जगातली पहिलीवहिली ‘कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षितता शिखर परिषद’ अ‍ॅलन टय़ूरिंगच्या कार्यस्थळी होणे औचित्यपूर्णच; पण अशा उपायांचे फलित काय?

कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात मानवी बुद्धिमत्तेची जागा घेईल का, हा प्रश्न विश्वामध्ये दुसरी जीवसृष्टी इतर कोठे असेल का, या प्रश्नाइतकाच उत्कट गूढ ठरत आला आहे. या दोन्ही प्रश्नांच्या चर्चेतील एक समान दुवा असा, की भयगर्भित उत्कटतेतच रममाण होत राहिल्यामुळे, उत्तरे शोधता शोधता प्रश्नच अधिक निर्माण होतात! या भानगडीत मूळ प्रश्नांची रोकडी उत्तरेही मिळत नाहीत. मुद्दा अनुत्तरितच राहतो. वैद्यक क्रांती, औद्योगिक क्रांती, संगणन व आंतरजाल या टप्प्यांप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ हा आधुनिक मानवाच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाचा टप्पा. उत्क्रांतीचा विषय निघतो तेव्हा केवळ जैविक उत्क्रांतीवरच भर देण्याची प्रथा आहे. परंतु प्राथमिक हत्यारे वापरत वानराचा नर झाला तोपर्यंतचा टप्पा आणि त्यानंतर भाषा, कृषी, संस्कृती, धर्म, देश, गणतंत्र, विज्ञान, वैद्यक, तंत्रज्ञान, अणुज्ञान, सृष्टिभान, उद्योगभान, संगणन, संपर्कज्ञान या टप्प्यांमध्ये झालेला आणि अजूनही सुरू असलेला मानवी प्रवास हे दोन स्वतंत्रपणे अभ्यासण्याचे टप्पे ठरतात. कारण इतर कोणत्याही जिवाच्या शक्तीने आजवर जितका परिणाम चराचरावर केला नाही, तितका तो मानवी बुद्धीने वा प्रज्ञेने घडवून आणला आहे. तशात आता मानवी प्रज्ञेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाल्यामुळे यातून जे रसायन उद्भवते ते मानवी प्रज्ञेला आणि परिणामी मानवाला भारी पडू शकते, अशी भावना जगभर मूळ धरू लागली आहे. याच धास्तीतून ‘एआय’च्या नियमनाची गरज निर्माण झाली. या निकडीतूनच ब्रिटनमधील ब्लेचली पार्क येथे नुकतीच जगातली पहिलीवहिली ‘एआय सेफ्टी समिट’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षितता शिखर परिषद पार पडली. या परिषदेच्या अखेरीस ब्लेचली जाहीरनामाही प्रसृत करण्यात आला. भविष्यात हा जाहीरनामा ‘एआय’च्या व्यापक नियमनाला आकार देईल हे नक्की. त्यामुळे त्याची दखल घ्यावी लागते.

Rakhi Sawant
“चूक केली; पण त्याला…”, राखी सावंतने घेतली रणवीर अलाहाबादियाची बाजू; म्हणाली…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
BJP , Manipur , Biren Singh
अग्रलेख : गणंग गेला आणि…
Why Namrata Sambherao accepted the role of four sentences in Chiki Chiki Booboom Boom
…म्हणून नम्रता संभेरावने ‘चिकी चिकी बुबूम बूम’ चित्रपटात अवघ्या चार वाक्यांची स्वीकारली भूमिका, म्हणाली…
Bada Naam Karange Hindi web series on Sony Liv
सहजता, साधेपणा जपण्याचा प्रयत्नख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे मत
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Santosh Juvekar
“डोळ्यात पाणी…”, ‘छावा’मधील राज्याभिषेकाच्या सीनबाबत संतोष जुवेकर म्हणाला, “विकी कौशलची एन्ट्री…”

हेही वाचा >>> अग्रलेख: अधिकस्य अधिकं मरणम्..

