पहिल्या पाचातले दोन ग्रँडमास्टर मराठी होते. महिलांमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय मास्टर मराठी होती. हे चित्र पुढे बदलले ते का, याचाही विचार यानिमित्ताने व्हावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोणत्याही खेळाप्रमाणे बुद्धिबळातही जगज्जेतेपद मिळवणे सोपे नाही. आजवर दीडेक डझन खेळाडूंनाच ते जमले. त्यात पुरुषांमध्ये १८व्या वर्षी निर्विवाद जगज्जेतेपद ही तर आणखी दुर्मीळ बाब. भारताच्या दोम्माराजू गुकेशने ही अपूर्वाई साधली आणि मूळ भारतीय म्हणवला जाणाऱ्या या खेळाची पाळेमुळे या भूमीत खऱ्या अर्थाने रुजली असल्याची प्रचीती आणून दिली. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला जगज्जेता. त्याचे साम्राज्य खालसा झाल्यानंतर ११ वर्षांनीच गुकेशने जगज्जेतेपद पटकावले. हे सगळे इतक्या लवकर घडून येऊ शकते, याची खात्री फारच थोड्यांना असावी. या थोडक्यांमध्ये स्वत: गुकेश होता हे महत्त्वाचे. दोम्माराजू गुकेश बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत तोपर्यंत जगज्जेता असलेला चीनचा प्रतिस्पर्धी डिंग लिरेनपेक्षा गुणांकनाच्या बाबतीत सरस होता. तरीदेखील अशा लढतींची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये असतात. या लढतींमध्ये खेळण्याचा अनुभव अनेकदा गुणांकन किंवा इतर निकषांपेक्षा सरस ठरू शकतो. तो डिंग लिरेनकडे होता. डिंग लिरेन गेल्या वर्षी जगज्जेता बनला. कारण त्याच्या आधीच्या वर्षी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने पारंपरिक प्रकारात जगज्जेतेपदाच्या लढतींमधून ‘निवृत्ती’ जाहीर केली. त्याच्यासारख्या अपराजित आणि प्रतिभावान खेळाडूच्या माघारीमुळे बुद्धिबळविश्वात पोकळी निर्माण झालीच, तरी चुरसही वाढली. याचा फायदा घेणाऱ्यांमध्ये डिंग सर्वश्रेष्ठ ठरला. हा आणखी काही काळ जगज्जेतेपदावर राहू शकेल असे त्याच्याविषयी बोलले गेले. एरवी चिनी मंडळी ही मानसिकदृष्ट्या कणखर आणि भावनातीत थंड व्यवहारवादी मानली जातात. डिंग लिरेन अपवाद ठरला. उच्च स्तरावरील बुद्धिबळामध्ये सातत्याने चमकत राहण्यासाठी प्रचंड तयारीत राहावे लागते, मानसिक आणि शारीरिक ताणतणाव झेलावा लागतो. ‘जगज्जेत्या’कडून त्या प्रमाणात अपेक्षाही वाढलेल्या असतात. त्या अपेक्षांचे, तयारीचे, ताणाचे ओझे लिरेनला पेलवले नाही. जवळपास नऊ महिने तो सर्व प्रकारच्या बुद्धिबळापासून दूर होता. मानसिकदृष्ट्या कोलमडला होता. त्याच्या अवस्थेबद्दल त्याचे प्रतिस्पर्धीही त्याची कीव करू लागले होते. कार्लसनच्या मते, लिरेन जगज्जेतेपदाची लढत खेळूच शकणार नाही इतका कोसळला होता. त्यातून डिंग सावरला, खेळला. इतकेच नव्हे तर गुकेशला तोडीस तोड ठरला. तरीदेखील त्याच्या तुलनेत गुकेशमध्ये अधिक ऊर्जा आणि ईर्षा दिसून आली हे नाकारता येत नाही. अखेरच्या टप्प्यात ही गुणद्वयीच निर्णायक ठरली. त्याची डिंग लिरेनविरुद्धची लढत सध्या चर्चेत आहे. पण जगज्जेतेपद हा गुकेशच्या प्रदीर्घ वाटचालीतला केवळ एक टप्पा आहे. ते शिखरही नव्हे. खुद्द गुकेशला याची पुरेपूर जाणीव आहे. या वाटचालीचा धांडोळा घेणे आवश्यक.
