आपल्या प्रतिस्पर्ध्यासही विजय मिळवण्याचा आपल्याइतकाच हक्क आहे हे सत्य ज्यांच्या गळी उतरत नाही, अशा निरंकुश सत्तावाद्यांस मुळात सत्तेपासून दूर ठेवणे बरे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राझीलमधील घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली हे अगदी उचित झाले. ‘‘लोकशाही परंपरेचा आदर राखायला हवा’’ ही मोदी यांची या संदर्भातील प्रतिक्रिया महत्त्वाची तसेच आश्वासकदेखील. ब्राझीलमधील घटनांची माहिती जगासमोर आल्यानंतर अवघ्या काही तासांत मोदी यांनी आपली काळजी व्यक्त करून अध्यक्ष लुला डिसिल्वा यांस सर्व तो पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेत ६ जानेवारी २०२१ या दिवशी घडले त्याची शब्दश: पुनरावृत्ती ब्राझीलमध्ये ८ जानेवारी २०२३ या दिवशी झाली. अमेरिकेत दोन वर्षांपूर्वी पराभूत झाल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी ‘कॅपिटॉल हिल’वर हल्ला केला तर ब्राझीलची राजधानी ब्रासिलिया येथील सर्वोच्च न्यायालय, त्या देशाची संसद आणि अध्यक्षीय प्रासाद यावर पराभूत अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांचे समर्थक चालून गेले. म्हणजे ट्रम्प यांच्यापेक्षा बोल्सोनारो यांचे समर्थक चार पावले अधिक पुढे गेले. बोल्सोनारो यांस ‘ब्राझीलचे ट्रम्प’ म्हणतात. म्हणजे त्या अर्थी ट्रम्प यांचा हा वैचारिक चेला गुरूपेक्षा पुढे गेला. हे बोल्सोनारो हे ट्रम्प यांच्याप्रमाणे विचारसरणीच्या उजवीकडचे. ट्रम्प यांच्यासारखे, किंबहुना कांकणभर अधिकच, वाह्यात. ट्रम्प यांच्याप्रमाणेच बोल्सोनारो यांचीही वचने कुख्यात. ‘‘मी बलात्कार करावा अशी तुझी लायकी नाही’’, असे महिलेस म्हणण्याइतका हा इसम गलिच्छ. त्यांचा गेल्या महिन्यातील अटीतटीच्या लढतीत लुईझ इनाशियो लुला डिसिल्वा यांनी पराभव केला. ट्रम्प यांस पराभूत करून सत्तेवर आलेल्या जो बायडेन यांच्याप्रमाणेच ब्राझीलचे अध्यक्ष लुला डिसिल्वा हे पुरोगामी. विचारसरणीच्या डावीकडील. या अशा पुरोगामी उमेदवाराकडून पराभव ना ट्रम्प यांस झेपला ना बोल्सोनारो यांस तो सहन झाला. ब्राझीलमधील त्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ लावणाऱ्या संपादकीयात ‘लोकसत्ता’ने (‘अ‍ॅमेझॉनचे आनंदतरंग’, १ नोव्हेंबर ’२२) अमेरिकेप्रमाणे ब्राझीलमध्येही पराभूत बोल्सोनारो यांचे समर्थक दंगेखोरी करतील की काय अशी भीती व्यक्त केली होती. ती तंतोतंत खरी ठरली.

याचे कारण ट्रम्प यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याची बोल्सोनारो यांची वृत्ती. ट्रम्प काय किंवा बोल्सोनारो वा अन्य हे सर्व एकाच वृत्तीचे प्रतिनिधित्व करतात. ते कमालीचे आत्मकेंद्री असतात आणि कोणत्याही व्यवस्थेपेक्षा आपण मोठे आहोत असे त्यांस वाटत असते. ‘‘निवडणुकीतील मतदानामुळे काहीही बदल होत नाही. बदलासाठी यादवीच व्हायला हवी आणि जे लष्कर करू शकते ते आपण करायला हवे. काही निरपराधांचे प्राण यात गेले तरी हरकत नाही..’’, असे मत लोकशाही मार्गाने निवडून आल्यावर आपली हुकूमशाही प्रवृत्ती दर्शवणाऱ्या या गृहस्थाने सत्तेवर असतानाच उघडपणे व्यक्त केले होते. तेव्हाच हा राजकारणी लोकशाहीस किती महत्त्व देतो हे लक्षात आले. यातूनच अशी व्यक्ती पराभव झाला तरी तो स्वीकारणार नाही, हे दिसून येत होते. तसेच झाले. निवडणुकीत पराभूत झाल्यापासून या बोल्सोनारो यांनी सर्वोच्च न्यायालय आदींवर सातत्याने टीका केली. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा विजय बोल्सोनारो सहन करू शकले नाहीत. मुख्य म्हणजे आपण पराभूत होऊ शकतो हेच त्यांस मान्य नाही. तसे झाल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांची माथी भडकावणे सातत्याने सुरू केले. तेव्हा असे काही होणार हे उघड होतेच. त्याचबरोबर या हल्ल्याचे बालंट आपल्यावर येणार याचाही अंदाज त्यांस होता. म्हणूनच ते स्वत: मात्र अमेरिकेतील फ्लोरिडा येथे जाऊन बसले आणि आपल्या हस्तकांकरवी हल्ले घडवून आणले.