ब्लेचली पार्क येथील शिखर परिषद अर्थातच ब्रिटन आणि त्या देशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पुढाकाराने झाली. हे स्थळ तसे ऐतिहासिक महत्त्वाचे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनीच्या सांकेतिक संदेशांची उकल करण्यासाठी ब्रिटिश गणितज्ञ अ‍ॅलन टय़ुरिंग यांच्या नेतृत्वाखाली एक पथक या ठिकाणीच कार्यरत होते. या पथकाने नाझी कूटसंदेशांची उकल करून दोस्त राष्ट्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. तो खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा शस्त्रज्ञानावर मिळवलेला पहिला विजय ठरतो. याच संशोधनातून पुढे जगातील पहिलावहिला संगणक उदयास आला. त्या यंत्रामध्ये संगणनाची प्राथमिक क्षमता होती. म्हणजे मानवाव्यतिरिक्त असे काही तरी निर्मिले जात होते, जे गणती करू शकत होते. पण त्याही पुढे जाऊन हे यंत्र ‘विचार’ करू शकेल का, असा प्रश्न टय़ुरिंगने उपस्थित केला होता. त्यासाठी १२ हजार शब्दांचे प्रदीर्घ टिपण त्याने लिहिले. त्याच्या अखेरीस जे लिहिले ते महत्त्वाचे – ‘आपण फार लांबचे पाहू नाही शकत. पण करण्यासारखे खूप काही आहे जे दिसू शकते’! आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत साधारण अशीच परिस्थिती आहे. दररोज एखाद्या नवीन क्षेत्रात ‘एआय’चा शिरकाव होत असलेला आपण पाहतो. एखाद्या संगणक प्रणालीत किंवा समूह संगणक प्रणालीत विदा (डेटा) भरून, रचनावली (अल्गोरिदम) सादर करून पुढील निष्कर्षांच्या वाटेवर सोडून देऊन आपले उद्दिष्ट साध्य करण्याची पद्धत आजकाल सरसकट रूढ झाली आहे. सर्जनशील क्रियाकलाप, शल्यचिकित्सा वा रोगनिदान, हवामान भाकीत, अंतराळ संशोधन, धान्यपीक निश्चिती, उच्च शिक्षण, खेळांमधील व्यूहरचना, साथरोग नियंत्रण अशा विधायक क्षेत्रांमध्ये ‘एआय’चा वापर वरचेवर होऊ लागला आहे. परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याची क्षेत्रे तेवढय़ापुरती मर्यादित राहू शकत नाहीत. हा  वापर विध्वंसक हेतूंसाठीही होऊ शकतो. जगभरातील बँकिंग यंत्रणा आणि भांडवली बाजार, उपग्रह संचार यंत्रणा, दूरसंचार यंत्रणा यांना लक्ष्य केले जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव निवडणूक प्रक्रियेमध्ये केला जाऊ शकतो. या तंत्राचा वापर करून जैविक वा रासायनिक अस्त्रे किंवा अधिक धोकादायक अण्वस्त्रे डागली जाऊ शकतात, अशीही भीती व्यक्त केली जाते. ही झाली एक बाजू. दुसरीकडे ‘एआय’च्या वापरामुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगारांवर गदा येणार असल्याची प्रचीती प्रगत देशांतही येऊ लागली आहे. कदाचित त्या देशांमध्ये याविरुद्ध उमटणारी प्रतिक्रिया एका मर्यादेपेक्षा अधिक नसेल. पण भारतासारख्या प्रगतिशील देशात रोजगारी रेषेखाली मोठय़ा प्रमाणात माणसे लोटली जाणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी, आर्थिक स्थैर्यासाठी आणि नेतेमंडळींच्या राजकीय भवितव्यासाठी पोषक ठरणारे नाही. ब्लेचली परिषदेत या दुसऱ्या धोक्याचा फारसा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र ‘एआय’च्या विध्वंसक अवतारापासून सुरक्षितता हवी असेल, तर जागतिक स्वरूपात नियमनाची गरज लागणार याविषयी बऱ्यापैकी मतैक्य घडून आले.

