मराठी भाषा अधिकृतरीत्या अभिजात झाल्यामुळे आपल्या सांस्कृतिक आयुष्यात फरक पडणार आहे का आणि कोणता? त्या फरकात आपले योगदान काय?

जातिवंत अभिजाततेच्या बळावर शेकडो वर्षांची वैभवशाली भाषिक परंपरा निर्माण करणाऱ्या मायमराठीला अखेर ती अभिजात असल्याची मान्यता दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानायचे तर पुढील महिन्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक नजरेआड करता येत नाही. अर्थात कोणत्या का निमित्ताने होईना, गेली अनेक वर्षे सुरू असलेले अनेकांचे अथक प्रयत्न मार्गी लागले आणि तमीळ, संस्कृत, कन्नड, मल्याळम् आणि उडिया यांच्याप्रमाणेच मराठीही आता अधिकृतपणे अभिजात भारतीय भाषा झाली, याबद्दल समस्त मराठी जनांचे अभिनंदन. आता हा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून दरवर्षी १०० कोटी रुपयांपर्यंतचा निधी अपेक्षित असून त्यामधून राज्य सरकारने मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणे अपेक्षित आहे. तसे असेल तर एखाद्या भाषेचा पसारा किती मोठा असतो, हे वेगळे सांगायला नको. त्या भाषेचा इतिहास, तिची लिपी, तिचे व्याकरण, त्या भाषेत निर्माण झालेले विविध प्रकारचे साहित्य, म्हणी, वाक्प्रचार, अलंकार, साहित्यिक, विविध बोलींमधून प्रकट होणारी भाषेची लडिवाळ आणि जिवंत रूपे, इतर भारतीय भाषांमध्ये अभावानेच असलेले मराठीमधले कोशवाङ्मयभाषाभिमानामुळे निर्माण होणारे वेगवेगळे भाषिक वाद…

…हे सगळे लेणे लेवून मराठी भाषेचा प्रवाह ‘अभिजात’ नसतानाही गेली कित्येक शतके अखंड वाहतो आहे. कैक राजवटी आल्या आणि गेल्या. समाज बदलला, जगणे बदलले, त्याप्रमाणे मराठीही बदलत गेली. अनेक बदल आत्मसात करत, काळानुरूप नको ते टाकून देत तिने सातत्याने नवे रूपडे धारण केले. आठव्या शतकातील कुवलयमाला ग्रंथातील मराठी माणसाचे वर्णन करणारी ‘दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे’ मराठी असो, की १०३८-३९ शक म्हणजे १११६-१७ सालची श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखातील ‘श्री चावुण्ड राजें करवियलें श्री गंगराजे सुत्ताले करवियले’ हा उल्लेख असो… किंवा बाराव्या शतकातील महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे शिष्य असलेल्या नागदेवाचार्य यांचा ‘तुमचे अस्मात कस्मात मी नेणेची गा… मज श्रीचक्रधरे निरूपिलि मऱ्हाटी तियेची पुसा’ असा मराठी भाषेचा खणखणीत पुरस्कार असो… तिथून पुढे ज्ञानोबा- तुकारामासह सर्व संतांनी मराठी भाषेला दिलेली वळणे, फारसी, अरबी शब्दही मऱ्हाटीत सामील करून लिहिल्या गेलेल्या बखरी, पोवाडे, लावण्या, विविध प्रकारचे लोकवाङ्मय, अव्वल इंग्रजी काळातले इंग्रजी वळणाचे मराठी आणि मग केशवसुतांनी फुंकलेली तुतारी… तिथून पुढे ‘वाघिणीचे दूध’ प्यायलेल्या पण स्वजाणीव असलेल्या मराठी भाषेचा बदलत गेलेला आविष्कार, असा हा प्रवास आहे. भाषा म्हणून ती अभिजात होती आणि अभिजात आहेच; पण आपले हे अभिजातत्व ती यापुढच्या काळात टिकवू शकणार का आणि कसे हा प्रश्न आहे.

हेही वाचा >>> मोठी बातमी : मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा; विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आणि या प्रश्नाला भाषा नव्हे तर आपण भाषकच जबाबदार ठरतो. एखाद्या भाषेला अभिजात हा दर्जा देणे हा उपक्रम २००४ साली केंद्रातली सत्ता मिळाल्यावर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुरू केला. आमच्या भाषेलाही हा दर्जा हवा, ही मराठी माणसाची तेव्हापासूनची मागणी जवळपास तब्बल २० वर्षांनी पूर्ण झाली. त्यामुळे एका अर्थाने सरकार यंत्रणेने आपली जबाबदारी पार पाडली. आता मुद्दा : आपली भाषा अधिकृतपणे अभिजात असावी, असा आपला आग्रह असेल आणि ती तशाच पद्धतीने टिकून राहायला हवी असेल तर त्यासाठी खरोखरच आपण काय करणार? आपली भाषिक अस्मिता सोडा, पण निदान जाणीव तरी खरोखरच टोकदार आहे? मराठी भाषा अधिकृतरीत्या अभिजात झाल्यामुळे तुमच्या-आमच्या सांस्कृतिक आयुष्यात फरक पडणार आहे का आणि कोणता? त्या फरकामध्ये आपले काही योगदान असणार आहे का?

