकर्ते वा स्थानिक नेत्यांप्रमाणे वक्तव्ये करतात. या बड्या लोकशाही देशांमध्ये कधी काळी विरोधी विचारांनाही ज्या आदराने वागवले गेले, सार्वजनिक हिताविषयीचे भान आणि जाण ज्या निगुतीने जपली गेली ते पाहता हल्लीच्या अध:पतनाबद्दल खंत वाटणेही संपुष्टात आले आहे. बालिश समज आणि बाहुबलींचा माज या अजब मिश्रणातून जे रसायन समोर येते त्याचे ‘नमुने’ ठायीठायी मनोरंजनच करू लागले आहेत