ठाकरे गटाने आपल्या राजकीय रेकॉर्डची ‘गद्दार’ या शब्दात अडकलेली सुई अलगदपणे सोडवावी आणि पुढच्या लढाईच्या तयारीस लागावे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील राजकारण सध्याइतके बालिश, बालबुद्धीचे आणि बालककेंद्री कधीच नव्हते. दोन द्यावेत, दोन घ्यावेत आणि झाले गेले विसरून पुढे चालू लागावे असा प्रौढपणा या राज्याने नेहमीच दाखवला. विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारास डावे आणि उजवे या दोघांनी सक्रिय पाठिंबा दिला त्याच्या किती तरी आधी महाराष्ट्रात रा. स्व. संघीय आणि समाजवादी असे दोन ध्रुव एकाच सरकारात सहभागी होते. समाजाचे व्यापक हित गुंतलेले असेल तर राजकारणी आपापले वैयक्तिक मतभेद दूर ठेवून एकत्र येत. राजकारणातील मतभेद वैयक्तिक कट्टी-बट्टीच्या पातळीवर कधी उतरले नाहीत. पण अलीकडच्या काळात महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्वच अंगाने उत्तरायण सुरू असल्याने गो-पट्ट्यातील राजकीय मतभिन्नतेस वैरत्वाकडे नेण्याची तऱ्हा येथेही रुजू लागते की काय असा प्रश्न पडतो. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा झालेला सत्कार आणि त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केलेला थयथयाट. त्याची खरेच गरज होती का आणि असे काही करून आपण आधीच घसरलेला राजकारणाचा स्तर आणखी उतरवतो किंवा काय, याचा विचार संबंधितांनी करायला हवा. तो केला जात नसेल तर त्याबाबत प्रश्न उपस्थित करणे माध्यमांचे कर्तव्य ठरते.

कारण यानिमित्ताने जो काही धुरळा उडाला त्यातून राजकीय हवा तेवढी गढूळ झाली. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार करावा असे आयोजकांस वाटले आणि त्या समारंभास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेही उपस्थित राहिले. हा पुरस्कार महादजी शिंदे यांच्या नावे होता. तो एकनाथ शिंदे यांस शरद पवार यांच्या हस्ते द्यावा असे आयोजकांस वाटले आणि त्यास संबंधितांनी होकार दिला असेल तर त्यात इतरांचा संबंध येतो कोठे? काही वर्षांपूर्वी शरद पवार यांचा भव्य सत्कार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला आणि त्याहीआधी पवार यांच्या साठी सोहळ्यास अटलबिहारी वाजपेयी हे मुंबईत उपस्थित राहिले होते. तेव्हा शिवसेनेने आक्षेप घेतल्याचे स्मरत नाही. ‘‘आमचे आणि भाजपचे फाटले आहे; सबब तुम्ही भाजपच्या नेत्यांस भेटू नका’’, असे काही उद्धव ठाकरे यांच्या सेनेने अलीकडे शरद पवार यांस सांगितल्याचेही ऐकिवात नाही. दुसऱ्या बाजूने ‘‘भाजपने आमचा पक्ष फोडला, घर फोडले. सबब तुम्ही भाजप नेत्यांस भेटू नका’’ अशी गळ उद्धव ठाकरे यांस शरद पवार वा त्यांच्या गटातील कोणी घातल्याचे दिसले नाही. सद्या:स्थितीत पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांतील संबंध किती सौहार्दाचे आहेत हे उद्धव ठाकरे वा त्यांच्या साजिंद्यास ठाऊक असेलच. असे असतानाही आपल्या आघाडीतील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस कसे काय भेटतात; अशी किरकिर पवार वा त्यांच्या वतीने कोणी केल्याचे दिसले नाही. असे असताना शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला याबद्दल इतके रान उठवण्याचे कारण काय?