हेही वाचा >>> मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?

माणसाच्या आयुष्यात भाषा त्याच्या घरापासून सुरू होते आणि शाळेत ती जोपासली, जोजावली जाते. आता मराठी अभिजात भाषा झाली म्हणून यापुढच्या काळात किती पालक आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा विचार बदलून मराठी माध्यमाच्या शाळेत घालतील? अभिजात झाल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांमुळे दादर येथील बंद मराठी शाळा सुरू होईल? मराठी माध्यमाच्या शाळा हव्या यासाठी मराठी भाषेच्या भूमीतच सुबुद्ध नागरिकांना, पालकांना चळवळ चालवावी लागते यापेक्षा भाषेचे दुर्दैव ते काय? ‘‘आमच्या बबड्या/बबडीला जर्राही मराठी येत नाही’’ असे म्हणणारे निर्बुद्ध आता कमी होतील? मराठी चित्रपट मॉलमधे अधिक काळ आता राहतील? मराठी नाटक-सिनेमांना आता अनुदानाची भीक मागावी लागणार नाही? मराठी माणसाच्या घरात पुस्तकाचे फडताळ आता असेल? ‘‘अमुक तमुक कॅरॅक्टर प्ले करताना मला जे सॅटिसफॅक्शन मिळालं…’’ ही भुक्कड मराठी कलाकारांची अतिभुक्कड मराठी आता सुधारेल? दुकानांच्या पाट्या कोणत्याही आंदोलनाशिवाय आता मराठीत असतील? मराठी जाहिरातींतून होणारी मराठीची विटंबना आता टळेल? म्हणजे ‘शेव्ह’ जाऊन पुन्हा ‘दाढी’चे खुंट उगवतील? अजागळ मराठी माणूस यापुढे ‘भुट्टा’ खायला न जाता सरळ मक्याचे कणीस खाईल? भाषा ही प्रसंगानुरूप बदलायची बाब आहे, हे मराठीजनांस कळेल? म्हणजे दहीहंडीला जातो त्या कपड्यात विवाह सोहळ्याला जायचे नसते; तशी नाक्यावरची मराठी, महाविद्यालयीन दोस्तांतली मराठी आणि लिखित मराठी हे सर्व वेगवेगळे असायला हवे, हे आता ‘अभिजात’ दर्जामुळे सहज उमगू लागेल? ‘काय ओल्तो’ जाऊन ‘काय म्हणतोस’ येईल? दोन सजीव ‘भेटतात’ आणि निर्जीव वस्तू सापडते/ आढळते/ मिळते हे मराठी जनांस यापुढे कळेल? रात्री बाहेर जाताना भीती वाटल्यास बरोबर कोणास घेणे म्हणजे सोबत. पण विवाह/चर्चा होते ती कोणाशी किंवा कोणाबरोबर, हे यापुढे मराठी जनांस कळेल? आपल्या लाडक्यांना बोलू लागण्याच्या वयात ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार’ शिकवताना ‘‘गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या’’, अशीही एखादी कविता आपण शिकवावी असे वाटणारे आई-बाप या भूमीत आता निपजतील? मुख्य म्हणजे प्रमाण/ ग्रांथिक भाषा आणि जात यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही- नसायलाच हवा, याची जाणीव या ‘अभिजात’ दर्जानंतर तरी या राज्यातील राजकारण्यांस होईल? भाषेचा लहेजा सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार बदलणे ठीक, पण भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे म्हणून आफ्रिकी इंग्रजी आणि युरोपीय इंग्रजी यांचे व्याकरण बदलत नाही, हे मराठीबाबतही व्हायला हवे असे काही आपल्या धोरणकर्त्यांना उमगेल? या प्रश्नांची उत्तरे ज्याची त्यांनी शोधायची. एरवी मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याच्या आनंद आणि अभिमान यात ‘लोकसत्ता’ही सहभागी आहेच. पण या आनंदापलीकडे, केंद्राकडून १०० कोटी रुपये मिळतील यापलीकडे आपण भाषेविषयी खरे जागरूक होणार की नाही, हा प्रश्न. अन्यथा ‘काप गेले, भोके राहिली’ या म्हणीप्रमाणे मराठी भाषा हातून निसटायची, आणि ‘अभिजात’ दर्जाचे भोक तेवढे मागे राहायचे. तसे होऊ नये, यासाठी हे प्रश्न

Story img Loader