यातील प्रत्येकास अटक केली जाईल आणि त्यांस कारवाईस तोंड द्यावेच लागेल, असे अध्यक्ष लुला म्हणाले. ते योग्यच. तथापि त्यांच्या कारवाईचा मोठा बडगा स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडे वळायला हवा. याचे कारण असे काही होणार अशी चिन्हे दिसत असताना यंत्रणा गाफील तर राहिलीच पण जमाव दिसू लागल्यावरही सुरक्षारक्षक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी निवांत गप्पा मारताना आणि सेल्फी काढताना दिसले. याचा अर्थ उघड आहे. तो म्हणजे बोल्सोनारो पराभूत झाले असले तरी त्यांच्या मताचे अनेक अजूनही प्रशासनात असून त्या सर्वास माजी अध्यक्षाविषयी असलेली सहानुभूती अधिक चिंतेची आहे. ती नुसती असती तर त्यात गैर काही नाही. वैध मार्गानी त्यांनी निवडणूक लढवावी आणि पुन्हा सत्तेवर यावे. पण बोल्सोनारो आणि त्यांच्या समर्थकांस हे मान्य नाही. ‘मी आणि माझे’ हाच त्यांचा दृष्टिकोन. अशा मंडळींचा व्यवस्थेवर विश्वास नसतो. तो नसतो याचे कारण मुळात या सर्वास लोकशाहीच मान्य नसते. मी जोपर्यंत निवडून येत आहे तोपर्यंत लोकशाही, पण प्रतिस्पर्ध्याचा विजय झाल्यास तो मात्र लोकशाहीचा पराभव असे या मंडळींस वाटत असते. त्याचाच आविष्कार आधी अमेरिकेत २०२१ साली आणि आता ब्राझीलमध्ये पाहावयास मिळतो. यावरून एक धडा घेण्यासारखा.

निरंकुश सत्तावाद्यांस सत्तेपासून दूर ठेवणे, हा तो धडा. वास्तविक बोल्सोनारो पराभूत होणे ही काळाची गरज होती. इतका प्रतिगामी, इतका विज्ञानविरोधी, इतका हुकूमशहा वृत्तीचा आणि इतका धर्मवादी अध्यक्ष ब्राझीलला लाभला हेच मुळात दुर्दैव होते. पण तो निर्णय त्यांच्या विरोधकांनी स्वीकारला. कारण जे काही झाले ते मतपेटीद्वारे झाले. प्रामाणिक लोकशाहीवाद्याने मतपेटीचा आदर करायलाच हवा. तसा तो करून लुला, त्यांचे अनुयायी आणि सामान्य ब्राझिलियन यांनी हा निर्णय चार वर्षे गोड मानून घेतला. या काळात बोल्सोनारो यांनी धुमाकूळ घातला आणि आपल्या विरोधकांवर सातत्याने काही ना काही कारणे दाखवत कारवाई केली आणि लुला यांस तुरुंगात धाडले. लुला दोनदा सलग अध्यक्षपदी राहिल्यानंतर त्यांनी उत्तराधिकारी म्हणून पक्षाची सूत्रे डिल्मा रूसेफ यांच्याकडे दिली होती. त्या ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्ष. पण त्यांची राजवट भ्रष्टाचारादी मुद्दय़ांनी गाजली. त्यामुळे त्या गेल्या आणि हे बोल्सोनारो सत्तेवर आले.

त्यांच्या कडव्या उजव्या राजकारणाची चव घेतल्यानंतर अवघ्या चार वर्षांत सामान्य ब्राझिलींनी त्यांस घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. याबाबत ब्राझिलींनी दाखवलेला समजूतदारपणा अमेरिकी नागरिकांसारखा. अमेरिकन अवघ्या चार वर्षांत ट्रम्प यांस विटले. पण ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्याप्रमाणे लुला यांचा विजय संपूर्ण निर्विवाद नाही. लुला डिसिल्वा यांना जेमतेम ५१ टक्के मते मिळाली. याचा अर्थ जवळपास निम्म्या मतदारांचा पाठिंबा इतक्या मागास बोल्सोनारो यांना आहे. ही संख्या कमी नाही. त्याचमुळे अजूनही आपण सत्तेवर येऊ शकतो असे बोल्सोनारो यांस वाटत असेल तर ते पूर्ण चूक म्हणता येणार नाही. तथापि आपली सत्तापिपासा त्यांनी लोकशाही मार्गानी पूर्ण करावी आणि पुढील निवडणुकांत लुला यांचा दणकून पराभव करीत पुन्हा अध्यक्ष व्हावे.

ती खरी लोकशाही. आपल्या प्रतिस्पर्ध्यासही विजयाचा आपल्याइतकाच हक्क आहे हे सत्य त्यासाठी बोल्सोनारोंस आधी स्वत:च्या आणि नंतर आपल्या वाह्यात समर्थकांच्या गळी उतरवावे लागेल. वाण आणि गुण दोन्हीही घेणारा ढवळय़ाशेजारचा पवळय़ा अशी ओळख होणे कोणालाच अभिमानास्पद नाही.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on violence in brazil by bolsonaro supporters after election loss zws
Show comments