‘‘एकनाथ शिंदे यांनी सेना फोडली, ते गद्दार आहेत. म्हणून शरद पवारांनी शिंदे यांचा सत्कार करणे चूक’’, असे ठाकरे गटाचे म्हणणे दिसते. तार्किकदृष्ट्या तेही अयोग्य. कारण शिंदे यांनी गद्दारी केली असे मानावयाचे असेल तर ते तसे गद्दार फक्त ठाकरे कुटुंबीयांचे ठरतात. ठाकरे कुटुंबाचा कात्रजचा घाट केला म्हणून संपूर्ण महाराष्ट्राशीच गद्दारी झाली असे सर्वांनी का मानावे? आणि दुसरी बाब अशी की ती गद्दारी त्यांनी केली असे गृहीत धरले तरी त्यांच्या पक्षास सलग दोन निवडणुकांत मिळालेल्या विजयाचे काय? आताच्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांच्या आकडेवारीविषयी विरोधी पक्षीयांस आक्षेप आहेत. पण मग लोकसभा निवडणुकांतील निकालाचे काय? त्या निवडणुकीतही शिंदे यांच्या सेनेस अधिक जागा मिळाल्या. याचा अर्थ महाराष्ट्रातील जनताही आता गद्दारांनाच पाठिंबा देऊ इच्छिते असा मानायचा काय? तसेच याबरोबरीने तिसरा मुद्दा हा शिंदे यांच्याकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा जाणाऱ्या नेते-कार्यकर्ते यांचा. ठाकरे आणि त्यांचे सवंगडी इतकी घसाफोड करून शिंदे यांच्या नावे गद्दारीचा गजर करत असतानाही, शिंदे मुख्यमंत्री नसतानाही इतक्या जणांस त्यांच्याकडे जावे असे मुळात वाटतेच का? खरा प्रश्न हा आहे. त्यास ठाकरे आणि त्यांच्या साथीदारांनी भिडण्याची अधिक गरज आहे. उगाच गद्दारीच्या नावे गलबला करून आणि हा त्यांना का भेटला, त्याने सत्कार का केला असली किरकिर करून काहीही हाती लागणार नाही. याचा अर्थ शिंदे सेनेत सर्व काही आलबेल आहे आणि तो पक्ष आदर्श राजकारण करतो आहे असा मुळीच नाही. त्या पक्षातील इतक्या नेत्यांचे नाक भाजपने अशा तऱ्हेने दाबलेले आहे की मिळेल ते ‘आत’ घेण्यासाठी त्यांस तोंड उघडे ठेवण्याखेरीज पर्याय नाही. या पक्षाच्या मंत्र्यांनी पालकमंत्रीपदाबाबत केलेली वक्तव्ये त्या सर्वांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंग लावूनही कसे विचारत नाहीत, हेच दाखवून देणारी आहेत. किंवा ठाकरे गटाचे अमुक खासदार येणार, तमुक आमदार येणार, लवकरच ‘ऑपरेशन मशाल’ इत्यादी ही मंडळी करत असलेल्या वल्गनादेखील शिंदे गटाचे अनेक मंत्री कसे वजनरहित आहेत हे दाखवून देतात. काही ना काही निमित्ताने आपण चर्चेत, बातम्यांत कसे राहू इतकाच काय तो या सर्वांचा या निरर्थक बडबडीमागचा विचार. त्यांना त्यांचा सहकारी पक्षही गांभीर्याने घेत नाही, हे वास्तव.

त्याकडे दुर्लक्ष करून त्या बडबड-बुणग्यांत सामील होण्याचा प्रयत्न ठाकरे यांच्या सेनेने करण्याचे कारण नाही. शरद पवार यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार झाला म्हणून या पक्षाने सुरू केलेले रडगाणे या धर्तीचे होते. त्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वत:च्या पक्ष बळकटीकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावे. आपल्याच कोणा नेत्यास गद्दार, गद्दार म्हणत राहिल्याने उलट सेना नेतृत्वाचे अशक्तपण अधोरेखित होते. अन्याय करणाऱ्याइतकाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो, या उक्तीप्रमाणे गद्दारी (ती झाली असेल तर) करणाऱ्याइतकाच ती करू देणाराही त्यास जबाबदार असतो. हे सत्य लक्षात घेतल्यास ठाकरे गटाने आपल्या राजकीय रेकॉर्डची ‘गद्दार’ या शब्दात अडकलेली सुई अलगदपणे सोडवावी आणि पुढच्या लढाईच्या तयारीस लागावे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय अशा अनेकांमुळे ठाकरे गटास न्याय मिळाला नाही, हे नाकारता येणार नाही. निवडणूक आयोग नामे यंत्रणेस कणा असता, सर्वोच्च न्यायालय आपला असलेला कणा योग्य वेळी दाखवून देते तर ठाकरे यांच्या शिवसेनेवर आज उद्भवलेली परिस्थिती उद्भवली नसती, हे खरेच. पण आता तो कोळसा उगाळण्यात काही अर्थ नाही. अधिक काळ उगाळला म्हणून कोळसा काळ्याचा पांढरा होत नाही. तेव्हा स्वत:वरील अन्यायाच्या इतिहासात रमणे स्वान्त सुखाय असले तरी तसे करत राहणे आत्मघातकी असते. तेव्हा पुढे चलावे.

‘‘त्याने पदर ओढला म्हणून तिने पातळ सोडले…’’ असे विंदा करंदीकर एका विरूपिकेत लिहितात. राज्याच्या राजकारणाची अशी विरूपिका होणे योग्य नाही. जबाबदारांनी तरी ते टाळायला हवे.