हेही वाचा >>> अग्रलेख: कोणी, कोणास, किती आणि का?

पण नियमन कसे करणार नि कोण, या प्रश्नावर भाष्य करण्यात आलेले नाही. कारण या प्रश्नांची उत्तरे शोधणे सोपे नाही, हे उपस्थितांना कळून चुकले होते. यातच ब्लेचली परिषदेच्या आणि एकूणच या मोहिमेच्या मर्यादा स्पष्ट होतात. याचे कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे-तोटे नेमके कोणते याविषयी निश्चित अशी वैचारिक बैठकच दिसून येत नाही. ती जगातील केवळ २८ देश (भारत, चीन, अमेरिकेसह २७ देश अधिक युरोपीय समुदाय) निश्चित करतील, असे समजणे हास्यास्पद आहे. शिवाय या शतकातील पहिल्या दोन दशकांच्या तुलनेत आजचे जग अधिक दुभंगलेले, विस्कळीत, अस्थिर आहे. काही देश आक्रमक बनले आहेत, काहींना स्वत:चा बचाव करायचा आहे. तेव्हा मतैक्य कसे घडून येणार? उदा. अमेरिका, भारताच्या निवडणूक प्रक्रियांमध्ये ढवळाढवळ करणे हे अनुक्रमे रशिया आणि चीनचे राष्ट्रीय धोरणच असेल, तर ते, ‘एआय’च्या माध्यमातून एखाद्या देशाच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करता येणार नाही, वगैरे स्वरूपाचा नियम कशासाठी स्वीकारतील? तीच बाब अण्वस्त्रे आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या बाबतीत लागू आहे. या परिषदेत जगातील सर्व आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्याही सहभागी झाल्या. त्यांनाही ‘एआय’च्या नियमनाबाबत सरकारांनी पुढाकार घ्यावा आणि काहीएक नियामक चौकट बनवावी असे वाटते. पण हे नियमन त्या कंपन्यांच्या वाटचालीच्या, प्रगतीच्या आड येता कामा नये, अशीही भूमिका ते मांडतात. हा तर दांभिक विरोधाभास. कारण याच कंपन्या प्रचंड गुंतवणूक करून, वरकरणी मानवी आव्हान सुलभीकरणासाठी पण प्रत्यक्षात प्रचंड नफेखोरीसाठी नवनवीन तंत्रज्ञान बाजारात आणत असतात. आता त्यांना जगभरातील सरकारांकडून सशर्त आणि सापेक्ष नियमनरूपी संरक्षण हवे आहे. अमेरिका, युरोपीय समुदाय, चीन आणि लवकरच बहुधा भारत हे स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र उद्दिष्टांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनाबाबत काम करत आहेत. त्यांच्या हितसंबंधांचा मेळ दरवेळी साधला जाईलच, असे नव्हे. शिवाय आज आफ्रिकेसारख्या खंडातील अनेक देशांमध्ये या नवतंत्रज्ञानाचे फायदेच पोहोचलेले नाहीत. मग तोटय़ांकडे बोट दाखवून त्यांना फायद्यांपासूनही वंचित का ठेवले जावे, याचा विचार या परिषदेत झालेला दिसून येत नाही. पाश्चिमात्य प्रगत देश हे आधुनिक तंत्रज्ञानाचे जन्मदाते आहेत. विधायक आणि विध्वंसक असा फरक करण्याची वेळ यापूर्वीही आली. त्या वेळी दाखवलेला सामूहिक शहाणपणा या परिषदेत दिसून आला नाही. त्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेला जोखडबंद करण्याच्या नावाखाली यांच्याच बुद्धीतून उद्भवलेला भीतीचा कृत्रिम भस्मासुर अधिक विध्वंसक ठरू शकतो.

Story img Loader