हेही वाचा : अग्रलेख : ‘ड्युरेबल ऑप्टिमिस्ट’
वर्षभर गुकेश उच्च दर्जाचे बुद्धिबळ खेळत आहे. त्याच्यासह तिघा प्रतिभावान भारतीय युवकांची चर्चा जगभर होते. आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी हे इतर दोघे. प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ट्य. प्रज्ञानंदने इतर दोघांपेक्षा कार्लसनला अधिक वेळा हरवून दाखवले आहे. अर्जुन इतर दोघांच्या आधी २८०० एलो गुणांच्या अत्युच्च पातळीवर जाऊन पोहोचला आहे. भारताचा विश्वनाथन आनंद आणि आणखी १४ बुद्धिबळपटूंनाच हे जमू शकले. या दोघांपेक्षा गुकेश लहान. तरीही गेली चार वर्षे तो जी परिपक्वता आणि तयारी दाखवत आहे, ते पाहिल्यावर ‘हाच खरा आनंदचा वारसदार’ असे कार्लसनसह अनेकांनी बोलून दाखवले होते. त्याचा जन्म उच्चशिक्षितांपोटी झाला, तरी दोन्ही पालकांना गुकेशसाठी सुरुवातीस खस्ता खाव्या लागल्या. १२व्या वर्षी तो ग्रँडमास्टर बनला. त्यानंतर जवळपास प्रत्येक वर्षी नवनवीन शिखरे तो सर करत आहे. मध्यंतरी कोविडमुळे सदेह बुद्धिबळ स्पर्धा जवळपास थांबल्या आणि ऑनलाइन स्पर्धांचे युग सुरू झाले. अनेक बुद्धिबळपटूंनी या काळात नशीब काढले. काहींनी पारंपरिक प्रकाराला सोडून अशा दूरस्थ बुद्धिबळातच कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. त्या वाटेने गुकेश फारसा गेला नाही. हे त्याला कोणी सांगितल्याची शक्यता कमी. कारण अल्प वयात गुकेश पोक्तांना लाजवेल इतका एकल निश्चयी आणि एकाग्र बनला. आपले लक्ष्य केवळ बुद्धिबळ जगज्जेतेपदच, हे तो खूप आधीपासून सांगू लागला. काहींना त्याच्या वक्तव्यात युवासुलभ उत्साह दिसला, तर काहींना त्या वयास साजेसे भानरहित अज्ञान. पुढे कोविडोत्तर सारे काही मार्गी लागल्यावर स्पर्धा होऊ लागल्या. त्या वेळी कार्लसनसकट अनेक आघाडीच्या बुद्धिबळपटूंना गुकेश त्याच्या वयापेक्षा किती तरी अधिक परिपक्व आणि स्थिरचित्त भासला. १६ व्या वर्षी तो २७०० गुणांच्या पलीकडे सरकला. १७ व्या वर्षी २७५० गुणांच्या टप्प्याला ओलांडणारा सर्वांत युवा बुद्धिबळपटू ठरला. पुढे १७ व्या वर्षीच कँडिडेट, १७ व्या वर्षीच आव्हानवीर आणि आता १८ व्या वर्षी जगज्जेता. तिन्ही टप्पे नवा विक्रम प्रस्थापित करणारे. हे केवळ नशिबाने मिळत नाही आणि इतक्या प्रमाणात तर नाहीच नाही. त्यामागे साधना, आत्मविश्वास आणि निष्ठा असावी लागते. विश्वनाथन आनंदने गेली चार वर्षे त्याला काही प्रमाणात प्रशिक्षण देण्याची जबाबदारी उचलली. आनंदचा तो शिष्योत्तम ठरला यात आश्चर्य नाही. परवा अखेरचा डाव जिंकतो आहे याची जाणीव झाल्यानंतर गुकेशच्या चेहऱ्यावर टीनएजरला साजेसे हसू उमटले. पहिल्यांदाच. प्रत्यक्ष जगज्जेतेपद हाती आल्यानंतर भावनांचा बांध फुटला. पहिल्यांदाच. निर्जीव सोंगट्या आणि भावनाशून्य कम्प्युटरच्या संगतीत तासन् तास घालवूनही भावना बोथट झालेल्या नाहीत याचे त्याने अनाहूत घडवलेले दर्शन सुखावहच होते. अश्रुपात होत असताना सोंगट्या पुन्हा जागेवर रचून ठेवणे किंवा विजयवीराच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीस आवर्जून प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख करून त्यास गौरवणे या बाबींचे कुठे प्रशिक्षण मिळू शकत नाही. ही नम्रता श्रेष्ठत्वाच्या दंभापेक्षा किती तरी पट अधिक आचरावी अशीच. कदाचित, गुकेशच्या प्रत्यक्ष खेळापेक्षा असे क्षण त्याची उंची अधिक वाढवणारे ठरतात!
हेही वाचा : अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
कार्लसनने निवृत्ती घेताना पुरेसे सक्षम प्रतिस्पर्धी गवसत नाहीत, असे कारण दिले होते. ते बहुधा अर्धसत्य असावे. गुकेश, अर्जुन, प्रज्ञानंद आणि इतरही काही षोडशवर्षीय किंवा विशीच्या उंबरठ्यावर असलेल्या काहींची प्रतिभा इतकी खाशी आहे, की त्यांच्यासमोर नजीकच्या भविष्यात निभाव लागणार नाही याची खात्री कार्लसनला वाटत असावी. पटावर पराभूत होण्यापेक्षा अशी माघार केव्हाही श्रेयस्कर, असा विचार यामागे असू शकतो.
हेही वाचा : अग्रलेख : ‘परदेशी हाता’चे भूत!
भारताचा पहिला जगज्जेता आनंद दक्षिणेतला. आता दुसरा जगज्जेताही तिथलाच. आजघडीला सर्वाधिक बुद्धिबळ ग्रँडमास्टर एकट्या तमिळनाडूतले. या खेळात मराठी पाऊल सुरुवातीस पुढे होते. पहिल्या पाचातले दोन ग्रँडमास्टर मराठी होते. महिलांमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय मास्टर मराठी होती. हे चित्र पुढे बदलले. इतके, की आज तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश/ तेलंगणातील बुद्धिबळपटूंच्या दर्जाविषयी आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून लिहिले जाते. कारण एका टप्प्यानंतर भूमिभूत गुणवत्तेला घडवावे लागते, पाठबळ द्यावे लागते. आमच्याकडे प्रतिभावंतांनाही, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निघताना पैसे कसे जोडावे ही भ्रांत. महाराष्ट्रात एरवी राजकीय कारणांसाठी कोट्यवधींची उलाढाल होते. पण एखाद्या खेळाडूसाठी कोटभर द्यावे लागले, तरी चालढकल होते. दक्षिणचेच कशाला, पण वर हरयाणा, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, ओदिशा या राज्यांनीही खेळ आणि खेळाडूंवर लक्ष केंद्रित करताना थैल्या सैल सोडल्या. शिवाय हे सारे पक्षातीत असते. आम्ही इतरांचे बघतो मग निर्णय घेतो. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच, ऐतिहासिकदृष्ट्या आघाडीवर असूनही दिशा, दृष्टी आणि दानत यांच्याअभावी आमची क्रीडा संस्कृती भरकटू लागली नि क्रीडापटू वाऱ्यावर सोडले गेले. गुकेशचे पोटभर कौतुक करताना, तो दक्षिणेत जन्माला आला याबद्दल त्याचा हेवा करण्याचा मोह आवरत नाही.